शालेय शिक्षण – एक अभिनव प्रयोग (पूर्वार्ध)

प्रयोगाच्या संकल्पनेचा उदय
सुविख्यात अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस त्यांच्याकडे येणाऱ्या मनोरुग्णांवर अधिकाधिक परिणामकारक रीतीने मानसोपचार करण्यासाठी जे प्रयोग करून पाहत होते, त्यांमधून १९५५ साली एक नवे मानसोपचारशास्त्र उदयाला आले. त्याला विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र असे म्हणता येईल. त्या शास्त्राचा विकास व प्रसार करण्यासाठी डॉ. एलिस यांनी १९५९ साली न्यूयॉर्क शहरातील आपल्या राहत्या घरातच एका संस्थेची स्थापना केली. आज ‘अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील या संस्थेची टोलेजंग इमारत, म्हणजे त्या संस्थेशी संलग्न असे त्या जगातील अनेक छोट्या-मोठ्या संस्थांचे केन्द्रस्थान आहे. त्याचप्रमाणे गेल्या ४५ वर्षांत विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचीही चौफेर प्रगती झाली आहे.
डॉ. एलिस यांच्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या प्राथमिक सिद्धान्तांचे व उपचारतंत्रांचे स्वरूप समजण्यास सोपे असल्यामुळे त्या शास्त्राचा उपयोग सर्वसामान्य माणसांच्या भावनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठीही होऊ शकतो असे काही मानसशास्त्रज्ञांना आणि मानसशास्त्राशी निगडित असलेल्या इतरही काही विशेषज्ञांना वाटू लागले. उदाहरणार्थ, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मानसशास्त्रज्ञांनी असे ओळखले, की औद्योगिक क्षेत्रात निकोप मानवी संबंध प्रस्थापित करून ते दृढ करण्यासाठी जे प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, त्यांमध्ये माणसाच्या भावनिक आरोग्यावर भर देणाऱ्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राला प्राधान्य देणे सयुक्तिक होईल. त्याचप्रमाणे इतर काही मानसशास्त्रज्ञांनी असे हेरले, की शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक प्र न सोडविण्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र साह्यभूत होऊ शकेल.
एका मुलखावेगळ्या शाळेची स्थापना
वरील दोन्ही क्षेत्रांत विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र उपयुक्त कामगिरी करू शकते, असे आढळून आल्यामुळे डॉ. एलिस यांनी १९७१ साली त्यांच्या संस्थेमध्येच ‘द लिव्हिंग स्कूल’ नावाच्या खाजगी प्राथमिक शाळेची स्थापना केली. तिच्यामध्ये पहिल्या इयत्तेपासून आठव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्या शाळेचा मुख्य उद्देश असा होता, की त्या शाळेतील मुलांना, अमेरिकेतील इतर शाळांमधील मुलांना विविध विषयांचे जे प्रचलित शिक्षण दिले जाते ते तर द्यावयाचेच; परंतु त्याजबरोबर त्यांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्याचीही सोय करावयाची. त्या शाळेची स्थापना झाली, तेव्हा वरील त-हेचे स्पष्ट उद्दिष्ट असलेली जगातील बहुधा ती एकमेव शाळा होती. ‘द लिव्हिंग स्कूल’चे वैशिष्ट्य असे होते, की त्या शाळेत भावनिक स्वास्थ्याचे शिक्षण देण्याचा उपक्रम त्या शाळेत दाखल झालेल्या मुलांपैकी जी मुले भावनिकदृष्ट्या अपरिपक्व असतील त्यांच्यापुरता मर्यादित नव्हता. उलट शाळेचा उद्देश असा होता, की शाळेत दाखल झालेल्या सर्वच्या सर्व मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित व पद्धतशीरपणे देणे.
