माझ्या मित्राचा भाऊ मुंबईला असतो. ५९ वर्षाचा आहे. बी.ए. झाला आहे. नेव्हीत ११ वर्षे नोकरी, त्यानंतर १५ वर्षे मुंबईला नामांकित खाजगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी व सध्या लेबर कॉन्ट्रक्ट घेणे, व एका कंपनीसाठी मुदत ठेवी गोळा करणारा एजंट म्हणून काम करणे—असा आतापर्यंत विविध प्रकारचा अनुभव गाठीस आहे. स्वतःचे घर आहे. बायको स्वतःच्या वेगळ्या जागेत दुकान व पैसे व्याजाने देण्याचा उद्योग करते, मुलगा चांगल्या नोकरीवर. अशा रीतीने आर्थिक स्थिती चांगली आहे.
११ वर्षांपूर्वी अपघाताने जखम झाल्याने मधुमेह व रक्तदाब हे विकार लक्षात आले. तेव्हापासून फॅमिली फिजिशियन कडून उपचार चालू आहेत. रिटायर्ड नेव्ही व्यक्ती म्हणून मूळ गावी चार एकर शेतजमीन मिळाली, तेथे ऊस लावला आहे. त्याची देखरेख करण्यासाठी साधारण १ महिन्यापूर्वी मूळ गावी गेला होता. रात्री थंडी असल्याने शेकोटीभोवती गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी दोन्ही पायांच्या बोटांवर भाजल्यासारखे मोठे मोठे फोड आले म्हणून कळले, की शेकोटीने पाय भाजले होते. प्रत्यक्ष भाजले त्यावेळी काहीच संवेदना जाणवली नव्हती.
तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला आल्यावर माझ्या मित्राने अक्षरशः पकडून सक्तीने माझ्याकडे आणले. मोठ्या नाईलाजाने तो आला. तपासणी अंती (१) खूप वाढलेली रक्तातील साखर (uncontrolled मधुमेह) (२) खूप वाढलेला रक्तदाब (३) दोन्ही पायाच्या नसा (Nerves) मधुमेहामुळे निकामी झाल्याने दोन्ही पाय संवेदनाहीन (Peripheral Neuropathy) (४) डाव्या पायाच्या अंगठ्याखाली जुनाट अल्सर (Neuropathic ulcer) (५) डोळ्यातील मज्जापटलाचे नुकसान (Diabetic Retinopathy) (६) किडनीचे नुकसान (Diabetic Nephropathy) (७) दारुची व तंबाखू ओढण्याची (सिगरेट) सवय असे आजार (आजारांचा पिसारा-Full spectrum of diabetic disease) सापडले.
त्याच्याजवळ रेकॉर्डमध्ये गेली कित्येक वर्षे नियमितपणे करून घेतलेल्या रक्तातील साखर-तपासणीचे आकडे सापडले. सतत उपाशी पोटीची व भरलेल्या पोटीची रक्त-साखर खूप वाढलेली होती. पण अकरा वर्षे सुरवातीला चालू केलेली तीच औषधे त्याच डोसमध्ये चालू होती. रक्त-साखर वाढली तर त्याबद्दल आपण काही करायला पाहिजे, औषधाचा डोस वाढवला पाहिजे, नाहीतर औषध बदलायला पाहिजे, नाहीतर आहारात बदल करायला पाहिजे व मधुमेह ताब्यात आणण्यासाठी डॉक्टरांच्या मागे लागून योग्य उपचार केले पाहिजेत, असे या सुविद्य, अनुभवी, शहर-निवासी व सुस्थितीतील माणसालादेखील वाटले नाही! तसेच रक्तदाबाचेही अनेक वेळचे आकडे उपलब्ध होते—-सर्व एकजात खूप वाढलेला रक्तदाब दर्शवीत होते. पण त्याबद्दलही काही हालचाल केली नव्हती. पायाच्या अंगठ्याखालची जखम कित्येक महिने बरी होत नव्हती. एकदा गडबडीत रेल्वेमध्ये याच्या पायातला बूट निघून गेला, तरी याला ते कळलेच नव्हते—-यातही त्याला काही गंभीर वाटले नाही व ही तक्रार घेऊन तो डॉक्टरकडे गेलाच नाही! त्याचे डॉक्टरही त्याच माळेतले मणी—-सतत वाढलेली रक्तशर्करा, सतत वाढलेले रक्तदाबाचे आकडे पाहूनही त्यांनी त्याला ना आजाराच्या गांभीर्याची कल्पना दिली, ना औपाधोपचारात बदल केले, ना पथ्य सांगितले, ना व्यसनांपासून परावृत्त करण्याच्या प्रयत्न केला! (हा आरोप सांगोवांगीवर अवलंबून आहे—- साक्षी-पुरावे करून सिद्ध केलेला नाही हे मान्य.)
