एकोणीसशे सत्याण्णवच्या मार्च महिन्यात माझी पत्नी निवर्तली. घरात मी, वय वर्षे ६४, चार हृदयविकाराचे झटके आलेल्या माझ्या सासूबाई, वय वर्षे ७७ आणि माझा नोकरी करणारा अविवाहित मुलगा, वय वर्षे २७, असे उरलो. ओघानेच घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पत्नी जाण्याआधी तिच्या दुखण्यात पोळीभाजी करायला एक बाई ठेवल्या होत्या, ती व्यवस्था चालू ठेवली. मला स्वतःला सर्व स्वयंपाक येत असल्यामुळे सकाळची न्याहरी, दुपारचे चहा खाणे, रात्री काही लागले तर करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. सर्वसामान्यपणे आता मुलाचे लग्न करून टाकून प्रश्न सोडवावा असा विचार असतो. हा विचार दोन कारणांसाठी केला नाही. एक म्हणजे मुलाचे लग्न हा त्याचा वैयक्तिक प्र न असून त्याला जेव्हा मनातून लग्न करावेसे वाटेल, आपण नोकरी/व्यवसायात स्थिर झालो असे वाटेल, तेव्हाच त्याने लग्न करावे. हल्लीच्या काळात नोकरीदेखील एकाच ठिकाणी स्थिर राहील अशी शाश्वती नसते. जिथे चांगला अनुभव, पुढे येण्याच्या संधी मिळतील तिथे नोकरी घ्यावी, त्यासाठी गाव सोडून जावे लागले तरी जावे, अशी साहसी उपक्रमशीलता पुढ येऊ पाहत आहे. तिला प्रोत्साहनच द्यावे. मी आणि सासूबाई मात्र स्थिर राहणार होतो. दुसरे असे की मुलाची होणारी पत्नी ही स्वतंत्रवृत्तीची, व्यावसायिक कारकीर्द असलेली असू शकते. कुटुंबाचा एक आपलेपणाने अविभाज्य भाग होण्याला काही काळ जावा लागतो आणि त्यानंतर तिने काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आपणहून घेणे हेच योग्य आहे. नवीन विवाह झाल्याने तर तरुण नवलाईची पहिली २-३ वर्षे तरी छानपणे बागडण्याची, एकमेकांना समजून घेण्याची; संसाराच्या, घरगृहस्थीच्या जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे अनुभवण्याची संधी खास करून जुळवून ठरविलेल्या विवाहात द्यावी, असे मला वाटते. एकत्र म्हणजे एकाच छपराखाली मास्नमुटकून (परंपरा म्हणून किंवा जागांच्या टंचाईमुळे परिस्थिति-शरण म्हणून) राहण्यापेक्षा एकोप्याने, एकमेकांना साद प्रतिसाद देत, गरजेला धावून जाऊन मदत करत,
आत्मसन्मानाने आपापली प्रगती करत जगावे हेच योग्य व चालू काळाशी सुसंगत आहे.
पहिली समस्या ही उदरभरणाची. घरात स्वयंपाकाची बाई ठेवली की सर्व प्र न सुटत नाहीत. ती काय, द्याल त्याचा स्वयंपाक करणार. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे खारट, तिखट, चमचमीत, माफक, तेलकटतुपट स्वयंपाक करणार. तेही बस्तान बसायला काही काळ जावाच लागतो. पण आरोग्याचा मूळ पाया अन्न हाच असल्यामुळे रोजचा दोन्ही वेळचा बेत ठरविणे, दिवसामागून दिवस ठरविणे, त्याची मोसमाप्रमाणे बाजारात मिळणाऱ्या वस्तूंशी सांगड घालणे, हे सुयोग्य किंमतीच्या महिन्याच्या अंदाजपत्रकाप्रमाणे करणे, यासाठी काही एक विचार, नियोजन लागते. हृदयविकार असलेल्या, दातांची कवळी नसलेल्या ७७ वर्षे वयाच्या व्यक्तीचा आणि २७ वर्षांच्या अंगमेहनतीचे काम करणाऱ्याचा आहार एक कसा असू शकेल? मऊसर, सुपाच्य आहार आणि पौष्टिक पण दातांखाली रगडण्याचा आनंद देणारा आहार ह्यांचा सुवर्णमध्य कसा गाठायचा? मुलगा सकाळीच डबा घेऊन कामावर जात असल्यामुळे भारी, पौष्टिक पदार्थाचा प्र न स्वतंत्र डब्याच्या माध्यमातून सोडवला. कच्च्या कोशिंबिरीसारख्या इतरही काही गोष्टींतून हा प्र न बराचसा सोडविता आला. पण आहार म्हणजे काही गाडीत पेट्रोल भरणे नव्हे. मानवी जीवनातला तो एक अत्यंत आनंदाचा मूलभूत ठेवा आहे. अन्नाने नुसते पोट भरून चालत नाही तर जेवणानंतर संपूर्ण समाधान चेहऱ्यावर पसरले पाहिजे. इथे जिभेचा प्र न येतो. आणि आहारशास्त्रापेक्षा रसनाशास्त्र नेहमीच वरचढ ठरते. सर्वजण एकाच वेळी जेवायला बसले तर या बाबतीत काही एक समतोल राहतो. नाहीतर गृहिणीला स्वयंपाकाची भांडी आणि खाणाराची पाने यावरच लक्ष ठेवून आपले जेवण बेतावे लागते. या शिवाय माणसे ही यंत्रे नाहीत. त्यामुळे मूड, भूक बदलत राहतात आणि नेमक्या स्वंयपाकाचा अंदाज कधीच येत नाही.