म्हणजे मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्यामागील शाळेचा हेतू व्यापक स्वरूपाचा होता. तो असा, की मुलांना स्वतःचे भावनिक आरोग्य संतुलित राखण्यास शिकवून, त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घेण्यास साहाय्य करणे. शिवाय, प्रौढ वयात त्यांच्यापुढे ज्या समस्या ठाकतील त्यांचे निराकरण जमेल तेवढ्या सर्जनशील-पणे व कार्यक्षमतेने करणे त्यांना शक्य होईल, अशी तरतूद करणे. तसेच, त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात स्वतंत्रपणे विचार करणे कष्टदायक वाटू नये, याची तजवीज करण्यावरही शाळेचा भर होता. सारांश, स्वतःला अकारण प्रक्षुब्ध करून न घेता त्यांना स्वतःमधील सुप्त क्षमतांना मूर्त स्वरूप देऊन, एक स्वतंत्रपणे विचार करून वागणारी मानवी व्यक्ती म्हणून जीवनात रममाण होता येईल, यासाठी शाळा प्रयत्नशील राहणार होती. ‘द लिव्हिंग स्कूल’चे आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित केले पाहिजे. ते म्हणजे, ती शाळा मुख्यतः मध्यम वर्गातील पालकांच्या मुलांसाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पालकांच्या मुलांसाठी होती. शिवाय, त्या शाळेत गरीब मुलांसाठी आणि अल्पसंख्यक समाजातील मुलांसाठी बऱ्याच शिष्यवृत्त्याही ठेवण्यात आलेल्या होत्या. भावनिक आरोग्य म्हणजे काय?
डॉ. एलिस यांनी स्थापन केलेल्या ‘द लिव्हिंग स्कूल’चे उद्दिष्ट मुलांना इतर पारंपरिक विषयांबरोबर भावनिक आरोग्याचेही शिक्षण देणे, हा होता. मात्र याचा अर्थ केवळ इतकाच नव्हता, की मुलांनी शाळेतील अनेक उपक्रमांपैकी स्वतःला आवडतील त्या उपक्रमांत सहभागी होण्यास, स्वतःच्या मनातील आवडी-निवडी व विविध भाव-भावना व्यक्त करण्यास आणि स्वतःचे जीवन आनंदाने जगण्यास त्यांना उत्तेजन देणे. अर्थात हे सर्व उद्देश योग्यच आहेत आणि ते विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रात अध्याहृत असलेल्या उद्दिष्टांना पूरकही आहेत. परंतु विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे उद्दिष्ट अधिक व्यापक स्वरूपाचे असते. आणि ते उद्दिष्ट त्या शास्त्राच्या तात्त्विक भूमिकेचा परिपाक असतो.
विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र माणसाच्या जडणघडणीविषयीच्या सामान्यतः प्रचलित असलेल्या समजुतींना छेद देते. सामान्यतः असे प्रतिपादले जाते, की माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा ढाचा त्याच्या बालपणातील अनुभवांमुळे पक्का झालेला असतो. या विचार-सरणीत असे तत्त्व गृहीत धरलेले असते, की माणसाची भावनिक प्रकृती निसर्गतः आरोग्यसंपन्न असते. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेल्या सर्जनाचा आविष्कार करून आपले जीवन समृद्ध करण्याची क्षमता त्याच्यामध्ये उपजतच असते. परंतु त्याचे आई-वडील, इतरेजन व त्याच्या सभोवतालची परिस्थिती त्याच्या निसर्गदत्त क्षमतांवर अकारण व अवाजवी मर्यादा घालून, त्याला भावनिकदृष्ट्या बिघडवून टाकून हतबल करून टाकते.
उलट, विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा एक मूलभूत सिद्धान्त असा आहे, की मुलांच्या वागण्यातून दिसून येणाऱ्या भावनिक अस्वास्थ्याला त्यांची आत्मघातकी विचारसरणी, त्यांच्या दुराग्रही, हट्टी मागण्या आणि आयुष्यातील कटकटींना सामोरे जाण्यास टाळाटाळ करण्याची त्याची प्रवृत्ती, या गोष्टी जबाबदार असतात. आणि या सर्व करण्याकडे दिसून येणारा त्याचा कल त्यांना जसा निसर्गतःच लाभलेला असतो, तसाच तो त्यांनी स्वतः व त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीनेही बळकट केलेला असतो.
