आपण कोण आहोत? कुठे चाललो आहोत? ह्या विश्वाचा अर्थ काय? ह्या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्र न आहे, नाही का? पण असो. तुम्ही कसाही विचार केलात तरी आम्ही एका शोधयात्रेत आहोत, हे जग समजून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. लोक मला विचारतात की मी भौतिकीचे अंतिम नियम शोधतो आहे का. असे नाही. मी तसले काही शोधत नाही आहे. मी फक्त हे जग समजून घ्यायच्या प्रयत्नात आहे आणि जर एखादा सोपा अंतिम निसर्ग-नियम सापडलाच, तर मजा येईल, एवढेच.
जर असे उत्तर आले की कांद्यासारखे समजुतीचे एकात एक थर असतील, लाखो थर असतील, तर तेही मंजूर करावे लागेल-शेवटी काय होईल ते निसर्ग ठरवेल. आपण काही आधीच निसर्ग कसा असेल ते ठरवू शकणार नाही. तुम्ही जर आधीच म्हणणार असाल की तुम्हाला गहन तात्त्विक प्रश्नांचे उत्तर शोधायचा मार्ग म्हणून निसर्ग तपासायचा आहे, तर ही तुमची चूक असेल. तुम्ही निसर्गाबद्दल जास्त शोध घेऊनही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेलच, हे कशावरून? (म्हणून) मी तसे शोध घेत नाही. मी निसर्गाचे, जगाचे स्वरूप शोधतो आणि जास्त काही सापडले तर मला जास्त बरे वाटते.
आपण प्राण्यांपेक्षा बऱ्याच जास्त गोष्टी करू शकतो असे दिसते. त्या आणि तसल्या निरीक्षणांमधून निसर्गात काही लक्षणीय गुपिते असल्याचे जाणवते. मला ह्याचा तपास करायला आवडेल—-आधीच उत्तर कसे असेल ते न समजता. आणि म्हणूनच मला आपण आणि विश्व ह्यांच्या संबंधाबद्दल सांगितल्या जाणाऱ्या ‘खास’ कहाण्या आवडत नाहीत. मला त्या फार सोप्या, फार जुळलेल्या, फार प्रादेशिक वाटतात. ही पृथ्वी, तिथे म्हणे देवाचा एक (तरी) अवतार आला—-पण पृथ्वीबाहेर कायकाय आहे पहा तरी. नाही, हे प्रमाणशीर वाटत नाही. पण वाद कशाला घालायचा? मला वाद घालता येत नाही. मी फक्त मला काय वाटते आणि ते माझ्या विज्ञानाबद्दलच्या दृष्टिकोनातून कसे घडले आहे, ते सांगायचा प्रयत्न करतो. आणखीन एक प्रश्न आहे एखादी गोष्ट खरी आहे का, हे ठरवण्याबाबतचा. आणि वेगवेगळे धर्म जेव्हा वेगवेगळी मते मांडू लागतात, तेव्हा जरा बुचकळ्यात पडतो मी. आणि एकदा का असा अविश्वास उत्पन्न झाला, की मग विज्ञानावरही शंका यायला लागते. मग तुम्ही म्हणता की विज्ञान तरी खरे आहे का, कारण तसे जर नसेल तर आपले सगळेच काही चूक असणार.
धर्म समजायलाही अशीच सुरुवात करू सगळे काही चूक आहे, इथून. मग तुम्ही घसरत जाता, अशा उतारावर; की जिथून परतता येत नाही. विज्ञानाचा दृष्टिकोण असा, की काय खरे आहे ते तपासून काढू, काय खरे असेलही-नसेलही हे ठरवू. अशा शंका घेत माझा आत्मा घडला आहे, आणि म्हणून मला श्रद्धा बाळगणे जड जाते. असे पाहा, मी शंकांना सामावून घेऊ शकतो. मी खात्री नसणे सहन करू शकतो. अज्ञान मला जास्त स्चते, चुकीच्या उत्तरांपेक्षा. माझ्यापाशी ‘जवळपास’ बरोबर उत्तरे आहेत, वेगवेगळ्या प्रमाणात ज्यांची खात्री देता येते अशा शक्यता आहेत —- पण खात्री मात्र कशाचीच नाही. काही गोष्टींबद्दल तर मला काहीच माहीत नाही. जसे —- आपण इथे (या विश्वात) का आहोत, किंवा मुळात या प्रश्नाचाच अर्थ नेमका काय आहे, वगैरेबद्दल मला काहीच माहीत नाही. पण मी यावर विचार करतो —- आणि काही सांगता–ठरवता आले नाही तर दुसऱ्या कोणत्यातरी प्रश्नाकडे जातो. पण उत्तरे येत नसण्याने मी घाबरत नाही. एका गूढ, न समजलेल्या, हेतू नसलेल्या विश्वात हरवण्याला मी घाबरत नाही. मला समजते आहे तिथपर्यंत तरी असा हेतू नाही. पण मला याची भीती नाही वाटत.
[१. डिसेंबर २००० (११.९) ह्या अंकात श्री. भ. पां. पाटणकरांचे एक पत्र आहे, ज्यात मनुष्यस्वभावाला अंतिम सत्ये हवीच असतात, असे प्रतिपादन होते. नंतरच्या अंकात मी हे व्यापक सामान्यीकरण मला पटत नसल्याचे नोंदले होते.
२. रिचर्ड फाईनमनच्या १९८१ मधील एका बीबीसीने घेतलेल्या मुला-खतीचे (व इतर मजकुराचे) एक पुस्तक नुकतेच उपलब्ध झाले, ‘द प्लेझर ऑफ फाइंडिंग थिंग्ज आऊट’ (पर्सियस, १९९९). त्यातील ‘डाऊट अँड अन्सर्टन्टी’ हे उपप्रकरण वर देत आहे. ते ‘अंतिम सत्या’ बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे नोंदते.
३. फाईनमनची बोलायची-लिहायची शैली काहीशी उपरोधिक, काहीशी खेळकर आणि पूर्णपणे ‘टेंटेटिव्ह’, तात्पुरती-प्रयोगात्मक-चर्चेसाठी सूचना असाव्या तशी आहे. तिचे भाषांतर वाक्ये तोडून, पण शक्यतो नेमके आणि संपूर्ण करायचा हा प्रयत्न आहे.
४. ऑगस्ट २००० (११.५) च्या अंकात फाईनमनचा एक लेख दिला होता. त्याच्या शैलीने ‘चकून’ नंतर काही पत्रेही आली (११.८,११.९). मूळ लेखाच्या त्रोटक प्रास्ताविकात नोंदले होते, की “सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे म्हणतो, त्या ठामपणाला फाईनमन हट्टाने सौम्य करतो’, वाचकांनी ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यात फाईनमनचा आग्रही खुलेपणा सामावलेला आहे.
५. फाईनमनच्या लेखांवरील पत्रांतून असे जाणवले की हा माणूस वैज्ञानिकांमध्येही ‘सुपरिचित’ नाही. ‘क्वाँटम् इलेक्ट्रोडायनामिक्स’ चा एक जनक, नोबेल पुरस्कारविजेता, ‘टाईम’ मासिकाच्या गेल्या शतकातील सर्वोच्च्य शास्त्रज्ञांच्या दहांच्या यादीतला एक, असा हा माणूस. अनेकांच्या मते आईन्स्टाईनशी ‘समकक्ष’ असा भौतिकशास्त्रज्ञ. पण त्याचेच तंत्र वापरून त्याच्या कीर्तीला फार वजन न देणेच बरे! —- संपादक