शिकणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. माणसाच्या प्रत्येक पिढीने आपली वाटचाल आधीच्या पिढीने सुपूर्द केलेली ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन केलेली आहे. या शिदोरीतील ज्ञानाचे संचित पुढील पिढीकडे सोपवणे हा औपचारिक, अनौपचारिक, किंवा सहज शिक्षणामागचा मूळ हेतू आहे. यामुळे नव्या पिढीचे पाऊल मागच्याहून पुढे पडावे अशीही त्यामागे अपेक्षा आहे. ज्ञानाची उपलब्ध शिदोरी खूप मोठी असते. साहजिकच प्रत्येक व्यक्तीकडे ती संपूर्ण पोचवणे अशक्य आहे. दिलेल्या वेळात, त्यातले नेमके काय पोचवावेच, काय आवश्यक आहे, तर काय हवे तर बाजूला ठेवावे —- हा विचार करताना आधाराला शिक्षणामागचे मूलभूत हेतू घ्यावे लागतात.
आजवर अनेक तत्त्वचिंतकांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षणामागचे मूलभूत हेतू काय असावेत याबद्दल मांडणी केलेली आहे. वेगवेगळ्या लोकांनी वेगळ्या मुद्द्यांना महत्त्व दिलेले आहे. मुद्द्यांमधील काही भाग स्वतंत्र तर काही एकाहून जास्त मुद्द्यांच्या क्षेत्रामध्ये येतो. पाच मुद्दे आपण महत्त्वाचे मानावेत असे दिसतात.
१. जीवनाची पूर्वतयारी —-
आयुष्यात जे जे काही करावे लागते, ते आधी शिकून घ्यावे. काही गोष्टी आधी साधत नसणाऱ्या नव्याने शिकाव्या, तर काहींमधील खाचाखोचा समजून नैपुण्य साधावे.
२. क्षमता-विकसन —-
शिक्षणाची व्याख्या अनेक तत्त्वचिंतकांनी जे उपजत आहे त्याची जाणीव होणे व विकास करणे, अशी केलेली आहे. कोणतीही नवी गोष्ट शिकताना पूर्वज्ञानाच्या आधारावरच शिकली जाते. शालेय शिक्षणात भाषिक व गणिती– तार्किक विचारक्षमतांचे विकसन महत्त्वाचे मानले जाते. त्याशिवाय सांगीतिक, अवकाशीय, शारीरिक कौशल्य,
सामाजिक समज किंवा व्यक्ती-व्यक्तीतील नाते समजून घेण्याची क्षमता आणि स्वतःकडे पाहण्याची, जाणण्याची क्षमता अशा एकूण सात क्षमतांचा उल्लेख दिसतो. ही यादी वाढूही शकेल. प्रत्येक माणसात कमी अधिक प्रमाणात या क्षमता असतात आणि त्या संधी मिळाल्यास वाढतात, न मिळाल्यास अडतात. शिक्षणाने या क्षमतांचे विकसन व्हायला हवे.
३. शिकायला शिकणे —-
हा एका प्रकारे पूर्वतयारीचाच प्रकार म्हणता येईल. अभ्यासक्रमाच्या दिलेल्या मुदतीत सर्व काही शिकणे तर कोणाही व्यक्तीला अशक्य आहे. महत्त्वाचे काय, तर त्यानंतर शिकणाराला जे शिकावेसे वाटते ते शिकण्याची क्षमता त्याच्या ठायी येणे. जीवनात जे करायचे त्यामध्ये शिकणेही जर मानले, आणि जरूर मानावे, तर त्या शिकण्याची पूर्वतयारी हा आधीच्या शिक्षणाचा हेतू ठरतो.
४. आनंदनिर्मिती —-
शिक्षण हे आनंददायी असावे, हा सामान्यपणे सर्वांनाच मान्य असलेला मुद्दा आहे. मात्र तो शिक्षणामागचा हेतू असावा की ते चांगल्या शिक्षणाचे लक्षण असावे असा प्र न दिसतो. ‘जीवनाचा मूळ हेतू चांगल्या दर्जाचा आनंद हाच असतो, माणूस सर्व प्रयत्न कष्ट हे आनंदासाठीच करतो, त्यामुळे शिक्षणाचाही मूळ हेतू आनंदनिर्मिती साधणे हाच असावा.’
