आर्थिक दृष्ट्या दुर्बल देशांना कुशल आणि प्रशिक्षित मानवी भांडवलाची गरज असते, तर श्रीमंत देशांकडे अशा तंत्रज्ञांचा मुळातच भरपूर साठा असतो. अशा परिस्थितीत प्रशिक्षित माणसांचा गरीब देशांकडून श्रीमंत देशांकडे वाहणारा जो ‘ओघ’ असतो, त्याला सध्या ‘ब्रेन ड्रेन’ म्हणतात. ह्या सोबतच अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवस्थापकीय आणि प्रशासनिक कामांकडे वळणे, याला ‘अंतर्गत’ ब्रेन ड्रेन म्हणतात. एखाद्या अभियंत्याला त्याचे तांत्रिक शिक्षण देण्यात खर्ची पडलेली भांडवली आणि मानवी संसाधने अशा माणसांच्या व्यवस्थापनासारख्या क्षेत्रात जाण्यामुळे वाया जातात, अशी ही विवाद्य कल्पना आहे.
‘द रिअल ब्रेन ड्रेन’ (ओरिएंट लॉगमन्स, १९९४) ह्या पुस्तकाचे लेखक डॉ. एस. पी. सुखात्मे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीमध्ये शिकले, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, पवईचे संचालक झाले. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांचे पुस्तक ब्रेन ड्रेनची व्याप्ती, तिची यंत्रणा (प्रक्रिया) आणि खऱ्या व दृश्य ब्रेन ड्रेन मधील फरक, अशा तीन भागांमध्ये विभागलेले आहे. ह्या नंतर ते खरी ब्रेन ड्रेन थांबवायची योजना सुचवतात.
संपूर्ण भारतातली आणि प्रामुख्याने आय. आय. टी. पवईच्या संबंधातली आकडेवारी तपासून आपल्याला ब्रेन ड्रेनची व्याप्ती शोधता येते. एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एकून राष्ट्रीय ‘उत्पादना’चा ब्रेन ड्रेनने व्यापलेला भाग असा आहे —-
अभियांत्रिकी ७.३% वैद्यक २.८%
विज्ञानशाखा २.१% आय. आय. टी.तून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकुणाच्या ४०% आहे.
ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आय. आय. टी.च्या स्नातकांना एक प्र न-पत्रिका देण्यात आली. ही बऱ्याच विचारातून घडवली गेली होती. ह्या प्र नपत्रिकांना मिळालेल्या प्रतिसादाचे वि लेषण केले गेले. (सुखात्मे आणि महादेवन् १९८७, ८८) त्यांचे महत्त्वाचे निष्कर्ष असे —-
१. भारतातच राहणाऱ्यांपैकीही बरेच जण परदेशी जाऊ इच्छित होते, व त्यांना अमेरिकन विद्यापीठांत प्रवेशही मिळाला होता, पण आर्थिक अडचणींमुळे ते परदेशी उच्च शिक्षण घेऊ शकले नाहीत.
२. ‘उत्तम’ विज्ञान-तंत्रज्ञानाला अमेरिकन समाज बांधील आहे, हे ‘बाहेर जाण्याचे मुख्य कारण म्हणून सांगितले गेले. उत्कृष्ट सुविधा आणि बऱ्याच संख्येत उच्च प्रतीचे वैज्ञानिक–तंत्रज्ञ उपलब्ध असल्याने ही बांधिलकी घडते, हे उघड आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकन शिक्षण-संशोधनाच्या सोई जगात सर्वोत्कृष्ट आहेत. ह्याची दुसरी बाजू म्हणजे भारतातले वातावरण घुसमटवणारे, असंवेदनशील आणि नोकर-शाहीग्रस्त असण्याने भारतात राहण्याची इच्छा कमी होते व भारतीय लोक परदेशी रुजायला धार्जिणे होतात.
३. मुळात शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांपैकी बहुतेकांची तिथेच रुजण्याची योजना नसते. नंतर मात्र आपले वर्गीकरण, परिस्थिती, पगार आणि कामाच्या सोई उत्तम आहेत, हे जाणवून परदेशीच राहायचे ठरवले जाते. सुरुवातीला तरी कामाच्या ठिकाणी पदोन्नतीच्या संधी चांगल्या आहेत, ही समज परदेशी राहण्याला पूरक ठरते.
