“पुरुष हा शेवटी पुरुष आहे आणि स्त्री ही स्त्रीच आहे. मग ते कितीही शिकोत, काहीही करोत.” “स्त्रिय चरित्रं पुरुषस्य भाग्यं, देवो न जानाति कुतो मनुष्यः””लिंगभेद सोडला तर बाकी सर्व बाबतीत स्त्रिया का नाही पुरुषांची बरोबरी करू शकणार?””स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता
असते, आणि पुरुष? पुरुष अनंतकाळचा प्रियकर आणि क्षणाचाच पिता असतो?” “Men are from Mars & Women are from Venus.”
प्रत्येकजण म्हणतो, स्त्री आणि पुरुष यांचे वागणे जन्मजातच वेगळे असते. ते का वेगळे असते आणि कोणकोणत्या बाबतींत वेगळे असते हे मात्र नीटपणे कुणी सांगू शकत नाही. या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली, परन्तु त्यांतील बरीच एकांगी आणि पूर्वग्रहदूषित असल्याने स्त्रीपुरुषांमधील भांडणे, आरोपप्रत्यारोप वाढीला लागतात. नेहमीच स्त्रीला बळी ठरवले जाते. काही गट पुरुषाला बळी ठरवतात, त्यामुळे समझौता न होता वादविवाद व ‘isms’ (Feminism आणि Chauvinism) आणि समानतेच्या विविध कल्पना पुढे येत राहतात. या पुरुषीवृत्तीचा मुळापासून शोध घेणारे आणि ती वृत्ती तशी कोणत्या निसर्ग-प्रेरणेमुळे बनलेली असते याचा सखोल अभ्यास करून त्यावर वैज्ञानिक प्रकाश टाकणारे असे एक उत्तम पुस्तक “Why is Sex Fun?’ (The Evolution of Human Sexuality) कामसंबंध आनंददायी कसे? (मानवी कामजीवनाची उत्क्रांती) लेखक — डॉ. जेरेड डायमंड यांचे हे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. (लेखक हे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या इंद्रियविज्ञान विषयाचे प्राध्यापक. इंद्रियविज्ञानानंतर त्यांनी परिसरशास्त्राचाही सखोल अभ्यास केला आहे. या दोन्ही विषयांवर मूलभूत संशोधन पण केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमी चे ते सभासद आहेत. न्यू गिनी येथील पर्वतमाथ्यांवर अनेकदा वाऱ्या करून तेथील विविध पक्ष्यांचाही अभ्यास केलेला आहे. दोन वेळा British Rhone – Poulen Science Book Prize मिळाले आहे. 1992 – Rise & Fall of Theird Chimpanzee तिसऱ्या 1998 – Guns, Germs & Steel. तिसऱ्या पुस्तकाला पुलिट्झर प्राइझ मिळाले आहे.)
सर्व सामान्यांना (विज्ञान न शिकलेल्यांना) समजेल अशा सोप्या, साध्या भाषेत, रोजच्या उदाहरणांचे दाखले देत अखिल जीवसृष्टीतील पक्षी व प्राणी यांच्या लैंगिक जीवनापासून मानवी लैंगिक जीवनाचा सखोल अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक. उत्क्रांतीचा अभ्यास करताना प्राण्यांच्या नर-मादींच्या वागणुकीकडून आधुनिक स्त्री पुरुषांच्या वर्तनाकडे येताना मध्ये आदिमानवांच्या अनेक टोळ्यांचा सूक्ष्म अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. या वर्तनाबद्दलची मांडणी पायाभूत असूनही मजेदार रीतीने मांडली आहे. अवघ्या १९२ पानांमध्ये — विलक्षण रीतीने वागणारी माणसाची जात — मानवी कामजीवनाबद्दल प्राण्यांना काय वाटेल वगैरे प्र न उपस्थित करीत त्यांचे समाधान करणारे ज्ञानही हे पुस्तक देऊन जाते. आपल्याला स्त्री पुरुषांच्या वागणुकीबद्दल पडणारे अनेक प्र न सोडवायला हे पुस्तक मदत करते आणि वाचताना अनेकदा ‘तरीच’ असे उद्गगारही नकळत निघतात. या पुस्तकाचा मुख्य संदेश असा की लैंगिक वर्तणूक इतर जीवशास्त्रीय बाबींमधूनच घडते.
