चिं. मो. पंडित यांनी (आ.सु. ११.११, १२.३) एका मोठ्या व महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. भविष्यातली समाजव्यवस्था ‘स्त्री-केन्द्री कुटुंबव्यवस्थे’ वर आधारित असावी असे मत मांडणाऱ्यांचा भूमिकेची ते वेगवेगळ्या अंगांनी पाहणी / तपासणी करतात. यासाठी जो ‘अप्रोच’ त्यांनी घेतला आहे व जी पद्धती अवलंबिली आहे ती फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
कुटुंब हे समाजाच्या बांधणीचे पूर्वापार प्राथमिक व पायाभूत एकक राहिले आहे. पण या सामाजिक संस्थेवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये सैद्धान्तिक आघातही केले जात आहेत. स्त्रीला पुरुषांच्या प्रभुत्वापासून मुक्त करावयाचे असेल तर तिला नवरा नावाच्या पुरुषाशी बांधून, जखडून ठेवणाऱ्या विवाह बंधनातून सोडविण्याची आवश्यकता मांडली गेली आहे. विवाह व कुटुंब या दोन सामाजिक संस्था पुरुष-सत्ताक समाजव्यवस्थेच्या मूलाधार होत, आणि म्हणून त्या उखडून फेकल्या पाहिजेत, अशी ही भूमिका. स्त्रीवादी चळवळ उत्कर्ष पावली नसती तरी, आधुनिक भांडवल-दारी अर्थव्यवस्था आणि व्यक्तिवादी लोकशाही व्यवस्था यांच्या आघाताखाली विवाह व कुटुंब या दोन्ही संस्था एरवीच बऱ्याच खिळखिळ्या होणारच होत्या. मूलविरहित जोडपे, एक मूल असलेले दांपत्य, लहान चौकोनी कुटुंब ही घडामोड पारंपरिक विवाहाच्या व कुटुंबसंस्थांच्या भक्कमपणाला सुसा लावणारीच आहे. हीच गोष्ट वैयक्तिक करियरविषयीच्या वाढलेल्या आग्रहाविषयी आणि आपले व्यक्तित्व स्वतंत्र राखण्याच्या आग्रहापोटी लग्न न करता राहण्याच्या वा घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेविषयी म्हणता येईल.
भारतात शंभरसवाशे वर्षांपूर्वी अभिजनवर्गातील घरातील, स्त्रीची जी स्थिती होती, तिच्या वाट्याला जो भोग येत होता त्याच्याशी तुलना करता आज मुलगी, पत्नी, सून, आई, वगैरे विभिन्न भूमिकांमधील स्त्रीची स्थिती अधिक मोकळिकीची, जाच व काच कमी झालेली अशी आहे. ती करियरचा वा ध्येयनिष्ठ पेशाचा विचार करून प्रतिष्ठितपणे, स्वेच्छापूर्वक अविवाहित राहू शकते, लग्न मोडण्याचा, पुन्हा नव्याने लग्न करण्याचा विचार तिने केला तर तिची अप्रतिष्ठा होत नाही, नोकरी-व्यवसायासाठी ती ‘घराबाहेर’ पडू शकते व घरच्या जबाबदाऱ्या कमीअधिक प्रमाणात अंगाबाहेर टाकू शकते. पुरुषप्रधानता, पुरुषसत्ताकता हे समाजव्यवस्थेचे आणि वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाचे वळण पुरते गेलेले नाही. पण आज पुरुषवर्गाचे विचारही बदलले आहेत. सापेक्षतः पारंपारिक वळणाच्या शिक्षित घरांमध्येही पुरुषांची स्त्रियांवर पूर्वीसारखी हुकूमत चालत नाही.
