‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे. ‘मी, माझं सदन आणि माझं बाहेरचं जग’ यासंबंधीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यादृष्टीने आपत्ती ही एक संधी असते. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व बाजूला पडलेल्या प्रश्नांना भिडा असंच नामदेव सुचवत होते. ‘मी कोणाचा?’, ‘मी कोणासोबत आहे?’, ‘मी जगण्याला अर्थ देत आहे का?’, ‘मी अधिकाधिक सुसंस्कृत होत आहे की नाही?’ हे ते खरे प्रश्न!
आपल्याला उपलब्ध असलेला वेळ कशात घालवायचा, याची निवड पूर्णपणे आपणच करीत असतो. त्यावरूनच ‘मी’ घडत जातो. आपण वेळेची गुंतवणूक कशात करतो? केवळ पैसा कमावण्यात? संपत्तीच्या वाढीचीच आस धरण्यातून साहित्य, संगीत व कला यांसाठी वेळच उरत नाही. सोबतीला असणारी नातीदेखील वेळेअभावी सघन वाटत नाहीत. आकाशातील रंग वा कोवळी पालवी दिसत नाही की पक्ष्यांचा आवाज ऐकू येत नाही. (आज घरात कोंडल्यावर कदाचित हे दोन्ही आनंद नव्याने मिळाले असतील.) सरतेशेवटी ‘हा सारा आटापिटा करून मी समाधानी, शांत, प्रसन्न आहे का?’ असा प्रश्नही स्वत:ला विचारण्याचं धाडस आपल्यात नाही. असे अवघड प्रश्न टाळत त्यांच्यापासून सतत पळत राहायचं. आपण ‘आनंद मिळवण्यासाठी’ जे जे करतो त्यातून तरी काही साध्य होतं का, असं स्वत:लाच खरवडलं तर केवळ पैशानं काय मिळवता येतं व काय नाही, ते लक्षात येतं. असे एकामागून एक प्रश्न पडत गेले तर ‘माझा’ खळखळाटी उथळपणा लक्षात येऊ शकतो. पैसा मिळवणं या एकमेव उद्दिष्टासाठी केलेल्या पेरणीनुसार तसंच पीक उगवलं आहे. पण मग हे ध्येय माझं झालं कसं? पैसा वगळता इतर सर्व काही क:पदार्थ ठरत गळून का गेलं? माझं ‘हे’ मनोविश्व कोणी घडवलं? याच्या त्रासदायक शोधात निघालं तर ती यात्रा ‘बाजारा’(मार्केट)पाशी येऊन थांबते. ‘माझी मूल्यं व जगणं, यश व अपयश, आनंद व दु:ख, विश्रांती व चैन सारं काही या बाजारपेठेनं ठरवलं’ असा साक्षात्कार होऊ लागतो. या ‘माया’बाजारात आपण कधी व कसे हरवून गेलो याची जाणीव होऊ लागते. एकांतात स्वत:ला मनाच्या आरशात पाहिलं तर त्यावर बाजाराच्या अनेक छटा दिसू शकतील.
