‘ज्ञान’ म्हणजे काय? ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये यांचे द्वारा व्यक्तीला होणारी ‘जाणीव’ म्हणजे ज्ञान. अध्यात्मवादी तत्त्वज्ञानात अशा ज्ञानाला मिथ्या म्हटले जाते. त्यांच्या मते ‘खरे’ ज्ञान हे इंद्रियापलीकडील असते. आणि हे इंद्रियांपलीकडील ज्ञान भगवद्भक्ती केली तरच प्राप्त होते, अन्यथा नाही. अध्यात्मवादी ह्या छापील तत्त्वज्ञानावर किंवा त्यांचे गुरु सांगतात म्हणून संपूर्ण विश्वास (चुकलो) —- ‘संपूर्ण श्रद्धा’ ठेवतात. विश्वास ठेवायला पूर्वानुभव लागतो. श्रद्धा ठेवायला पूर्वानुभवाची गरज नसते.
अशा ज्ञानाची पुढची पायरी म्हणजे आत्मज्ञान! म्हणजेच ‘आत्मसाक्षात्कार’ असे म्हणतात! श्रीमद्भगवद्गीतेत हा विषय पुष्कळ विस्तृतपणे हाताळलेला आहे. श्रद्धाळू लोकांना गीतेत सांगितलेली प्रत्येक गोष्ट संपूर्ण खरी वाटते.
त्याप्रमाणे वागण्याची कवाईत खूप अध्यात्मवादी करताना दिसतात. गीतेत ज्ञान-अज्ञान आणि आत्मज्ञानाबद्दल काय सांगितले आहे याचा बुद्धिवादी विचारसरणीतून, प्रामाणिक पण आग्रही भाविकांसाठी, मी घेतलेला आढावा असा :—
आत्मज्ञानाबद्दल गीतेच्या दुसऱ्या अध्यायात, विशेष करून २३, २४ आणि २५ ह्या लोकांतील माहिती अशी— -प्रथम ‘आत्मा’ कसा आहे तो पाहू या. “हा आत्मा शस्त्रांनी तोडला न जाणारा, अग्नीने जाळला न जाणारा, पाण्याने न भिजणारा, वाऱ्याने न सुकणारा, चिरला न जाणारा, इंद्रियांना न दिसणारा, अचिन्त्य म्हणजे मनाने समजून घेऊन त्याचे चिंतन करणे अशक्य असलेला, याला राग-लोभासारखे कोणतेही विकार नसलेला असा आहे.” पाण्याने आत्मा भिजत नाही म्हटले की वारा त्याला कसे काय सुकविणार? हा प्र न श्रद्धाळू लोकांना भेडसावीत नाही. असा हा आत्मा हा सर्वश्रेष्ठ, त्यानंतर बुद्धी, नंतर मन आणि शेवटी इंद्रिये अशी उतरत्या क्रमाने त्यांची ज्येष्ठता सांगितली आहे.
ह्यानंतर ज्ञानाबद्दलची माहिती तिसऱ्या अध्यायात ३८ व्या लोकात आहे. ज्ञानाचे दर्शन ‘सहज’ होत नाही! ‘काम’ नावाचा शत्रू त्या ज्ञानाला झाकून ठेवतो. ह्या कामशत्रूचा मुक्काम इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्यांच्या निवासस्थानी असतो. तिथून तो ज्ञानाला झाकून ठेवण्याच्या कारवाया करतो. एवढेच नव्हे तर इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्यांच्या मदतीने तो ज्ञानाला कोंडून ठेवतोच, पण, आत्म्याला मोहात पाडतो आणि नादीही लावतो. निर्विकारी आत्माला ‘मोह’ कसा काय पडू शकतो आणि त्याला ‘नाद’ कसे लागतात? ही साधी शंका अध्यात्मवाद्यांना पडत नाही! आत्म्याबद्दल आणि ज्ञानाबद्दल सांगून झाल्यावर ह्या बंदिस्त ज्ञानाच्या सुटकेसाठी पुढे तिसऱ्या अध्यायात ४३ व्या लोकात कृतिआराखडा दिलेला आहे तो असा —- “ज्ञानाला बंदिस्त करणाऱ्या–दडवून ठेवणाऱ्या–कामशत्रूला ठार मारल्याशिवाय ह्या ज्ञानस्पी कैद्याची सुटका होणे नाही. ही मोहीम कशी राबावयाची तर—-बुद्धीच्या पलीकडील ह्या बलवान आणि श्रेष्ठ आत्म्याला जाणून, बुद्धीमार्फत मनाला वश करून ह्या प्रबळ शत्रूला मास्न टाकायचा. (म्हणजेच शत्रू मेला रे मेला की हे ज्ञान मुक्त होऊन प्रकाशित होईल.)
