बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यूयॉर्क येथील अधिवेशनात ख्यातनाम साहित्यिक-नाटककार विजय तेंडुलकर यांनी अध्यक्षपदावरून एक भाषण केले. त्यावर महाराष्ट्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी दैनिकांमधून अमेरिकेतील भाषणाचे जे त्रोटक वार्तांकन झाले त्यावर विसंबून आपल्याकडे टीकाटिप्पणी होत आहे. त्यामुळे तेंडुलकर ज्या मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छित आहेत त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष होताना दिसत आहे. कान बंद ठेवून ऐकण्या-वाचण्याचे हे भाषण नव्हे. म्हणूनच संपूर्ण भाषण आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. ते वाचावे आणि मग ठरवावे की या भाषणाचे काय करावे.
आता औदार्य —- तसे म्हटले तर हा विषय याआधीच्या विषयापासून—उपकारापासून-तसा वेगळा नाही. म्हणूनच दोन्ही एकत्र मनाशी आले असावेत. औदार्याला आपण कधी तरी आर्थिक औदार्याशी बांधून टाकले. देणग्या देतो तो उदार. भरपूर दानधर्म करतो तो फारच उदार. औदार्यमूर्ती. दानशूर. याचा अर्थ आपल्या नकळत असेल पण कळतही असू शकेल — ज्याच्याकडे देण्यासाठी भरपूर असते — अर्थात पैसा आणि मालमत्ता — तोच दानशूर आणि उदार होऊ शकणार हे ठरले. किंबहुना पैसे देणे हे औदार्य अशी व्याख्या बनली. औदार्य ही केवळ देण्याची कृती नसून ती जगण्याकडे बघण्याची समग्र वृत्ती आहे हे आपण विसरलो. जगताना दुसऱ्यांचा विचार, समग्र सृष्टीचे भान, त्यामुळे होणारी आपल्या छोटेपणाची जाणीव मनाशी ठेवून नैसर्गिक नम्रतेची वागणूक, याचाच भाग म्हणून आपल्याजवळ असलेले वाटून उपभोगणे, कुणी न मागता त्याची गरज समजून देणे, त्याविषयी न बोलणे आणि मुख्यतः आपल्याला हवे म्हणून, दुसऱ्याचे हिसकावून न घेणे ही औदार्याची महत्त्वाची अंगे आपण विसरलो. देण्यात जसे औदार्य आहे तसे दुसऱ्याचे न घेण्यातही आहे. याकडे आपण सोयिस्कर दुर्लक्ष केले. दुसऱ्याचे न घेणे आणि देणे ही दोन्ही
औदार्याचीच लक्षणे आहेत हे आज आपण मानत नाही. कोणत्याही मार्गांनी दुसऱ्याचे घेणे हा एका बाजूला संतांच्या भाषेत ‘वेवहार’ झाला आहे आणि देण्यासाठी ज्यांच्या संग्रही उदंड आहे त्यांनी त्यातले थोडे देणे हे नवे औदार्य ठरले आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. संत हे उदारांचे उदार होते हे विसरून श्रीमंत दानशूरांना आपण नवे उदार मानले आहे. दानाची आपली व्याख्या, कशाही मार्गांनी आधी भरपूर मिळवून मग सुस्थिर झाल्यावर मूळ भांडवल राखून त्यातले काही देणे — तेही टॅक्स माफ होत असेल तर, अशी उत्तम वेवहारी झाली आहे. यात आपल्याला कोणतीही तोशीस लागणार नाही. आपली जीवनपद्धती बिनसणार नाही, याची काळजी आर्थिक सल्लागाराच्या सल्याने आधी घेण्याचा सावधपणा आपल्या औदार्यात आला आहे. आपल्या काळातला दानशूर असा आहे. संतांची आपण सुट्टी केली आहे. नशीब, तुकाराम महाराजांनी किती देणग्या दिल्या होत्या याची चौकशी अजून आपण करीत नाही.
