खांडववन
भारतातील सर्वांत जुने मानवसदृश प्राण्यांचे जीवाश्म (fossils) आहेत १.३ कोटी वर्षांपूर्वीचे. सत्तरेक लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्राणी वावरत. मग मात्र त्यांचे अवशेष सापडत नाहीत. ज्यांना मानव म्हणता येईल अशा प्राण्यांचा भारतातला इतिहास सुमारे सात लाख वर्षांपूर्वी सुरू होतो. तेव्हापासून ते दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात भारतभर छोटे छोटे संकलक गट पसरले. या गटांच्या संसाधन-वापराबद्दल आपण अंदाजच बांधू शकतो.
काही विशिष्ट भूप्रदेश व्यापणाऱ्या, शेजाऱ्यांशी या प्रदेशांवरून भांडणाऱ्या, आपसातच लग्नसंबंध करणाऱ्या टोळ्या, असे या गटांचे रूप असणार. निसर्गावर या गटांचा परिणाम क्षीण असणार, आणि त्या मानाने हवामान बदलाचे परिणाम तीव्र असणार. सुमारे दहाएक हजार वर्षांपूर्वी प्लाईस्टोसीन हिमयुग संपले आणि या घटनेने अनेक जीवजातीही नष्ट झाल्या. या जीवजाती ‘संपवण्यात’ माणसांनी केलेल्या शिकारीचाही काही भाग असावा. बबून कपी आणि हिप्पो पाणघोडे याच काळात भारतापुरते संपले, आणि यात माणसांचा ‘हात’ होता असे मानायला जागा आहे.
आज भारतभर स्थिरावलेली शेती हीच प्रमुख जीवनशैली आहे, पण ईशान्येची दमट जंगले आणि पूर्व घाट व विंध्याचा सांधा या क्षेत्रांमध्ये आजही संकलक आणि फिरती शेती करणारे गट आहेत. यांपैकी काही क्षेत्रांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊन पारंपारिक पद्धती बदलत आहेत. इतर क्षेत्रांत मात्र निसर्गाला सांभाळून घेणाऱ्या पद्धती टिकून आहेत. देवराया, लाकूडतोडीचे मापदंड, अशा या पद्धती एकेकाळी सार्वत्रिक असाव्या, पण याबाबत हमी देण्यासारखा पुरावा मात्र नाही.
दहाएक हजार वर्षांपूर्वी हिमरेषा ध्रुवांकडे सरकली. काही इतिहासकारांच्या मते यासोबत अनेक भूप्रदेशांत अन्नाचा तुटवडा पडला. संकलक जीवनशैलीच्या लोकांना काही जनावरे व वनस्पती ‘पाळून’ अन्नसाठे टिकवून धरायचे सुचले. बहुधा ह्याचे सर्वांत ‘तीव्र’ उदाहरण पश्चिम आशियातील आहे. गहू, बार्ली, डाळी, शेळ्यामेंढ्या, गाई, हे असे पाळीव झालेले जीव. भारतीय उपखंडात अशा पालनाचे पुरावे बलुचिस्तानातील मेहरगडला मिळतात व ते आठ हजार वर्षांपूर्वीचे आहेत. गंगेच्या खोऱ्यात तांदळाची लागवड सातेक हजार वर्षांपूर्वी झाल्याचे दावे आहेत, पण ही ‘तारीख’ तीनेक हजार वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता जास्त आहे.
संकलनातून गुराखी व शेतकी जीवनशैली आधी जंगलाच्या कडाकिनारींना झाली असणार. मोठी, दाट वने छाटण्यासाठी आवश्यक असलेली लोखंडी हत्यारे त्यावेळी उपलब्ध नव्हती. गंगेचे खोरे आणि सह्याद्रीच्या परिसरातली दमट वृत्तीय जंगले गुराखी-शेतकी शैलीला लायक नव्हती. सिंधूचे खोरे आणि दख्खनच्या पठारावर मात्र आठ हजार ते तीन हजार वर्षांपूर्वी अशी शैली घडल्याचे पुरावे आहेत.