४. परदेशी स्थिरावणारे व त्यांची कुटुंबे तेथील समाजात कशी सामावली गेली आहेत याचे उत्तर ‘बरी’ ते ‘समाधानकारक’ असे असते. त्यांचे सामाजिक आयुष्य बहुतेक वेळी थोड्याशाच स्नेह्यांच्या गटापुरते मर्यादित असते, व तेथेच त्यांना सुरक्षित वाटते. तुम्ही नुकतेच अमेरिकेत पोचलेले असा, की वीस वर्षे तेथेच राहिलेले असा, तुम्हाला असल्या प्र नांना तोंड द्यावे लागते “भारतीय ना, तुम्ही? किती दिवस झाले इथे येऊन? किती दिवस राहणार?” विद्यार्थी असताना अशा प्र नांमुळे फार वाईट वाटत नाही, पण तिथेच राहायचे ठरवल्यावर मात्र त्यांच्यामागची अ स्वीकृतीची भूमिका उमजते. मुले अमेरिकेत वाढत असताना हे न सामावले जाणे, त्यामागचा सांस्कृतिक बेजोडपणा नव्याने जाणवू लागतो. मुलांना कोणत्या मूल्यांचा संच घडवत वाढवायचे? भारतात पालक जसे मुलांशी वागतात, तेच नियम इथे लागू करायचे का? हे मुद्दे समजून घेणे आणि त्यांच्यावर उत्तरे ठरवणे सोपे नसते. ह्यामुळे आपली ‘ओळख’च गोंधळाची वाटू लागते आणि मुले ‘बहकतील’ अशी भीती उत्पन्न होते. ही पाश्चात्त्य समाजांची (वाईट) ‘उणे’ बाजू. रोममध्ये असताना रोमनांसारखे वागा, हे मुलांना झेपते पण पालकांमध्ये ताण उत्पन्न करते!
एखादा (गरीब) देश सुबत्तेकडे सरकवणाऱ्या आर्थिक पुनरुथानात शिरला की ब्रेन ड्रेन मंदावते. कोरियन युद्धाने कोरियाची अर्थव्यवस्था विस्कटल्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी रोडावल्या. ह्यामुळे पन्नास आणि साठच्या दशकांत अनेक कोरियन विचारवंत (प्रामुख्येने अमेरिकेकडे) ‘बाहेर’ गेले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांमध्ये कोरियन अर्थव्यवस्था सुधारली, कोरियन औद्योगिक उत्पादने जागतिक बाजारपेठात उतरू लागली. ह्या निर्यातीमुळे तंत्रज्ञान सुधारण्यासाठी पैसे मिळू लागले. हुषार कोरियन विद्यार्थ्यांना त्यांच्याच कंपन्या नोकऱ्या पुरवू लागल्या —- कोरियाच्या विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाला बाराशे ‘परदेशी कोरियन्स’ ना परत आपल्या देशातील विद्यापीठे आणि प्रयोगशाळांमध्ये आणता आले.
भारतातली पगारांची पातळी अमेरिकन पातळ्यांच्या एक-पंधरांश ते एक-विसांश आहे. आणि भारतीय खाजगी उद्योगांना उच्च-कौशल्य असलेल्या वैज्ञानिक-तंत्रज्ञांची फारशी गरजही नाही.
ब्रेन ड्रेन यंत्रणेचा अभ्यास असे दाखवतो, की ब्रेन ड्रेनची व्याप्ती ‘गरजू’ देशांच्या मागणीनेच ठरत असते. आपल्या दारिद्र्याचाही त्यात मोठा वाटा आहे. पाचेक हजार तंत्रज्ञ गमावणे हीच मोठी समस्या नाही, तर काही-शे अत्यंत सर्जक व्यक्ती गमावणे, ही आहे. ह्या शेकड्यांमध्येच भावी खुराना आणि चंद्रशेखर असतात. लेखकाच्या मते ही ‘खरी’ ब्रेन ड्रेन, आणि इतर सारी दृश्य (दिखाऊ?) ब्रेन ड्रेन.
मूलभूत विचार करू शकणारी व साधेच प्र न मुळातच नव्या त-हेने सोडवणारी मुले असामान्य हुषारीची असतात. अशा त-हेने विचार करणारी किंवा प्राध्यापकांना काही असामान्य अडचणी विचारणारी मुले ओळखता येतात. ह्या मुलांना उच्च शिक्षणासाठी ठेवून घेणे संस्थांना आवडत असते.
