प्रत्येक वर्ग तत्त्वे आपल्या वर्गाच्या दृष्टीने किंवा आपल्या विशिष्ट अनुभवाच्या दृष्टीने मांडीत असतो. त्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची तपासणी करताना तत्त्वे मांडणारांचा वर्ग कोणता होता आणि त्यांची परिस्थिती काय होती याचा नि चय आपणास केला पाहिजे. सामाजिक भावना आणि शासनसंस्था यांचा निकट संबंध असला तरच सामाजिक सुधारणेस प्रवृत्ती होणार आणि कर्तव्यात्मक समाज-शास्त्राची उत्पत्ती होणार. सामाजिक भावना असेल तरच विविध कार्यक्रम लोकांमध्ये उत्पन्न होईल. हिंदुस्थानात १९१९ च्या सुधारणा आल्या तरी समाजाच्या सुखाची आणि संरक्षणाची जबाबदारी घेणारी सामाजिक भावना जन्मास आली नाही. काँग्रेसचे लक्ष ती मवाळ वर्गाच्या ताब्यात होती तोपर्यंत केवळ सिव्हिल सर्व्हिसच्या नोकऱ्या हिंदी लोकांस अधिक मिळाव्यात आणि त्यासाठी त्या नोकरीभरतीच्या परीक्षा हिंदु-स्थानात व्हाव्यात इकडेच होते. देशी संस्कृतीचा विकास व्हावा, देशी वाङ्मय वाढावे, सर्व जनतेचा आयुष्यक्रम उच्च व्हावा या प्रकारच्या विचारांचा स्पर्शही त्या संस्थेत जोपर्यंत मॉडरेट वर्गाचे प्राबल्य होते तोपर्यंत झाला नाही. —- डॉ. श्री. व्यं. केतकर [भारतीय समाजशास्त्र, या ज्ञानकोशकार केतकरांच्या ग्रंथातून]