अमेरिकन निसर्गशास्त्र संग्रहालयातले डायनोसॉर्जचे प्रदर्शन पाहून आलेला आदम न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एका बाकावर बसला आहे, संध्याकाळच्या वेळी, आपल्या जीवजातीच्या हलचाली पाहात.
“आणि ही एवढी सारी माणसं म्हणजे पृथ्वीच्या साऱ्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग! सारे माझ्या नात्यातले! सारे, सारे! हौवा हवी होती बरोबर. तिला मनापासून आनंद झाला असता. नातलग भेटला की तिचा स्वतःवर ताबा नाही राहात. सगळ्यांच्या पाप्या घ्यायचा प्रयत्न करेल ती. गोरे, काळे, सगळेच्या सगळे”. एक बाबागाडी ढकलत नव्याने आई झालेली बाई बाकावर आदमजवळ येऊन बसते. बाबागाडीला संथ झोका देते.
“किती कमी बदल झालाय—-काहीच नाही, खरं तर—मला पहिलं बाळ आठवतं —- केव्हा बरं? येत्या मंगळवारी तीन लाख वर्षं होतील. आणि हे बाळ तस्संच आहे. पहिल्या बाळात आणि ह्याच्यात फरकच नाही. तेच अपुरं जवळ, तेच दात नसलेलं बोळकं, तेच नाजुक शरीर आणि तीच ‘रिकामी’ नजर —- तेच खूपसं अनाकर्षक रूपडं —-
पण हौवा त्या पहिल्या बाळावर जीव टाकायची, ह्या ताज्या बाळाची आई टाकत्येय तसा. हिच्या डोळ्यात तीच चमक आहे, हौवाच्या डोळ्यात होती तशी. तीन लाख वर्षं चमक एका डोळ्यातून दुसऱ्यात नाचते आहे, मुळीच न बदलता! आहे बुवा —- ह्या आईचा चेहेरा उजळवणारी नजर आणि हौवाचा चेहेरा फुलवणारी —- मी पृथ्वीवर जी ताजी गोष्ट पहातोय ती जुन्यातल्या जुन्यासारखीच आहे”.
(मार्क ट्वेनच्या ‘आदम आणि हौवाच्या रोजनिश्या’ मधले हे अवतरण —- पण सध्या ‘आदम-हौवां’चा काळ तीसेक लाख वर्षांपूर्वीचा मानला जातो —- जरी आदम-हौवांना मानले जात नाही, तरी!)