हे सर्व इतके तपशीलवार लिहिले कारण हे अपवादात्मक उदाहरण नाही—प्रतिनिधिक उदाहरण आहे. जवळ जवळ सर्वच रुण व त्यांचे नातेवाईक व बऱ्याच वेळा त्यांचे डॉक्टरही असेच असतात! शिक्षण, अनुभव, शहर निवास, आर्थिक स्थिती व आता दूरदर्शन सारखी माध्यमे—-यांनी या (गैर) वर्तनात काही फरक पडत नाही! मला तरी या वर्तनामागे भारतीय संस्कृतीतील, परंपरेतील, तत्त्वज्ञानातील घटक दिसतात—-(१) कर्मकांड (२) निष्काम कर्मयोग (३) कर्म सिद्धान्त.
(१) कर्मकांड —- क्रिया व त्यामागील हेतू किंवा उद्देश यांची फारकत. दरमहा रक्तदाब मोजला, रक्तशर्करा मोजली की आपले काम संपले. जणू काही नुसत्या मोजण्याच्या क्रियेनेच आजार बरा होणार आहे. औषधे घेऊनही रक्त-दाब वाढलेला आढळला, रक्तशर्करा वाढलेली आढळली तर आपण काही हालचाल करायला हवी (Action), हे यांच्या गावीही नसते! जणू काही ही एक यातु–क्रिया (magical act) आहे. ही मनोवृत्ती सर्वत्र आहे. न समजणाऱ्या संस्कृत मंत्रांनी संस्कार होतात. ज्ञानेश्वरी न समजता नुसती वाचली तरी लाभ होतो—-पुण्य लागते. त्यामुळे ज्ञानेश्वरीची पारायणे केली जातात—-११ वेळा, १११ वेळा वगैरे. शासन व नगरपालिका अनेक प्रकारची माहिती कर्मकांड म्हणून गोळा करतात. ती माहिती व ती आकडेवारी तशीच दप्तरांत पडून रहाते. त्या माहितीवरून, आकडेवारीचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले जात नाहीत, धोरणात त्यामुळे काही बदल केले जात नाहीत. नगरपालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याला कोणत्या रोगाने किती मृत्यू गेल्या वर्षी झाले हे देखील ठाऊक नसते. होलस्टीन, जर्सी वगैरे आयात-वाणाच्या गाईंची शिंगे वासराला डोक्यावर डाग देऊन वाढू द्यावयाची नसतात—-ते केवळ कर्मकांड म्हणून. शिंगांमुळे आपल्याला व जनावरांना जखमा होऊ नयेत म्हणून नाही. त्यामुळे देशी वाणाच्या इतर जनावरांची शिंगे डागण्याचा विचारही मनात येत नाही. या मनोवृत्तीची अशी अनेक उदाहरणे देता येतील.
निष्काम कर्मयोग —- कर्मापासून फळ मिळण्याची अपेक्षाच धरावयाची नसते. औषधे एक कर्म म्हणून घ्यावयाची असतात. औषधे घेतल्याने रक्तदाब कमी यावा, मधुमेह ताब्यात यावा, अशी अपेक्षाच नसते. गुण आला तर तो औषधांमुळे नसतो—तर डॉक्टरच्या हातगुणामुळे, किंवा ग्रह–योगामुळे, नशिबात लिहिले असल्यामुळे किंवा शनीचा जप केल्याने आलेला असतो. आजार वाढला तरी त्याला आपली दिरंगाई, हेळसांड, किंवा आपली व्यसने, किंवा डॉक्टरांचे चुकीचे निदान, चुकीची औषधे घेणे अशी कारणे नसतात, तर तसे नशिबातच लिहिलेले असते.
