अक्षरधन हे प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांच्या वठलेल्या आणि अनुभवसिद्ध लेखन-शैलीतून साकार झालेले पुस्तक. पूर्वी त्यांचे लेखन आजचा सुधारक आणि वृत्तपत्रे यांमधून नियमित प्रकाशित होत असे. माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकरूपाने आलेले अक्षरधन हे त्यांचे पहिले प्रकाशन. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रा. कुळकर्णी ह्यांचा लौकिक बराच झाला असला तरी साहित्यिक म्हणावे इतकी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर नाही. आपल्या अविस्मरणीय शिक्षकांना वाहिलेली आदरांजली शब्दबद्ध करणारे अक्षरधन हे भावानुबंध प्रा. कुळकर्णीनी येथे सादर केले आहेत.
ललित लेखक ज्यावेळी स्वतःचे अनुभव शब्दांकित करतो तेव्हा त्या लिखाणाचा अर्थ प्रथम-वाचनातच सामान्य वाचकाला उमगत नसेल तर लेखकाची लेखनशैली, विषयाची अभिव्यक्ती ही कृतक आहे आणि ती त्याच्या अनुभवांशी प्रामाणिक नाही असे खुशाल समजावे. असा लेखनकर्मी केवळ शब्दाळ असतो. तेथे भावाचा अभाव असतो. या समीक्षा-तत्त्वाच्या निकषावर प्रा. कुळकर्णीचे हे भावलेखन हमखास उतरते. पुस्तकाची लेखनशैली, लघुगद्याने आविष्कृत झालेली आहे. कोठेही कृत्रिमता नसून ती अत्यंत सुबोध, ओघवती आणि सहजसुलभ वठली आहे. कारण आपण विद्यार्थी म्हणून कसे घडत गेलो त्याची वार्ता त्यांनी प्रामाणिकपणे शब्दबद्ध केलेली आहे. ह्याअर्थी अक्षरधन हे प्रा. प्र. ब. कुळकर्णी ह्यांचे शैक्षणिक आत्मचरित्र असू शकते.
आत्मचरित्रात ‘अहम्’ चे प्रत्यय पानोपानी उमटलेले असतात. पण प्रा. कुळकर्णीनी त्यांच्यातील अहम् ज्यांनी संस्कारित केला अशा व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून, ‘मी’ला लागणारे विभक्तिप्रत्यय गाळलेले आहेत. आत्मचरित्राचा लेखक त्याच्या जीवनाच्या प्रवासात भेटलेली व्यक्तिमत्त्वे ‘मी’च्या अवतीभवती फिरवितो. त्यात अहंकाराचे स्फुरण हेतुपुरस्सर असते. या दृष्टीने विचार करता हे शैक्षणिक आत्मवृत्त प्रा. कुळकर्णीनी निरहंकारी वृत्तीने लिहिलेले आहे. गोवर्धन नावाच्या खेड्यापासून या लेखकाची अक्षरसाधना सुरू होते, सुखदुःखमिश्रित अशा आठवणींची ती अभिव्यक्ती असते. पण या कथनातही त्यांनी स्वतःच्या बालपणातील अडचणी वाचकांच्या उंबरठ्यावर आणलेल्या नसून त्यांना विद्येची गोडी लावणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता ग्रहणशील भावनेने अकृत्रिम शैलीत प्रकट केलेली आहे. जीवनातील चढणीच्या प्रवासात ज्या शिक्षकांनी या लेखकाला वरच्या पायरीवर पाय ठेवण्यासाठी आधार दिला अशांची, सामान्य वाटणारी पण वस्तुतः असामान्य व्यक्तिमत्त्वे त्यांनी क्रमशः अक्षरबद्ध केलेली आहेत. प्राथमिक वर्गापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ती त्यांनी क्रमवार मांडली आहेत.
सुरुवात होते गोवर्धनच्या प्राथिमक शाळेतील मुळाक्षरे घोटून घेणाऱ्या सुर्वे गुरुजींपासून. शेवट होतो पोरगा सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक झाला हे बघून कृतकृत्य झालेल्या आणि समाधानाने जगाचा निरोप घेणाऱ्या लेखकाच्या मायपाशी. पहिल्या आणि अखेरच्या व्यक्तिमत्त्वांमधील रिकाम्या जागा भरून काढणारे अनेक महाभाग अक्षरधनचे नायक असून ते सारे तसे सामान्य आहेत. सामान्य या अर्थाने की त्यांच्या मागे समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रातील प्रसिद्धीची बिरुदे आणि प्रतिष्ठा नाही, पण ध्येयवादी म्हणून ते असामान्यच.