गीतेच्या चौथ्या अध्यायात ४० व्या लोकात “अज्ञ किंवा अश्रद्ध माणसाने जर वरील प्रतिपादनावर श्रद्धा ठेवली नाही, संशय घेतला, तर तो सुखाला पात्र होणार नाही. त्याला इहलोक तर प्राप्त होत नाहीच शिवाय परलोकही प्राप्त होणार नाही. दोन्ही लोकी तो भ्रष्ट होऊन नाश पावतो.’ बस्स! ज्ञान आणि आत्मज्ञानाबद्दलची ही गीतेतील संक्षिप्त माहिती.
कामशत्रूला ठार मारण्याच्या मोहिमेच्या कृतिआराखड्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवायची, शंका कुशंका काढल्या, संशय घेतला, तर काय दुष्परिणाम होतील याची तंबी दिलेली आहे.
बुद्धिवादी माणसांना वरील माहिती अपुरी वाटते. अनेक ठिकाणी शंका येतात, खाचाखोचा जाणवतात, विसंगती आढळते. किंबहुना श्रीकृष्ण “असले काही” सांगतील ह्यावर त्यांचा विश्वास बसत नाही; तो का नाही त्याचे स्पष्टीकरण करतो.
१. बुद्धिवादी तत्त्वज्ञानात ज्ञानाची सुरवात इंद्रियांमार्फत सुरू होऊन मन आणि बुद्धी इथे संपते. मन आणि बुद्धीपलीकडील निसर्गातील सर्व घटना, गोष्टी, अवस्था, ह्या अज्ञेयवादात येतात. ‘अज्ञेय’ म्हणजे जाणता येण्याजोगे जे नाही ते.
२. आत्म्याचे वर्णन तो “नाही कसा’ ते केलेले आहे. मग तो आहे कसा? गौतम बुद्धांना हाच प्र न पडून त्यांनी ‘अनात्मा’–‘आत्मा नाही’ असा सिद्धान्त मांडला असावा. कोणतेही ज्ञान इंद्रियगोचरच असते आणि जे इंद्रियगोचर नाही ते ज्ञानच नव्हे हे तत्त्व विचार करणाऱ्याला पटते.
३. शरीर मेले की हा शरीरातून नाहीसा होतो; ते जीर्ण झाले नसले तरीही. बरे हा आत्मा शरीरातच का असतो? तो अंतराळात का राहत नाही? हा शरीरात राहून करतो काय? शरीराला त्याचा उपयोग काय? हे प्र न श्रद्धाळूना पडत असले तरी त्यांनी प्र न विचारायचे नाहीत, श्रद्धापूर्वक गप्प राहायचे.