म्हणजे असे म्हणता येईल, की लहान मुले अगदी सहजगत्या अविवेकी विचार आत्मसात करतात किंवा स्वतःच निर्माण करतात आणि मग आपल्या मनातील त्या अविवेकी विचारांनुसार वर्तन करून, आपले उर्वरित आयुष्य काही अंशी उद्ध्वस्त करून टाकतात. कारण त्यांच्या मनातील अविवेकी विचारांमुळे त्यांची अशी पक्की समजूत होऊन बसते, की आपल्याला इतरांकडून मान्यता व प्रशंसा मिळालीच पाहिजे; आपल्याशी जी माणसे अन्यायकारक, सहानुभूतिशून्य व कठोर रीतीने वागतात, ती नालायक, नतद्रष्ट व कुचकामी असतात आणि म्हणून त्यांचा धिक्कार करून त्यांना जबरदस्त शासन केलेच पाहिजे; आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती व बाह्य जगातील घडामोडी आपल्याला अनुकूल नसणे, म्हणजे एक महान आपत्तीच म्हटली पाहिजे. इतकेच नव्हे, तर त्यांना मनापासून असे वाटते, की बाह्य जगातील प्रतिकूल परिस्थिती व घटनाच आपल्याला चिंताग्रस्त, संतप्त किंवा विषण्ण करीत असतात; आणि आपण एखाद्या घटनेविषयी चिंता करीत बसलो, तर त्या घटनेवर नियंत्रण ठेवण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल —- मग ती घटना प्रत्यक्षात घडो वा न घडो! शिवाय, त्यांना असेही वाटते, की अडचणींना व जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याऐवजी त्या टाळणेच सोपे व श्रेयस्कर असते. मुख्य म्हणजे त्यांची अशी ठाम समजूत होऊन बसलेली असते, की आपल्याला सभोवतालची परिस्थिती पूर्णपणे सुव्यवस्थित व सुरक्षित असणे आवश्यक आहे. येथे असे लक्षात घेतले पाहिजे, की बहुतेक प्रौढ व्यक्तींच्या मनांतही अशाच त-हेच्या वेडगळ समजुती ठिय्या देऊन बसलेल्या असतात. परंतु बऱ्याचदा असे दृष्टोत्पत्तीस येते, की मुले अशा समजुतींना फारच घट्टपणे चिकटून बसलेली असतात.
‘द लिव्हिंग स्कूल’ मधील भावनिक शिक्षणक्रमाची आखणी उपर्युक्त सैद्धान्तिक पायावर आधारलेली होती. परिणामी त्या शिक्षणक्रमाचे मुख्य लक्ष्य असे होते, की मुलांना त्यांच्या मनात आत्मघातकी भावना निर्माण करणाऱ्या अविवेकी दृष्टिकोणांची जाणीव करून देऊन, त्या दृष्टिकोणांचे निर्दालन करण्यास शिकविणे. तसेच त्यांना आपल्या मनात अविवेकी दृष्टिकोण पुन्हा मूळ धरून फोफावणार नाहीत याची काळजी कशी घ्यावी, याचेही शिक्षण देणे. अशा प्रकारच्या शिक्षणामुळे त्यांना स्वतःमधील गुणदोषांसकट स्वतःचा स्वीकार करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे त्यांना इतरांच्या मतांकडे व वर्तनाकडे अधिक सहिष्णुतापूर्वक दृष्टीने पाहता येईल. त्यामुळे त्यांना इतरांशी मित्रत्वाच्या नात्याने वागणे सहज शक्य होईल. शिवाय, त्यांना आपला अभ्यास व इतर दैनंदिन व्यवहार शिस्तशीरपणे करण्याची सवय अंगी बाणविता येईल; आणि त्यांना आपल्या मार्गातील अडचणींशी आत्मविश्वासपूर्वक सामना करणे कठीण जाणार नाही. इतकेच नव्हे, तर त्यांना स्वतःमधील सर्जनाचा अथवा निर्मितिक्षमतेचा योग्य रीतीने उपयोग करून घेता येईल, याही अपेक्षा शाळा बाळगून होती. व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित वरवर पाहता असे वाटणे स्वाभाविक आहे, की डॉ. एलिस यांनी आपल्या संस्थेत स्थापन केलेल्या शाळेतील अभ्यासक्रमाची तात्त्विक बैठक निःसंदिग्ध आहे आणि त्याबद्दल काही गंभीर समस्या निर्माण होण्याचे कारण नसावे. परंतु जर सखोल विचार केला, तर मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्याच्या संदर्भात एक महत्त्वाची समस्या निर्माण होणे शक्य होते. ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील मुलांना अभ्यासक्रमामार्फत प्रामुख्याने खालील दोन गोष्टींचे शिक्षण दिले जात होते.
१. जर आपल्या सभोवतालची परिस्थिती निदान नजीकच्या काळात बदलणे शक्य नसेल किंवा त्या परिस्थितीतून स्वतःची सुटकाही करून घेणे शक्य नसेल, तर तिच्याशी मिळते-जुळते घ्यावे. उदाहरणार्थ, आपल्या नात्यागोत्यातील माणसांचे किंवा मित्रांचे वर्तन अतिशय उद्वेगजनक किंवा अन्यायकारक असेल तर त्या वस्तुस्थितीचा, आक्रस्ताळेपणा न करता, स्वीकार करून तिच्याशी जमेल तेवढ्या शांतपणे जमवून घ्यावे.