अनुक्रमणिकेत सात लेख आहेत. १. अजब लैंगिकजीवन असणारा प्राणी २. लैंगिक युद्ध ३. पुरुष आपल्या तान्हुल्यांना पाजत का नाहीत? ४. अवेळी केलेले प्रियाराधन (कामानंदाची उत्क्रांती) ५. या पुरुषांचा उपयोग तरी काय? ६. कमी करून जास्त मिळवणे (स्त्रीच्या रजोनिवृत्तीची उत्क्रांती) ७. देहप्रदर्शनामागील सत्य (देहबोलीची उत्क्रांती)
प्रा. डायमंड लिहितात —- “मागच्या वर्षी मला एका परिषदेचे निमंत्रण मिळाले. कंटाळवाणा विमानप्रवास आणि आठवडाभर घरापासून दूर राहावे लागणार होते. पण निमंत्रण अतिशय आकर्षक भाषेत लिहिलेले असल्याने, जाणे टाळावेसे वाटले नाही. लिहिणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याचाही बोध होत नव्हता —- पण निमंत्रण फार व्यवस्थितपणे लिहिलेले, म्हणून मी तिथे पोहोचलो. माझ्या अपेक्षेपेक्षाही सर्व कार्यक्रम उत्तमत-हेने पार पडले —- आणि हे सर्व करणारी व्यक्ती एक प्रभावी व्यक्तिमत्वाची स्त्री होती —- रूपगुणसंगन्न आणि बुद्धिमती अशी. ती अतिशय कार्यक्षमही होती. या कॉन्फरन्स-नंतर माझ्या पत्नीसाठी आणि घरच्यांसाठी भरपूर खरेदीही मी केली हे तिला समजल्यावर तिने रात्रीच्या भोजनाच्यावेळी अतिशय आ चर्य व्यक्त केले. तिने सांगितले की तिचे पती कधीही तिच्यासाठी काहीही भेट आणीत नाहीत. सुरुवातीला तिनेच पतीसाठी बऱ्याच भेटी आणल्या पण प्रतिसाद शून्य! म्हणून मग कंटाळून तिने हे सगळे थांबवले —- तसे तिचे पती इतर बाबतीत सर्व मदत करीत, प्रोत्साहनही देत, पण घरातले सहकार्य शून्य! कामाच्या दिवशी रात्रीपर्यंत काम आणि सुटीच्या दिवशी T. V. आणि आराम म्हणून मग घरात मदतीसाठी कामवाली बाई ठेवावी लागली.”
डॉ. डायमंडनी न्यू गिनीतील पक्ष्यांचा अनुभव सांगितला–ह्या स्वर्गामधले नरपक्षी पिले वाढवायला कधीही मदत करीत नाहीत —- ते दिवसभर इतर माद्यांबरोबर मजा करीत असतात —- बाई म्हणाल्या “म्हणजे अगदी आपल्या पुरुषांसारखेच!’
एवढ्या आकर्षक, कर्तबगार बाईच्या पतीला तिच्याबरोबर जास्ती काळ घालवावासा वाटत नाही हे नवलच!
निदान या स्त्रीला इतर क्षेत्रे तरी मोकळी होती. पण रानटी किंवा आदिवासी विभागातल्या स्त्रियांची कहाणी तर अधिकच दुःखद!
शिकारीला जंगलात जाणाऱ्या स्त्रीपुरुषांकडे पाहावे तर स्त्रीच्या पाठीवर लाकडाच्या वजनी मोळ्यांचा भार, कडेवर आणि बोटाशी मुले शिवाय भाजीपाल्याचे ओझे वेगळेच! तिच्याबरोबरचा पुरुष धनुष्यबाण अडकवून दोन्ही हात मोकळे ठेवून चालणार कारण तिचा रक्षणकर्ता ना तो! ही त्याची मालमत्ता! एवढ्यातेवढ्या कारणावरून तिला टाकणार किंवा वेळप्रसंगी विकणार सुद्धा! फक्त पुरुष शिकारीला गेले, तर छोटीमोठी शिकार करणार आणि तिथेच सगळे जण चट्टामट्टा करून टाकणार, पुन्हा टवाळक्या करायला मोकळे!