५. विवेकाला जाग येणे —-
जीवनाकडे संवेदनशील आणि वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहणे हे शिक्षणातून साधू शकेल. शिक्षणामध्ये तशी क्षमता असते. भाषा, तर्कशास्त्र, विज्ञान, या विषयांमधून विवेकवृत्तीचा विकास घडवता येऊ शकतो. नागरिकशास्त्र, इतिहास, लैंगिकता-शिक्षण यांमधून तर विवेकाची जोपासना व्हावी हा महत्त्वाचा हेतू आहे.
शिक्षणामागच्या हेतूंची यादी आणखीही वाढवता येईल, परंतु अनेकांना मान्य असणारी, किमान यादी येथे गृहीत धरली आहे. या पाच मूलभूत हेतूंची पार्श्वभूमी गृहीत धरली तर त्यावर वास्तवाची चौकट ठेवून आपल्याला काय दिसेल?
येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की शिकणाऱ्याबद्दलचा विचार या हेतूंमध्ये गृहीत असला, तरी प्रत्यक्ष शिकणारा यामध्ये सक्रिय नाही. त्याच्या वतीने इतर घटकच हा विचार करत आहेत. शिक्षणाच्या सुरवातीला तर शिकणारा हा लहानसे मूल असतो. शाळेत मित्रमैत्रिणी भेटतील, खेळायचे आहे, खाऊ खायचा, असे खरेखोटे आनंदाचे गाजर त्याच्यापुढे धरले जाते. ते मिळवणे असा त्याच्या शिक्षणामागचा हेतू बनतो. शिकण्याची प्रेरणा त्याला निसर्गाने बहाल केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक नव्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल आहे. त्यामुळे काही प्रमाणात अडखळत, तरीही थोडे जिव्हाळ्याचे वातावरण मिळाले तर मूल या नव्या प्रकाराला सामोरे जाण्यासाठी तयार होते. खेळ, सवंगडी, पुस्तकांचे जग, अशा अनेक गोष्टी त्याला पुढेही आकर्षक वाटतात. त्या मिळणे हा हेतू मुलामुलींच्या मनात असतो.
एकंदरीने शिक्षणाच्या केंद्रस्थानी मूल आहे असे मानले तरी हेतूंच्या दृष्टीने त्याचा विचार फारसा केला जात नाही. काही ठिकाणी परिस्थितीच्या सोईसाठी मूल ते हेतू स्वीकारते एवढेच.
शिक्षणधोरण ठरवणाऱ्यांपासून प्रत्यक्ष शिक्षक-पालकांपर्यंत सगळ्यांची गत वेगळीच आहे. तात्त्विक चर्चेत आपण वर मांडलेल्या पाच हेतूंना ते सहमती दर्शवतात परंतु त्याशिवाय किंबहुना त्याऐवजीही त्यांचे काही ‘हेतू’ असतातच. त्यामध्ये धोरणी लोकांना राजकीय दृष्ट्या सोईस्कर विचारांचा प्रभाव तयार करणे, मतपेटीच्या दृष्टीने काही प्रदर्शनीय (?) हालचाली करणे, येथपासून ते पैसे मिळवणे, मानमरातब मिळवणे, आपल्या सुप्त किंवा अपुऱ्या इच्छा मुलांच्या माध्यमातून पुऱ्या करून घेणे, मुलांच्या द्वारे शाळेला, शिक्षकांना, पालकांना महत्त्व मिळणे, मुले गुंतलेली राहून पालकांना मोकळा वेळ मिळणे इ. इ. अनेक हेतू मुलांनी शाळेत जाऊन शिकण्यामागे असतात.