माझ्या लहानपणी ‘तव्यातलं पिठलं’ असा एक शब्द प्रयोग वापरात असे. हा पदार्थ फार चुरचुरीत खमंग असून बायका तो मुद्दामहून करून खातात अशी माझी बालबुद्धि समज होती. त्या काळी पुरुषमंडळी आणि मुले आधी जेवत. एखादा पदार्थ—-भरल्या वांग्याची भाजी (आम्ही काय सागुतीचे नाव घेणार?)—-चांगला झाला की मंडळी आडवा हात मारत असत. मग मागून जेवणाऱ्या बायकांसाठी खडखडाट. अशा वेळी चुलीवर तवा असायचाच. त्याच्यावरच पिठले टाकून बायका वेळ निभावून न्यायच्या. पण काका, मामा कोणी तरी तिरकसपणे म्हणायचेच, “व्वा, चैन आहे”! हे सगळे झाले तरी उरलेल्या शिळ्या अन्नाचा प्र न राहतोच. फ्रिजमुळे याची तीव्रता कमी झाली आहे. पण म्हाताऱ्या माणसाला कशाला उगीच शिळे द्या आणि तरुणांना दिवसभर मेहनतीचे काम केल्यावर घरच्या एकाच जेवणात तरी कसे शिळे द्यायचे म्हणून शेवटी हीही जबाबदारी गृहिणीचीच उरते. काहीजण घरच्या नोकराला किंवा नोकराणीला–स्वयंपाकीणबाई, धुणे भांडी करणारे ह्यांना उरलेले अन्न देतात. हे लोक तीनचार ठिकाणी तरी कामे करतात. त्यामुळे सर्वकडेच त्यांना हे खाणे शक्य नसते. शिवाय उरलेल्या अन्नात नियमितता नसते. अशा उरल्या सुरल्या अन्नाच्या हिशेबावर त्यांनी काय म्हणून आपला आहार बेतावा? त्यामुळे काही जण दिले तरी खात नाहीत आणि ते योग्यच आहे. मग बऱ्याच वेळा थोडेच राहिले आहे, कुठे काढून ठेवायचे म्हणून गृहिणीच ते संपवून टाकते. परिणामी सडसडीत गृहिणीची लवकरच बरणी होते.
झाकपाक आणि उष्टीखरकटी काढणे हेही काम असतेच. काही जण इतके ताटवाट्या बरबटून जेवतात की काढणाऱ्याला किळस येते. त्यानंतर ही खरकटी भांडी नीट पाण्याने विसळून, पाणी घालून ठेवली नाहीत तर दुसऱ्या दिवशी भांडी घासणारा/रीला फार त्रास होतो. अर्थात भांडी स्वच्छ घासली जात नाहीत. कोरड्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हा त्रास जास्त होतो. शिवाय पिण्याची भांडी, चहादुधाची भांडी स्वतंत्रपणे स्वच्छ केली नाहीत तर त्यांना अन्नाचा ओशटपणा आणि वास लागतो. चहाचे भांडे व गाळणे ही चार आठ दिवसांनी नीट घासली नाहीत तर त्यावर राप चढतो, डाग पडतात. झाडू पोछाला आणि कपडे धुण्यालासुद्धा जरी कोणी ठेवले तरी चार आठ दिवसांनी सांदी कोपऱ्यातला केर काढावा लागतो, जळमटे काढावी लागतात, धूळ झटकावी लागते, फ्रिज, वॉशिंग मशीन पासून सर्व पुसावे लागते, संडास बाथरुमही घासावे लागतात आणि कपडे कॉलरीवर किंवा जिथे जास्त मळकट होतात तिथे नीट चोळावे लागतात—-अगदी मशीन असले तरी. कपडे इस्त्रीला दिले तरी लिहून ठेवण्याचे काम गृहिणीलाच करावे लागते. जर पडदेबिडदे असा शौक असेल तर ते स्टुलावर चढून काढून बदलावे लागतात. पंखेही स्टुलावर चढूनच नीट पुसावे लागतात. धुण्याच्या पावडर, साबणापासून ते डाळ, तांदूळ, रवा, तिखट, मीठ, मिरची अशा साठसत्तरतरी वस्तू आहेत नाहीत पाहाव्या लागतात. मुंबईत जागा मर्यादित म्हणून खूप भरून ठेवता येत नाहीत. शिवाय उष्ण दमट हवेमुळे पोरकिडे होणे, जाळ्या पडणे, अळ्या पडणे, बुरशी लागणे, पाखरे होणे यापासून खाण्याच्या वस्तूंचे सतत लक्ष ठेवून रक्षण करावे लागते.