२. आपल्याला इतरांची संमती, शाबासकी व मान्यता मिळविता आलीच पाहिजे; नाहीतर आपण कुचकामी व नालायक आहोत हा आपल्या मनातील दृष्टिकोण समूळ उपटून टाकावा. म्हणजे आपण सभोवतालच्या सामाजिक आचार-विचारांचे आणि रूढी व परंपरांनी ठरवून टाकलेल्या नियमांचे सदैव तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे, असे आपल्याला वाटणार नाही. त्यामुळे आपण आहे त्या सामाजिक परिस्थितीतही निदान काही अंशी स्वमतानुसार जीवन जगण्यास मोकळे राहतो. तेव्हा या संदर्भात शाळेचे धोरण स्पष्ट होते. शाळेची भूमिका अशी नव्हती, की आपल्या सभोवतालचे जग अनेक बाबतींत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे प्रत्येक मुलाने क्रान्तिकारक होणे आवश्यक आहे. तसेच शाळेची भूमिका अशीही नव्हती, की प्रत्येक मुलाने आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीसाठी सभोवतालची परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी काही व्यवहार्य मार्गाचा अवलंब करावा. उलट शाळेचे धोरण असे होते, की मुलांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील क्षमतांचा वस्तुनिष्ठपणे विकास करून घेण्यास अशा रीतीने शिकावे, की अखेर प्रत्येक जण भावनिकदृष्ट्या अकारण विचलित न होता वरील मूलभूत प्र नासंबधी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकेल. म्हणजे आपण पुढील आयुष्यात बाह्य जगातील परिस्थितीशी कोणत्या वेळी किती प्रमाणात मिळते-जुळते घ्यावे आणि त्या परिस्थितीविरुद्ध कोणत्या वेळी किती प्रमाणात बंड करून उठावे, हे ठरविण्यास प्रत्येक जण मुखत्यार असला पाहिजे. एखादी शालेय शिक्षणप्रणाली काय अथवा मानसोपचारपद्धती काय, जर सर्व मुलांना एकाच विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक तत्त्वाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करीत असेल, तर ती प्रणाली अथवा पद्धती मुलांवर अति बंधने घालून त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच तर करत नाही ना, अशी शंका घेण्यास जागा उरते. परंतु विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची उभारणी मानवतावादी व सहिष्णुतेच्या उदार तत्त्वांवर झालेली आहे. म्हणून ‘द लिव्हिंग स्कूल’ आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचे साचेबंद शिक्षण देण्यात येणार नाही, याची नेहेमी खबरदारी घेत असे. पालकांचा सहभाग ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील मुलांनी भावनिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न व्हावे, म्हणून त्यांना नेमक्या कोणत्या पद्धतीने शिक्षण दिले जात जसे हे समजावून घेण्यापूर्वी असे आवर्जून नमूद करावयास हवे, की शाळेने प्रथमपासूनच पालकांना विश्वासात घेण्याची खबरदारी घेतली होती. कोणत्याही मुलाचे नाव शाळेत दाखल करून घेताना त्या मुलाच्या पालकांना असे सांगण्यात येत असे, की मुलांना इतर पारंपारिक विषयांबरोबरच भावनिक आरोग्याचे शिक्षण देणे, हा शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा एक भागच होता.