काबाडकष्ट करून पोट भरणाऱ्या, कनिष्ठ, हीन वा अस्पृश्य गणल्या गेलेल्या बहुजनसमाजातील स्त्रियांची स्थिती पूर्वापार वेगळी राहिली आहे. काही प्रकारची बंधने त्यांच्यावर कमी होती. रीतिभातीही जातजमातीगणिक वेगळ्या होत्या. सांस्कृतिक वैचारिक-मूल्यात्मक चौकटीही काही प्रमाणात वेगळ्या होत्या. पण व्यवस्था एकंदर पुरुषसत्ताकच होती, आणि पुरुष आपली सत्ता उघड उघड अधिक हिंस्र पद्धतीने राबवीत आले असेही म्हणण्यास जागा आहे. जगभरच एक अनुभव समान दिसतो : स्तरीय, व्यामिश्र समाजाच्या जेवढे तळागाळाशी जावे तेवढ्या विवाह व कुटुंब या संस्था वेगवेगळ्या कारणांनी व अंगांनी खिळखिळ्या असणे, मोडकळीच्या अवस्थेत असणे अधिक प्रमाणात आढळते. समाजातल्या वरिष्ठवर्गीयांचा एक सर्वांगीण दाब निम्नवर्गीयांवर कायम असतो, ज्या दाबाखाली या संस्था ठिसूळ बनतात. आपली बरीचशी चर्चा अभिजनवर्गीयांना समोर ठेवून चालते. हे काहीसे स्वाभाविक व अटळ आहे. पण त्यामुळे समाजातील सर्व थरांतील, जातीजमातीतील स्त्रियांच्या स्थितीबद्दल आपण बोलायला जातो तेव्हा फसगत होते.
विवाह व कुटुंब या दोन संस्थांची आमूलाग्र फेरमांडणी केली तरच स्त्री मुक्त, स्वतंत्र व समान होईल, पुरुषाचे तिच्यावरील आधिपत्य संपुष्टात येईल, ही वैचारिक भूमिका आजही स्त्रीमुक्तीच्या स्त्रीवादी चळवळीची पायाभूत भूमिका आहे असेच म्हटले पाहिजे. या दोन संस्थांच्याद्वारेच स्त्रीचे दास्य निर्माण केले गेले, तिला अबला बनविले गेले ही समज आजही मध्यवर्ती आहे. या समजेमध्ये पुरेसे तथ्यही आहे; म्हणजे, जरी ही उद्दिष्टे बाळगून या संस्थांची निर्मिती पुरुषांनी ठरवून केली असे जरी नसले तरी, विशेषतः नागर संस्कृतींच्या विकासक्रमात या संस्थांना या दिशेने वळण बुद्ध्या दिले गेले. स्त्रियांवर टाकली जाणारी बंधने, दास्य, गौणत्व हे इष्ट व आवश्यक आहे, ही भूमिका सरळ सरळ घेतली गेली. आपण इतकेच फार तर म्हणू शकू की, स्त्रियांचेच या व्यवस्थेत भले होणार आहे, कारण त्या अशा अशा स्वभावप्रकृतीच्या असतात, हे अनेकांचे निःस्वार्थी प्रामाणिक मत होते.
हा साराच मुद्दा स्त्रियांच्या लैंगिक कामनापूर्तीशी, स्त्रीपुरुषांमधील लैंगिक व भावनिक संबंधांशी अटळपणे जोडलेला आहे. आता, एक गोष्ट बहुतेक सर्वांनाच मान्य आहे असे दिसते. ती ही की समाजाचा धारणेसाठी स्त्रीपुरुषांच्या ठायी असलेल्या सर्वच पायाभूत व प्रगाथी ‘भुकां’चा बाबतीत नियमन गरजेचे आहे. म्हणजे, जाला हवे तसे त्याने वागावे; कोणत्याच वर्तनाला आडकाठी असू नये, कोणतेही बंधन असू नये —- स्वैराचारी, अनैतिक हे शब्दच बाद ठरवावेत —- ही भूमिका व्यवहार्यही नाही व शहाणपणाचीही नाही. यांचीही एक चांगली, शिव व सुंदर अशी, सत्य अशी व्यवस्था ‘ऑर्डर’ कल्पावी लागते व ती व्यवस्था साकार करण्यासाठी योग्य नियमन, त्यासाठीच्या रीतीभाती, संस्थात्मक रचना, नीतिनियम, दंड व शिक्षा इत्यादींचा विचार व्यक्ती व समाजधारणाशास्त्र म्हणून करावा लागतोच लागतो.
याच्याशी जोडलेला आणखी एक मुद्दा आहे स्त्रीत्व व पुरुषत्व हा. निसर्गाने स्त्री व पुरुष हा लिंगभेद व त्याशी निगडित कार्यभेद व शरीररचनाभेद ठेवला आहे. पण त्या गाभ्याभोवती माणसाच्या—-स्त्रियांनी आणि पुरुणांनी—- स्त्रीत्व व पुरुषत्व यांच्या कल्पना केल्या आहेत, प्रतिमा निर्माण केल्या आहेत आणि व्याख्या पण केल्या आहेत. पण हा सगळाच मामला केवळ कपोलकल्पित आहे का? जैविक भेदातच मनाच्या साभावप्रकृतीतल्या भेदाची पाळेमुळे नाहीत का? त्याच्याही पलीकडे जाऊन, स्त्रीच्या नजरेत पुरुष आणि पुरुषाच्या नजरेत स्त्री एक ना एका प्रकारे गुणात्मकदृष्ट्या वेगळी व वैशिष्टपूर्ण असणे —- म्हणजेच ‘स्त्रीत्व’ व ‘पुरुषत्व’ असे असणे —- दोघांच्या मीलनातून पूर्णत्व साकार होण्याला, प्रकट होण्याला आवश्यकही तर आहे ना?