काळाच्या खूपच पुढे असणाऱ्या सत्यजीत राय यांना, मूल्यं मानणाऱ्या मध्यमवर्गीय समाजाला कीड लागली आहे, हे प्रकर्षांनं जाणवलं होतं. त्यांनी १९७०च्या दशकात ‘कोलकाता त्रयी’मधून शहरांमधील बाजारू जीवनशैलीचं वास्तव उलगडून दाखवलं होतं. १९७६साली आलेल्या ‘जनअरण्य’ (इंग्रजीतील नामकरण ‘द मिडलमन- दलाल’)’ मध्ये प्रमुख भूमिका असलेल्या तरुणाची सगळीकडून कोंडी होते. मूल्यं बाजूला सारून तो ‘दलाल’ बनतो. (त्या काळात ‘दलाल’ ही संकल्पना हे अतीव दूषण मानलं जात होतं.) व्यापारात ‘कामं’ कशी मिळवावी? तर कधी ती कशी निर्माण करावी? अधिकाऱ्यांना संतुष्ट कसं करावं? हे सर्व ‘व्यवहार’ तो तरुण करू लागतो व त्यातच सरावतो. एका अधिकाऱ्याला ‘शयनसाथ देणारी स्त्री पोहोचवण्याचा’ प्रसंग येतो आणि ती त्याच्या मित्राची बहीण निघते. त्याला आर्थिक सुख लाभतं खरं, परंतु आपला मानसिक ऱ्हास छळत राहतो. राय यांना हे ‘जनांचं अरण्य’ तयार होणं खूपत होतं. त्यांना नीतिशून्य बाजाराचा ऑक्टोपस मध्यमवर्गापर्यंत पोहोचल्याचं तेव्हाच जाणवलं होतं. काही वर्षांत दलालांची सद्दी एवढी वाढत गेली की त्यांनी गल्ली ते दिल्ली.. सर्वदूर असलेल्या सत्तेच्या अनेक वर्तुळांचा ताबा मिळवला. उत्पादन वा सेवा कशातही प्रत्यक्ष सहभागी न होणाऱ्या दलालांची अफाट संपत्ती निर्माण होत गेली. समाजकारण व राजकारण, वैयक्तिक व सार्वजनिक जीवन यांत संपत्तीचं ओंगळवाणं दर्शन होऊ लागलं. त्याचा खेद-खंत कुणालाही वाटेनासा झाला. याची चाहूलही राय यांना खूप आधीच लागली होती. त्यांच्या १९९०साली आलेल्या ‘शाखा प्रशाखा’मध्ये नातू आजोबांना सांगतो, ‘मला शाळेत एबीसीडी, पाढे, रंग, खेळ शिकवतात. पण तुम्हाला सांगू, मला ना, पांढरा पैसा आणि काळा पैसासुद्धा समजतो. बाबांकडे आणि काकांकडे खूप आहे. तो कुठे ठेवतात, हे सगळं मला समजतं,’ हे ऐकताच नीतिमूल्ये पाळणाऱ्या आपल्या कुटुंबवृक्षाला आलेल्या फांद्यांना लागलेली कीड पाहून वृद्ध आजोबा हादरून जातात. राय यांनी अखेरच्या ‘आगंतुक’ चित्रपटातून सुसंस्कृत, उदार व क्षमाशीलपणा जपणारे आगंतुक झाले आहेत हे दाखवलं होतं. ‘बाजार’मय झालेल्या मध्यमवर्गीयांचा मूल्यऱ्हास पूर्ण झाल्याची खूण दाखवून सत्यजीत राय निघून गेले.
१९८०च्या दशकात मार्गारेट थॅचर व रोनाल्ड रेगन यांनी ‘बाजारपेठ ही स्वयंभू व सार्वभौम आहे, तिच्यावर सर्व काही सोपवा’ असा सिद्धांत मांडून मोकाट अर्थकारणाचा जणू जाहीरनामाच घोषित केला. ‘सरकारने कमीत कमी कामं करावी. अनुदानं व कल्याणकारी योजना बंद कराव्यात. गरीबांना स्वत:चं कल्याण करून घेता येतं, त्यांना दया दाखवून दुबळं करू नका,’ असा धोशा लावला. त्यानंतरच सार्वजनिक सेवासुविधा या आजारी पाडून मारून टाकण्यात आल्या. सर्व काही खाजगी क्षेत्रांच्या ताब्यात गेलं.