गहू-डाळींसारख्या रब्बीच्या पिकांसोबत तांदळासारखी खरीफ पिके घेणारी, जमीन नांगरणारी शेतीची पद्धत आधी वायव्य भारतात उपजली. याचसोबत नागर संस्कृतीही उपजली. गरजांपेक्षा जास्त उत्पादनांची साठवण, त्यावर प्रक्रिया होऊन त्यांचा व्यापार केला जाणे, त्याच्याशी संलग्न हस्तव्यवसाय उपजणे, व्यापाराच्या सोईसाठी लिखित भाषेचा उगम, हे सारे सिंधु संस्कृतीत आढळते. ही संस्कृती का नष्ट झाली, याची अनेक कारणे सुचवली गेली आहेत. सतलज नदी पश्चिमेकडे सरकून सिंधूला मिळणे, सरस्वती नदी लुप्त होणे, हवामानात बदल होऊन सिंधूचे खोरे ‘खारावणे’, अशी यंत्रणा सर्वांत शक्य वाटते. आणि यातच तीनेक हजार वर्षांपूर्वी लोखंड भारतात पोचले. वायव्य भारत आणि मध्य भारतातली विशिष्ट कुंभारकला आणि भूशिरीभागातली मोठे दगड वापरणारी ‘मेगालिथिक’ संस्कृती लोखंडाच्या आगमनाशी जोडली जाते.
आता जंगले हटून शेतजमीन घडवणे सोपे झाले आणि सोबतच निसर्गा-कडे पाहण्याची दृष्टीही बदलली. एखादे झाड, एखादी राई, एखादे तळे, यांना देवत्व देण्याऐवजी पंचमहाभूतांची संकल्पना पुढे आली. त्यापैकी अग्नि आणि वरुण ही दैवते तर विशेषच महत्त्वाची.
अग्नीला पुजले जाई यज्ञांच्या माध्यमातून. मोठ्या प्रमाणात लाकडे आणि प्राण्यांची चरबी जाळूनच यज्ञ ‘संपन्न’ होत. या जंगल सफाईला सुरुवात केली जाई ब्राह्मण आणि ‘ऋषीं’कडून. जंगलात जगणारे संकलक याला विरोध करत, त्यामुळे ब्राह्मण युद्धात तज्ज्ञ अशा क्षत्रियांना मदतीला बोलवत. एकदा अर्जुन आणि कृष्ण वनविहार करत असताना असाच एक ब्राह्मण येऊन मदत मागू लागला. मदत देण्याचे कबूल करताच त्या ब्राह्मणरूपी अग्नीने कृष्णार्जुनांना उत्कृष्ट रथ आणि धनुष्यबाण दिले. त्याबदल्यात खांडववनाच्या नाग रहिवाशांसकट साऱ्या जंगलाची यज्ञात आहुती दिली गेली.
शेतजमीन हे नवे संसाधन एकाएकी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. अशा परिस्थितीत लोकसंख्या झपाट्याने वाढवण्याकडे कल असतो. कारण दरडोई उपलब्ध असलेल्या जमिनीचे प्रमाण मोठे असते. सुमारे ख्रिस्तपूर्व १३५० मध्ये कानपूरजवळ दर चौरस किलोमीटरला पाऊणच माणसे होती (माणशी १३३ हेक्टर) असा एक अंदाज आहे. गुराखी-शेतकी जीवनपद्धतीत हे प्रमाण भरपूर आहे. सोबतच यज्ञांमुळे आणखी जमीन उपलब्ध होत होती. परिणामी ख्रिस्तपूर्व ५५० सालापर्यंत लोकसंख्या चौपटीने वाढली असावी. गुरे राखण्याचे प्रमाण कमी होऊन शेतकरी जीवनशैली स्थिरावत होती, आणि सोबतच लोकसंख्याही. आता नवनवी जमीन काबीज करून लोकसंख्या वाढू देणे गैरसोईचे वाटू लागले होते. निसर्गाचे दोहन जास्त शहाणपणाने व काटकसरीने करण्याकडे कल वाढत होता. यातून ब्राह्मणी यज्ञयागाला विरोध करणारे जैन आणि बौद्ध धर्म उपजले. आता झाडाडोंगरांत देव नव्हते, इंद्रादी पंचमहाभूतांपासून घडलेले देवही नव्हते. अतिनैसर्गिक धारणा संपून मानवी व्यवहारांना विवेकी बैठक दिली जात होती.
