आरोग्यशिक्षणाचा हेतू

“आरोग्यशिक्षणाचा माझा हेतू काय?”, असा माझ्या वैयक्तिक हेतूंबद्दल कोणी प्र न विचारला तर मी म्हणेन की “मला जे वैद्यकीय ज्ञान मिळाले आहे त्यातील किमान आवश्यक तो भाग तरी लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात मला आनंद वाटतो म्हणून मी हे काम करतो.” या वैयक्तिक आवडीच्या शिवाय तितकाच महत्त्वाचा हेतू म्हणजे आज सामान्यपणे जे आरोग्यशिक्षण दिले जाते ते बरेचसे असमाधानकारक आहे, त्यामुळे चांगले आरोग्यशिक्षण करणाऱ्या प्रवाहात भर घालावी या हेतूनेही मी आरोग्यशिक्षण देतो.
अगदी थोडक्यात सांगायचे तर आरोग्याबद्दल त्याच्या सामाजिक पैलूंकडे दुर्लक्ष करून फक्त जीवशास्त्रीय पैलूंवर लक्ष केंद्रित करणारे, अनावश्यक माहितीचा डोलारा मांडून तज्ज्ञांचा अकारण दबदबा निर्माण करणारे किंवा त्याहून वाईट म्हणजे “हा प्रकार फार गुंतागुंतीचा मामला आहे. लवकरात लवकर तज्ज्ञाला भेटा” एवढाच संदेश प्रामुख्याने देणारे; तज्ज्ञतेच्या नावाखाली आपले सामाजिक पूर्वग्रह कळत नकळत पसरवणारे; एखाद्या विशिष्ट उपचारपद्धतीची भलावण करणारे किंवा बिगर-अॅलोपॅथिक पद्धतीबद्दल तुच्छता पसरवणारे . . . . अशा पद्धतीचे ‘आरोग्यशिक्षण’ न करता ‘चांगले’ आरोग्यशिक्षण करायची माझी इच्छा असते. अर्थात हे मला कितपत जमते ते माहीत नाही. त्यामुळे आरोग्यशिक्षणाचा हेतू काय असायला हवा असे या छोट्या लेखात मांडणे अधिक योग्य होईल.
आरोग्याबाबतची समज वाढवणे
आरोग्यशिक्षणातून आरोग्याबाबतची, त्याच्या विविध पैलूंविषयीची लोकांची समज वाढायला हवी. केवळ भरपूर माहिती, तपशील दिला की समज वाढते असे नाही. जो आरोग्य सल्ला द्यायचा, मग तो वैयक्तिक आचरणाबाबत असो किंवा सामाजिक धोरणाबाबत असो, त्यामागची कारणमीमांसा कळण्याइतपत माहिती, तपशील द्यायला हवा, म्हणजे सल्ला समजून उमजून अंमलात आणणे, आणि त्यात गरजेनुसार थोडा बदल करणे वाचकाला शक्य होते. यापेक्षा जास्त तपशील दिल्याने आरोग्यशिक्षण बोजड होते. त्यातूनही आरोग्यशिक्षण करणाऱ्या तज्ज्ञाचा दबदबा वाढतो. पण वाचक, श्रोता यांच्या पदरी फारसे काही उरत नाही. दुसऱ्या टोकाला आरोग्यशिक्षणाच्या नावाखाली नुसत्या ‘हे करा, हे करू नका’ अशा सूचना देऊन थोडक्यात काम उरकणे हे ही योग्य नाही. सूचना/आदेश म्हणजे आरोग्यशिक्षण नव्हे. आरोग्यशिक्षणातून वाचकाची/श्रोत्याची आरोग्याबाबत समज वाढली पाहिजे.