आजचा आपला राष्ट्रीय संत अंबानी आहे. जो केवळ गरिबांनाचा देत नाही तर आजचे नवगरीब नोकरशहा, लोकसभा सदस्य, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही नियमित दान करीत असतो. जो जे वाच्छील तें तें देणारा तो आजच्या काळातला नव-परमेश्वरच आहे. हे मी अंबानी आणि मंडळीविषयी-म्हणजे त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या हुशारीविषयी आणि यशाविषयी आदर ठेवूनच म्हणतो आहे. यात असूया तर असणेच शक्य नाही कारण अंबानीच्या बुटाशीही बसण्याची माझी आर्थिक लायकी नाही याची जाणीव मला आहे. मनात त्याच्या उंची जीवनशैलीविषयी बारीकशी असूया आहे, नाही असे नाही. किती झाले तरी मीही या चंगळवादी काळाचाच भाग आहे. मराठी लेखक असलो तरी बाजारात सर्व नवनव्या सुखसोयी आणि गॅजेट्स यांचे आकर्षण मला आहेच. जमत नाही ते लेखक म्हणून अंबानीच्या गुड बुक्समध्ये कसे शिरायचे आणि त्याचे औदार्य पदरात कसे पाडून घ्यायचे. पत्रकार असतो तर हे शक्य होते. तुकारामाचा काळ संपला आणि तो पुन्हा येणार नाही हे मीही मानतो. माझे म्हणणे इतकेच आहे की, औदार्यासारख्या समग्र शब्दाला आपण दानधर्माच्या संकुचित चौकटीत बंद करून टाकले आहे पण तो तसा नाही. ती जीवनिवषयक एक समग्र दृष्टी आहे. माणूस नव्हे तर समग्र जगणे श्रीमतं बनवणारी ही जादूची कांडी आहे. अंबानी ओघाने आला, पण आपलेच उदाहरण घेऊ.
काही वर्षांपूर्वी एका अनाथाश्रमात गेलो होतो. तिथे दर्शनीच अनेक पाट्या लटकत होत्या. त्या देणगीदारांच्या नावाच्या होत्या. कधी न ऐकलेली नावे. कुणी आई-वडिलांच्या स्मृत्यर्थ तर कुणी आपल्याच नावे छोट्या छोट्या रकमा देणगी म्हणून दिल्या होत्या. अज्ञात नावांनी भिंत भरली होती. वाचताना कौतुक वाटले. दानाची प्रवृत्ती या थरातही होती. पोटार्थी जगताना या लहान माणसांचे औदार्य तुलनेने कठीण. माझ्याकडे कोट्यवधी असतील आणि रोज आणखी जमा होत असतील तर त्यातले लाखो देणे म्हणजे माझ्या डोक्यावरच्या विपुल केशसंभारातले दोन केस उपटून देण्यासारखे. पण माझ्या डोक्यावर टक्कल आहे. मग त्यावरच्या थोड्याश्या केसांतला एक देणे म्हणजे औदार्याची कमाल. आपल्या छोट्या मिळकती-तून काही रक्कम—मग ती कितीही असे ना– बाजूला काढून ती त्यांनी संस्थेला दिली होती याचे कौतुक अंबानीच्या दातृत्वापेक्षा मला खूप वाटले. यातले कुणी तर निवृत्त असतील. सिंगल बेडरूमच्या फ्लॅटमध्ये आयुष्यभर राहून काटकसरीने जगलेले असतील. अंबानीचा उत्तम वेवहार करून नव्हे तर काटकसर करून, हौसा मौजा टाळून ते दानशूर बनले होते. त्यांची नावे एका संस्थेच्या दर्शनी भिंतीवर लागली होती. याशिवाय गावी देवळांच्या जीर्णोद्धारासाठी नाही तर शाळेच्या जास्तीच्या बांधकामांसाठी देणग्या दिलेले, स्मशानाच्या नवीनीकरणासाठी काही झाडांसाठी देणगी दिलेले, रुग्णालयात नवा वॉर्ड बांधण्यासाठी आईवडिलांच्या स्मृत्यर्थ देणगी दिलेले असंख्य अनामिक उदार मला जाईन तिथे नावारूपाने भेटले आहेत. आणि मी नम्र झालो आहे. औदार्याची एक मोठी परंपराच महाराष्ट्राला असल्याचा साक्षात्कार अशा वेळी मला झाला आहे. आणि प्रश्न पडला आहे, हे सर्व पाट्या लावून कायमचे जाहीर करण्याची गरज या सर्वांना का वाटली असेल? आपण अनामिक असलो, तर पाटी वाचूनही कुणा लेखी फरक पडत नाही आणि नामवंत असलो तरी पाटीने त्यात कोणती नवी भर पडते? पाटी लावून, ती लावण्याची व्यवस्था करून आपले दातृत्व अमर करण्याची अशी इच्छा या दात्या मंडळींना का होत असेल? यात कोणता विरळा आनंद किंवा सार्थक असेल? मला याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
