आमच्या देशात आजही यंत्रसंस्कृतीपेक्षा मंत्रसंस्कृतीचाच पगडा अधिक आहे. आणि ती केवळ ब्राह्मणांपुरतीच मर्यादित नाही. दर मंगळवारी गणपतीपुढे नारळ, उदबत्त्या, पेढ्यांचे पुडे घेऊन तास न् तास हजारो माणसे उभी राहतात, ती काही फक्त ब्राह्मणच नसतात. ही माणसे वैयक्तिक नवस आणि परलोकात स्वतःची सोय करू पाहतात. … पण अशी रांग इस्पितळाच्या पुढल्या पेट्यांतून स्प्रया-सव्वा रुपया टाकायला कधी उभी राहत नाही. परलोक, स्वर्गलोक ह्या मंत्रसंस्कृतीतल्या पगड्यामुळे आम्ही मंत्रमुग्ध होऊन विचाराची दारे बंद करून झोपेत चालल्यासारखेच जीवनात चालतो आहोत. ह्या मंत्रसंस्कृतीतच जन्मजात शुद्धाशुद्धत्वाच्या कल्पना स्तलेल्या असतात. … आज लोकशाही निवडणुकीत-देखील यश मिळवायला ह्या अंधश्रद्धांचा उपयोग यापूर्वी कधी नव्हता इतक्या जोरात झालेला दिसतो. ही कीड जिथे उत्पन्न होते ती डबकीच नाहीशी व्हायला हवीत. माणसाचे भवितव्य माणसाच्याच हाती आहे हा विचार रुजवण्याच्या आड जे जे काही येत असेल त्याचे मूळच उखडवले पाहिजे. धार्मिक भावना दुखावल्या जातात ह्या सबबीखाली ज्या वेळी सामाजिक हित आड येते त्या वेळी सामाजिक हितच महत्त्वाचे मानले पाहिजे. ‘देवदानवां नरें निर्मिले हे मत लोकां कवळू द्या’ हे केशवसुतांचे उद्गार लोकमानसात रुजवले पाहिजेत. भारतातल्या स्त्रियांची दुरवस्था सर्वत्र सारखी आहे. अशा वेळी हिंदू स्त्री, मुसलमान स्त्री असा फरक मानता कामा नये. राज्यघटना म्हणजे काही अपौरुषेय ग्रंथ नव्हे. बदलत्या परिस्थितीत त्यात योग्य ते बदल केले गेलेच पाहिजेत. ज्या नागरिकांना आजवर स्ढींनी माणुसकीचे साधे हक्क नाकारले त्यांच्या अभ्युदयाला अग्रकम दिला पाहिजे.
मैत्र, पृष्ठ ८३-८४
पु. ल. देशपांडे