गोव्यातील एका चर्चमध्ये एका ख्रिस्ती संताचे जीर्ण शरीर जतन करून ठेवलेले आहे. स्वामी योगानंदांचे शरीर त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक दिवस न कुजता तसेच टिकून होते असे त्यांचे भक्त मानतात. हे प्रकार खरे की खोटे हा
मुद्दा इथे नाही. मुद्दा असा की आत्मा मानून त्याचे ज्ञान किंवा दर्शन झाले तर त्या व्यक्तीचे शरीर कुजत नाही’ असा निष्कर्ष त्या शास्त्राचे भाविकगण जो काढतात तो खरा नाही. कारण अनेक साधुसंताना आणि तथाकथित महाराजांना आत्मज्ञान झाले असल्याचे त्यांचे भक्त मानतात. म्हणून त्यांची शरीरे कुजता कामा नयेत. शिवाय वस्तुसंग्रहालयांत त्यांची मूळ शरीरे नाहीत, तर मातीचे किंवा दगडी पुतळे का म्हणून? भूमितीमध्ये एक सिद्धान्त आहे —- “Converse is not always true (व्यत्यास हा नेहमीच खरा नसतो”) आत्मा हा असा असा नाही म्हटल्याने तो कसा कसा आहे हे सिद्ध होत नाही. शरीर मर्त्य आहे हे तर
खरेच, पण म्हणून आत्मा अमर होत नाही. नसलेला आत्मा आहेच म्हणणे हा आध्यात्मिक दुराग्रह झाला.
४. गीतेत आत्म्याला सार्वभौम म्हटलेले आहे. मुळात जो शरीरात काहीच काम करीत आणि शरीराबाहेरही ज्याचे मुळीच अस्तित्व नाही हा सार्वभौम कसा?
५. “जहि शत्रु महाबाहो कामरूपं दुरासदम् ।” अशी आज्ञा भगवंतानी अर्जुनाला दिलेली आहे. या दोघांनाही ह्या कामरूप शत्रूला ठार मारता आलेले नाही. एकवेळ अर्जुनाने सुरवातीला “मला राज्य नको, मी भिक्षा मागेन’ म्हणून आपली कामना मारली. पण भगवंत? पांडवांच्या आणि खास करून अर्जुनाच्या जयाची कामना श्रीकृष्णांना मारता आलेली नाही! अध्यात्मवादी जर लैंगिक दृष्ट्या ‘काम’ असा अर्थ घेत असतील तर दोघांनाही बायका आणि मुले होती.
सामान्य माणूस, बुवा-बाबा-महाराज, ताई-माई-देवी, तेहत्तीसकोटी देव आणि अर्जुन शिवाय खुद्द भगवंत यांपैकी कुणालाही आपल्या लैंगिकभावना आणि कामना मारता आलेल्या नाहीत! अध्यात्मवादी आणि त्यांच्या श्रद्धा याबद्दल काय बोलावे?
माणसाला केव्हा आणि कशाचा मोह पडेल हे सांगता येत नाही! अध्यात्मवादी स्वर्गीय के. व्ही. बेलसरे साहेबांना एकदा एका तरुण कुष्टि णीचा मोह पडला होता. “माझी आध्यात्मिक साधना’ या पुस्तकात खुद्द त्यांनीच तसे नमूद केले आहे. मोह टाळणे हे संस्कारांचे आणि बुद्धीचे काम आणि तो पडणे हे मनाचे काम.
६. गीतेच्या सहाव्या अध्यायात साधारणपणे १० व्या ते १६ व्या लोकांत “आत्मज्ञानप्राप्तीसाठी योगाची शिफारस केलेली आहे. योगाबरोबरच “ब्रह्मचर्य-पालना-चीही शिफारस आहे. आत्मज्ञान-प्राप्तीसाठी कोणत्या योग्याने कुठे बसावे, भूमी कशी असावी, बसायला काय घ्यावे, कोणत्या उंचीवर बसावे, कसे बसावे वगैरे सर्व तपशील दिलेला आहे. शरीराच्या सर्व भाव-भावना-जाणीवा, मनाच्या सर्व कामना, ‘नष्ट’ करून बुद्धी शुद्ध आणि निर्विकार करावी असे सांगितले आहे.