त्यातही, देण्याचे पुण्य न घेण्याच्या संयमाइतकेच मोठे आहे. देणे जमले नाही तरी हरकत नाही, पण घेण्याचा मोह आवरणे महत्त्वाचे आहे हे या मंडळींना कळले असेल का असाही विचार मनात येऊन गेला आहे. समाजाला अनेक मार्गांनी देता येते हे त्यांना कुणी सांगितले असेल का असाही प्रश्न पडला आहे. मुळात देणे हा आर्थिक व्यवहार आहे ही गैरसमजूत त्यांच्यात कुणी रुजवली? देणे विशाल आहे. अनेकांगी आहे. मी माझा व्यवसाय सचोटीने केला तरी त्यातून समाजाला काही मिळते; मी भेटणाऱ्या माणसांना इतर मदत केली, त्यांच्या उपयोगी पडलो तरी समाजाला माझा हातभार लागतो; मी पैशांनी नव्हे तर कामाने एखाद्या संस्थेला हातभार लावला तरी ते दातृत्वच आहे, औदार्य आहे; हे आपण का मानीत नाही? शाळेच्या दात्यांच्या यादीत विद्यार्थीप्रिय शिक्षकाचे नावे का नसावे? त्याने देणगी दिली नाही म्हणून? बदल्यात शाळेने त्या शिक्षकाला काय दिले? किती पगार दिला? तो तरी वेळच्या वेळी दिला? मुलांवर प्रेम केलेल्या प्यूनचे नाव शाळेच्या दर्शनी भागात का कुठे लिहिलेले असू नये? त्याला शाळेने पोटापुरता पगार दिला तो इतर कामांसाठी, पण त्याने शाळेत येणारी मुले आपली मानली आणि त्यांना जपले हे विशेष नाही? माझ्या प्राथमिक शाळेचा प्यून असा होता. शिक्षकांचे निरोप-समारंभ झाले. देणगी देणारांचे नाव शाळेला समारंभपूर्वक देण्यात आले पण हा प्यून निवृत्त झाला तेव्हा त्याच्यासाठी शाळेत निरोप-समारंभ झाला नाही. एक दिवशी तो येईनासा झाला. कारण त्याने दिले ते शाळाचालकांच्या लेखी दान नव्हतेच. दान म्हणजे देणगी. पैसा.
मी स्वतः लेखक आहे म्हणून नाही, एरवीच विचारतो, समाजातला कलावंत आणि लेखक समाजाला काही देत नाही काय? ते देणे आर्थिक नव्हे म्हणून कमी प्रतीचे असते काय? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे माझ्या लेखी दानशूर होते. महाराष्ट्राला त्यांनी आपल्या विनोदाने आणि एकपात्री प्रयोगांनी जो अपार आनंद दिला त्यामुळे त्यांचे दातृत्व तुलनेने दुय्यम आहे असे मी, त्याचे महत्त्व कमी न मानता, म्हणतो. त्या आनंदाची तुलना आर्थिक देणग्यांशी कशी होणार?
कुसुमाग्रज उदार होते ते नाशिक शहराला त्यांनी जे सांस्कृतिक नेतृत्व दिले त्यासाठी. नाशिकमधल्या गोरगरीबांचे ते हक्काचे आधार होते. ते उदार होते महाराष्ट्राला त्यांनी जी कविता दिली तिच्यामुळे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान ते न काढते तरी ते उदार आणि दानशूर होतेच.
माझ्या मते संत अंबानीलाही जमले नाही आणि कधी जमणारही नाही असे दातृत्व असलेले हे उदारांचे राजे होते. महाराष्ट्राला यांच्या ऋणातून कधीही मोकळे होता येणार नाही. पण मुळात महाराष्ट्रावर हे ऋण या दोघांनी कधी ठेवलेच नाही.
फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल असे मानण्याची विरळा नम्रता या दोघा दात्यांकडे होती. तरी मला या दोघांबाबतीत एक शंका आहेच. आपल्या नावे एक फौंडेशन आणि प्रतिष्ठान स्थापन करण्याची गरज यांना का वाटली असावी? दोघे शब्दप्रभू, संस्थेसाठी एखादे दुसरे सुंदर आणि अर्थपूर्ण नाव यांना का सुचले नाही? तात्पर्य : दातृत्वाची व्याख्या आपण विस्तारण्याची गरज आहे. ते केवळ आर्थिकच नाही. ज्ञानदान हा परंपरेतलाच दानाचा प्रकार आपण का विसरत चाललो आहोत? ग्रहणात तर रस्त्यावरून फिरणारे भिकारी पूर्वापार वस्त्रदान, तांबेदान असे दानाचे किती प्रकार ओरडतात! दान म्हणजे देणे, उलट अपेक्षा न धरता दुसऱ्यासाठी काहीतरी करणे. जे शक्य असेल ते द्या पण निरपेक्ष होऊन द्या! उलट काही मागू नका. खरे तर दिले हेही विसरून जा. कुणी विचारील. मग द्यायचे कशाला? शक्य तर देऊच नका. तुम्ही न दिलेत तर बिघडणार नाही. तुम्ही भीक नाकारलीत तर रस्त्यावरचा भिकारी उपाशी मरत नाही. तुम्ही देणगी दिली नाहीत तर कोणतीही संस्था बंद पडत नाही. तुम्ही मदतीला गेला नाहीत तर जगाचे काहीही अडत नाही, जग चालत आले तसे चालत राहील. देणे ही तुमची गरज असेल तर द्या. दिले नाही तर तुमची झोप बिनसणार, घास अडणार असेल तर द्या. जे करायचे ते तुमचे त्याविना अडत असेल तर करा. बाकी कुणाचे अडत नाही हे समजून घ्या. तुम्ही नाही तर आणखी कुणी ते करील. कुणीच काही केले नाही तरी जे चालू आहे ते चालूच राहिल. समजा बंद पडले. पडू दे. एखादे झाड मेल्याने जंगल संपत नाही, ते वाढतच असते. दुसरी झाडे उगवत आणि वाढतच असतात. जंगल वाढवायला कोण जाते? पाऊस पाडायला, फुले फुलवायला, सूर्य वर आणायला आणि तो रोज खाली घालवून रात्र पाडायला कोण जाते? काहीतरी नष्ट होत असते आणि त्याच वेळी काहीतरी वाढत असते. सृष्टीची ही व्यवस्था आहे. आपण या सृष्टीतले कण आहोत.
कण असू तरी यःकश्चित् नव्हेत. आपले महत्त्व आपण मानायचे. संत नसू तरी संतासारखे ‘आम्ही दुनियेचे राजे’ अशा विशुद्ध आनंदात असायचे. हा सगळा पसारा आपल्यासाठी आहे, आपण म्हणजे माणसे-ह्यूमन स्पेसीज-या सृष्टीचे कर्ते करविते आहोत अशा छान भ्रमात जगायचे. आपण आपल्यापुरती जागा निर्माण करायची. दुसऱ्याला न लुबाडता इथले सुखोपभोग घ्यायचे. आनंद लुटायचा. समाधान शोधायचे. म्हणून जगायचे, जे करायचे ते करायचे. काय करायचे ते आपणच ठरवणार. मात्र ते कुणावर उपकार नसावेत. त्यामागे पाटीचा, नावाबिवाचा आग्रह नसावा. म्हणजे शक्य तो नसावा, पण कुणाला त्यातच सुख असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. शेवटी आपण गेल्यावर नाव राहिले काय आणि न राहिले काय, काही फरक पडतो काय? अशी खूप नावे या पृथ्वीच्या पाठीवर अट्टाहासाने कोरलेली आपल्याला दिसतील पण त्यांचे मालक ती वाचायला कुठे राहिले? आणि यातली अनेक नावे वाचावी लागतात तेव्हा वाचणारे चौकशी करतात, कोण हो?
मुंबईत व्ही.पी.रोड आहे. तो मुळात विठ्ठलभाई पटेल रोड होता. एम.जी. रोड आहे तो महात्मा गांधी रोड. पण आज कुणाला तो या पूर्ण नावाने माहीत नाही. एल.टी.रोड, एल.जे.रोड, अशा अनेक रस्त्यांवरून आज असंख्य माणसे, हा कुणाचा रस्ता असे न विचारता बिनदिक्कत चालतात. पूर्वी मुंबईत सँडहर्स्ट रोड होता. मला कळू लागले तेव्हापासून त्याला संडास रोडच म्हणत. बिचारा सँडहर्स्ट साहेब! कारमायकेल रोड होता. त्याचे नाव बदलण्याचा प्रश्न आला तेव्हा तो कोण हे महानगरपालिकेच्या संबंधित खात्याला काही केल्या सापडेना. मग नाव बदलण्याच्या समारंभात नवे नाव होते बाबासाहेब डहाणूकर रस्ता. भाषण करणारे महापौर बोलता बोलता डहाणूकर ऐवजी बाबासाहेब आंबेडकर म्हणू लागले ते अखेरपर्यंत. काही चुकते आहे हे कुणालाच कळले नाही.
