आजकाल सामाजिक कामे करणारे, आपल्या समाजाचे जीवन सुधारायला धडपडणारे अनेक लोक एक सूत्र मांडतात—- “विचार विश्वाचा करा, आणि क्रिया स्थानिक करा.” ह्या मागची भूमिका बहुधा अशी आहे—- विश्वभरात बदल करणे अवघड असते. तसे करायला खूपच व्यापक जनाधार लागतो, जो उभारणे कठीण असते. पण आपली सुधारणेची कल्पना मात्र जगभरच ‘हवीशी’ वाटणारी असायला हवी, म्हणून विचार विश्वाचा करा. पण तो करताना स्वस्थ बसू नका, तर आपल्या नजीकच्या परिसरातली सुचणारी कामे करायला लागा.
आजचा सुधारक मधील लेखांचेही वैश्विक आणि स्थानिक असे भाग पाडता येतील. बायोगॅस, पाण्याचे व्यवस्थापन (अरवली गाथा), शासन-प्रक्रियेत सामान्यांचा सहभाग, आयात करायच्या वस्तूंचे अग्रक्रम, हे ‘स्थानिक’ प्रश्न. श्रद्धा, समता, राष्ट्रभावना, हे ‘वैश्विक’ प्रश्न (आणि अर्थातच ह्या टोकांमधला विस्तीर्ण ‘रंगपट’!) आत्तापर्यंतचा अनुभव असा की स्थानिक कामांबद्दलच्या लेखांवर चर्चा कमी होते. लेखक-संपादकांना विषय महत्त्वाचे वाटतात आणि लेख छापले जातात. लेखी चर्चा नगण्य असते. प्रत्यक्ष भेटीतही ‘छान. बरोबर’, असा मोघम प्रतिसाद मिळतो. मार्च ‘९८ मध्ये एका माजी सल्लागाराने विचारणा केली होती की प्राचीन भारतीयांनी समाजसुधारणेचा काय विचार केला होता. गेली अडीच वर्षे ह्या प्रश्नाला उत्तर लाभलेले नाही!
प्रत्यक्षात स्थानिक महत्त्वाची कामे करणारे लोक बरेच असतात. कित्येकदा तर शासकीय कामांच्या परिणाम शून्यतेतून पूर्वी ‘सरकारी’ मानल्या गेलेल्या क्षेत्रातही खाजगीपणे सुधार करायला धडपडणारे दिसतात. अशा कार्यकर्त्यांचे वैश्विक विचार जाणून घेऊन ते आजचा सुधारक प्रस्तुत करू इच्छितो. कार्यकर्ते आणि आ. सु.च्या लेखक-वाचकांपैकी एखादी व्यक्ती असे मिळून हा तपास व्हायला हवा. प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार वगैरेंमधून सामाजिक कामांमागचे विचार, त्यामागच्या धारणा, यांच्यावर लेख घडवायचे आहेत. गेल्या काही वर्षांत माणसांच्या आयुष्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत, आणि यापुढेही ते वेगाने होत राहतील असे दिसत आहे. हे बदल बहुतांशी तंत्र-ज्ञानातील प्रगतीतून उद्भवतात. नंतर ते आर्थिक स्पात सामोरे येतात. आणि शेवटी त्यांच्या नैतिकतेच्या, मूल्याधाराच्या चर्चा होतात. वाढत्या क्षमतेचे संगणक. त्यांना जोडणारे, सतत वेगवान होत असलेले माहिती-महाजाल. जीन्सचा आधार असलेले जैवतंत्रज्ञान. त्याचा शेती, औषधीशास्त्र, वैद्यक वगैरेंमध्ये होणारा उपयोग. हे सारे समजू शकणारे, वापरू शकणारे तंत्रज्ञ घडवण्यासाठी आवश्यक अशी सुधारित शिक्षणप्रणाली, ही तंत्रे जास्त उपयुक्त व्हावी यासाठी लागणारी प्रचंड संसाधने, ह्या संसाधनांसाठी आवश्यक असलेले जागतिकी-करण. त्यातून उद्भवणारे नवे असमतोल, नवी वर्गव्यवस्था —- ही सारी येत्या काळाची पार्श्वभूमी आणि चौकट असणार आहे.
भारतासारख्या गरीब देशांचा ह्या बदलांमागच्या ज्ञानसंपादनातला सहभाग नगण्य होता, आणि पुढील बदलांमध्येही नगण्य राहील. अर्थातच ह्या प्रक्रियेत जास्त सहभाग असलेले मानवी समाज त्यांच्या कामाचे मोल आपल्यासारख्या उपभोक्त्यां-कडूनच वसूल करतील.
ह्या परिस्थितीत आपण काय करावे, हा प्रश्न खूप मोठा आणि किचकटपणे बहु-आयामी आहे. ह्यावरही आजचा सुधारक मध्ये लेख व चर्चा यायला हव्यात. ‘गांवगाडा’ ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक त्रिंबक नारायण आत्रे यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हटले होते, “खेड्यांतील संभाविताकडे वाणगी म्हणून खरवसासाठी कोबळे दूध पाठविलें, तर ते भांडे रिकामें परत न करता त्यांत कांहीतरी तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी घालून ते परत केले पाहिजे अशी जुनाट रीत आहे; आणि ती नागरिकांनाही साजेल!’
आ. सु. ही हीच अपेक्षा वाचकांकडून ठेवत आहे! कोणी जर कार्यकर्त्यांची नावे सुचवत असेल किंवा “मी अमुक कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचे विचार लेखबद्ध करू इच्छिते/इच्छितो’, असे म्हणत असेल —- तर अशा सूचनांचे मनःपूर्वक स्वागत होईल. एखाद्या कामाची ओळख आणि ती कामे करणाऱ्यांचे ‘वैश्विक’ विचार, असे लेख अपेक्षित आहेत. असे लेख घडवण्यासाठी काही प्रवासखर्च वगैरे करावा लागणार असेल तर आधी चर्चा करून तो खर्चही देण्याचा विचार करता येईल. ह्या उपक्रमात आ. सु.चा प्रत्येक वाचक हा ‘संभाव्य’ लेखक आम्ही मानतो!