स्त्रीवर सर्व भार आणि पुरुष का मोकळा, यालाही उत्तर आहेच की! कारण जंगलात संकट आले तर आपल्या स्त्रीचे आणि मुलाबाळांचे रक्षण करायला, तो सज्ज असायला हवा आणि त्याचे हातही धनुष्य बाण घेण्यासाठी मोकळे असायला हवेत. आपण आधुनिक समाजातले पुरुषही, मुलांना बरोबर घेऊन चाललो की त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतोच!
१०,००० वर्षांपूर्वी, कृषिक्रांतीबरोबर मानवी समाजाची उत्क्रान्तीही झाली. तोपर्यंत सर्व सस्तन प्राण्यांमध्ये, नराचे काम फक्त प्रजोत्पत्तीसाठी आवश्यक ते कार्य करणे, एवढेच. एकदा समागम झाल्यावर नराचा मादीशी काहीही संबंध राहत नाही —- पिलांना जन्म देणे, वाढवणे, त्यांचे संरक्षण करणे ही कामे फक्त मादीलाच करावी लागतात. नराचा त्यात काहीच सहभाग नसतो. मानवप्राण्याची अवस्थाही तशीच होती—-पण शेती करायला लागल्यावर, मानवी समाज आकार घेऊ लागला. त्यामुळे नर आणि मादी म्हणजेच पुरुष आणि स्त्री यांमध्ये श्रमविभागणी होऊ लागली. पुरुष मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी जाऊ लागले आणि स्त्रिया धान्य, भाजीपाला कमावणे, लहान प्राणी मारणे आणि मुलाबाळांची काळजी घेणे यात व्यस्त झाल्या. ही कामांची वाटणी स्वाभाविकच होती. कारण पुरुष अधिक बलवान असल्याने मोठी शिकार करू शकत असत. स्त्रियांना सर्व त-हेने मुलांचे संगोपन करावे लागे, त्यामुळे त्यांना मोठ्या शिकारी करणे कठिणच होते. पुरुष मुख्यतः आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणासाठी शिकार करीत, असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे.
आधुनिक यंत्रयुगातही पुरुष आणि स्त्रियांमध्ये अशीच श्रमविभागणी आहे. पुरुष शिकार करीत नाहीत पण निरनिराळे व्यवसाय करून द्रव्यार्जन करतात आणि पुष्कळशा स्त्रिया फक्त घर सांभाळतात —- परंतु आता अनेक
अमेरिकन स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने अनेक व्यावसायिक क्षेत्रांत पुढे आल्या आहेत.
अन्न–(मांस) संपादन करणे — शिकार करून आणणे हे पुरुषाचे कर्तव्य, इतर प्राणिजगतात, आफ्रिकन लांडगे व आफ्रिकन शिकारी कुत्रे वगळता, कोणताही सस्तन प्राणी असे करीत नाही. इतर सस्तन प्राण्यांपेक्षा माणसाचे वेगळेपण यातच आहे. मानवी स्त्री पुरुष कुटुंब निर्माण करतात आणि त्यांची पिल्ले (मुले) जन्मानंतर बरीच वर्षे परावलंबी असतात. पुरुष जे मिळवतात ते स्वतःच्या नातलगांसाठीच उपयोगात आणतात. पण ही शिकार (मिळकत) केवळ यासाठीच असते का?
अर्थात् ही सर्व गृहीतके मानववंशशास्त्राने सिद्ध केली आहेत का? —- याचा शोध उटा युनिव्हर्सिटीच्या क्रिस्टिन हॉक्सने घेतला. टांझानियातील हादझा जमाती आणि पॅराग्वेतील ॲचे इंडियन्स जमातींच्या अभ्यासाचे निष्कर्ष त्यांनी मांडले.
१९७० नंतर अंचे जमातीने शेती करण्यास सुरुवात केली. ते मूळचे शिकारी असल्याने पुरुष मोठ्या प्राण्यांची शिकार करतात आणि मोठ्या प्रमाणात मध गोळा करतात. स्त्रिया पामच्या झाडापासून पीठ तयार करतात. आपले आणि मुलाबाळांचे पोट भरण्याइतकी त्यांची मिळकत असते —- पण पुरुषांइतकी प्रचंड प्रमाणात शिकारीतली मिळकत त्यांची नसते. एखादी मोठी शिकार मिळाली की मध्यंतरी काही न मिळाल्याची भरपाई होते. त्यामुळे अॅचे पुरुष रिकाम्या दिवसांतही पीठ कुटण्यासारखी बायकी कामे करीत नाहीत. एखाद्या जुगाऱ्यासारखीच ही वृत्ती आहे. एखादेवेळी खूप मिळाले म्हणजे झाले. पण ही सगळी शिकार तो घरी आपल्या बायकामुलांसाठी नेत नाही. बाहेरच्या लोकांनाच त्याचा उपयोग होतो.