विवाह आणि कुटुंब या सामाजिक संस्थांची फेरमांडणी करावयास हवी असे माझेही मत आहे. ती किती आमूलाग्र अर्थाने वेगळी असणे गरजेचे आहे, या सैद्धान्तिक प्रश्नाचे उत्तर लगोलग देण्याची घाई न करता, तपशिलांचा विचार करीत जावे, जसे एक मुद्दा घेऊन चिं. मो. पंडित करून आहेत. अशी फेरमांडणी वरील दोन मुद्द्यांना तर कवेत घेईलच, पण धार्मिक, व राजकीय व्यवस्थेचीही फेरमांडणी आवश्यक ठरेल, व त्याचेही तपशील विचारासाठी मांडण्याचे काम करावे लागेल.
‘कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रित कुटुंब’ या विषयाचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करतोय, असे पंडितांनी जून २००१ मधील त्यांचा लेखाच्या आरंभीच म्हटले आहे. आरंभीच एकदोन मुद्दे उपस्थित करावयास हवेत. ‘दांपत्यजीवन’ हा शब्द पंडितांनी वापरला आहे. पुढील उदाहरण विचारात घ्या. एक स्त्री व एक पुरुष एकत्र राहात आहेत. त्यांच्यात लैंगिक संबंधही आहेत व एकाच घरात राहत असल्याने काही सहजीवनात्मक व्यवहारही आहेत. पण, समजा, या दोघांचीही दृष्टी अशी की हा एक अस्थायी संबंध आहे, आणि तो सहजा मोडता यावा इतका जुजबीच राखावयाचा; याचा भाग म्हणून मूल होऊ द्यावयाचे नाही. हरेकाने आपले व्यक्तित्व व स्वतंत्रता जपावयाची, राखावयाची. आता, या प्रकारच्या व्यवस्थेला काय म्हणावे? याला दांपत्यजीवन म्हणावे का? ‘लिव्हिंग इन’ असा शब्दप्रयोग परदेशात रूढ आहे, आणि तरुण मंडळी पुष्कळदा कमीअधिक काळ ठरवून या प्रकारे राहतात. वेगळे होतात, व याच प्रकारचे नवे संबंधही जोडतात. याला दोस्ती, ‘कंपॅनिअनशिप’ म्हणणे अधिक यथार्थ होईल. लैंगिक संबंध सघनही असू शकतील; वये लक्षात घेता ही शक्यता जास्तच. पण बहूधा विवाहबंधन टाळलेले असते; म्हणजेच, तूर्त ‘दांपत्यजीवन’ नको, असा निर्णय असतो.
भावी काळात, अशा अस्थायी, जुजबी दोस्ती-संबंधांना मोकळीक ठेवणारी नीती समाजमान्य व्हावी लागेल असे म्हणायला हवे. अशा संबंधाचीही काही पथ्ये असतील व नीतिनियमही असतील. पण असे संबंध प्रतिष्ठित असतील. मात्र हे पंडितांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने ‘दांपत्यजीवन’ नसेल हे स्पष्ट असायला हवे.
