सीने में जलन, आँख में तुफान सा क्यों है?
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? आजकाल आजूबाजूला पाहिले तर आपल्या संपर्कात येणारे नातेवाईक जवळचे दूरचे, मित्रमैत्रिणी, सहकारी, कामाला येणारी बाई, दुकानदार, बँका ऑफिसेसमधील कर्मचारी, विद्यार्थी, इतकेच काय पण प्रवासात होणारी घडीभराची संगत, अशा सर्व व्यक्ती ‘सीने में जलन’ व ‘आँखों में तूफान’ घेऊन वावरताना दिसतात. आपापल्या ‘परेशानी’ त बुडून गेलेली व त्याचा आविष्कार त्यांच्या बोली व शारीर भाषेतून (body larguage) प्रकट करताना दिसतात. जीवन धकाधकीचे झाले आहे. सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते. जो तो आपल्यातच मग्न असतो. हे सर्व जरी बऱ्याच प्रमाणात खरे असले तरी पाच वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षाच्या वृद्धापर्यंत हा मानसिक ताण इतका सर्वस्पर्शी का झाला आहे असा विचार मनात येतो. आजकाल जागोजागी सुरू झालेले Laughter Clubs मला वाटते यांचेच द्योतक आहेत. ‘हसणे’ ही नैसर्गिक व स्वाभाविक प्रतिक्रिया इतकी दुर्मिळ झाली आहे की प्रयत्नपूर्वक ‘हसणे’ शिकवणे, क्रमप्राप्त झाले आहे. हास्य हरवून बसलेला हा समाज नैराश्याच्या गर्तेत खरच का इतका बुडत चालला आहे की हसण्याचे, हसवण्याचे म्हणजे आनंदी होण्याचे classes सुरू करावे लागले, ज्याद्वारे मानसिक तणाव कमी करण्याचा उठारेटा करावा लागतो आहे.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर जीवन म्हणजे सुखदुःखाचा आलेख. दुःखे ही दोन प्रकारची असतात. जन्मजात अपंगत्व, असाध्य रोग, जोडीदाराचे किंवा मुलाबाळांचे अकस्मात् निधन ही झाली मानवी नियंत्रणाबाहेरची अटळ अस्मानी दुःखे. दुसऱ्या प्रकारची दुःखे ही मानवी असामंजस्य, आपसातील वैमनस्य, स्वार्थ, स्पर्धा, कटुता अशा नकारात्मक मानवनिर्मित आचारांनी स्वतःवर ओढवून घेतलेली व टाळण्यासारखी सुलतानी दु:खे. अर्थात् दोन्ही प्रकारची दुःखे तितकीच तापदायक असतात व जीवनाचा तोल ढळून आयुष्य बेचव व निरर्थक करणारी ठरतात. ‘सीने में जलन’ ‘आँखों में तुफान’ पैदा करणारी ठरतात. पहिल्या प्रकारची अटळ अस्मानी संकटे असली किंवा दुसऱ्या प्रकारची मानवनिर्मित सुलतानी असली तरी मनुष्याला त्या संकटांना सामोरे जाणे व यथाशक्ति त्यावर विजय मिळवणे हाच एक सकारात्मक तोडगा असतो. कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्याची मनोवृत्ती असणारी माणसे त्यांतून जास्त सबळ व आत्मविश्वासपूर्ण होऊन बाहेर पडतात. त्याउलट पलायनवादी, कटु सत्य नाकारणारी माणसे मनोदुर्बल, हताश, हरलेली अशी होऊन बसतात.
कुठलीहि कठीण परिस्थिती आली तरी मनुष्याला एका adaptation process (अनुकूलन-प्रक्रियेतून) जावे लागते. त्याची मनःस्थिती कुठल्या वेगवेगळ्या संक्रमणावस्थेतून जाते व कशी बदलते हे पाहणे आवश्यक आहे.
१. मानसिक धक्का किंवा shock. यामध्ये गोंधळलेली, बधिर अशी मनःस्थिती असते.
२. नकारात्मक (denial) — अविश्वास, तक्रारखोर, माझ्या बाबतीत असे होणे शक्यच नाही. स्वतःची फसवणूक.
३. क्रोध — आक्रमकता, दुसऱ्यांवर दोषारोप, अशा प्रतिक्रिया.
४. दुःख (depression) अपराधीपणाची भावना, शरमिंदेपणा, हताश होणे व नैराश्य अशी अवस्था असते.
५. अलिप्तता (detachment) हरवलेपण, शून्यवत् निरर्थकता वाटणे.
६. Reorganisation (पुनःसंघटन) परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, वास्तवाची जाणीव, आशा पल्लवित होणे.