स्त्रियांना मात्र मुले संभाळून काहीतरी मिळवावेच लागते. लहानलहान प्राणी मासे फळे इ. त्या संसारासाठी आणतात. पुरुष मात्र तसे करीत नाहीत. टॅझानियातील तसेच न्यू गियानातील शिकाऱ्यांची वृत्तीही काही वेगळी नाही. एकोणतिसातले अठ्ठावीस दिवस जरी काही मिळाले नाही तरी एखादा जिराफ मिळाला म्हणजे सगळी भरपाई होते. हादझा टोळ्यांमधील बायका-मुले त्याकरता उपाशी राहणे पत्करतात. पण मोठी शिकार परस्परांत वाटली जाते त्यामुळे सहसा उपाशी राहण्याची वेळ येत नाही.
शिकार हे जसे पोट भरण्याचे साधन आहे. तसेच ते पुरुषाला कणखर आणि बळकट बनवते. विशेषतः सिंहासारख्या हिंस्र पशूपासून रक्षण करण्याचेही बळ येते. या टोळ्यांना रानटी जनावरांपेक्षा शत्रूच्या टोळ्यांची जास्त भीती असते. कारण जिंकणारे त्यांना मारून त्यांच्या बायकामुलांनाही गुलाम बनवतात. एकंदरीत कुटुंबासाठी शिकार करून मुलाबाळांचे पोषण करणे या बाबतीत हे वनवासी लोक अजूनही इतर सस्तन प्राण्यांसारखेच आहेत. मानवी समाजातील कुटुंबवत्सलता त्यांच्यात नाही. मुलेबाळे स्त्रियांनीच सांभाळायची. मोठी शिकार मिळण्याचे इतरही फायदे आहेत. ॲचे जमातीत विवाहबाह्य संबंधांबद्दल फारशी बंधने नाहीत. त्यामुळे सर्व मुलांचे वडील वेगवेगळे असू शकतात. त्याबद्दल फारसा संकोचही नसतो. कारण एकदा गर्भवती झाल्यावर, कोणाशीही संबंध आला तरी एकच मूल होणार! क्रिस्टिन हॉक्सने पोशिंदा पुरुष आणि विलासी पुरुष असे दोन प्रकारचे शिकारी, सांगितले आहेत.
कुटुंबाचा पोशिंदा कुटुंबापुरतीच शिकार मिळवून आणतो. या उलट विलासी (show off) पुरुष आपल्या कुटुंबाला थोडी शिकार देऊन बाहेरच्यांना जास्त वाटा देतो. साहजिकच एखादी स्त्री आपल्या मुलासाठी लग्न केलेल्या पोशिंद्या पतीकडून तर मिळवतेच, पण अशा विलासी शेजाऱ्याकडून जर काही मिळकत झाली तर अधिक चांगल्या त-हेने स्वतःला आणि मुलाना संभाळू शकते. त्यासाठी मग अशा शेजाऱ्याशी संबंध जोडायला तिची काही हरकत नसते. आसपासच्या सगळ्यांनाच असा उदार शेजार हवाच असतो. त्यासाठी मग आपल्या मुलीनाही त्याच्याकडे पाठवायला त्यांची हरकत नसते.
अशा विलासी माणसाला अनेक अपत्यांचा पिता बनण्याचा फायदा मिळतो — पण ही मुले चांगली वाढतात, त्याची घरची मुले मात्र कमी अन्न मिळाल्याने नीट वाढत नाहीत. हा तोटा त्याला सोसावा लागतो. त्याची पत्नीही तो घरी नसताना, दुसरीकडे जाते. त्यामुळे त्याची स्वतःची मुले नेमकी किती आणि कोणती हे सांगणे कठीणच! फक्त त्याचे वंशसातत्य टिकते हे खरे!