अक्षरधनचा लेखक हा तसा जन्मापासून अभावग्रस्त असला तरी अभागी नाही. चाकोरीबद्ध जीवनाच्यावाटेवर अनेक सामान्यांपैकी तो एक सामान्य जीवन जगू शकला असता. पण उच्चविद्याविभूषित होण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आर्थिक स्थिती तर अनुकूल नव्हतीच पण लेखक हा परिवारात असूनही एकटा होता. तरी अक्षरधनात आपल्या आप्तांसबंधीच्या निवेदनात अप्रीती नाही, कटुता नाही. त्याच्या अगतिकतेची बोचक कहाणी त्याने रोचक केली आहे. तात्पर्य आपल्या शैक्षणिक प्रवासातील आपदांवर मात करण्यात त्याने जी हलाखी भोगली त्याचा आकांत नाही, आहे तो गुरुजनांचा गुणगौरव या दृष्टीने त्याचे प्रयत्न वाचकाला प्रेरणादायी ठरतात.
अक्षरधन या पुस्तकाच्या या समीक्षणापेक्षा लेखकाने स्मरणचित्रांची म्हणून जी प्रस्तावना लिहिली आहे, ‘तटस्थ वृत्तीने, निर्लेप राहून’ जी समीक्षा केली आहे ती अधिक अर्थपूर्ण आहे. त्यात त्यांनी गुरुऋणविषयक सूत्र मांडले आहे. प्रा. कुळकर्णी लिहितात—- “माझी पक्की खात्री आहे की चांगले शिक्षक तुम्हाला पुनर्जन्म देणाऱ्या डॉक्टरइतकेच दुर्मिळ आहेत. शिक्षक हा आपला दुसरा जन्मदाता असतो. एखादे सुर्वे गुरुजी जीव ओतून कर्तव्य का करतात? तुमच्या ठिकाणी एका सुखार्थी ‘स्व’ बरोबर एक उदात्ताकडे झेप घेणारा ‘स्व’ असून त्याचा तर हा आविष्कार नसेल?” सामान्यांतील अशा उदात्ताने प्रेरित झालेल्या ध्येयवादी शिक्षकांची व शिक्षणप्रेमींची संस्मरणे अक्षरधनात प्रा. कुळकर्णीनी चितारली आहेत. आपल्या यशस्वी जीवनाच्या उत्तरार्धात कृतांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्याच्या विनम्र वृत्तीने अक्षरबद्ध केलेली आहेत. या व्यक्तींपैकी आज अनेक जण आपले गुणगान वाचण्यासाठी जिवंत नाहीत. जे आहेत त्यांना त्यांच्या जीवनात कृतार्थ झाल्याचे समाधान लेखकाने दिलेले आहे हे खास.
अक्षरधन या पुस्तकात ज्या गुरुजनांची चरित्रे, ज्यांचे कर्तृत्व आणि उपलब्धी प्रा. कुळकर्णीनी शब्दांकित केलेली आहेत ते स्थलकालाशी संबंधित असून सामान्य जीवन जगणारे सद्गृहस्थ आहेत. पण या सामान्यांचे कर्तृत्व आणि कार्य ज्यावेळी व्यक्तिनिरपेक्ष होते त्यावेळी त्यांच्यातील गुणवत्तेची सीमा व्यक्तीपुरती संकुचित न राहता ती स्थलकालातीत होत जाते. तिला एक प्रकारचा सार्वत्रिकपणा आणि विशालता प्राप्त होते. या सामान्यांचे व्रत आणि वृत्ती असामान्यत्वाचे प्रातिनिधित्व करतात हे जर लक्षात घेतले नाही तर प्रा. कुळकर्णीच्या लेखनामागचा हेतू कळला नाही असे म्हणावे लागेल.
अक्षरधन या पुस्तकातील अनेक व्यक्ती माझ्या परिचयाच्या आहेत. उदा. प्रा. दि. य. देशपांडे, प्रा. मे. पुं. रेगे ह्या व्यक्तिमत्त्वांविषयी मला सकारण आदर आहे. प्रा. रेगेंना मी एखादे वेळी बघितले आहे. प्रा. दि. य. देशपांडे ह्यांचेशी माझा मधूनमधून सुसंवादही झाला आहे. प्रा. नातू मॅडम ह्यांचे मला फक्त नाव तेवढे माहीत. प्रा. मुरकुटे माझ्या तीर्थरूपांचे चांगले मित्र. अक्षरधनातून या व्यक्तींची ज्ञानसाधना, त्यांची जीवननिष्ठा ह्या संदर्भात जो परिचय प्रा. कुळकर्णी ह्यांनी करून दिला त्यामुळे त्या व्यक्तींविषयीचा माझा आदर द्विगुणित तर झालाच पण जे आता या जगात नाहीत त्यांचेशी संवाद होणे नाही, ही जाणीव तेवढीच व्याकुळ करणारी ठरली.