विवाहसंस्था ही प्रजोत्पत्तीचे व बालांच्या संगोपनाचे व संस्कार करण्याचे कार्य पार पाडण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. कधीकाळी विवाहबंधन ही गोष्ट नव्हती, आणि तरीही प्रजोत्पादन व संगोपन या गोष्टी पार पडतच होत्या असे म्हणता येईल, वानरांचे असतात तसे माणसांचे कळप होते आणि एका कळपात सगळे मिळून १० १५ असतील, तेव्हा अशी स्थिती असेल. पण ‘समाज’ या आकृतिबंधाची निर्मिती करण्याच्या टप्प्यावर संबंधात्मक व्यूहपण निर्माण केले गेले. आपण ज्यांना ‘टोळी समाज’ म्हणतो तेही सापेक्षतः मोठ्या संस्थेचे, गुंतागुंतीचे समाज असतात, हे मानववंशशास्त्रीय अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. विवाहबंधन हे मुलांसह कुटुंब प्रस्थापित करण्यासाठी पायाभूत व आवश्यक व इष्ट मानले गेले. या पाठीशी मानवजातीचा दीर्घकाळचा काहीएक अनुभव राहिला आहे. मुद्दा असा की, ‘दांपत्यजीवन’ हा शब्दप्रयोग हा नव्या पिढीची निर्मिती व संगोपन गृहीत, अध्याहृत धरून केला जाणारा शब्दप्रयोग आहे व असला पाहिजे, हे ध्यानात असायला हवे. प्राणिसदृश मानवी कळपांचे समाजात रूपांतर कधी व कसे झाले, या स्थित्यंतराचे टप्पे सर्व जगभर तेच एक राहिले का, ते कोणते, हा मोठा विषय आहे. मानवसंस्कृतीचा विकासक्रम काय राहिला, या विषयाचा तो एक भाग आहे. कळप कायम स्थलांतर करीत भटकत राहू शकतो. कळपांचे त्यांचे त्यांचे क्षेत्र असते. पण तरीही एका भौगोलिक प्रदेशाशी त्याचे नाते तसे अस्थायीच राहते. पण समाज आणि प्रदेश / विकासक्षेत्र यांचा स्थिर व जैव संबंध आढळतो. उपजीविकेसाठी त्या क्षेत्रातील नैसर्गिक एका आकृतिबंधानुसार पुनःपुन्हा उपयोग करीत राहण्यामधून असा संबंध जुळून येतो आणि असा संबंध जुळून येतो तेथे जीवनधारक वस्तूंचे उत्पादन काही पटींनी वाढविण्याच्या, ते अधिक नि िचतपणे खात्रीपूर्वक हस्तगत करायची तंत्रविद्या माणसाने शोधून काढली व आत्मसात केली. या कारणाने लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली. आणि मग स्थिर स्वरूपाची संबंधात्मक व संस्थात्मक व्यवस्था लावणे अत्यावश्यक बनले. अशा व्यवस्थेच्या अभावी त्या निवासक्षेत्राची उत्पादकता टिकवून धरणे वा संवर्धित करणे शक्य होणार नाही हेही माणसाच्या लक्षात आले असणार. म्हणजे अर्थव्यवस्था, तिची व्यवस्था राखणारी कारभारव्यवस्था, तिच्यासाठी व प्रजेचे संगोपन व संस्करण करण्यासाठी नातेसंबंधांवर आधारलेली विवाह-कुटुंब-गोतवळा ‘किनग्रुप’ आणि अशा गोतावळ्यांचा मिळून जनजाति-समाज अस्तित्वात आले, असा तर्क करता येतो. अशा प्रकारे, कुटुंब हे प्रथमपासूनच एक आर्थिक, सामाजिक व राजकीय एकक राहिले आहे, आणि विवाह ही संस्था कुटुंबाच्या निर्मितीसाठी अस्तित्वात आणली गेलेली संस्था आहे.
विवाह ही पुरुषांनी पुरुषसत्ताकता प्रस्थापित करण्यासाठी उत्पन्न केलेली, आणि केवळ स्त्रीला बंधनात टाकणारी संस्था, अशी वस्तुस्थिती कधीच नव्हती. अगदी पुरुषसत्ताक व्यवस्थेतही सिद्धान्ततः आणि व्यवहारतः
देखील पुरुषही बांधला जातोच. एका अंगाने, कुटुंब ही द्वि-केन्द्री रचना आहे. आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेतही ती एक केन्द्री बनत नाही. मोठ्या कुटुंबात तर (आणि अशी मोठी कुटुंबे हाच जगभर दीर्घकाळ ‘नियम’ राहिला आहे) बहुधा, दोनपेक्षाही अधिक केन्द्रे असल्याचे अनुभवाला येते. पुरुषसत्ताक कुटुंबांतही अधिकार व सत्ता यांचे केन्द्र म्हणून स्त्रीचे अस्तित्व व स्थान पूर्ण मिटले आहे असे होत नाही. कुटुंबाधारित समाज अस्तित्वात येणे हा विकासक्रमातील ‘पुढारलेला’ टप्पा होता, आणि त्या टप्प्यावर श्रमविभागणी, कार्यविभागणी, अधिकार