(क) भारतात १९०१ पर्यन्त बसेस मध्ये अस्पृश्यांना मज्जाव
भारतात १९०१ पर्यन्त अस्पृश्यांना ट्राम व बस मध्ये चढूच देत नसत. बसेस मध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळविण्यात श्री. संभाजी संतूजी वाघमारे या अस्पृश्य कार्यकर्त्याने केलेल्या कार्याची माहिती श्री. आर. डी. गायकवाड यांनी त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या आठवणी (सुगावा प्रकाशन, पुणे ३०; सप्टेंबर १९९३) या पुस्तकात दिली आहे. त्यांच्याच शब्दांत खालील वर्णन पाहा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अस्पृश्यांना हजारो वर्षांच्या गुलाम-गिरीच्या शृंखलातून मुक्त करण्याकरिता अविश्रांत परिश्रम केले. त्यांच्या उज्ज्वल यशाची पायाभरणी म. फुले, छत्रपती शाहू महाराज, बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड, कर्मवीर शिंदे इत्यादिकांनी केली. त्याचप्रमाणे अस्पृश्यांतही स्थानिक स्वरूपात कार्य करणारे बरेच लोक होते. शिवराम गोपाळ जाधव, शिवराम जानबा कांबळे व संभाजी संतूजी वाघमारे (मु. पो. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे, वास्तव्य भायखळा व लव्हलेन) यांची कामगिरी त्या काळात (मुंबई भागात) मोलाची होती. या संभाजीने मुंबई–पुणे येथील मोटार सर्व्हिसची बंदी उठ वली. ती हकीकत अशी: भारतात (अंदाजे) १९०१ पासून मोटार सर्व्हिस सुरू झाली. प्रमुख शहरांतून खेड्यांकडेही ह्या प्रवासी मोटारी जाऊ लागल्या. या मोटारीतून अस्पृश्यांना मज्जाव असे. त्यामुळे तळेगावला रेल्वेतून उतरल्यावर सर्व अस्पृश्यांना ३-४ दिवस पायी चालावे लागे. गावोगावी मुक्काम करीत अस्पृशांची बिहाडे तळेगावपर्यन्त पायी येत-जात. वाघमारे यांनी या भेदभावाबद्दल विचार केला व प्लॅन करून ते एकदोन सहकाऱ्यांसह तळेगावला गेले. त्यावेळी मोटारीमध्ये सीट भरण्याकरता एजंट असत. वाघमारे व त्यांचे सहकारी एजंटला पैसे देऊन गाडीत जाऊन बसले. वाघमारे यांचा पोषाख ब्राह्मणी पद्धतीचा असल्यामुळे त्यांच्या जातीबद्दल एजंटलाही शंका आली नाही. गाडी सुटण्याची वेळ झाल्यावर वाघमारे यांनी स्वतः होऊन ड्रायव्हरला व प्रवाशांना “मी महार आहे’ असे सांगितले, त्याबरोबर ड्रायव्हर बिथरला व प्रवासीही बिथरले व ते त्यांना गाडीतून उतरायला सांगू लागले. शेवटी एजन्ट, मोटारमालक व पोलीस आले. पोलिसांना वाघमारे यांनी सांगितले की “ही प्रवासी वाहतूक आहे व गाडी खाजगी मालकीची असली तरी, सार्वजनिक रस्त्यावरून जाते आणि महार-मांगांना नेणार नाही असे अधिकारपत्र मोटारमालकाकडे नाही.” मोटार मालकासह वाघमारे व पोलीस कलेक्टर-कचेरीत गेले. कलेक्टर युरोपियन होता. त्याने मोटार मालकास सांगितले की सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांना तुम्ही गाडीतून नेणार नसाल तर तुमचा मोटार-वाहतुकीचा परवाना आजच्या आज रद्द करतो व तुम्ही मोटार-वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याबद्दल तुमच्यावर खटला भरतो. त्यामुळे मोटार मालक घाबरले व “बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असाच पेच त्यांच्यापुढे पडला. मोटारमालकाने माघार घेतली व अशा त-हेने पुणे–नगर परिसरातील सर्व