नावाच्या पाट्यांचे आणि पाट्यांवरच्या नावांचे हे भवितव्य. म्हणून माझा मित्र शहाणा. जवळ असतात आणि कुणाला तरी गरज आहे म्हणून पैसे देऊन मोकळा होतो. नो हिशेब ठिशेब. नगि. बोलीच नाही. अटी नाहीत. पाटी नाही. पावती नाही. व्याप नाही. आपण मोकळे. आपला आनंद देण्यातला. कुणाची तरी गरज भागवण्यातला. कुणी व्यवहार म्हणून पावती देऊ लागले तर तो ती घेऊन तिथल्या तिथे फाडतो आणि फेकतो. जरा जास्तच मोठे तोंड करून बोलतो आहे का? माहीत नाही. पण मनात आलेय तर बोलून टाकतो.
उपकार आणि औदार्य यांना जोडून आपल्या समजुतींच्या संदर्भात आणखी एका मूल्याचा विचार मनात येतो. हे मूल्य: त्याग
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र प्रयत्नांच्या काळात शब्द कधी तरी चलनात आला आणि बघता बघता स्वस्त झाला. स्वातंत्र्यपूर्व काळातले क्रांतिकारक आपली आयुष्ये तळहातावर घेऊन मरणाच्या छायेत जगले आणि त्यातल्या अनेकांना अनन्वित छळ—-शारीरिक आणि मानसिक–भोगावा लागला. हौतात्म्य पत्करावे हे क्वालिफिकेशन झाले आणि दे.भ. किंवा देशभक्त ही पदवी तुरुंगात जाऊन आलेले स्वतःला लावू लागले. हे बिरूद त्या काळात बघता बघता इतके सवंग झाले की त्या काळातच त्याची चेष्टा होऊ लागली.
याबरोबर त्याग या मूल्याचेही अवमूल्यन कळत आणि नकळत झाले. देशासाठी त्याग असा शब्दप्रयोग सहजपणे आणि विचार न करता केला जाऊ लागला. या त्यागाची वसुलीही केली जाऊ लागली. देशातल्या पहिल्या निवडणुकांत—-संपूर्ण स्वातंत्र्य मिळण्याआधी या झाल्या—-तिकिटे मागणारांच्या भाऊगर्दीत असे तुरुंग-त्यागी मोठ्या संख्येने होते. तुरुंगात गेले म्हणून त्यांना तिकिटावर त्यांचा हक्क आहे, असे वाटत होते. हा त्याग क्रांतिकारकांचा त्याग नव्हता. हा आपल्या छोट्या आयुष्यातले असले नसले स्वास्थ्य झुगारून चळवळीत उडी घेणारा सामान्य माणसाचा वेडा त्यागही नव्हता. असा वेडा त्याग त्या काळात असंख्य छोट्या माणसांनी केला. हा शहाणा त्याग होता. हिशेबी होता, ज्यात काहीच पणाला न लावता त्यागाची किंमत वसूल करण्याची व्यवस्था होती. आपले घरदार, जायदाद, व्यवसाय असे सर्व सुरक्षित राखून माणसे त्याग नावाचे नाटक फावल्या वेळात खेळू लागली. या नाटकी त्यागाचा दावा तपासणे समाज म्हणून आपण सोडले आणि त्यागाचा देखावा किंवा नाटक टिकू देऊ लागलो.