क्रिस्टिन हॉक्स आणि तिच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाचा आपल्या चर्चेला काय उपयोग? —- त्या आदिवासी टोळ्यांचे संघर्ष, वंशसातत्य टिकविण्याची धडपड इतरही टोळ्यांमध्ये असू शकेल —- इतर सस्तन प्राणी आणि मनुष्याच्या मूलभूत प्रवृत्तीही सारख्या असू शकतील. परंतु सुधारलेल्या अमेरिकन समाजात हे कितपत लागू पडते? अमेरिकन पुरुष आपल्या कुटुंबाशी एकनिष्ठ असतात. आपली सांपत्तिक स्थिती अधिकाधिक चांगली व्हावी असा प्रयत्न करतात. पत्नी आणि मुलांसाठी झटतात. मुलांची काळजी घेतात आणि अनैतिक वर्तनापासून दूर असतात.
तरीही अँचे जमातीच्या — अप्पलपोट्या प्रवृत्तीचे पुरुषही आपल्या समाजात आहेत हेही सत्य आहे. पत्नीला आणि मुलांना सोडून देणारे, विभक्त होऊन घटस्फोट घेणारे अशांची संख्याही कमी नाही. त्यानंतर मुलांची आर्थिक जबाबदारी टाळणारे वडीलही आहेतच. एकच पालक असलेल्या कुटुबांची संख्याही दोन्ही पालक असणाऱ्या कुटुंबांच्या तुलनेत वाढत आहे. मुलांना एकटीने वाढवणाऱ्या स्त्रियांची संख्या, पुरुषपालकांपेक्षा अधिक आहे.
विवाहित पुरुषांमध्येही कुटुंबापेक्षा स्वतःकडे जास्त लक्ष देणारे कमी नाहीत. स्वतःचा वेळ, पैसा, ताकद, रंगेलपणाने उधळणारेही आहेत आणि स्वतःच्या पदाचा व परिस्थितीचा नाहक टेंभा मिरवणारेही आमच्या समाजात आहेतच. विलासी राहणी, दारू व इतर निरर्थक खेळ यांवर पैसा उधळणे, आणि त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती रसातळाला नेणे, हेही कमी प्रमाणात नाही. आई आणि वडील दोघेही द्रव्यार्जनाचे काम करीत असले तरी, मुलांकडे लक्ष देण्याचे काम, वडिलांपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात आई करीत असते. नोकरी व्यवसाय, घरकाम, मुलांचे संगोपन यासाठी स्त्री ही पुरुषांपेक्षा कितीतरी अधिक वेळ देते. पुरुष आपल्या घरकामाचा गाजावाजाच जास्ती करतात. मला तर असे वाटते की इतर उद्योग प्रधान देशांत, उ. ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया, जर्मनी, फ्रान्स आणि पोलंड; घरसंसारात पुरुषांचा सहभाग आणखीच कमी असावा.
म्हणूनच ‘या पुरुषांचा उपयोग तरी काय?’ हा प्र न समाज आणि मानव वंशशास्त्रज्ञ या दोहोंच्याही चर्चेचा विषय राहणार आहे. होय, मानवातील स्त्री पुरुष कामजीवनाचा आनंद घेऊ शकतात. फक्त प्रजोत्पादनासाठीच कामसंबंध न येता ते निरामय आनंदासाठीही येतात. याची कारणे म्हणजे मानवी स्त्रीमधील स्त्री बीज हे शरीरांतर्गत असते आणि स्त्रिया नेहमी संवेदनशील असतात. अशा वैचित्र्यपूर्ण प्रजोत्पतीची उत्क्रांती मानवात कशी झाली?
होय. पुरुषांना पान्हा फुटू शकतो, स्तनजन्य दुग्ध-निर्मितीची क्षमता त्यांच्यात असते, परन्तु हे काम उत्क्रांतीमध्ये का थांबले? का शांत झाले? रजोनिवृत्तीनंतर–स्त्री-बीजाची उत्पत्तीच थांबते हे आपल्याला माहीत आहे. परन्तु संशोधनाचा खरा मुद्दा हा आहे की —- प्रजननाच्या शास्त्रात, मनुष्य, असा स्वतःची हानी करून घेणाऱ्या उत्क्रांतीचा कसा बळी ठरला?
[जेरेड डायमंडने पुस्तक अमेरिकन वाचकांसाठी लिहिले, पण यामुळे ते भारतीय व इतर समाजांना लागू पडत नाही अशा भ्रमात कोणी राहू नये!
— संपादक]
५५२/२ पुनर्नवा, जुनी रामदासपेठ, नागपूर