१९९०नंतर बाजारानेच नीती व मूल्यं ठरवण्याचा मक्ता घेतला. बाजाराची भाषा सर्रास घराघरांतून ऐकू येऊ लागली. पैशाला अतिरेकी महत्त्व येत गेलं. पैसा हेच मोजमाप सर्वत्र लागू होताच कमीत कमी काळांत व कमीत कमी कष्टांत अधिकाधिक पैसा हे आयुष्याचं ध्येय झालं. अमेरिकी विचारवंत प्रो. मायकेल सँडल यांनी ‘व्हॉट मनी कान्ट बाय : द मॉरल लिमिट्स ऑफ मार्केट’ (२०१२) या पुस्तकात ‘बाजारपेठ ही समाजावर तिचे खोलवर व्रण उमटवत असते. त्यातून विषमता व अन्याय होत असतोच; पण त्याशिवाय मानवी वृत्तीदेखील बाजारू होत जाते. ‘बाजार’ हे मूल्य व्यक्ती व समाज, नाती व नीती सारं काही घडवत जाते,’ असं मर्म सांगितलं आहे. मग लहानपणापासून ‘जबरदस्त संपत्ती मिळते ते उत्कृष्ट करीअर’ व ‘स्पर्धेसाठी वाटेल ते’ हीच वचनं कानी पडत गेली. हे समीकरण यच्चयावत तरुणांच्या मनामध्ये घट्ट रुतून बसलं. शिक्षण, नोकरी असो वा व्यवसाय- कोटी कोटींनी घर भरावं हेच एकमेव लक्ष्य झालं. महिन्याला पगार सहा आकडी; परंतु कामाचे तास २४! या फेऱ्यातून समाधान, शांतता मिळणार तरी कशी? ‘मी आणि माझं’ या सापळ्यात अडकलेल्यांचं कुणाशीही ‘नातं’ असत नाही. कुठलंही नातं हे आपोआप तयार होत नाही. ते तयार करण्यासाठी कष्ट पडतात. अशा नात्यांपैकी काही नाती प्रवाही व अर्थपूर्ण असल्यास त्यामुळे ‘व्यक्तिमत्त्व’ घडत जातं. त्यातून उत्तम अभिव्यक्ती होऊ शकते. बाजाराची मूल्यं स्वीकारल्यामुळे सर्वत्र ‘चेहरा’ नसलेल्या माणसांचा सुळसुळाट झाला असून, समाजशास्त्रज्ञ सध्याच्या काळाला ‘अभिव्यक्तीचा अंत’ असं संबोधन देतात.
सुमारे सहाशे वर्षांपूर्वीच कबीरांनी ‘माया महा ठगनी हम जानी’ असं सांगून ठेवलं होतं. पं. कुमार गंधर्व यांनी या निर्गुण भजनात ‘माया’ म्हणताना लावलेल्या अद्भुत स्वरातूनच अज्ञान व भ्रम प्रकट होतो. माया ही अगम्य आहे. ती लक्ष्मी, हिरा, मूर्ती, तीर्थ अशी विविध रूपे घेऊन महाठगाप्रमाणे सर्वांना फसवीत राहते. ‘ही माया दूर केली तरच सत्य व ज्ञान गवसू शकतं’ हे कबीर यांनी बजावलं होतं. हे प्रतिपादन प्रत्येकालाच ‘राजा’ वा ‘राणी’ ठरवणाऱ्या बाजाराला तंतोतंत लागू पडतं.
बाजाराच्या स्पर्धेत पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाचीच घाई सुरू झाली. संपत्तीचा पक्का माल निर्माण करण्यासाठीचा कच्चा माल म्हणजे निसर्ग अशी निसर्गओळख झाली. खनिज, पाणी, जैवसंपदा ही खरी निसर्गसंपत्ती. परंतु तिला ओरबाडून व खरवडून संपत्ती तयार करण्याची ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ स्पर्धा लागली. पाणी संपवा, वाळू संपवा, जंगलं संपवा, पर्वतं छाटा, हवा व पाणी नासवून टाका.. या राष्ट्रीय कार्यक्रमांत खेड्यांपासून राजधानीपर्यंतचे नेते, अधिकारी व त्यांचे सहकारी सहभागी झाले. या काळात मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांचं उत्पन्न पटीपटीनं वाढत गेलं व सभोवताल बकाल होत गेला. जगातील ४०० कोटी जनतेच्या एकत्रित उत्पन्नाएवढी संपत्ती जगातील केवळ ३७८ कुबेरांकडे आहे. दरवर्षी गरीब देशांतील दोन कोटी बालके दूषित पाण्यापासून होणाऱ्या रोगांमुळे दगावतात. भुकेल्यांची संख्या ८२ कोटींवर जाऊन ती कोटींनी वाढतच आहे. (करोनामुळे आज त्यात विलक्षण भर पडते आहे.) जगातील संपत्ती तुफान वेगाने वाढत आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत भराभर भर पडत आहे, तसंच शेअर्सचा इंडेक्स एक लाख झाला तरी त्या बाजाराचा आणि सार्वजनिक जीवनाचा काडीमात्र संबंध लागत नाही. भुकेल्या पोटांची आणि सुकलेल्या नरड्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली व वाढतेच आहे.