शाळाचालकांसाठी ‘पैसा मिळवणे’ हेही एक उद्दिष्ट असते, तेही शिक्षण-प्रक्रियेतून भागू शकते. पालक शाळेवर अवलंबून असल्यामुळे इच्छा असो नसो, त्यांच्याशी सहकार्य करतात. यामधून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे याचा अर्थ पैसा उभा करणे, असा पालक घेताना दिसतात. (हे एक नवे समीकरण बनले आहे, पूर्वी पैसे मिळवण्यासाठी शिक्षण अशी समजूत रूढ होती.)
या सगळ्यांतून होणारे परिणाम अधिकच भयंकर आहेत. शिक्षणाचे व्यक्ती च्या आणि समाजाच्या नात्यामधले अपरिहार्य स्थान लक्षात न घेतल्यामुळे, व टोकाच्या व्यक्ति-केंद्रित व्यवहारातून निर्माण होणाऱ्या जीवघेण्या चढाओढीच्या रेट्यामुळे शिक्षण ह्या संकल्पनेतून मूल्यात्मक हेतू आणि सामाजिक जीवनाचे सगळेच संदर्भ नाहीसे होण्याची शक्यता दिसते. तशा स्पष्ट खुणाही जाणवतात. परिणामी एकंदर जीवनाबद्दलची असुरक्षितता आणि त्यातून दुसऱ्या व्यक्ती, गट, समूहांबद्दल आक्रमकता निर्माण होते. ती शिक्षणामधूनही वाहत, वाढत जाते. त्याचे दूरगामी परिणाम शिक्षितांच्या सबंध व्यक्तिमत्त्वावर दिसतात. मिळेल ते, मिळेल त्या मार्गाने ओरबाडत, गिळत राहण्याची आणि त्यालाच वैयक्तिक पराक्रम मानण्याची सवय लागते. त्यामधून स्वतःबद्दल अतिरेकी उच्चतागंड/अहंगंड वा न्यूनगंड अशा चक्रात माणसे सातत्याने अडकतात. याचेच एक रूप स्वतःपेक्षा आर्थिक, सामाजिक खालच्या स्तरावर असणारांना तुच्छ लेखणे, हे तर शिक्षित समाजाचे व्यवच्छेदक लक्षण मानावे एवढे तीव्र होते. हे एकीकडे तर दुसरीकडे स्वतःच्या व त्याहून इतरांच्या वाट्याला येणारे शैक्षणिक वास्तव विविध अर्थांनी निकृष्ट दर्जाचे आहे याकडे लक्ष राहत नाही, त्याची खंतही वाटत नाही. ह्यात शिक्षण ह्या मूळ संकल्पनेचा पराभव होताना दिसत आहे.
शिक्षणप्रक्रिया आणि त्याभोवतीचे वास्तव यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हटले तर बदल घडवू शकतो म्हटले तर शकत नाही—-शिक्षक या घटकाच्या हातात शिक्षण पोचवण्याचे प्रत्यक्ष काम असते, तसेच तो स्वतःही समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्थेच्या मर्यादेत बांधलेला असतो, त्याच व्यवस्थेने निर्मिलेलाही असतो.
शिक्षक का शिकवतात याचे पहिले उत्तर त्यांना त्याबद्दल पैसे मिळतात असे आहे. ते खोटे नाही पण पुरेसेही नाही. त्यांना नियमितपणे पगार मिळतात असे नाही, साधनांची पुरेशी उपलब्धता आहे असे नाही, तरीही अनेक शिक्षक काम मनापासून करतात. मग ती शाळा शहरातली संधीसंचित असलेली वा दुर्लक्षित कोपऱ्यातील किंवा दुर्गम ठिकाणची असो, पस्तीस टक्के शिक्षक अतिशय चांगले काम करतात. हे खरे असले तरी जीवनाची पूर्वतयारी, क्षमता-विकसन, आनंदनिर्मिती इ. हेतूंची जाण आणि भान शिक्षकांना अभावानेच असल्याचे दिसते. स्वतःच्या क्षमतेत अभ्यासक्रमाचे गाठोडे कमी-अधिक स्पष्टतेने विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवणे, एवढाच त्यांचा हेतू असतो.
