श्री. एस्. पी. तारे, टाईप D, 25/6, ऊर्जा नगर, चंद्रपुर — 442 404
महिलांच्या प्र नांबद्दल आजचा सुधारक फार जागरूक आहे पण त्यांत श्री. शरद जोशी यांच्या लक्ष्मी मुक्ती चळवळीला स्थान मिळायला हवे होते. १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या स्वीवर इस्टेटीमध्ये पत्नीच्या नावांचा पण संयुक्तपणे समावेश केला आहे. ही फार मोठी सामाजिक क्रांती आहे. त्या खेड्यांमध्ये १०० शेतकऱ्यांनी पत्नीचे नाव शेतीच्या मालकींत समाविष्ट केले आहे. अशा खेड्यांना आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून प्रत्यक्ष भेट देऊन त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करतात. प्रत्येक जिल्ह्यांतील किमान १०० गांवे ‘लक्ष्मी मुक्ती गांवे’ व्हावीत असा त्यांचा आग्रह व प्रयत्न आहे. यांत फार मोठ्या सामाजिक क्रांतीची बीजे लपलेली आहेत.
श्री. शरद जोशींच्या शेतकरी संघटक या पाक्षिकांत याविषयी अधिक माहिती मिळेल.
[श्री. तारे यांचे हे बहुधा शेवटचे पत्र असावे, कारण श्री. तारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आमच्या शोकसंवेदना.
श्रीकांत पुरुषोत्तम वेरुळकर, मानस, ३२/अ, विशाखा कॉलनी, स. नं. ८७८/१, राजीव नगर, आग्रा रोड, नाशिक — ४२२ ००१
सप्टेंबर २००१ च्या अंकात ‘नैवेद्य ही देवाला दिलेली लाच ठरेल काय’ असे वाक्य आहे. नैवेद्य या संकल्पनेची माझी व्याख्या अशी आहे की, ‘सुग्रास भोजनाबद्दल देवाचे मानलेले आभार म्हणजे नैवेद्य’ अर्थात यासाठी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत.
१. नैवेद्य राखण्यासाठी इच्छा आणि ऐपत दोन्ही असली पाहिजे. जिथे एकवेळच्या जेवणाची मारामार आहे तिथे नैवेद्य ही कल्पना रुजू शकणार नाही.
२. इच्छा आणि ऐपत असूनही नैवेद्य न दाखवणारे अनेक जण असतात त्यासाठी संस्कार आवश्यक आहे. आणि संस्कार हे रात्रीतून होत नाहीत तर त्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. म्हणूनच नैवेद्य ही संकल्पना एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित राहिली आहे असे दिसते. तसेच नैवेद्य ही लाच आहे असे आपण मानतो कारण सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे देवही त्यात सामील झाला आहे असा कोणालाही समज होणे शक्य आहे. पण तसे असते तर ज्यावेळी विद्यार्थी देवाला–इंग्लिश आणि गणिताच्या पेपरला पास झाल्यास पेढे वाटू असे कबूल करतात किंवा पहिला नंबर आल्यास पेढे वाटू म्हणतात त्यावेळेस ती मुले पेढे वाटताना दिसत नाहीत म्हणजेच नापास होतात. म्हणजेच पेढ्याची लाच कबूल कस्न देव लाचखोर होऊ शकत नाही. परीक्षेतील सुयशासाठी अभ्यास आणि प्रयत्न यांची जोड असावी लागते व वडीलधारी मंडळी, गुरुजन आणि देव यांचे आशीर्वाद असावे लागतात असे मला वाटते.