पालकांना असेही सांगण्यात येत असे, की दर महिन्याला शाळेत पालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळेत त्यांनी सहभागी होणे आवश्यक होते. कारण अशा कार्यशाळांमधून मुलांना भावनिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिक्षणाशी निगडित असणाऱ्या अनेक समस्यांचा ऊहापोह करण्यात येत असे. इतकेच नव्हे, तर त्या कार्यशाळांमधून, शाळेत मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाला पूरक ठरेल असे कोणत्या प्रकारचे शिक्षण पालकांनी आपल्या पाल्यांना घरी द्यावे, याबद्दलही पालकांना मार्गदर्शन करण्यात येत असे. पालकांना असेही सुचविण्यात येत असे, की त्यांनी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राविषयी काही किमान ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक होते. अर्थात असे ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी डॉ. एलिस यांच्या संस्थेमार्फत प्रकाशित होणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याचा उपयोग करावा, असे त्यांना सांगण्यात येत असे. त्याचप्रमाणे डॉ. एलिस यांच्या संस्थेत सर्वसामान्य माणसांसाठी विवेकनिष्ठ मानसोपचार-शास्त्रावर आधारित व्याख्याने व कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात, त्यांचाही पालकांनी फायदा करून घ्यावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असे. आणि याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पालकांना असे आवर्जून सांगण्यात येत असे, की त्यांना आपल्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी, डॉ. एलिस यांच्या संस्थेतील जे मानसोपचारतज्ज्ञ शाळेशी संबंधित होते, त्यांचा अथवा शाळेच्या संचालकांचा सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध होते. या सर्व प्रयत्नांच्या मुळाशी शाळेचे एक धोरण होते. ते म्हणजे, मुलांना त्यांची भावनिक प्रकृती सुदृढ राखण्यास शिकविण्याच्या उपक्रमात पालकांनी सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक होते; नाहीतर तो उपक्रम यशस्वी होणे दुरापास्त झाले असते. शिक्षकांचे प्रशिक्षण मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्याअगोदर शाळेने प्रथम त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन, त्यांना मुलांसाठी आखण्यात आलेल्या शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यास उद्युक्त करणे नक्कीच स्पृहणीय व आवश्यक होते. मात्र कळीचा प्र न असा होता, की मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देण्याची जबाबदारी कोणावर सोपवावी? या प्र नाचे उत्तर असे, की शाळेने हे काम प्रामुख्याने शाळेतील शिक्षकांमार्फतच करून घेण्याचे ठरविले होते. ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील भावनिक आरोग्य हा नवीन विषय सोडला, तर इतर सर्व अभ्यासक्रम न्यूयॉर्क शहरातील इतर शाळांमध्ये गणित, भाषा, विज्ञान इत्यादी विषय ज्या अभ्यासक्रमानुसार शिकविले जात असत, तेच विषय त्याच अभ्यासक्रमानुसार शिकविण्याची सोय होती. आणि मुलांना या प्रचलित विषयांचे शिक्षण देण्यासाठी ‘द लिव्हिंग स्कूल’ मध्येही काही प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती. फरक इतकाच होता, की शाळेतील मुलांना त्याच शिक्षकांमार्फत भावनिक स्वास्थ्याचे शिक्षण देण्याची पद्धत अवलंबिण्यात आली होती.
अर्थात शिक्षकांना ही जबाबदारी पेलता यावी, म्हणून त्यांना प्रथम विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रावर आधारित समुपदेशन करण्याच्या कामात प्रशिक्षित करण्यात आले होते. त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचा जो अभ्यासक्रम डॉ. एलिस यांच्या संस्थेत तयार करण्यात आला होता, त्यातील पहिला भाग म्हणजे अर्थातच प्रशिक्षणार्थी शिक्षकांना विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे मूलभूत सैद्धान्तिक ज्ञान आत्मसात करण्यास शिकविणे. आणि त्या अभ्यासक्रमातील दुसरा भाग म्हणजे, प्रशिक्षणार्थी शिक्षकांना विवेकनिष्ठ मानसोपचार-शास्त्रावर आधारलेल्या समुपदेशनाच्या पद्धती प्रत्यक्ष कृतीद्वारे, सरावाने आत्मसात करण्यास शिकविणे. या दुसऱ्या भागात प्रशिक्षणार्थी शिक्षकांना डॉ. एलिस यांच्या संस्थेचे ‘फेलो’ होऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थीना मानसोपचाराच्या पद्धतीचे जसे उच्चस्तरीय प्रशिक्षण देण्यात येत असे, तसेच प्रशिक्षण देण्यात येत असे. किंबहुना ‘फेलो’ होऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठी आयोजित केलेल्या सराव-सत्रांमध्ये त्यांना सहभागी करून घेण्यात येत असे. त्यामुळे एखाद्या लहान अथवा प्रौढ व्यक्तीवर, आणि लहान अथवा प्रौढ व्यक्तींच्या समूहात, मानसोपचार करण्याचे कौशल्य प्रशिक्षणार्थी शिक्षकांना चांगल्या प्रकारे अवगत होत असे. शिवाय, डॉ. एलिस यांच्या संस्थेत सर्वसामान्य माणसांसाठी व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांमध्येही प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सहभागी होण्याची संधी मिळत असे. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकाला निदान एकदा तरी, सर्वसामान्य व्यक्तींच्या समूहात एक प्रशिक्षित समुपदेशक म्हणून स्वतंत्रपणे (परंतु अर्थातच त्याच्या पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली), आपण अवगत करून घेतलेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करण्याची संधीही प्राप्त करून देण्यात येत असे.