सुखे नाकारणाऱ्या लढाईतील एक लढाऊ शिक्षक कै. बाबुराव पुराणिक ज्ञानवंत होते. उत्तम वक्ते होते. प्राध्यापक होते. पण प्रसिद्धीच्या क्षेत्रात पहिल्या रांगेत जागा पटकाविण्यासाठी जो धूर्तपणाचा अवगुण आवश्यक असतो तो त्यांचे ठायी नसावा. अशी माणसे प्रसिद्धिपराङ्मुख राहतात. जीवनाच्या शेवटी क्वचित् उदास वाटणाऱ्या बाबुरावांचे व्यक्तिचित्र वाचल्यानंतर असे जाणवते की ध्येयवाद आणि व्यवहार ह्यांची सांगड घालणारा पंडितजींसारखा मार्गदर्शक कुळकर्णीना लाभला तसा बाबुरावांच्या संस्कारक्षम वयात त्यांना लाभला असता तर? काही व्यक्तींच्या तरुणपणीची उभारी नंतर नैराश्यात लुप्त झालेली असते.
कै. दादा जोशी हा प्रा. कुळकर्णी ह्यांचा संघशाखेचा शिक्षक. त्याचा आपला सुतराम संबंध नसतो. पण दादा जोशींवरचा लेख वाचत असता कळते की तो बसच्या अपघातात ऐन तारुण्यात मरतो. पण या लेखाशी माझी वाचकाची वृत्ती इतकी तादात्म्य होते की कालचक्राची गती उलटी होते आणि ४५ वर्षांपूर्वीच्या कालखंडातील ही कारुण्यपूर्ण घटना वाचली की मी आज माझे डोळे पुसतो. कारण व्यक्तिचित्रणाशी तादात्म्य उत्पन्न करण्याचे सामर्थ्य प्रा. कुळकर्णीच्या लेखनशैलीत असते. लेखांची शीर्षके ही काव्यात्म असली तरी गद्यलेखन मात्र लघु वाक्यांच्या सुबोध वळणाचे असून ओघवते आहे. भाषेच्या अलंकृतीचा मोह त्यांनी टाळला आहेच पण वयोपरत्वे येणारा लेखनातील पाल्हाळ यापासून ते मुक्त आहेत.
तात्पर्य, एका सामान्य ग्रामीण परिवारातील महत्त्वाकांक्षी तरुणाला आपले शैक्षिणक ध्येय गाठण्यासाठी ज्या व्यक्ती आणि संस्था ह्यांनी प्रेरणा दिली आणि प्रकाशाची वाट दाखविली त्या सर्वांचे स्मरण आपल्या सघन आयुष्याच्या उत्तरार्धात जाणीवपूर्वक जन्मभर कृतज्ञतेच्या भावनेने जे जोपासले त्याची साक्ष देणारे अक्षरधन हे पुस्तक आहे. कारण त्यातील व्यक्ती ह्या प्रातिनिधिक आहेत. मृत्युशय्येवर असणाऱ्या, अनंताचा वेध घेणाऱ्या मातेने जे लेखकाला सांगितले की “अण्णा, तुला सारी सुखे मिळाली, आणखी मिळतील पण आई मात्र मिळणार नाही.” त्यावेळी का कुणास ठाऊक, जिच्याशी माझे फारसे पटले नाही ती माझी आई माझ्यासमोर सजीव होऊन माझे कौतुक बघते आहे असे होते. मग मी माझा गहिवर आवरू शकत नाही. आणि तेथे हे पुस्तक संपलेले असते!
ता.क. मुखपृष्ठावरील गर्द छायांकित वटवृक्ष इतका सजीव वाटतो की त्या रंगच्छायेत काही काळ विसावा घ्यावा. मुद्रण छान आहे. अंतर्बाह्य सुंदर असणारे प्रा. कुळकर्णीचे हे पहिले पुस्तक आहे. त्याला विदर्भ साहित्य संघाचा विशेष पुरस्कार नुकताच जाहीर झाला हे योग्यच आहे. तो पुढील प्रकाशनासाठी स्फूर्तिदायक ठरावा एवढीच अपेक्षा.
अक्षरधन, पृष्ठसंख्या १५७, मूल्य : १५० रु. प्रकाशक : आनंद प्रकाशन, भगवागर काँप्लेक्स, नागपूर-१० मुखपृष्ठ : भाऊ दांदडे, नागपूर