संपादकीय

लवकरच एक शतक संपेल. सहस्रकही संपेल. खरे तर घड्याळाचा एक ठोका दुसऱ्या ठोक्यांसारखाच असतो, आणि कॅलेंडरचे पानही मागच्यापुढच्या पानांपेक्षा वेगळे नसते. आपण आपल्या आठवणींचे संदर्भ लावायला काळाच्या तुकड्यांना नावे आणि क्रमवार आकडे देतो, एवढेच. पण तरी विसावे शतक जरा विशेषच. ह्या शतकात मानवी जीवन जेवढे बदलले तेवढे इतर कोणत्याच शतकात बदलले नाही. आणि हा बदल वाढत्या वेगाने होत राहणार अशी चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत कोणते वैचारिक सामानसुमान वागवत पुढची वाट चालायची हे ठरवणे निकडीचे वाटते. आजचा सुधारक ह्या सामानात विवेकवादाला सर्वात महत्त्वाचा ‘डाग’ मानतो. त्याला ओझे न मानता वाट दाखवणारा दिवा, रक्षण करणारी ढाल, अडथळे ओलांडायचे अवजार, अशा ख्यात पाहतो. आणि इतकी महत्त्वाची वस्तू वारंवार ‘चाचपतो’ —- म्हणजे पुन्हापुन्हा विवेकवाद म्हणजे काय, ते तपासत राहतो.

पंधराएक वर्षांपूर्वी (१९८४-८५) नवभारत मासिकात ज्येष्ठ तत्त्वज्ञ श्री. मे. पुं. रेगे यांची ‘विज्ञान आणि संस्कृती’ नावाची लेखमाला प्रसिद्ध झाली होती. विज्ञान ज्या संकल्पनांवर आधारलेले आहे त्यांची चर्चा केल्यावर रेग्यांनी लिहिले, “ह्या ज्या ‘आधुनिक’ संकल्पनात्मक चौकटीचे विवरण आपण केले तिचा स्वीकार करणे म्हणजे विवेकवादी दृष्टिकोण स्वीकारणे होय”. म्हणजे व्यवहारात तरी विवेकवादी दृष्टी म्हणजेच वैज्ञानिक वृत्ती. गेल्या पंधराएक वर्षात ह्यात फारसा बदल झालेला नाही, जरी वैज्ञानिक माहितीचा तपशील वाढला आहे. वैज्ञानिक वृत्ती (म्हणजेच विवेकवाद) आपल्याला पडणारे प्रश्न सोडवायला वापरायची असते. ज्ञानेंद्रियांना आलेले आणि उपकरणांनी स्पष्ट केलेले अनुभव, त्यांच्यावर बेतलेली अनुमाने, आणि ह्यातून हाती आलेले नियम वापरून प्रश्न सोडवणे, ही विज्ञानाची पद्धत. प्रयोगातून अनुभव कमवायचे, अनुमानाने नियम रचायचे, वापरायचे —- सारा खुल्लमखुल्ला कारभार, तिथे हा ‘तयारीचा’, तो ‘ज्ञानी’, असा फरक नाही. प्रयोग — तर्क कोणीही तपासावे, चुका दाखवाव्या, नियम बदलण्यावर आग्रह धरावा — मज्जाव नाही, कोणालाच. उत्तर सापडले नाही, नियम सापडला नाही, तरी चालते; शोध मात्र ‘शिस्तीत’ व्हायला हवा! उदाहरण पहा:
जयंत नारळीकरांनी लिहिल्याचे आठवते की ‘कस्त्वं कोऽहं कुत आयातः, का मे जननी को मे तातः’, हे प्रश्न आज बऱ्याच अंशी सुटलेले आहेत. ह्याच प्रश्नांची चर्चा करताना स्वामी चिन्मयानंद लिहितात, ‘ह्या लोकात सुचवलेल्या वाटेने तपासणी केल्यास भ्रम दूर होऊन सत्य समजेल . (ह्या तपासणीसाठी) आत्ताच आपले मन उपलब्ध नाही. ते आत्ता बाहेरील वस्तूंच्या विश्वाच्या मोहात फार गुंतले आहे, आणि स्वतःवर रोखून व्यक्तिनिष्ठ चौकशी करायला मोकळे नाही’. स्वामींना व्यक्तिनिष्ठ वाटणारे प्रश्न वैज्ञानिकांनी ‘कस्त्वं कोऽहं’चे सामान्यीकरण करून वस्तुनिष्ठ केले, की ‘माणसे कशी घडली?’ आणि हे प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेही. ह्या वाटेवर सापडलेले जैवतंत्रज्ञान आज कधीच प्रश्न न पडलेल्यांनाही उपयुक्त ठरत आहे. असे उपयुक्त किंवा इतर कोणतेही परिणाम स्वामींचा व्यक्तिनिष्ठ तपास जाहीर करत नाही. ते परिणाम तपासनिसालाच जाणवतात —- असे तपासणारे सांगतात, एवढेच. इतक्या (सध्याच्या भाषेत ‘एक्स्क्लू झिव्ह’) गटाची मते खरी आणि हायब्रिड ज्वारी मात्र स्वप्नविचार! पटायला जड आहे, विवेकीपणाने पाहता. विवेकवादाची एक मर्यादा वारंवार नोंदली जाते, की त्याच्या आधाराने मूल्यव्यवस्था उभी करता येत नाही. विवेकवाद म्हणजे वैज्ञानिक वृत्तीच असे मानले तर ही मर्यादा आहे. विज्ञानाने अमुक क्रियेचा परिणाम काय होईल, हेच तपासता येते. असा परिणाम हवासा की नकोसा, हे ठरवता येत नाही. श्री. रेगे याबद्दल म्हणतात, ‘मूल्यांना जर वैज्ञानिक ज्ञानाचे अधिष्ठान नसेल तर त्यांना भक्कम प्रामाण्य लाभणार नाही’. मग पर्याय काय? ‘सत्य’ शोधायला विज्ञान, तर ‘शिव-सुंदर’ शोधायला काय वापरावे? जे काही वापरायचे ते विज्ञानाशी फटकून वागणारे नसावे, कारण तसली सांधेजोड पचायला जड जाईल! त्याऐवजी विवेकवाद मूल्यव्यवस्थेसाठी उपयोगितावादाची मदत घेतो. ‘सुख’ हेच एक मूल्य, आणि एकूण सुखात वाढ करणारी क्रिया म्हणजे चांगली क्रिया, हवीशी क्रिया. दोन क्रियांपैकी तो पर्याय चांगला, जो सुखात जास्त वाढ करतो. अशी मूल्यांची मांडणी म्हणजे उपयोगितावाद. सत्य शोधण्यात विवेकवादाला जेवढे यश मिळाले आहे तेवढे मूल्ये ठरवण्यात उपयोगितावादाला मिळालेले नाही. पण तरीही इतर कोणत्याही मूल्यव्यवस्थेपेक्षा हा विचार विवेकाला जास्त जवळचा आहे. उपयोगितावादाच्या ‘सुख’ ह्या मूल्याची काहीजणांनी फोड करून ज्ञानलालसा, सौंदर्यासक्ती, स्नेहभाव, अशी पूरक मूल्ये मांडली आहेत. ‘प्रेम’ हे मूल्य वापरावे, अशी सूचनाही पूर्वी आ. सु. मध्ये आली आहे. पण ही पूरक मूल्ये मानावी की सुखाची अंगे-उपांगे मानावी, ही व्यवहारात उपयोगी न ठरणारी चर्चा आहे. ह्यापेक्षा महत्त्वाची एक बाब ‘एकूण सुख’ ह्या कल्पनेत सामावलेली आहे, ती म्हणजे सुखाच्या मोजमापाची. ‘अ’चे सुख ‘ब’च्या सुखाएवढेच मानावे, त्यात डावेउजवे न करावे, हे सूत्र एकूण सुखाच्या कल्पनेतच रुजलेले आहे. समता किंवा न्याय, ही ह्यातली मूळ कल्पना. दोन व्यक्तींना एकसारखेच महत्त्व द्यावे, ह्या कल्पनेला विज्ञानाचा एक अस्फुटसा आधार आहे! नुकत्याच ठरवल्या गेलेल्या मानवी जीन्सच्या आराखड्यात असे दिसते, की माणसांच्या लाखभर जीन्सपैकी नळ्याण्णव हजार नऊशे जीन्स एकसारखे असतात -तेही ‘एकमेकांबरहुकूम’ अशा कठोर अर्थाने. जर निसर्गाने माणसांना इतके एकसारखे केले आहे, तर मूल्यव्यवस्थेने माणसांमध्ये फरक करण्याला कोणता आधार असू शकतो?