गौतम बुद्धाच्या काळापर्यंत (म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी) भारतभर शेती स्थिरावली होती आणि संकलकांच्या क्षेत्राची शकले पडली होती. संकलक कमी क्षेत्रात ‘कोंबले’ जात होते आणि शेतकऱ्यांची लोकसंख्याही वाढलेली होती. संकलक समाजांमध्ये श्रमविभाजन फारसे नसते. त्या तुलनेत शेतकरी समाज पेशांमध्ये विखुरलेला असतो. एकाच टोळीत रोटीबेटीव्यवहाराची पद्धत मोडून पेशेवार असे व्यवहार सुरू झाले. यातच श्रेणीची कल्पनाही उपजली. रोटीबेटीसंबंधांमध्ये आता टोळी हा घटक न राहता पेशाधिष्ठित जात हे नवे एकक लागू झाले. या क्रियेला वर्णव्यवस्था या नावाने प्रतिष्ठित केले गेले. कंटाळवाणी, रटाळ, अंगमेहेनतीची कामे करणाऱ्यांना ‘खालचे’ मानले गेले, तर अतिरिक्त उत्पादन एकत्रित करून ‘भोगणारे’ स्वतःला ‘वरचे’म्हणवू लागले. स्वेच्छेने किंवा अपरिहार्यपणे एकेका वर्णात साठवले गेलेले लोक वंशाच्या (genetic) दृष्टीने एकसंध नव्हते.
एकेका वर्णात वेगवेगळे रक्तसंबंध आणि ‘इतिहास’ असलेले अनेक गट असत आणि यांना ‘जाती’ हे नाव पडले. एकेका जातीतही चालीरीतींप्रमाणे उपगट असत, आणि यामुळे जातिसमूहाची संकल्पनाही घडली. उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्ट्रात शूद्र या वर्णात शेती करणारे कुणबी, हस्तव्यावसायिक कुंभार आणि गुराखी जीवनशैलीचे धनगर हे सारेच येतात. धनगरांमध्येही (डोंगरी जंगलात म्हशी पाळणारे) गवळी धनगर, (कमी पावसाच्या भागात मेंढ्या पाळणारे) हटकर धनगर, (जनावरे कापणारे) खाटीक धनगर, (घोंगड्या विणणारे) सणगर, (तट्टे पाळणारे) झेंडे धनगर, अशा अनेक जाती आहेत. धनगर हा एक जातिसमूह आहे. थोडक्यात रोटीबेटीसंबंधाने जोडलेली ती जात आणि पेशांच्या शैलीने जुळलेल्या जाती म्हणजे जातिसमूह—-आणि वर्णव्यवस्था ही यावर लादलेली कृत्रिम वर्गवारी. एकूणच जातींवरून ‘मूळ’ ओळखणे अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्रातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण हे कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांपेक्षा स्थानिक कुणब्यांना वंशाच्या दृष्टीने जवळचे आहेत, ते यामुळेच. श्रेणीची संकल्पना जातींवर ‘बसवण्या’साठी दोन आधार वापरले गेले. एक म्हणजे जातींमध्ये काही बाबतीत तरी वांशिक–जैविक फरक होतेच. दुसरा आधार होता पूर्वजन्मातील कर्मांवरून या जन्मातील सामाजिक स्थान ठरते,