वाहतूक अस्पृश्यांना खुली झाली. (ख) दलित इतिहास गाडण्याचा प्रयत्न दलित इतिहास भारतात जनतेपुढे आणण्यात तर येतच नाही पण काही प्रांतांत तर तो गाडण्याचा प्रकार सुरू आहे असे कळते. श्री. व्ही. बी. रावत “दलितांना व आदिवासीयांना शाळेच्या पुस्तकांत योग्य-स्थान द्या’ ह्या लेखात उत्तर-प्रदेशाच्या शालेय पुस्तकांवर प्रकाश टाकतात. ते लिहितात : “भगवे निशाणवाले अधिकारावर आल्यानंतर त्यांची पहिली गदा शिक्षणपद्धतीवर पडली. मी उत्तरप्रदेशात शिकत असताना इतिहासात कबीर व त्यांचे दोहे शिकलो होतो. कबीर आपल्या देशातील निधार्मिक विचारवंतांत येतात. पण राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी इतिहासातील पुस्तकातून कबीरांना वगळले. ह्यात आता सूर, तुलसीदास, मीराबाई आहेत पण कबीर नाहीत. ‘हमारे पूर्वज’ या ६ वी, ७ वी व ८ वी च्या पुस्तकांत एकाही दलिताचे वा आदिवासीचे पूर्वज म्हणून नाव नाही. त्यात दधीची, श्रीकृष्ण, राम, भरत, द्रोणाचार्य इत्यादी मात्र आहेत. ‘हमारा इतिहास’ मध्ये प्रार्थना- समाज, ब्राह्मो समाज, आर्यसमाज इत्यादिकांचा समाजसुधारक म्हणून उल्लेख आहे पण त्यात डॉ. आंबेडकर, पेरियार, जोतिबा फुले, शाहू महाराज, नारायण गुरू यांची नावे देखील नाहीत. पण या साऱ्यांवर कळस म्हणजे पुणे कराराच्या (POONA-PACT) हकीकतीमध्ये गांधीची स्तुती आहे पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे पुणे करार झाला त्यांचे नाव देखील त्यात नाही”. ही गत उत्तरप्रदेशाची आहे. तीच इतर प्रांतांची (कमीजास्त प्रमाणात) असेल. नसेल तरच नवल!
(ग) अविवेकवादी व धर्मान्ध लोक किती अविचारी व आंधळे असतात याचा दाखला कालच मिळाला. अफगाणिस्तानातल्या तालिबान राजवटींनी रॉकेटस् व इतर मोठ्या विध्वंसक शस्त्रांचा उपयोग करून तेथील बामीयान येथील बुद्धांच्या भव्य मूर्ती तोडून टाकल्या व काबूल येथील वस्तुसंग्रहालयातील बुद्धाच्या ६००० मूर्ती तोडल्या. भारतातही बाबरी मस्जीद तोडणे, ख्रि चन लोकांची चर्चेस् जाळणे, त्यांचा ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्सची व त्यांच्या मुलांची ओरिसात हत्या करणे, अस्पृश्यांची घरे जाळणे, त्यांना ठार मारणे, इतिहासांच्या पुस्तकांतून त्यांचे नाव-निशाण मिटविणे हे सारे धर्मान्ध लोकांचेच काम आहे.
[श्री. कांबळे आमचे जुने आणि सजग वाचक आहेत. त्यांनी १६ मार्च २००१ रोजी एका पत्राद्वारे अमेरिकेतील ‘काळ्यांचा इतिहास व भारतातील दलितांचा इतिहास यावर एक लेख पाठवला. त्यातील काही भाग वर देत आहे..श्री. कांबळे सांगतात की अमेरिकेत एक ‘ब्लॅक हिस्टरी मंथ’ साजरा केला जातो, व त्या धर्तीवर भारतातही दलित-आदिवासींच्या इतिहासावर व समस्यांवर लक्ष केंद्रित करणारा एखादा महिना (आ.सु.ने तरी) साजरा करावा. एकांगी व मतलबी इतिहासलेखनाबद्दल आ.सु.ला राग आहेच, पण वेगळा ‘महिना’ न योजता. वर्षाभरात नेहेमीच अशा लेखांचे स्वागत होत असते, व होत राहील..
बस वाहतुकीची तुलना रेल वाहतुकीशी करावी. जी.आय.पी. रेल्वेकडे जातिनिहाय डबे नेमण्याबद्दल अर्ज गेले होते. ते सपशेल नाकास्न आर्थिक स्तरानुसार डबे घडवले गेले. एक अन्याय तर हटला —- आता दुसऱ्याचे काय?
—- संपादक