याचा अर्थ काय होतो, त्याचा भगवद्भक्तांनी आणि अध्यात्मवाद्यांनी स्वतःच्या बुद्धीने थोडासा विचार करावा. ‘मन निर्विकार करणे, इच्छा–आशा–आकाङ्क्षा नष्ट करणे, भाव-भावना-जाणिवा नष्ट करणे’ म्हणजेच इंद्रिये, शरीर, मन आणि बुद्धी बधीर करणे, बोथट करणे, गोठवून टाकणे’ असा होतो! जगायचे कशासाठी ह्याचा विचार बंद आणि मरायचेही नक्की ठरत नाही! स्थितप्रज्ञ होण्यासाठी आटापिटा करायचा! अशा अवस्थेत आत्मज्ञान कोणाला आणि कसे होणार? सर्व काही बधिर, बोथट, गोठलेले!!
“शरीर असे बोथट, बधिर आणि निर्जीव झाले की त्याचा आत्मा भगवन्मय होऊन, परतत्त्वाशी एकरूप होऊन ती व्यक्ती परमोच्च असे सुख अनुभवते,’ असे गीता सांगते.
संपूर्ण श्रद्धा ठेवून, संशयरहित होऊन हे सर्व खरे मानले तरी एक बारीकशी शंका भेडसावते. निर्जीव, बोथट, बधिर शरीराला, बधिर मनाला आणि बधिर बुद्धीला हे परमोच्च ‘सुख-आनंद’ कसे समजेल? बुद्धी-मन-इंद्रिये आणि शरीर जणू काय लाकूड झालेले. त्याला काय समजणार? त्याला जाळले काय किंवा खतपाणी घातले काय?
“माझी सर्व इंद्रिये, मन, बुद्धी बधिर होत आहे, कोणताही विकार किंवा विचार अनुभवीत नाही आहे,’ अशा ‘स्वयंसूचना’ बाह्य मनाने अंतर्मनाला सतत देत राहिले तर ती व्यक्ती संमोहित होते (Self Hyprosis) ह्या संमोहित अवस्थेत ती व्यक्ती काय वाट्टेल ते करते. डोळे बंद असूनही तिला समुद्र दिसतो, धबधबा दिसतो, तिच्या आवडीचा देव तिला स्पष्ट दिसतो, भगवंतांच्या सिंहासनावर ती त्यांना खेटून बसू शकते! ह्या साध्या, सरळ, स्वप्नमय
अवस्थेत कुणाला आत्माही दिसेल. ह्याच प्रकाराला किचकट पद्धतीने “आत्मा दिसला म्हणजे आत्मज्ञान झाले; किंवा आत्मसाक्षात्कार झाला’ असे म्हणायचे असेल तर नको कोण म्हणणार?
७. आत्मज्ञानप्राप्तीसाठी ‘ज्ञान’ आवश्यक. त्या ज्ञानाला स्पष्ट करण्यासाठी ज्ञानाचा जो शत्रू ‘काम’ त्याला ठार मारण्याच्या मोहिमेत आत्म्याला का आणि कशासाठी ओढला आहे! आत्म्याच्या वर्णनात त्याला बुद्धीपलिकडील आणि अचिंत्य म्हटले नाही. अध्याय ३-४३ मध्ये बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याला जाणून . . . . . अशी सुरुवात आहे. ‘बुद्धीच्या पलीकडील आत्म्याला जाणणार कसे?’ मनाने तर तो अचिंत्य! पुढे . . . बुद्धीद्वारा मनाला वश करून ह्या दुर्जेय कामाला मारून टाक अशी ऑर्डर आहे. बुद्धीने मनाला वश करणे शक्य आहे पण आत्म्याला जाणणे हे बुद्धीचे काम नव्हे असे गीताच सांगते!! ही कृतिआराखड्यातील फार मोठी आणि मूलभूत विसंगती आहे.