यामध्ये शिक्षकांचा खरोखरच काही दोष असतो किंवा काय हे सांगणे अवघडच आहे. त्यांना अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पगार मिळतो, आणि त्या पैशांना ते सभ्यपणे जागतात. अमुक अभ्यासक्रम तमुक वेळात पूर्ण करणे हेही तसे अवघड कामच असते. पाठ्यपुस्तकात अतिशय त्रोटक स्वरूपात मांडलेल्या अनेक संकल्पना अवघड असतात. त्या शिकवण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. चांगल्या त-हेने काही जण तोही करतात, पण बरेच समजुतीपेक्षा पाठांतरावर जोर देऊन कामाचा उरक पाडतात.
या प्रयत्नात त्यांना विद्यार्थ्यांकडून संपूर्ण मान्यता, खरे म्हणजे शरणागती हवीशी असते. म्हणजे मग हे विशेषतः पाठांतर किंवा परीक्षेत यश मिळवण्याचे काम सोईस्कर होते. विशेषतः प्राथमिक गटांत ही शरणागती, निदान तात्पुरती, सहजी मिळू शकते. यासाठी शिक्षकांना प्रथम थोडे कष्ट करून किंवा धाक दाखवून मुलांच्या मनात स्वतःची अनिवार्य गरज निर्माण करावी लागते. काही शिक्षकांना हे काम खूपच जमते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा त्यांना उपयोग होतो. ह्या शिक्षकाला सर्व विषयांतले सर्वात जास्त कळते, त्याने म्हटले तेच खरे, त्याने वागावे तोच आदर्श, अगदी त्याने नेसले, ल्यायलेले असेल तेच सुंदर, अशी मुलामुलींची कल्पना होते.
ही एक प्रकारची मानसिक गुलामीच आहे. कारण मग स्वतंत्र काही सुचत नाही. शिक्षकाने म्हटलेले काहीही पटते, पटत राहते. मग ते विज्ञानातले असो की भाषेमधले. ते शास्त्रीय सत्य असो की दृष्टिकोण. ही अनिवार्यता मुलांपर्यंत पोचवण्यासाठी शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वासपूर्ण वरचढ आवाज कमी पडल्यास शिक्षकांच्या हातातले दुसरे हत्यार असते, ते गाजराचे–शिक्षेचे.
किमान अपेक्षित क्षमतांपर्यंत मूल न पोचल्यास शिक्षा करायची आणि सामान्य पातळीवरून वर खेचण्यासाठी समोर गाजर धरायचे या प्रक्रियेमध्ये मूल स्वतःचा असा एक खास विचार असतो हेच विसरते. सातत्याने परिस्थितीच्या तापमापिकेवर एक डोळा ठेवूनच त्याला जगावे लागते. ज्यांना शाळेत जायला मिळते ते नशीबवान असे आपण म्हणतो, ज्यांना तेही मिळत नाही, त्यांच्या तुलनेत हे खरेही आहे, त्याचवेळी या नशिबाची किंमत त्यांना स्वत्व गमावून द्यावी लागते.
आमिषांच्या आणि शिक्षांच्या वापरामुळे माणसाच्या मनाचे, विचारवृत्तीचे भयंकर नुकसान होते, हे अनेक संशोधनांनी, अभ्यासांनी सिद्ध केलेले आहे. आपण जीवनात नेमके काय करावे, करायचे आहे, हे ठरवण्याचा अवकाश मुलामुलींना शालेय चौकटीत एरवीही अभावानेच मिळतो. शिक्षकांच्या आक्रमक वातावरणात तो आणखीच कमी होतो. एखाद्या गोष्टीमागे धावून किंवा शिक्षांच्या भीतीने कष्ट करण्यामधून एखाद्या विषयाची माहिती तात्पुरती मिळेलही, परंतु त्या माहितीचे पुढे काय करायचे, याची दृष्टी येत नाही.
हे सिद्ध करण्यासाठी अभ्यास-संशोधनांची तरी काय गरज? कुठल्याही शाळेत ते दिसते. आपल्या सर्वांना त्याचा अनुभवही आहे.