व सत्ता यांची विभागणी यांनीही पुढारलेली टप्पे गाठले असणार. प्राथमिक अवस्थेतील समाज ही देखील जर गुंतागुंतीची आर्थिक-सामाजिक राजकीय रचना असेल तर, मुलांचे संगोपन, व त्यांच्यावर केले जाणारे संस्कार, त्यांची व्यक्ती म्हणून जडणघडण यांची देखील त्या त्या समाजाची एकेक रीतभात विकसित केला जाणे अगत्याचे ठरते. आणि त्याचे एक सिद्धान्तनही केले जाते, शास्त्रही रचले जाते. मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य, सामान्यपणे, माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वाभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे. या कार्यामुळे भटक्या वा पशुपालक समाजांमध्येही, स्त्री ही जागेशी / घराशी बांधली जाते, मुलांशीही बांधली जाते आणि याचा एक परिणाम म्हणून चूलही तिच्या ताब्यात येते. पण दीर्घकाळपर्यंत या कार्य व काम विभागणीमुळे स्त्रिया केवळ बंधनात अडकल्याचा अनुभव येत नव्हता; त्यांचे स्वतःचे अधिकाराचे व सत्तेचे क्षेत्रही कुटुंबात (व पर्यायाने समाजात) त्यांचा ताब्यात येत होते. शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे जगभर मानवेतिहासाचा एक टप्पा स्त्रीराज्यांचा होता. आता ‘स्त्रीराज्ये’ होती का नाही, हा मुद्दा विवाद्य मानता येईल. पण स्त्रियांचा अधिकार, सत्ता, स्थान पुरुषांशी तुल्यबळ होते, काही बाबींच्या संदर्भात त्या वरचढही असाव्यात, असे नक्कीच म्हणता येते. एरवी स्त्री-देवतांची, तेती शक्तिमान स्त्रीदेवतांची निर्मिती कोणी का केली असती?
तसे हे सर्व मुद्दे प्राथमिक आहेत. ते आवश्यक अशासाठी की पंडितांची संकल्पना नेमकी व अधिक खोलवर स्पष्टता करण्याची गरज ध्यानात यावी. आजही जगभर समाज कुटुंबकेन्द्रितच आहेत. सोविएत रशियातही क्रांतीनंतरच्या दशकात प्रयोगशीलता, बंडखोरी यांना खुला वाव होता तेव्हाही तो समाज कुटुंबकेन्द्रित होता. इस्राएलमधील किबुत्स वसाहतींमध्ये काही काळ मुलांचे संगोपन सामुदायिक केले गेले होते. पण ती व्यवस्था टिकली नाही, आणि सगळा इस्राएली समाज त्या धर्तीवर संघटित कधी नव्हताही. कुटुंबसंस्थेवर खरा आघात व्यक्तिवादी विचारव्यूहाचा व स्त्रीवादी चळवळीच्या स्त्री-मुक्तीच्या कल्पनांच्या आधारे केला गेला आहे. पण जर कुटुंब हा संस्था आज खिळखिळी होताना दिसत असली तर त्याचे मोठे कारण आजची कुटुंब या संस्थेला महत्त्व न देणारी, औपचारिक स्थान न देणारी अर्थ व राज्यव्यवस्था हे आहे. या पार्श्वभूमीवर पंडित जेव्हा कुटुंबकेन्द्रित समाजाची गोष्ट करतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, समाजाच्या योग्य धारणेसाठी पायाभूत, मध्यवर्ती एकक म्हणून कुटुंब या संस्थेला अधिमान्यता व स्थान दिले जायला हवे, असे त्यांना आवर्जून म्हणावयाचे आहे. त्यांच्या लेखनामधून असेही सूचित होते की, मासलेवाईक ‘चौकोनी कुटुंब’ नवराबायको, एक, वा फार तर दोन मुले असे —- त्यांना अपुरे वाटते. जुन्या ‘अविभक्त हिंदू’ कुटुंबाचे पुनरुज्जीवन करावे असे ते सुचवत नाहीत. पण कुटुंबात तीन पिढ्यांची माणसे एकत्र येण्याचे, राहण्याचे महत्त्व ते प्रतिपादतात. चांगल्या, समृद्ध व जबाबदार मानवी संबंधांची अनुभूती ही माणसाच्या व्यक्तित्वविकासासाठीची प्राथमिक, पायाभूत आवश्यकता असली तर आजी-आजोबा व नातवंडे ही कुटुंबाचा भाग असण्याची गरज व महत्त्व ध्यानात येऊ शकते. तसेच त्याहून विस्तार असलेल्या नातेसंबंधांनी, शेजारधर्मानी संबंधित अशा मोठ्या ‘गोतावळ्या’ मध्ये कुटुंब समाविष्ट असणे हीदेखील एक गरज आहे. पंडितांच्या मनातला ‘कुटुंबकेन्द्रितते’चा अर्थ पुरेसा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे.