ही मांडणी अनेकांना अपुरी वाटेल, चुकीची वाटेल. त्यांना पर्याय सुच-वायचे आवाहनच आहे. मुळात असे पर्याय विवेक वापरून तपासावे आणि मगच मान्य करावे, हाच आमचा आग्रह आहे. नील्स बोर हा शास्त्रज्ञ अनेकदा व्याख्यानांच्या सुरवातीला म्हणत असे की त्याचे प्रत्येक वाक्य हा त्याला पडलेला प्रश्न मानावा! प्रत्येक वाक्यापुढे प्रश्नचिन्ह टाकणे गोंधळ माजवेल —- पण वृत्ती मात्र विवेकी आहे. त्या मानाने इतर ‘भक्कम’ वाटणारी प्रामाण्ये आणि अधिष्ठाने केवळ शब्दच्छल असण्याची दाट शक्यता आहे!

जानेवारी २००० मध्ये पुण्यात भरलेल्या आजचा सुधारकाच्या वाचक-मेळाव्यात आगरकर प्रतिष्ठानाने महाराष्ट्रातील सर्व विश्वविद्यालयांमध्ये आजचा सुधारक पोचावा ह्यासाठी आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. ह्या उपक्रमाची सुरुवात आम्ही सप्टेंबर २००० (अंक ११.६) पासून केलेली आहे. त्या अंकाच्या तीनशे प्रती महाराष्ट्रातील अनेक कॉलेजांना पाठविल्या आहेत. लवकरच आगरकर प्रतिष्ठानाला अपेक्षित असा हजार प्रतींचा आकडा आम्ही गाठू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.