मुंग्यांना साखर, कबूतरांना ज्वारी, गाईला मूठभर चारा टाकावा आणि धन्य व्हावे तोच प्रकार दारात नाना हेतूंपैकी एका हेतूने आलेल्या अतिथीला खायला-प्यायला देण्याचा. कणात विश्व पाहावे त्याप्रमाणे नैवेद्यात विश्वातल्या असंख्य गरिबांची क्षुधा शमल्याचे स्वप्न पाहावे! गरजूला काम देऊन पुरेसे वेतन द्यावे ही खरी सेवा. अनेकांच्या जमिनी जाताहेत. अनेकाचे रोजगार नष्ट होताहेत, अनेकां-वर नाना पटींनी अन्याय होत आहे त्यासाठी झगडणाऱ्या संस्थांना मदत करणे ही आजची गरज आहे. त्यातूनच गरिबांचा स्वाभिमान जपला जाईल. मागे सरकारने भिकाऱ्यांसाठी वसाहत सुरू केली. भीक देणे गुन्हा ठरवला. पण चार आणे देऊन अजिजी पाहून सुखावणाऱ्या धनिकबाळांनी ती योजना धुडकावून लावली. गरिबांच्या किमान जगण्यासाठी अनेक स्तरांवर चाललेल्या लढ्यांत सामील होऊन आर्थिक छळ, शारीरिक श्रम आणि मानसिक त्रास सोसायला हवेत. व्यक्तिगत जीवनात गरिबाचा घास काढून घेणाऱ्या योजनेत आपला हात नाही हेही सतत पाहायला हवे. अंधश्रद्धाचा फायदा घेऊन उभी राहिलेली देवालये अन्नछत्रे घालताहेत आणि दारिद्र्याला उत्तेजन देताहेत. अधिकाधिक रोजगार वाढवूनच इतरांना नैवेद्यात सहभागी करून घेता येईल. चार लोकांना प्रणाम करून जेवू घातल्याने प्र न सुटणार नाहीत. अतिथीला प्रणाम वगैरे का करायचे? त्याला बरोबर घेऊन काय असेल नसेल तर एकत्र खा ना? पर्यावरणवादी हे व्यापक दृष्टीने खरे वैश्वदेव पूजणारे. दुष्काळपीडितांना, भूकंपग्रस्तांना देणग्या न देणारे दारी आलेल्या गरजूला घास दोन घास देऊन स्वतःच्या ‘अहम्’ ला सुखी करतात. थोर संत वामनराव पैनी तर एका पुस्तकात उष्टे अन्न गरिबास द्यायला हरकत नाही अशी भलावण केली आहे. त्यातही पुण्य आहे म्हणे,
मालाड इतिहासाचे पुनर्लेखन
१. नवरतन राजा राम हे अमेरिकावासी भारतीय पुरातत्त्वशास्त्री सांगतात की हिमालयातील ‘रामापिथेकस’ या मानवी जीवाश्मांवरून (Fossils) सिद्ध होते की मानववंश भारतात उपजला. [रिचर्ड लीकी हे आघाडीचे पुरामानवशास्त्री सांगतात की भारतीय उपखंडातले तुरळक जीवाश्म फार ‘ताजे’ आहेत. ह्याच ‘प्राण्याचे’ खूप प्राचीन जीवाश्म (१४० लक्ष वर्षांपूर्वीचे) केनियात सापडतात. मुळात हे तीनेक फूट उंचीचे, कधी जंगलात तर कधी कुरणांमध्ये राहणारे कपी होते.]
२. पिरॅमिड बांधण्याची कला भारतीयांनी इजिप्शियनांना शिकवली. [पण ती कला भारतात मात्र कुठेही वापरली नाही!]
३. ताजमहाल हे ‘तेजोमहालय’ आहेच, पण फतेहपुर-सीक्री ही अकबराची राजधानीही हिंदू वास्तूवर उभी आहे! (अकबराच्या प्रासादाजवळील खोदकामात मात्र याला पुरावा सापडला नाही. प्रासादाला मात्र इजा झाली.)
हे आणि असले ‘विचार’ विद्या-भारतीच्या शाळांसाठी लिहिलेल्या पुस्तिकांमधून प्रसारित केले जात आहेत. एनसीईआरटी आज शालेय अभ्यासक्रमाच्या ‘दुरुस्ती’च्या नावाखाली हा काल्पनिक इतिहास शाळांमध्ये पोचवू इच्छित आहे.
ह्या पुनर्लेखनातले धोके दाखवून त्याचा निषेध करण्यासाठी एक सभा दिल्लीत ४ ते ६ ऑगस्ट २००१ ला भरली होती. भाग घेणाऱ्यांमध्ये के. एम. पणिक्कर (इतिहासकार), इर्फान हबीब (इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्चचे माजी अध्यक्ष), सी. टी. कुरियन (मद्रास इंस्टि. ऑफ डेवलपमेंटल स्टडीजचे अध्यक्ष), ए. जी. नूरानी (न्यायशास्त्री) वगैरे लोक होते. सभेचे संघटन ‘सहमत’ या संस्थेने केले. त्या संस्थेचे अध्यक्ष प्रभात पटनाईक म्हणाले की सभेचा हेतू ‘विवेकी चर्चेवर आणि सामान्यजनांच्या माहिती मिळवण्याच्या (लोकशाही) हक्कावर गदा आणण्याच्या प्रयत्नांना विरोध करणे’ हा आहे.
(दीपशिखा घोष यांनी आय. ए. एन. एस. साठी लिहिलेल्या आणि नागपूरच्या ‘हितवाद’ या वृत्तपत्राने ६ ऑगस्ट २००१ रोजी प्रकाशित केलेल्या अहवालाचा हा सारांश आहे.)