मुंबईत तयार पदार्थ खात्रीचे, त-हेत हेचे, सहज उपलब्ध होतात. अगदी पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्यांपासून सर्व. पण ते अर्थातच महाग असतात. शेंगदाणे रु. ३०–३५ किलो दराचे असतील तर दाण्याचे कूट रु. ७०–७५ किलो दराचे असते धान्ये रु १५–२० किलो दराची असतील तर भाजण्या रु. ७०-८० किलो असतात. घरच्यापेक्षा दुप्पट ते अडीचपट भाव पडतातच. चांगल्या नोकऱ्या असतील तर स्त्रिया मग घरी करायच्या फंदात पडत नाहीत. सुट्टीच्या दिवशीपण मग बाहेरच जेवणाचे कार्यक्रम होतात. पण नोकरी न करणाऱ्या गृहिणीला हे सर्व परवडतच नाही.
दुधाचे व्यवस्थापन हा आणखी एक खास विषय आहे इथेही फ्रिजचा वापर असेल तर पुष्कळ सोय होते. एरवी सतत तापवून ठेवावे लागते. भारतीयांच्या चहाच्या सवयी खास आहेत. त्यांना घट्ट (६% स्थिग्धांश असलेल्या) ताज्या दुधाचा चहा फार प्रिय, माझ्या एका स्नेह्याच्या म्हणण्याप्रमाणे या सवयीमुळेच भारतात गायी मागे पडून म्हशी पुढे आल्या! गाई मुख्यतः बैलांच्या पैदाशीसाठी! शेतीसाठी बैल लागतात ना! दुधापासून ताक, दही, लोणी, तूप हेही पदार्थ घरीच करावे लागतात. कोणाला ताक आवडत नाही पण दही हवेच. कोणाला आंबट, कोणाला गोड, कोणाला खमंग कढवलेले तूप तर कोणाला पांढरे. कडक थंडीत दही लावणे, पावसाळ्यात त्याला तार न सुटू देणे अशाही परी असतात. शिवाय सारखे दूध तापवणे, निरनिराळ्या वेळी चहा करणे यात दुधातच तूप तयार होते. चहावर तवंग येतो. शिवाय साय इकडे तिकडे होते आणि सरते शेवटी तुपाचा उतारा कमी पडतो. घरातल्यांसाठी आणि येणाराजाणारासाठी केव्हा किती चहा करायचा याला धरबंधच नसतो. आपल्या आतिथ्याच्या कल्पनेत या गोष्टी बसतच नाहीत.
असे अनेक कामांचे अनेक बारकावे सांगता येतील. एकच ‘वैताग’ सांगून हे सुमार वर्णन थांबवून मुख्य विषयाकडे वळतो. सकाळपासून रात्रीपर्यंत घराची घंटा किती वेळा वाजेल आणि हातची कामे टाकून दार उघडावे लागेल ते सांगणे अवघड आहे. कचरा गोळा करणारा, पोस्टमन, फेरीवाले, कुरियरवाले, वर्गणीवाले असे येतच असतात. त्यांना वेळकाळ नसतो. भरीत भर फोन, राँग नंबर असतातच. एकटी गृहिणी या सर्व आघाड्या लढवत असते. माझ्या या अनुभवात १-२ छोट्यांची, शाळा कॉलेज वाल्यांची भर घाला, बऱ्याच वेळा फिरतीवर जाण्याऱ्या नवऱ्याची (आणि त्याच्या बॅग भरण्याच्या कामाची) शाळेतल्या पालकभेटी, सणवार अशी सर्व भर घाला, म्हणजे गृहिणीच्या एकूण कामाची कल्पना येईल. गृहिणीला स्वतःला नेमका हक्काचा वेळच नसतो. त्यामुळे घड्याळाप्रमाणे ४-५ तासांचे काम २४ तास पसरले जाते.