सामाजिक पैलूंचा विचार
जुलाब, टायफॉईड, कावीळ, मलेरिया इत्यादी अनेक आजार रोगजंतूमुळे होतात. हे रोगजंतू माझ्या शरीरात कसे शिरतात? शिरल्यावर काय नुकसान करतात? ते शिरू नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी . . . इत्यादी मला समजायला हवे. पण हजारो लाखो लोक दरवर्षी या आजारांनी ग्रस्त का होतात? केवळ त्यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने, म्हणजे त्यांच्या चुकीने? की एकूणच स्वच्छतेच्या सोयींचा अभाव असल्याने? जिथे पाणी, संडास, सार्वजनिक स्वच्छता पुरेशी आहे अशा भागांमध्ये हे आजार फारसे आढळत नाहीत. तंबाखू-दारूचे व्यसन यापासून एडस्पर्यंत सर्व आजारां-बाबतही हेच दिसते की नुसत्या वैयक्तिक आचरणावर लक्ष केंद्रित करणारे आरोग्यशिक्षण अपुरे ठरते. तंबाखू-दारूचा व्यवसाय हा जोपर्यंत वैध विकासाचा वैध मार्ग मानला जातो तोपर्यंत लाखो लोक व्यसनाधीन होणारच. त्यांनी व्यसनाधीन होणे ही या व्यवसायाची गरज आहे, त्याचा अटळ परिणाम आहे.
त्यामुळे एखादा डॉक्टर तंबाखू-दारूच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत फक्त बोलत असेल पण हे व्यसन वाढवणारे ‘उद्योग’ व त्यापासून सरकारला मिळणाऱ्या करावरचे सरकारचे अवलंबित्व याबद्दल बोलणार नसेल तर ते फार तुटपुंजे आरोग्यशिक्षण होते. त्यातून सर्व दोष व्यसनाला बळी पडणाऱ्यांकडे जातो. लाखो लोकांना व्यसनाच्या जाळ्यात पकडणारे ‘उद्योग’ नामानिराळे राहतात. आरोग्यशिक्षणाचा हेतू एकांगी नव्हे तर समतोल समज वाढवणे, असा असायला हवा.
सामाजिक प्र न, तांत्रिक उत्तरे?
अनेक आरोग्यप्र न हे प्रामुख्याने, मूलभूत अर्थाने आर्थिक-सामाजिक प्र नही असतात. ते सोडविण्यासाठी वैद्यकीय तंत्रविज्ञानाचा पूरक उपयोग करून घ्यायला हवा. पण सामाजिक सुधारणा न करता नुसत्या वैद्यकीय उपायांनी हे प्र न सुटणार नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. उदा. भारतात स्त्रियांमध्ये रक्तपांढरी (अॅनिमिया) या आजाराचे प्रमाण खूप आहे. ते कमी करायचे, तर दारिद्र्य, स्त्री-पुरुष विषमता, योग्य आहारा-बाबतच्या मार्गदर्शनाची कमतरता हे प्र न सोडवायला हवेत. पूरक उपाय म्हणून रक्तपांढरी झालेल्या स्त्रियांना व सर्व गरोदर स्त्रियांना लोहाच्या गोळ्या देणे हा आधुनिक वैद्यकीय उपायही करायला हवा. पण अशा गोळ्या देणे हा मुख्य उपाय असू शकत नाही हे सांगणे हाही आरोग्यशिक्षणाचा हेतू हवा. प्रचलित, अधिकृत आरोग्यशिक्षणात नेमके सामाजिक उपाय वगळले जातात. तीच गोष्ट लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबद्दलच्या प्र नाची. दारिद्र्यात लहान मुलांचा नीट सांभाळ करून त्यांचे वारंवार योग्य प्रकारे खाणे-पिणे सातत्याने बघणे यासाठी सोय नसणे यामुळे भारतात पाच वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. अंगणवाडीत मुलांना दुपारी पूरक आहार देणे हा त्यावर पूरक उपाय होऊ शकतो. पण सामाजिक आरोग्यशास्त्र याच्या आधारे राबवायचा पूरक आहार कार्यक्रम हा प्र न मुळापासून सोडवण्याचा मार्ग नाही. अनेक दशके हा पूरक आहार कार्यक्रम चालवणे म्हणजे मूळ कारणावर उपाय करू न शकल्याचे लक्षण आहे हे सांगणे, हा आरोग्यशिक्षणाचा हेतू असायला हवा.
