महाराष्ट्रातील सांस्कृतिक नेतृत्वाने (पत्रकार, विचारवंत, संपादक, लेखक, कवी इत्यादी) या बदलत्या जगाचे, माध्यममाहितीच्या क्रांतीचे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे, दोलायमान मनःस्थितीचे आणि बहुसांस्कृतिकतेचे आव्हान विचारा तही घेतलेले नाही. आपल्या मानसिकतेच्या भौतिक (जातीय आणि भाषिक) कक्षा रुंदावल्या नाहीत. आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत आणि अर्जेटिनापासून ऑस्ट्रेलिया-पर्यंत जे नवे प्रवाह साहित्य-संस्कृतीत येत होते, लोकांचे दैनंदिन जीवन बदलत होते, नवी मूल्ये तयार होती, नाती बदलत होती, त्यांची दखल घेतलेली नाही.
या सर्व जगडव्याळ घटनांचा संस्कार साहित्यातून प्रगट व्हायला ‘साहित्याचे राजकीय जागतिकीकरण’ होण्याची गरज नाही. अगदी कौटुंबिक, सामाजिक कथेतून वा राजकीय कादंबरीतूनही बदलणाऱ्या मानसिकतेचे चित्र रेखाटता येते. महाराष्ट्रातील विचारवंतांनी तर मराठी सारस्वताचा खरोखरच गुन्हा केला आहे.