हे नाटक आम्ही स्वीकारले नाही हा युक्तिवाद पुरेसा नाही. या कृतक त्यागाचे पांघरलेले कातडे खेचून त्याआतला स्वार्थ आणि हुषारी उघडी करणे आम्ही तेव्हा करायला हवे होते ते केले नाही. पुढे स्वातंत्र्य मिळाले. गांधींच्या चळवळी आणि त्यांचा भाग म्हणून घडणाऱ्या तुरुंगयात्रा बंद पडल्या तरी तुरुंगात जाणे या कल्पनेविषयीचा आपला स्वातंत्र्यपूर्व आदर आजही तसाच टिकून आहे. अगदी अलीकडच्या काळात इंदिरा गांधींच्या आणीबाणीत ‘अ’ वर्गात घरचे अन्न खाऊन वाचन लेखन आणि गप्पाटप्पा करीत जगलेल्यांनीही स्वतःला त्यागी मानले आणि आपण ते बिनशर्त मान्य केले. जुन्या क्रांतिकारकाचा अनन्वित छळाचा तुरुंगवास, बाहेर निराधार कुटुंब ठेवून ‘क’ वर्गात खितपत पडलेल्यांचा तुरुंगवास हा नव्हे, हा तर ‘माहेरवास’ हे आपण लक्षात घेतले नाही.
‘त्याग’ या मूल्याचे अवमूल्यन जे एकदा सुरू झाले ते अजून चालू आहे. मुळात, समाजाच्या दृष्टीने खरोखरी त्यागी म्हणता येईल अशा माणसांचे मन आधी समजावून घेणे आवश्यक आहे. माणूस त्याग करतो म्हणजे, स्वतःपलीकडे जाऊन इतरांसाठी, समाजासाठी काहीतरी करतो. पण स्वतःचे मन मारून तो हे करतो असे दिसत नाही. तसे त्याने केले तर फार काळ तो त्याच्या कार्यक्षेत्रात टिकत नाही. तो जे करतो ते करण्याची इच्छा त्याच्या मनात केव्हापासून वाढत असते. कधी तरी ती अनावर होते. मनात असलेले केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही आणि तो ते करून मोकळा होतो. त्याचा त्याग ही त्याची गरज असते. त्याचीच गरज तो त्याग कसा काय? तो तर त्याचा स्वार्थ. इथे आपण दचकू. पण स्वार्थ हा जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा स्वभावधर्म असतो आणि त्यात काहीच गैर नाही. हे इथे लक्षात घेतले पाहिजे. फक्त कुणाचा स्वार्थ कशात तर कुणाचा आणखी कशात असू शकतो आणि असतोच. स्वार्था-स्वार्थात फरक आहे. स्वतःपुरताच राहतो तो क्षुद्र स्वार्थ, दुसऱ्याचे, समाजाचे हित ज्याने साधते तो मोठा स्वार्थ. ज्यांना आपण त्यागी म्हणतो ती मंडळी ही अशी मोठ्या स्वार्थासाठी आयुष्य वेचणारी असतात आणि म्हणून ती महत्त्वाची
असतात. मग त्यांना त्यागी का म्हणायचे? म्हणू नये असे मी म्हणेन. ती वेगळी असतात. महत्त्वाची असतात. आपल्या उपयोगाची असतात. इतकेच आपण म्हणावे आणि त्यांच्यासाठी जमेल ते करावे. उपकार किंवा औदार्य म्हणून नव्हे तर आपला स्वार्थ म्हणून करावे. आपण करायची ती कर्तव्ये आपल्या वतीने अनेकदा ती करतात त्यासाठी त्यांची कदर करावी. तेही आपल्यावर उपकार करतात असे मानण्याचे कारण नाही. ते जे करतात ते स्वतःची गरज म्हणूनच करतात. तेव्हा मी म्हणेन की हे त्याग नावाचे मूल्यही आपण मोडीत काढले पाहिजे.
समाजाने स्वतःच्या हितासाठी सामाजिक कामे करणारांना जगवले पाहिजे, त्यांची कामे जगवली पाहिजेत. कामे करणारे समाजावर उपकार करतात हे खोटे आणि या उपकारांची परतफेड समाजाने करायची असते म्हणून समाजाने या कामांना उदार होऊन नावाच्या अटी-सह किंवा अटीविना मदत केली पाहिजे हेही खोटे. खरे हे की, समाजाच्या स्वार्थासाठी आणि स्वास्थ्यासाठी समाजाने या माणसांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांची कामे जगवली पाहिजेत. हे समाजाचे म्हणजे तुमचे माझे स्वार्थी कर्तव्य आहे. तर मनातले मुद्दे बोलून झाले.
भाषणाचा लेख करताना परिच्छेद व शुद्धलेखनातले बदल तेंडुलकरांच्या परवानगीने केले आहेत.
बद्रीधाम, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पू.) मुंबई — ४०० ०५७