वैद्यकीय तांत्रिक उपायांच्या मर्यादा ‘नव्या’ आजारांबाबत जास्त प्रकर्षाने दिसतात. हृदयविकार, मानसिक आजार, एड्स अशा प्रकारच्या नव्या साथींवर प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. हे आजार होऊ नयेत म्हणून आरोग्यदायी जीवन-शैलीचा खरे तर अवलंब करायला हवा. त्यासाठी योग्य ती सामाजिक स्थिती निर्माण करायला हवी. त्याऐवजी वैयक्तिक आचरणात, सवयींमध्ये सुधारणा करणे किंवा औषधांचा वा कंडोमचा वापर यासारख्या तांत्रिक पूरक उपायांनी प्र न सुटेल अशा भ्रमात राहणे चूक आहे, हेही सांगायला हवे.
वैद्यकीय हितसंबंध
वैद्यकीय ज्ञानाला, वैद्यकीय तंत्रविज्ञानाला जरूर महत्त्व आहे. पण वैद्यकीय उपायांचा अतिरेक होऊन लोकांचे अकारण नुकसान होऊ शकते. गर्भ राहिल्यापासून माणूस मरेपर्यंत जीवनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वैद्यकीय तंत्रविज्ञानाच्या मदतीने हस्तक्षेप करून जीवन अधिक निरोगी, सुकर, आनंददायी बनवण्याची क्षमता वैद्यकीय तंत्रविज्ञानाने कमावली आहे. पण या तंत्रविज्ञानाचा अतिरेक झाला तर ही तंत्रविज्ञाने विकणाऱ्या लोकांचा फक्त फायदा होतो. गरज नसताना निरनिराळ्या तपासण्या करणे, त्यातून येणाऱ्या कधी चुकीच्याही रिपोर्टसमुळे आर्थिक व शारीरिक नुकसान होणे, फारशी उपयोगी नसणारी व तब्येतीला हानिकारक ठरू शकतील अशी औषधे वापरणे यात वैद्यकीय कंपन्यांचे संकुचित हितसंबंध गुंतले आहेत. त्यावर मात करून रुग्णांच्या हितसंबंधांना प्राधान्य देणारी व्यवस्था का व कशी उभी करायला हवी हे सांगणे हाही आरोग्य शिक्षणाचा हेतू असायला हवा.
मानवतावादी मूल्यांना खतपाणी
आरोग्यशिक्षणातून थेटपणे मूल्यशिक्षण होत नाही. पण मानवतावादी मूल्यांना खतपाणी घालणे, मानवी हक्क, सामाजिक न्याय यांच्या बाजूने झुकते माप टाकणे हे आरोग्य शिक्षण करताना होऊ शकते. अगदी साधा मुद्दा म्हणजे रक्तदान–नेत्रदान हे जात-पात धर्म, वंश, प्रांत या पलिकडे जाणारे मानवी दान असते, हे आवर्जून सांगता येते. तसेच स्त्रियांना दुय्यम, अपमानास्पद स्थान देणाऱ्या काही प्रथा कशा अशास्त्रीय आहेत हेही आरोग्यशिक्षण करताना सांगता येते. मासिक पाळीतील शिवाशीव, वंध्यत्व असल्यास स्त्रीलाच दोष देणे, मुलीच होत राहिल्या तर दुःख करणे व स्त्रीलाच दोषी धरणे, नसबंदीची शस्त्रक्रिया स्त्रीनेच करून घ्यावी असे गृहीत धरणे इत्यादी प्रथा कशा अशास्त्रीय व मानवतावादाच्या विरोधी आहेत हे सांगणे किंवा एडस्चा धोका स्त्रियांना जास्त का असतो हे सांगणे हाही आरोग्यशिक्षणाचा हेतू असायला हवा.
काही आजारांबद्दल अनेकांच्या मनात गंड असतो. तो दूर करून अशा आजाऱ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून प्रयत्न करणे हा ही आरोग्यशिक्षणाचाच एक भाग असायला हवा. कुष्ठरोग, क्षयरोग, एडस्, मानसिक आजार, कातडीचे आजार, फिटस्चा आजार याबद्दल समाजातील गंड दूर करणे हाही आरोग्यशिक्षणाचा हेतू असायला हवा.
