ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा.
आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली तरी पुरते, पुढचे न वाचता आतील मजकूर कळतो; इतकी कडक आलोचना ऐकून मन खिन्न होई. ती टीका मनावर घेऊन थोडी विविधता आणायचे ठरवले. विचारणीयतेबरोबर वाचनीयता काहीशी वाढवण्याचा प्रयत्न केला. ती दिशा ठरविली. त्या दिशेने केलेली ही वाटचाल :
१. विवेकवाद ही जीवनपद्धती आहे, विचारसरणी आहे. आगरकर या शब्दाने महाराष्ट्रात तिचा आरंभ होत असला तरी तो अखेरचा शब्द नव्हे. विवेकवाद त्यांनी काही आपल्या डोक्यातून काढलेला नाही. त्यामुळे अमुक एक भूमिका त्यांनाही पटली नसती असा विरोध व्यर्थ आहे. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी हा युक्तिवाद मांडला होता. त्यांचे म्हणणे आम्हाला पटले. पटते. खुद्द र. धों. नी विवेकवादी विचारसरणी १९२७ पासून १९५३ पर्यंत आपल्या परीने पुढे नेली आहे. त्यांच्या समाजस्वास्थ्याद्वारे. त्यातला एखादा लेख, एखादा विचार आपल्या वाचकांपुढे शक्यतो दरमहा ठेवण्याचा प्रघात आम्ही सुरू केला. स्त्रीपुरुषसंबंधात, लैंगिक नीतिशास्त्रात व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचाराची मजल कुठवर जाते हे त्यातून दिसते.
२. नवे लेखन मिळवण्याचा, नवे लेखक जोडण्याचा बुद्ध्या प्रयत्न केला. अॅड. हर्षवर्धन निमखेडकर, डॉ. सुरेखा पंडित बापट, डॉ. भाऊ लोखंडे, श्रीराम गोवंडे, नरेन् तांबे, मधुकर कांबळे, यशवन्त ब्रह्म, म. शं.
बाबगावकर, कालिदास मराठे, श्रीनिवास हेमाडे, जयंत फाळके, अरुण ठाकूर अशी काही नावे आ. सु. मधून पूर्वी कधी न आलेली आहे. पत्रलेखनात आणि पत्रलेखकांत असेच नावीन्य दिसते.
३. आ. सुधारकाचे लेख वाचून क्विनाईनची कडू गोळी घेतल्याची भावना होते, अशी एक कुत्सा ऐकू येई. थोडे हलके-फुलके, चिपालट म्हणून ‘हे प्रभो, विभो, अगाध किति तव करणी’ हे सदर चालवले. त्याला दाद प्रतिसाद काहीच येईना म्हणून बंद केले. तरी पथ्यकर पण रोचक लिखाण यावे ही भूमिका सोडली नाही.
४. आ. सुधारकात लिहिणारे लेखक अभ्यासक, संशोधक आणि विचारवंत आहेत. ते त्यांच्या परिसराबाहेर परिचित नसणे स्वाभाविक आहे म्हणून लेखक-परिचय देण्याची प्रथा सुरू केली.
५. आ. सु.चे वाचक महाराष्ट्रभर, तुरळक असतील पण सर्वदूर, पसरले आहेत. त्यांना कधी-मधी, कोठेतरी एकत्र करावे, बोलते करावे, मैत्र वाढवावे यासाठी वाचक-मेळे, मित्रमेळे घेतले. अकोला, अमरावती, पुणे, नासिक येथील वाचकमेळ्यांचे विस्तृत वृत्तान्त तुम्ही वाचले असतील. पत्री जे लिहिता येत नाही ते या भेटीतून वाचकांनी ऐकवले. विशेषतः महिलांनी.
६. आ. सुधारकाचे वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. मार्च २००० चा अंक दशवर्षपूर्ति-अंक होता. सहकारी स्नेही मोहनी म्हणाले, संपादकीयातून काही तरी विचार मांडा. म्हणून पुरोगामीपणा म्हणजे काय, यावर लिहिले. चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून दरमहा काहीतरी लहान मोठा विचार संपादकीयातून देण्याचा प्रयत्न केला.
७. मैफिलीतल्या जाणकार श्रोत्यांची दाद जशी, जेवढी गायकाला खुलवते तशी, तेवढी वाचकांची दाद संपादकालाही तोषवते, प्रेरक होत असते. ‘मनात आलं ते केलं’ या शकुंतलाबाई परांजपे यांच्यावरच्या आमच्या आदरांजलीला दिलखुलास दाद देऊन आजचा सुधारकचे हे वैशिष्ट्यपूर्ण संपादन जपावे, ही शुभेच्छा असेच काही फुलवून गेली. वाचकांचा एकूणच पत्रव्यवहार, पत्रसंवाद वाढतो आहे, हे आम्ही चांगले लक्षण समजतो.
८. आम्ही आधी मुखपृष्ठावरील विचार आवडीने वाचतो, मग एकदम शेवटचा पत्र-व्यवहार वाचतो, मग अमके-तमके, अशी आपली पसंती, आवड-नावड वाचक कळवतात तेव्हा अंधारात वाट चालताना लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी दिशा दाखवावी असे होते. काय ठेवावे, काय वाढवावे, काय काढावे, याची थोडी फार कल्पना करता येते.
९. आजीवसदस्यसंख्या वाढत आहे. आज ती ४०९ वर गेली. वर्षापूर्वी ३६० च्या आसपास होती.
१०. सनातनधर्माभिमानी वाचक दुखावतात हे आम्हाला दिसते. पण त्यांना दुखावणे हा आमचा हेतू नसतो. विचारकलहाला कां भितां, असे आगरकर विचारत. आम्हीही तेच म्हणतो.
११. विद्वद्रत्न डॉ. दप्तरीच्या धर्मविचारांची नवलाई सांगणारा लेख स्वतंत्र-पणे दिला आहे. भारतीय विचार मंच व प्रज्ञाप्रवाह या संस्थांच्या डॉ. दप्तरीवरील परिसंवादात तो निबंध आम्ही सादर केला होता. मूलगामी चिंतनासाठी डॉ. दप्तरी प्रसिद्ध होते. त्यांच्या विचाराचा अल्पांश येथे आहे. ती विचारसरणी आ. सु.ला संमत आहे असे कोणी समजू नये.
कळावे, लोभ असावा हे विनंती.
आपला प्र. ब. कुळकर्णी