कर्मापासून फळ मिळण्याची अपेक्षाच नसल्याने, कर्मापासून फळ मिळते का हे तपासण्याचीही गरज राहत नाही. (पा चात्त्य) शास्त्रीय (अॅलोपथी) वैद्यकात औषधानेच खरोखर गुण आला का हे तपासण्याचे, सिद्ध करण्याचे एक शास्त्रच विकसित झाले आहे. तसे शास्त्र आयुर्वेद, यूनानी किंवा होमिओपथीचे उपचार उपयोगी आहेत का नाहीत हे तपासण्यासाठी वापरले जात नाही—-आजदेखील वापरले जात नाही. उलट एका प्रकारचा अविश्वासच या शास्त्राबद्दल असतो. डॉक्टरनी दिलेल्या औषधांपेक्षा कोणीतरी सांगितलेल्या औषधावर चटकन विश्वास बसतो. शास्त्रावरच विश्वास नसल्याने भारतीय माणूस शास्त्रीय वैद्यकातील पदवीधर, मिश्र वैद्यकातील–पूर्ण आयुर्वेदातील पदवीधर, होमीओपथी पदवीधर, स्वतः अभ्यास करून होमिओपथी, आयुर्वेद, यूनानी, किंवा बाराक्षार उपचारपद्धती देणारे, झाडपाल्याची औषधे देणारे धनगर वगैरे सर्व उपचारकांना एकाच मापाने मोजतो व सर्वांकडे सारख्याच श्रद्धेने जातो. भारतीय माणूस स्वतः उच्चशिक्षित असला तरीही यात फरक पडत नाही. तीच गोष्ट ज्योतिष, पत्रिका यांबद्दल. फलज्योतिषाने भविष्य सांगता येत नाही, हे शास्त्रीय कसोट्यांवर कितीही वेळा सिद्ध झाले तरी उच्चशिक्षित भारतीय माणसाची त्यांवरची श्रद्धा अढळ राहते.
शासकीय पातळीवर देखील अब्जावधी रुपये खर्चाच्या योजना, त्या योजनां-मुळे विकास होणारच अशा श्रद्धेने हाती घेतल्या जातात. योजना पुया होऊन वीसवीस वर्षे झाली तरी त्या योजनांमुळे राष्ट्राचा, जनतेचा खरेच फायदा झाला की सर्व खर्च वाया गेला व जनतेचे नुकसानच जास्त झाले, याचा हिशेब, जमाखर्च, ताळेबंद कोणी मांडतच नाही. त्यात शासनाला रसच नाही. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य खोडून टाकून तेथे “श्रद्धेचा विजय असो’ असे ब्रीदवाक्य लिहावे! कर्मा-पासून फळ मिळावे अशी आमची अपेक्षाच नाही—-विकास योजना ह्या ‘स्वतो-मूल्याय’ पार पाडावयाच्या—-विकास साध्य करण्यासाठी नाही.
(३) कर्मसिद्धान्त —- नशिबात जे काही विधिलिखित आहे, ते होणारच या कल्पनेमुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे, आजारांवर योग्य शास्त्रीय उपचार केल्या-मुळे, आजार किंवा आजारांचे वाईट परिणाम टळू शकतील यावरच भारतीय माणसाचा विश्वास बसत नाही. मग नियमित शारीरिक तपासणी, दीर्घ आजारातील योग्य उपचार यांसाठी पैसा, वेळ, यत्न व बुद्धी कोण खर्च करणार? त्यामुळेच असेल की मला गेल्या ३५ वर्षांत नियमित शारीरिक तपासणी करणाऱ्या व्यक्ती अपवादानेच भेटल्या. किंवा, “मला (किंवा माझ्या नातेवाईकाला) असाअसा आजार आहे, तर कुटुंबातील इतर व्यक्तींना तो आजार होण्याची किती शक्यता आहे; शक्यता असेल तर इतरांना तो आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?’ असे विचारणाऱ्या व्यक्ती मला २–३ च भेटल्या! व तसा सल्ला व माहिती मी आपणहून दिली तर, ‘काय कटकट आहे बुवा’, असा भाव चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतो. (फक्त एकाच बाबतीत लोकांना रस असतो—-“क्षयरोग, महारोग, कॅन्सर किंवा एडस् चा एखादा आजारी कुटुंबात असला, तर संसर्गाने घरातील इतर व्यक्तींना तो आजार होईल का?” यात. नकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्यांच्या चेहेऱ्यांवर निराशा दिसते—-जणू काही आता त्या व्यक्तीला वाळीत टाकता येणार नाही याचे त्यांना दुःख वाटते!)