ही सर्व म्हटली तर शारीरिक कामे आहेत. फार बुद्धी लागतेच असे नाही. मात्र व्यवस्थापकीय कौशल्य खूपच लागते. त्याशिवाय सर्व घर धरून ठेवायचे, प्रत्येकाच्या लहरी जपायच्या, घरातले वातावरण प्रसन्न, हसते ठेवायचे हे तारेवरच्या कसरतीचे कामही गृहिणीलाच करावे लागते. या बाबतीत तर भारतीय नारीचा लौकिक रमेशचंद्र दत्तांपासून गांधीजींपर्यंत नावाजला आहे ना! सोशिकपणा, संस्कृतीची रक्षणकर्ती . . . काय काय किताब तिला बहाल झाले आहेत. पण . . . सध्या डॉ. माशेलकर स्त्रीकेंद्रित कुटुंबव्यवस्था आणि कुटुंबकेंद्रित समाजव्यवस्थेचा पुरस्कार करताहेत. त्याचा तपशील मिळाला तर बरे होईल.
समाजात नेहमीच ज्याला dirty work म्हणतात ते राहील. नागपूरच्या अंग जाळणाऱ्या उन्हात रस्त्यावर डांबर पसरावे लागते, कोसळणाऱ्या पावसातही भाताची लावणी करावीच लागते, लहान मुलांची हागीमुती काढावी लागते. आजाऱ्याची सर्व सेवा शुश्रूषा करावी लागते. यादी खूप लांबविता येईल. प्र न असा आहे की ही कामे करायची कोणी? समाजातील शेवटच्या माणसाने आणि स्त्रियांनी? दरवर्षी प्रत्येक गृहस्थाने १५ दिवस तरी घरी बसून गृहिणीची सर्व कामे करावीतच. १५-२० वर्षांच्या मुलामुलींवरही ही जबाबदारी टाकावीच. संपूर्ण दिवसभराचे गृहिणीपद आणि भाजी आणणे किंवा तत्सम काम यात फरक आहे. शिवाय लक्षात ठेवा, गृहिणीला ‘निवृत्तीचा काळ’ नसतो.
या विषयावर बोलताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या एका शब्दाचे स्पष्टीकरण आणि एक घडलेला किस्सा सांगून हे कथन पुरे करतो. करिअर हा शब्द नोकरी या शब्दाला पर्यायी म्हणून वापरला जातो. प्रत्यक्षात ९५ टक्के स्त्रीपुरुष हे पोटभरू चाकरमान्येच असतात. अगदी अभियंते, अधिकारी इ. शेवटी कारकूनच. त्यात वाईट, कमीपणाचे काहीच नाही. नृत्यांगना, चित्रकार, लेखक, संशोधक असे ज्ञानाच्या मागे लागलेले, सृजनात्मक काम करणारे करियरिस्ट फारच थोडे. त्या सर्वांना स्त्री असो, पुरुष असो, समाजाने हळुवारपणाने आनंदाने, अभिमानाने सांभाळलेच पाहिजे. इतर सर्वांना तथाकथित करियरच्या नावाने निसर्गदत्त कर्तव्यापासून दूर जाण्याचा नैतिक अधिकार नाही. नुकताच घडलेला प्रसंग. माझ्या एका ओळखीच्या गृहस्थांच्या मुलासाठी चांगल्या मुली पाहणे चालले होते. त्यांना नोकरी करणारी मुलगीच हवी होती. एक स्थळ पसंत पडले होते. त्या मुलीने आपणहून फोन केला. मुलाच्या आईला तिने ठणकावले, “मी नोकरी करणारच आहे. मला मुलगाही पसंत आहे. पण माझ्याही अटी ऐकून घ्या. मग निर्णय घ्या. घाई नाही. मला घरकामाची अजिबात आवड नाही. मी घरात दर महिन्याला रु. ३५००/- देत जाईन. वाटले तर रु. ४०००/- मागा. पण बाकीचे पैसे माझे माझ्या बँकेत स्वतंत्र राहतील. मूल झाले तर पैसे वाढवीनही, पण कुठच्याही परिस्थितीत घरात इकडची काडी तिकडे करणार नाही.’ मुलाकडची मंडळी हबकूनच गेली. एका तरुण, सुशिक्षित मुलीने गृहिणीच्या कामाचे केलेले हे परखड मूल्यमापन आहे. आणि समाजाचा चालू व्यवहार पाहता वास्तव तेच आहे, कटु वाटले तरी. कितीजण घरखर्च जाऊन जी कमाई घरात शिल्लक राहते त्यातील निम्मे पैसे गृहिणीच्या नावे स्वतंत्रपणे बँकेत ठेवायला तयार होतील?
६ सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई — ४०० ०५७