आमिष-शिक्षांचा वापर काय परिणाम करतो याबद्दल अनेक वर्षे मी स्वतः पालक-शिक्षकांशी चर्चा करते आहे. पालकांना ते समजावून घ्यायला वेळ लागला तरी सामान्यपणे ते चर्चेसाठी तयार असतात. विचार, निर्णयक्षमता मुलांमुलींमध्ये यायला हवी. एवढे तरी त्यांना मनापासून वाटत असते. आणि त्यासाठी आमिष-शिक्षांना पर्याय काय शोधावे, अशा विचारापर्यंत तरी ते अनेकदा येतात. पण शिक्षकांना मात्र कधीही हा विचार आतून पटत नाही. आमिष-शिक्षांवर त्यांचा ठाम विश्वास असतो, आणि मुलांनाच काय, पालकांना, समाजाला बदलवायचे तर दंड करा किंवा बक्षिसे ठेवा हीच एकमेव पद्धत त्यांना सुचते. याला स्पष्ट कारण आहे. मुलांमुलींच्या एकंदर ‘जीवनासाठी पूर्वतयारी’ या दृष्टीने —- घटनांचा, कृतींचा विचार त्यांच्या मनात फारसा नसतो. त्यांना आजचा ‘पोर्शन’ पुरा करण्याचा किडाच चावत असतो. वेळेवर शाळेत आलेच पाहिजे, वर्गात गप्प बसलेच पाहिजे, इंग्रजीतच/मातृभाषेतच बोलले पाहिजे, अशा कुठल्याही अपेक्षांबाबत त्या अपेक्षा योग्य/अयोग्य आहेत हे तपासून बघायची गरज त्यांना वाटत नाही, किंवा माणूस ते करत नाही, करू शकत नाही, असे होत असेल तर तसे का होते आहे हे पाहावे, हेही त्यांना पटत नाही. अतिशय भलेभले शिक्षकही शिस्त पाळली गेली नाही तर शिक्षा हवीच असे मानतात, आणि तात्पुरता हेतू साध्य करून घेतात. मग त्यातून दूरगामी तोटे होऊ शकतात हे दिसूनही नाकारतात.
पालक-गटाची एकंदरीने पंचाईतच झालेली दिसते. त्यांना मुलांच्या हिताची ओढ जरूर असते, पण त्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या शिक्षकावर टाकलेल्या असतात, पालकत्व स्वीकारण्यापासून आपण त्यासाठी तन-मन-विचाराने तयार आहोत की नाही असे पाहिलेले नसते, त्यामुळे ते परिस्थितीच्या हातातले बाहुले बनतात. मग ती परिस्थिती शिक्षण-माध्यम, शाळा इ. निवडण्याची असो, शाळेच्या नियमांची असो, अभ्यासक्रमांची असो की डोनेशन्सची असो,
ते फक्त अगतिक असतात.
शिक्षणामधून जीवनासाठीच्या क्षमता मुलात-मुलींत विकसित व्हाव्यात, स्वतः स्वतःला कसे वाढवावे हे त्यांना उमजावे, हे सारे स्वयंप्रेरणेने, प्रसन्नतेने घडावे, आणि जीवनाकडे भद्रतेने पाहण्याचा विवेक त्यांच्या ठायी सक्रियपणे असावा या मूलभूत हेतूंबद्दल कुणाचे दुमत नसते, पण वास्तवात शिक्षण ह्या अपेक्षांना पुरे पडत नाही. किंबहुना या अपेक्षांपर्यंत जाण्याचा हेतूच त्यामागे नाही, असे प्रतिदिवशी खालावत जाणाऱ्या शिक्षण-वास्तवाकडे पाहून खेदाने म्हणावेसे वाटते. अशा परिस्थितीत या मूलभूत हेतूंना ‘विचार चांगले आहेत पण प्रत्यक्षात टिकणारे नाहीत’ असे म्हणून दूर सोडायचे की त्यासाठी एकत्रितपणे अथक प्रयत्न करायचे हा शेवटी आपला—आपल्यासमोरचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे हे मान्य आहे की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
प्रयास परिवार, अमृता क्लिनिक, संभाजी पूल कोपरा, कर्वे रोड, पुणे — ४११ ००४