[‘देव आहे’ असे मानायला कोणताही पटेलच असा आधार मला सापडलेला नाही. पण जर ‘तो’ असलाच तर तो लाचखोर आणि दुसऱ्यांचे श्रेय लाटणाराच असावा असे वाटते. जसे, सुग्रास भोजनाबाबतचे आभार तो स्वीकारतो! संस्कार (म्हणजे जे काय असेल ते) तो करीत नाही. आणि शेवटी परीक्षेतल्या यशापयशाच्या बाबतीत अभ्यास आणि प्रयत्न यांच्यासोबतच अमक्यातमक्याचे आशीर्वाद असण्याचीही तो सक्ती करतो. – संपादक]
श्याम ग. कुळकर्णी, द्वारा जयवंत कुळकर्णी, D 5/4 सुंदर गार्डन, सिंहगड रस्ता, पुणे — ४११ ०५१
जुलै २००१ च्या (१२.४) अंकातील श्री. र. द. जोशी व श्री. लोकेश शेवडे या दोघांचे लेख जवळजवळ एकाच मथितार्थाचे आहेत. श्री. जोशी यांचा लेख भारतीयांच्या आजच्या स्थितीविषयी व त्यास कारणीभूत होणाऱ्या विज्ञानाकडे पाठ फिरविण्याच्या वृत्तीवर टीका करणारा पण त्यातून लेखकाची पोटतिडीक व्यक्त करणारा वाटतो. मात्र श्री. शेवडे यांच्या लेखातील उपहासाचा व टिंगलीचा सूर खटकला. मी स्वतः आस्तिक नाही पण त्यामुळे आस्तिक असणे मूर्खपणाचे वा क्षुद्र वृत्तीचे द्योतक आहे असे मला तरी वाटत नाही. आषाढी कार्तिकीला लाखो भाविक पंढरपूरला गर्दी करतात किंवा अमरनाथ यात्रेला अक्षरशः जिवावर उदार होऊन (सद्यःपरिस्थितीत हा शब्दप्रयोग योग्य ठरतो) जाणारे यात्रिक माझ्या दृष्टीने मूर्ख वाटत नाहीत. काहींचे देव काळे तर काहींचे पांढरे वा लाल वा हिरवे असण्याबद्दल आ चर्य वाटण्याजोगे काही आहे असे मला वाटत नाही. कारण ‘जाकी रही भावना जैसी, प्रभुमूरत देखी तिन तैसी’ असे एका भक्ताने म्हणून ठेवलेच आहे. मुंगीला गुळाचा खडा पर्वतासारखा वाटणे किंवा महाकाय डायनोसोरला माणूस उंदरासारखा वाटणे या दोन्ही कल्पना त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहेत. त्याबद्दल त्यांचा उपहास करणे योग्य नव्हे.
आस्तिक किंवा नास्तिक असणे हे कुठल्या तरी तत्त्वावर किंवा तर्कावर आधारित नसून त्याच्या प्रॉफिटेबि लिटीवर अवलंबून असते हे श्री. शेवडे यांचेकडूनच प्रथम कळले. मी स्वतः आस्तिक नसण्याचे कारण आस्तिकांसारखे श्रद्धाळू (मी अंध-श्रद्धाळू असे म्हणत नाही) किंवा भाविक होणे मला जमत नाही हे आहे. त्यादृष्टीने आस्तिक होणेच अवघड आहे. कारण जन्मतः कोणी आस्तिक असत नाही. उलट आपण जन्मतः नास्तिकच असतो त्यामुळे देवाची मूर्ती तोंडात घालतो किंवा फेकून-सुद्धा देतो. नंतरच्या संस्कारामुळेच ते जसे होतील व त्याचा तुमच्यावर जसा परिणाम होईल तसे तुम्ही आस्तिक होता वा नास्तिकच राहता. नास्तिक असण्या-साठी काही खास करावे लागते असे वाटत नाही व त्याबद्दल आस्तिकांनी मला तरी धडा शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. जोपर्यंत आस्तिक लोकांच्या ‘आस्तिक’ -पणाचा मला किंवा समाजातील इतर घटकांना त्रास होत नाही तोपर्यंत त्यांच्या आस्तिक असण्याची हेटाळणी करण्याचा अधिकार मला किंवा कुणाला आहे असे मला वाटत नाही.