७. Acceptance (स्वीकार) आलेल्या संकटाचा सकारात्मक स्वीकार, मार्ग काढण्याचे उपाय योजणे. असलेल्या परिस्थितीशी मिळवून घेणे.
या सात संक्रमणावस्थांमधून प्रत्येक मनुष्य जातोच व acceptance या अवस्थेला पोचतोच असे नाही. प्रत्येकाची मानसिक, बौद्धिक व भावानिक बैठक कमकुवत आहे की सबळ सुदृढ आहे यावर त्याची प्रगती अवलंबून असते. मानस-शास्त्रज्ञ व समुपदेशक याचे काम हेच असते की कुठल्या stage (पातळी) वर client आहे हे ओळखणे व त्याला जरूर तितकाच आधार देऊन शेवटच्या म्हणजे ‘सकारात्मक स्वीकार’ या पातळीपर्यंत पोचवणे. सैद्धान्तिक पातळीवर (academically) हे सर्व खूप सोपे सरळ वाटते पण प्रत्यक्षात मात्र असे आढळून येते की सहसा मनुष्य हा ‘परिवर्तनशील’ बनतो. स्वतःची चूक, कमीपणा किंवा सदोष विचार-पद्धती तो मान्यच करत नाही. विचारपद्धती न बदलणे ‘अविवेकी विचार’ व त्यातून निर्माण होणारे ‘अविवेकी आचार’ ह्यामुळे स्वतः समस्याग्रस्त होऊन इतरांनाही त्याची झळ पोचते आहे हे सर्वसाधारण लोक अमान्यच करतात (denial). ‘बदल’ हा दुसऱ्याने करावा, मी तर बरोबरच आहे, अशाप्रकारचे ठाम (rigid) विचार व समजुती एखाद्या पाचरीसारख्या मनात घट्ट स्तून बसवलेल्या असतात. समुपदेशना-द्वारे या पाचरीला हळूहळू खिळखिळी करून शेवटी तिचे उच्चाटन कस्न फेकून देणे हे समुपदेशनाचे उद्दिष्ट गाठायला प्रचंड प्रयास पडतात. त्यात जर client बुद्धिमान असला तर विवेकनिष्ठ उपचारपद्धतीचा (Rational Emotive Therapy) चांगला परिणाम होतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अशा व्यक्ती अत्यंत कमी असतात की ज्या बौद्धिक दृष्ट्या वरच्या दर्जाच्या व receptive (ग्रहणशील) अशा दोन्ही असतात.
समाजातील बहुसंख्य माणसे rigid व आत्मसंकुचित मनाची कवाडे घट्ट बंद केलेली असतात. त्यामुळे ‘स्व’ च्या बाहेर जाऊन आजूबाजूच्या निसर्गाने, कलात्मक गोष्टींनी, संगीताने, ध्येयाने एकत्रित होऊन समाजोपयोगी कामे अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात.
Human relationships could be healing or killing depending on the persons involved. दुसऱ्यांशी संवाद साधणे, त्यांचा आदर करणे, त्यांच्यातील गुणांना दाद देणे व दोषांकडे दुर्लक्ष करणे ह्या सकारात्मक प्रतिक्रिया असलेल्या व्यक्ती आनंदी व समाधानी असतात. positive गोष्टींत रमून जातात व negative गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले व दुसऱ्यांचे जीवन सुखमय करतात. याउलट आत्मकेंद्रित व्यक्ती स्वतःच स्वतःभोवती कोष निर्माण करून दुसऱ्यापासून स्वतःला तोडून टाकतात व कष्टी होतात. थोडक्यात ‘जलन’ व ‘तूफान’ यांत स्वतःस बुडवून घेऊन ‘परेशान’ असे ‘शख्स’ स्वनिर्मित दु:खांत पिचत राहतात. त्यांना त्यांचे आंतरिक मनोबल वाढवायला मदत कस्न ‘शांति, स्वास्थ्य, समाधान’ प्राप्त करून देण्यास त्यांचेच प्रयत्न वाढवायला मदत करण्याची आवश्यकता असते.
दुःखी, तणावपूर्ण, असमाधानी, निराश अशा व्यक्तींची चित्रे रंगवली. पण यापुढे प्र न असा पडतो की याउलट ‘स्वस्थचित्त, शांतिस्वरूप, serene (प्रसन्नचित्त) अशा व्यक्तीला ओळखायचे कसे? त्याची काही बाह्य लक्षणे आहेत का? Peace Pilgrim नावाच्या, शांतिसंदेश पसरवणे हेच ध्येय मानून काम करणाऱ्या, एका अमेरिकन शांतिदूताच्या भाषेत personal transformation ‘स्वपरिवर्तन’ साधकाची लक्षणे अशी असतात.
१. विचार व आचार स्वाभाविकपणे त्वरित अंमलात आणणारी, पूर्वानुभव व भीति यावर अवलंबून नसणारी २. प्रत्येक क्षण नि िचतपणे आनंदाने उपभोगण्याची क्षमता असणारी ३. दुसऱ्यांना तोलून मापून (judgemental) त्यांना लेबले लावण्यात स्वारस्य नसणारी ४. कज्जे, खटले, गैरसमज (conflicts) यांमध्ये रस नसणारी ५. दुसऱ्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावत बसण्यात न रमणारी ६. चिंता करण्याची सवय नसलेली ७. आजूबाजूच्या माणसांचे, निसर्गाचे, कलेचे कौतुक (appreciation) प्रकट करणारी ८. दुसऱ्या माणसांशी व निसर्गाशी जवळीक साधलेली व त्यामुळे समाधानी असलेली.
९. ज्यांना स्वाभाविकपणे सहज हसता येते अशी १०. आपुलकीचे व प्रेमाचे पूल बांधणारी व दुसऱ्यांकडून आलेल्या प्रेमाच्या आपुलकीच्या भावनांची कदर करणारी.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा क िचत् दुःखभाग्भवेत्। या शांतिमंत्रांत
या लेखप्रपंचाचा आशय व सार सामावलेले आहे.
२०१, पद्मा अपार्टमेंटस्, ७६, फार्मलॅण्डस्, रामदास पेठ, नागपूर — ४४० ०१०