आधुनिकतेच्या संस्कार खोलवर झालेल्या माणसांना ‘व्यक्तिस्वातंत्र्या’चा अर्थ बंधन-विरहिततेच्या अंगाने लागतो; अनिर्बंध मोकळीक म्हणजे स्वातंत्र्य, अशी व्याख्या मनात ठसलेली असते. विवाह बंधनात टाकतो म्हणून विवाह ‘निर्बंधरहित’ कसा होईल याची चिंता केली जाते. कुटुंब जितके मोठे, अविभक्त, तेवढी बंधने अधिक; इतकेच काय, मुले म्हटले की तीही बंधने येतातच, तेव्हा कुटुंबही आटोपशीर, चौकोनी हवे आणि मूलही एखादेच, येथपर्यंत विचार पोचतो. सधन परदेशात कुटुंब नियोजनामागे मुख्य मुद्दा व्यक्तिस्वातंत्र वाढविण्याचाच मानला आहे. याचे टोक कधी गाठले जाते? जेव्हा ‘रक्ताची नाती’ सर्वस्वी टाळता आली, शेजारधर्मच बाद करता आला तर बरे असे मानस बनते तेव्हा. नातेसंबंधांनी समृद्ध असे कुटुंब, नातेसंबंध, शेजार-संबंध यांनी समृद्ध असा मोठा गोतावळ, ही समाजरचनेची प्राथमिक, पायाभूत एकके असायला हवीत, या अर्थाने ‘कुटुंबकेन्द्रितता’ असावी ही पंडितांची भूमिका असली तर ती मला स्वागतार्ह, इष्ट व उन्नत वाटते. संबंध | नाते आणि बंधन या दोन्ही शब्दांमध्ये ‘बंध’ हा सामायिक घटक आहे. बंधांत अटळपणे येणारे बंधन ही मानवी व्यक्तित्वाच्या धारण-पोषण-विकास यासाठी आवश्यक गोष्ट आहे. बंधन हे स्वतंत्रतेच्या विरोधी तत्त्व आहे हा दृष्टिकोन चुकीचा आहे. बंध-अनुबंध, नाते हे जर सम्यक् बंध (= संबंध) या स्वरूपाचे असले तर त्यापोटी येणारे बंधन हे व्यक्तीच्या स्वतंत्रतेला स्वैर, मोकाट, विध्वंसक बनण्यापासून रोखते, आणि या अर्थाने व्यक्तीचे स्वातंत्र्य संवर्धितच करते. संबंधविरहित व्यक्ती ही निराधार बनून कोसळते; ती खचते, पिचून जाते, तिची जगण्याची उमेद संपते, वा ती हिंस्र, विध्वंसक बनते.
अशी कुटुंबे व गोतावळे अस्तित्वात यायला व टिकायला पोषक अशी अर्थ व राज्यव्यवस्था निर्माण करावी लागेल. आजचे या दोन्ही व्यवस्थांचे अधिभान सुट्या सुट्या व्यक्ती हेच आहे. सिद्धान्ततः व व्यवहारतः पंडितांचा विचारव्यूह विकेन्द्री-करणाला महत्त्व देणारा, सहभाग व सहवाटप यावर आधारित असलेला ‘कम्युनिटेरियन’ वा ‘कोऑपरेटिव्ह कॉमनवेल्थ’ (प्रा. धनंजनराव गाडगीळ यांचा शब्दप्रयोग) वा ‘साम्ययोगी’ (विनोबा भावे यांचा शब्द) असावा असा ग्रह होतो. हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. भविष्यासाठी हा विचारव्यूह इष्ट, आवश्यक, चांगला (व व्यवहार्यही) अशी व्यक्तिश: माझी भूमिका आहे.
(अपूर्ण) १५०, गंगापुरी, वाई – ४१२ ८०३
ग्रंथ-परिचय हंग्री फॉर ट्रेड (हाऊ पुअर पीपल पे फॉर फ्री ट्रेड) (२) (जॉन मेडेली, पेंग्विन बुक्स इंडिया, २००१, पृ. १७८, किं. रु. २००/-.)