८. मानववंश चालू ठेवणे हे या कामशत्रूचे कार्य. इच्छाआकांक्षेशिवाय मानव जगूच शकणार नाही. श्रद्धाळू अश्रद्धाळू, भक्त-अभक्त, बुद्धिवादी-अध्यात्मवादी, आस्तिक-नास्तिक यांचे की कोणीही ह्या कामशत्रूला मारू शकलेले नाही! पण माराच कशाला? बुद्धिवाद्यांनी ह्या शत्रूशी तह केला. संयमाने ह्या शत्रूशी हात मिळवणी करून सुख मिळते हे त्यांनी ओळखले. ‘काम’ ज्ञानाला झाकून ठेवतो हे खरे मानले नाही. शरीर, मन, बुद्धी बोथट-बधिर न करता जगण्यापुरते ज्ञान बुद्धिवादाने मिळते.
९. संशयात्मा विनश्यति। हे मुळीच खरे नाही. कोणत्याही अभ्यासात ‘शंका’ नसेल तर ज्ञानप्राप्ती अशक्य. हुषार मुलेच प्र न विचारतात. हुषार विद्यार्थी शंका विचारतात. बावळटमुले आणि ढ विद्यार्थी माना डोलावतात. शंका नाहीत, संशय तर नाहीच नाही. अशांना दृढ श्रद्धाळू म्हणावे का?
एके काळी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे तीन लोक मानले जायचे. संशय घेतल्यामुळेच विज्ञान आले. सध्या पृथ्वी हा एकच लोक विज्ञान मानते. अंतराळात इतर ग्रहगोलांवर मनुष्यवस्ती असू शकेल असे काही वैज्ञानिक मानतात. नक्की काहीच नाही. बुद्धिवाद्यांप्रमाणेच सध्याचे अध्यात्मवादी फक्त पृथ्वी हा एकच लोक मानतात. कदाचित त्यांच्या सुप्तमनांत स्वर्ग-नरक असतीलही. पृथ्वी हा एकच लोक मानला की परलोक नाहीच. “अश्रद्धांना इहलोकी भ्रष्टता लाभेल आणि परलोकीही ते भ्रष्ट होतील’ ही गीतेची शापवाणी बुद्धिवाद्यांना छळीत नाही.
१०. भगवद्गीतेत बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत! दान कसे असावे, दैवी संपत्ती कोणत्या, आहाराचे प्रकार, उत्तम यज्ञ कोणता, इतरेजनांच्या आचरणासाठी थोर पुरुषांची आवश्यकता आणि थोरांचे आचरण, कर्मयोग इत्यादि बरेच काही! हे चांगले सोडून, केवळ श्रद्धेच्या जोरावर न पेलणारे, निसर्गविरोधी, आत्मघातकी तत्त्वज्ञान अध्यात्मवाद्यांनी का निवडावे हे कळत नाही. कुणीतरी श्रेष्ठ व्यक्ती सांगते, ग्रंथ सांगतो म्हणून ते सर्व खरे मानणाऱ्या लोकांना भाविक किंवा श्रद्धाळू म्हणता येणार नाही. त्यांना ‘कट्टरपंथीय’ हे नाव चांगले शोभेल.
“निसर्गानुरूप वागा” हा बुद्धिवादाचा संदेश! “निसर्गविरोधी आचरण, चुकीचे तत्त्वज्ञान यांचा श्रद्धापूर्वक स्वीकार करा” हा अध्यात्माचा संदेश!
११. अध्यात्माचे आचरण, हे अज्ञान, बुद्धीने ठरवून आचरण, हे ज्ञान आणि स्वतःतील जो ‘मी’ त्याला बुद्धीने जाणून त्या प्रमाणे आचरण, म्हणजे आत्मज्ञान!
गव्हे, दापोली, रत्नागिरी — ४१५ ७१२
सदर तुमचा आत्मज्ञानाविषयीचा लेख वाचून, मला खरेपणात सर्व ज्ञान आहे याची जाणीव झाली.. तुमच्या अमोल माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
sir timcha contact number bhetel ka mala
आमच्याजवळ नाही. शोधावा लागेल. प्रयत्न करतो.