पण ही उच्च क्षमतेची मुले परदेशी जातात, आणि तिथे त्यांच्या क्षमतांची ताबडतोब दखल घेतली जाते. एम.आय.टी., कॅलटेक, स्टॅनफर्ड आणि बर्कली येथील प्राध्यापकांमध्ये अशी मुले आहेत. बेल-लॅब्ज, आय. बी. एम. च्या प्रयोगशाळा वगैरें-मध्येही अशी मुले ज्येष्ठ स्थानांवर आहेत.
गुणी विद्यार्थ्यांना ‘ठेवून’ घेण्याचा प्र न काही संस्थांनी काही अंशी सोडवला आहे. जसे, आय.आय.टी. कानपूरने शंभरावर अमेरिकास्थित भारतीयांना आपल्या शिक्षकांच्या यादीत स्थान देऊ केले. ही घटना साठीच्या दशकातील आहे, कानपुरची संस्था घडत असतानाची. सर्वांचे अकादमीय अहवाल बारकाईने तपासून, त्रयस्थांची मते मागवून, व्यक्तिश: मुलाखती घेऊन हे केले गेले. सर्वांना भारतात सहकुटुंब परतण्याचा खर्च दिला गेला. संस्थेच्या परिसरात घरे दिली गेली. असे येणारे कानपूर-संस्थेला उत्तम शिक्षक पुरवून एक चांगली सुस्वात देऊ शकले. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनेही सत्तरीच्या सुरुवातीला परदेशातून उत्तम संशोधक-शिक्षकांची भरती केली. आज हेच प्रयत्न राष्ट्रीय पातळीवर आणि एकत्रित स्पात करण्याची सूचना केली जात आहे. पण जर खूपशा चांगल्या लोकांची बुद्धी आपण भारतात वापरूच शकणार नसलो, तर त्यांना परदेशी जाऊ द्यावे, हेच बरे.
सुखात्म्यांची कळकळ आणि सच्चेपणा पुस्तकभर दिसत राहतो. त्यांची स्वतःची निरीक्षणे, भारतीय व अमेरिकन सरकारी माहिती, लोकसंख्या एकीकडून दुसरीकडे जाण्याबाबतची पुस्तके, अशा साऱ्या आधारांवर त्यांचे निष्कर्ष घडले आहेत. त्यांना गरीब देशांमधून होणारी ब्रेन ड्रेन विचारणीय आणि काळजी करण्यासारखी वाटते.
आपण साऱ्यांनीही हा विचार, ही काळजी तितक्याच गांभीर्याने वाहायला हवी आहे.
आज उदार जागतिक अर्थव्यवस्थेची भाषा वापरली जात आहे. ह्या बाबत काही वर्षांपूर्वी कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन करणारे श्री भगवती यांनी एक धोक्याची सूचना दिली होती. त्यांच्या मते डब्लू. टी. ओ. (जागतिक व्यापार संघटना), गॅट करार (जनरल अॅग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ), जागतिक बँक, आंतर राष्ट्रीय नाणेनिधी (आय. एम. एफ.) ह्या सर्व संस्थांचे नियम फक्त श्रीमंत देशांना अनुकूल आहेत, गरीब देशांना मुळीच नाहीत. ह्या नियमांमुळे आणि शतीमुळे श्रीमंत व गरीब देशांमधली दरी कायमस्वरूपी होणार आहे. ह्याचा परिणाम म्हणून ब्रेन ड्रेनही कायमस्वरूपी होईल, कारण तिचे मूळ हे मूळ देशांच्या दारिद्र्यातच आहे.
एकविसावे शतक हे ज्ञानाचे (माहितीचे) आणि पेटंटांचे शतक असणार आहे —- पेटंटे हा ज्ञानाबाबतचाच घटक आहे. सर्वांत बुद्धिमान माणसे आणि खूपशा पेटंटांवर बसणारे श्रीमंत देश गरीब देशांना अनेक अंगांनी अडचणीत आणत राहतील, उदाहरणार्थ औषधे, धान्य वगैरे.
सुखात्म्यांच्या पुस्तकात ठळकपणे नोंदलेले एक प्राचीन निरीक्षण आहे—- “आपल्या बुद्धिवंतांचा आदर न करणारे कोणतेही राष्ट्र विनाशच पावेल” (धाकटा प्लिनी इ.स. ६१-११२).
कांचन-यश, ८ वेस्ट पार्क रोड, धंतोली, नागपूर — ४४० ०१२