ह्या संकल्पनेचा. हे ‘तत्त्वज्ञान’ मोडायचे जैन आणि बौद्ध धर्मांचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नाहीत, आणि श्रेणीबद्ध जाती भारतात रुजल्या. ख्रिस्तपूर्व ५०० ते इ. स. ३०० या आठ शतकांमध्ये नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मोठमोठी क्षेत्रे लागवडीखाली आली. उत्पादन भरपूर होते आणि त्यामुळे गरजा पूर्ण झाल्यावर उरणारी अतिरिक्त संपत्तीही भरपूर होती. यामुळे व्यापारही वाढला आणि मौर्य, कुशाण, चालुक्य, संगम चोला अशी ‘साम्राज्ये’ही घडली. लहानसहान जमीनदार– जागीरदारांच्या चळतींमधून ही राज्ये घडली. व्यापार देशाबाहेरही घडू लागला. आपापल्या क्षेत्रातील अतिरिक्त उत्पादन वाढवण्यासाठी नवी जमीन लागवडीखाली आणण्याचे आणि सिंचनव्यवस्था उभारायचे प्रयत्न होत. या व्यवहारामागची प्रशासकीय चौकट मौर्य साम्राज्यात घडलेल्या कौटिलीय अर्थशास्त्रा’ने पुरवली. आपल्या क्षेत्राबाहेरील अतिरिक्त उत्पादन ‘कमावायचे’ प्रयत्नही होत असत. यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘हत्यारां’मध्ये हत्तीला महत्त्वाचे स्थान होते. पाळीव हत्तींचे प्रजनन जमत नसल्याने ‘अर्थशास्त्र’ हत्तींसाठी वने राखून ठेवण्याची सूचना देते. अशा जंगले राखण्याने आपोआपच संकलक जीवनशैलीवर गदा येई. मांसासाठी हत्तींची शिकार करणाऱ्यांचे मिझोरम, नागालँड, अरुणाचल, हे प्रदेश कधीच भारतातल्या ‘साम्राज्यां’ना जिंकता आले नाहीत, हा योगायोग नव्हे!
मौर्य साम्राज्यात काही वने शिकारीसाठी राखण्याचाही प्रघात होता. हत्तींच्या प्रजननासाठी आणि शिकारीसाठी वने राखण्यामुळे प्रथमच जंगलाखालील मोठी भूक्षेत्रे मध्यवर्ती सरकारच्या ताब्यात गेली. हे घडेपर्यंत शेती शेतकऱ्याची आणि गावांच्या सीमेतली इतर जमीन एकूण गावाची, अशीच पद्धत असे. आता मात्र संकलक टोळ्या आणि शेतकऱ्यांना फार तर जंगलातील वनस्पतींवर हक्क सांगता येई, प्राणिसृष्टी मात्र राजांच्या अखत्यारीत गेली. संकलक गटांवर हा मोठाच आघात होता. सोबतच हत्ती, कस्तुरी, चंदन यासारखी वनउपज मोठ्या आणि विरचित पद्धतीने वनांबाहेर जाऊ लागली. यातून वनसंपत्तीचे दोहन वाढत गेले.
यज्ञयागांना विरोध करत उभे राहिलेले जैन आणि बौद्ध धर्म निसर्गाच्या वापरावर नियंत्रण आणायचाही प्रयत्न करत असत. अहिंसा हे या दोन्ही धर्मांचे समान सूत्र खऱ्या अर्थी पटले ते संकलकांपासून घडलेल्या जातिसमूहांना. निसर्गाचा वापर ‘हात राखून’ करण्याच्या संकलक वृत्तीला या नव्या धर्मांनी नव्याने प्रतिष्ठा दिली. दिगंबरपंथी जैनांनी ह्याची परिसीमा गाठली. अशोकासारखा सम्राट बौद्ध होण्याने अभिजनवर्गही निसर्गाकडे जास्त विवेकी, काटकसरी वृत्तीने पाहू लागला. भारतातले अनेक प्रदेश शुद्ध शाकाहारी झाले. कोरड्या क्षेत्रात शेतीसाठी जनावरे बाळगण्याची गरज जास्त असते, आणि यामुळे राजस्थान, गुजरात, उत्तर कर्नाटक, अशा कोरड्या क्षेत्रांत शाकाहार खोलवर रुजला. त्या मानाने जास्त पाऊस असलेली क्षेत्रे शाकाहाराबाबत तितकी आग्रही नाहीत.
युरोपीय भारतात येईपर्यंत भारताचे चित्र ढोबळमानाने असेच राहिले.