संकटांची, आजारांची, अपघातांची पूर्वकल्पना करणे (prediction), त्यांची कारण-मीमांसा करणे व ते टाळण्याचा प्रयत्न करणे (prevention) या गोष्टी बुद्धी व विवेक लागणाऱ्या असल्याने जणू भारतीय मनोवृत्तीत बसत नाहीत. त्यापेक्षा भविष्य, ग्रह-कुंडली—कर्मफलमीमांसा व त्यावरील दैवी/जादूटोण्याचे उपचार किंवा अटळ समजून स्वीकार, या गोष्टी भारतीय मनोवृत्तीला मानवतात. रस्त्यावरील अपघातात माणसे मरणार, जायबंदी होणार याचा आपण नशीब म्हणून स्वीकार करतो. अभ्यासाने, वाहने एकमेकांवर किंवा मोठ्या झाडांवर आदळून ९५% अपघात होतात असे ठरवून, रस्त्यावर रात्री दिवे नसलेली वाहने—-इतर अडथळे ठेवणे हा खुनाचा प्रयत्न आहे, असे समजून या गंभीर गुन्ह्याला गंभीर शिक्षा देत नाही. किंवा रस्त्याशेजारी मोठी झाडे वाढवण्याचे धोरण आपण बदलत नाही. अपघात/रोग/संकटे टाळणे (Preventive Action) आमच्या रक्तात नाही—-ब्रिटिश राजने—-पाश्चिमात्त्य संस्कृतीने आमच्यावर लादलेले ते एक सक्तीचे लसीकरण आहे—-व म्हणून लसीकरणा-पुरतेच ते मर्यादित राहिले आहे.
माझे अनुभव व्यवसायामुळे वैद्यकीय क्षेत्रातलेच प्रामुख्याने असल्याने उदाहरणे याच क्षेत्रातली प्रामुख्याने आहेत. पण माझी खात्री आहे की बुद्धी व विवेक हे हेडलाइटस् बंद करून श्रद्धेच्या फॉगलाइटस् मध्ये जीवनाचा प्रवास केल्यास जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आपण आंधळ्याप्रमाणेच वावरणार. आंधळा माणूस काठी टेकत चालत असला तर ते त्याच्या व इतरांच्या दृष्टीने बऱ्यापैकी सुरक्षित असते. पण तंत्रज्ञानाची मोटर किवा विमान त्याला चालवायला दिली तर ते त्याला व इतरांना घातक ठरतेच. तसेच विज्ञानपूर्व-कालातील श्रद्धाळू समाज कोणालाच फार नुकसानकारक नव्हता पण तंत्रज्ञानाने (स्वयंचलित वाहने, संगणक, अणुशक्ती, जैवतंत्रज्ञान) समर्थ झालेला समाज जर वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेला, आंधळा असेल, तर स्वतःला, पर्यावरणाला व पृथ्वीच्या भविष्याला ते फार नुकसानकारक ठरेल. आपल्याला उज्ज्वल परंपरा शोधावयाची असेल तर ती उपनिषदे, चार्वाक, ज्योतिबा फुले, रानडे, आगरकर, आंबेडकर, र. धों. कर्वे यांच्या बुद्धिवादी विचारधारांमधून शोधावी लागेल. मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा यासाठी प्रथमपासूनच जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.
२५ नागाळा पार्क, कोल्हापूर