परंतु प्रशिक्षणार्थी शिक्षकांना ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील मुलांबरोबर स्वतंत्रपणे काम करावे लागणार होते. त्यासाठी त्यांना आणखी एका पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत असे. ती म्हणजे, त्यांचे पर्यवेक्षक मुलांच्या समूहात समुपदेशकाची भूमिका घेऊन, मुलांच्या समस्या कोणत्या प्रकारे हाताळाव्या याचे प्रात्यक्षिक सादर करीत असत. अशा वेळी प्रशिक्षणार्थी शिक्षक जागरूक राहून निरीक्षकाची भूमिका पार पाडीत असत. समजा एका प्रशिक्षणार्थी शिक्षिकेचे पर्यवेक्षक खुद्द डॉ. एलिसच आहेत. आणि ती शिक्षिका आपल्या वर्गातील सात-आठ मुलांना घेऊन डॉ. एलिस यांच्या कचेरीत गेली आहे. अशा वेळी डॉ. एलिस तिला सामूहिक समुपदेशन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक सादर करीत आहेत. तर ती शिक्षिका डॉ. एलिस यांच्या पद्धतीचे जे निरीक्षण करील, त्यातून तिला खूप काही शिकता येईल. परंतु मुख्यतः तिला पाहता येईल, की डॉ. एलिस समुपदेशनाचे काम करताना शिक्षकाची भूमिका घेत आहेत. कारण मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देणे म्हणजे एक शिक्षण देण्याचीच प्रक्रिया आहे, असा त्यांचा दृष्टिकोण आहे. आणि ते आपल्या विषयाचे एक चांगले शिक्षक असल्यामुळे, मुलांच्या विचारांशी व भावनांशी निगडित असलेल्या अडचणींचे त्यांना बरेच ज्ञान आहे. म्हणून त्यांना असा आत्मविश्वास वाटतो, की आपण सामूहिक समुपदेशनाद्वारे अगर इतर तंत्रांचा उपयोग करून, मुलांना अधिक विवेकनिष्ठ विचार करण्यास आणि आत्मघातकी भावनांच्या आहारी न जाण्यास शिकवू शकतो.
अशा प्रात्यक्षिकामार्फत प्रशिक्षणार्थी शिक्षिकेला समजेल, की डॉ. एलिस केवळ शिक्षकाची भूमिका पार पाडत नाहीत, तर मुलांनी विवेकाची कास धरून विचार कसा करावा आणि आपले जीवन आनंदमय कसे करावे, याचे धडे देणाऱ्या शिक्षकाची भूमिका बजावीत असतात. ते मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने वागतात. परंतु त्यांचे वागणे असे असते, की मुलांनी त्यांच्याकडे एक प्रिय व्यक्तीच नव्हे तर एक आदरणीय प्रौढ व्यक्ती म्हणून पाहणे शक्य व्हावे. त्यांना मुलांबद्दल आपुलकी वाटते; तरीदेखील त्यांना मुलांचे काही वागणे आवडते, तर काही वागणे आवडत नाही. समुपदेशनाचे सत्र सुरू असताना मुलांनी बरोबर उत्तरे दिली, तर ते मुलांना शाबासकी देतात, आणि मुलांची उत्तरे चुकली, तर त्यांना थोडी नाराजी वाटल्याचेही ते मुलांना दाखवून देतात. कधीकधी ते मुलांना एखादी जरा अनोखी कृती करण्याचा धोका पत्करून, थोड्या वेगळ्या अनुभवाला सामोरे जाण्यासही प्रवृत्त करतात. आणि अशा विविध प्रकारे ते शिक्षकाची भूमिका कशी घेतात, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षिकेला समक्ष पाहता येते.
प्रात्यक्षिक संपल्यानंतर डॉ. एलिस पर्यवेक्षक म्हणून त्या प्रशिक्षणार्थी शिक्षिकेला त्यांनी आपल्या प्रात्यक्षिकात आपण कोणता भाग चांगल्या रीतीने केला व कोणत्या चुका केल्या, हे समजावून सांगतील. तसेच, आपण प्रात्यक्षिकात मुलांच्या कोणत्या मुख्य समस्यांची चर्चा केली व विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र त्या समस्या कोणत्या रीतीने हाताळते, याबद्दलही तिच्याशी चर्चा करतील.
(अपूर्ण)
४४/डी/११६ मनीषनगर, जयप्रकाश रोड, अंधेरी (प िचम), मुंबई — ४०० ०५३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.