बहुमुखी दृष्टिकोण
अॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी इत्यादी पूर्णपणे वेगळ्या तत्त्वांवर आधारित अशा उपचारपद्धतींना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये मानवी शरीर कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद देते. हे का व कसे होते हे जरी कोडे असले तरी हे होते, हा अनुभव आहे. त्यामुळे अमुक एक ‘पॅथी’च फक्त चांगली, बाकी सर्व तुच्छ असा दृष्टिकोण समाजात आरोग्यशिक्षण करताना रुजवता कामा नये. माझ्या मते ‘अॅलोपॅथिक’ उपचार-पद्धती ही सर्वांत जास्त विकसित व इतरांच्या मानाने खूप पुढे गेलेली, सर्व आधुनिक तंत्रविज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी उपचारपद्धती आहे. पण तिच्याही मर्यादा आहेत. अॅलोपॅथीच्या उपचाराने बरे न झालेले रुग्ण इतर पॅथीच्या उपचाराने बरे झाल्याचे अनुभव वारंवार येतात. पा चात्त्य देशांत याबाबत आता काही प्रमाणात संशोधनही झाले आहे. त्यामुळे इतर पॅथीच्या विकासाला पूर्ण वाव मिळावा यासाठी धोरणे व जनमानस तयार करायला हवे. त्यासाठी आरोग्यशिक्षण करताना बहुमुखी दृष्टिकोण ठेवायला हवा. अर्थात सुयोग्य अशा शास्त्रीय निकषांचा आग्रहही धरायला हवा. नाहीतर आजकाल कोणीही कोणत्याही शास्त्राचे नाव घेऊन ‘धंदा’ करते. हे टाळण्यासाठी वैद्यकीय संशोधन, त्याची पद्धती यांबाबत किमान माहिती, समज पोचवणे हाही मी माझ्या आरोग्य शिक्षणाचा भाग, हेतू मानतो.
सारांश
वरील मुद्द्यांचा सारांश लेखाच्या सुरवातीला आला आहे. वेगळ्या शब्दांत हा सारांश सांगायचा झाला तर म्हणता येईल की, आरोग्य शिक्षणाचा जो प्रचलित, अधिकृत ढाचा आहे त्यापेक्षा वेगळ्या, जनवादी भूमिकेतून आरोग्याची सर्वांगीण समज वाढवणे हा आरोग्य शिक्षणाचा हेतू असायला हवा. त्यासाठी एकतर तांत्रिक माहितीचे अवडंबर माजवून, तज्ज्ञतेचा दबदबा निर्माण न करता किंवा केवळ सूचना/आदेश/नियम न सांगता तंत्रवैज्ञानिक माहितीचा वापर विषय समजण्याच्या भूमिकेतून करायला हवा की जेणेकरून वाचक/श्रोता त्या पैलूंबाबत स्वतः चिकित्सक विचार करून सल्ल्याचा योग्य तो वापर करू शकेल किंवा सल्ला परिस्थितीनुसार बदलून घेऊ शकेल. दुसरे म्हणजे वैद्यकीय तंत्रविज्ञानाच्या मर्यादाही सांगायला हव्या की ज्यामुळे या तंत्रविज्ञानाचा अत्युत्साही, अतिरेकी वापर होऊन आर्थिक, शारीरिक नुकसान होणे टळेल. तिसरे म्हणजे आरोग्य, आजार याबाबतचे सामाजिक, आर्थिक पैलू याचेही भान आरोग्यशिक्षणातून यायला हवे, म्हणजे प्र न मुळापासून सोडवायचे असतील तर काय करायला हवे हे कळेल. चौथे म्हणजे मानवतावादी मूल्ये, सामाजिक न्याय यांना खतपाणी घालणारे आरोग्यशिक्षण जेव्हा जेव्हा देणे शक्य आहे तेव्हा ते आवर्जून दिले पाहिजे.
शेवटचा मुद्दा म्हणजे कोणत्याही एक ‘पॅथी’ची भलावण न करता डोळस, शास्त्रीय, बहुमुखी दृष्टिकोन ठेवायला हवा.
आजीव वर्गणीदार आ. ४६८ श्री. विजय मशीदकर जिल्हा भंडार नियंत्रक कार्यालय,मध्य रेल्वे, करी रोड, मुंबई — ४०० ०१३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.