लंडनहून प्रकाशित होणाऱ्या ‘द इकॉनॉमिस्ट’नं अर्थतज्ज्ञ डॉ. मार्क कार्नी यांना सद्य:काळात विशेष लेख लिहिण्याची विनंती केली. (१७६ वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकानं लेखकांचा नामोल्लेख करण्याची प्रथा जपली आहे. विशेष लेख अतिशय दुर्मीळ प्रसंगी घेतले जातात.) १६ एप्रिलच्या अंकातील त्यांच्या ‘हाऊ द इकॉनॉमी मस्ट यिल्ड टू ह्य़ूमन व्हॅल्यूज’ या लेखात ‘करोनोत्तर जगाचं मूल्य बदलण्या’वर विशेष भर दिला आहे. त्यात कार्नी यांनी ‘बाजार’ हाच आधार असलेल्या अर्थव्यवस्थेवर घणाघात केला आहे. प्रो. सँडल यांच्या ‘बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेकडून बाजारू समाज अशी आपली वाटचाल झाली आहे’ या प्रतिपादनाचा उल्लेख करून कार्नी यांनी, ‘पुन्हा एकदा मूल्याधारित अर्थकारणाकडे जाण्याशिवाय इलाज नाही,’ असं या लेखात स्पष्ट म्हटलंय. करोनामुळे संपूर्ण जगाची उलथापालथ होताना सर्व व्यवस्थांची पारख होत आहे. नीतिमूल्यांपासून घेतलेली फारकत आपल्याला परवडलेली नाही, हेच कार्नी यातून ठसवीत आहेत. अर्थवेत्ते अॅडम स्मिथ यांनी अठराव्या शतकात भांडवलाची महती सांगितली होती; पण त्यासोबतच ‘सभ्यता व विवेक’ ही मूल्यं पैशापेक्षा नेहमीच मोठी असतात. मूल्यं, विवेक, न्याय आणि परोपकार हे विकासाचे महत्त्वाचे पैलू आहेत, हेही त्यांनी आवर्जून ठसवलं होतं. धनशक्तीने विवेकापासून फारकत घेतल्यामुळेच ही संकटांची मालिका सुरू झाली आहे.
करोनाच्या काळात संपूर्ण जगाला सर्व खर्च थांबवून आरोग्याकडे निधी वळवावा लागला आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही महामंदीच्या तडाख्यात गेली आहे. असंख्य उद्योग संपुष्टात येणार असून, त्यामुळे कोट्यवधी बेकारांचं काय करायचं? हा भयंकर प्रश्न निर्माण होणार आहे. श्रीमंतांमुळे उद्भवलेल्या करोनापत्तीमुळे गरीब व मध्यमवर्ग भरडून निघणार आहे, तर धनिकांची आणखी चंगळ होणार आहे. सुमारे तीस वर्षे बाजार आणि व्यक्तिवाद हे हातात हात घालून फोफावत गेले होते. आता दोन्हींचं कठोर विच्छेदन करणं आवश्यक आहे. अनेक विद्वान अनेकांगांनी नवीन जगासाठी उपाययोजना सुचवीत आहेत.
डॉ. अमर्त्य सेन, डॉ. जोसेफ स्टिगलिट्झ व डॉ. अभिजीत बॅनर्जी हे अर्थवेत्तेदेखील ‘विषमता या रोगामुळे बाजारी अर्थव्यवस्था अत्यवस्थ झाली. यातून बाहेर पडताना पुन्हा एकदा सर्व सरकारांना आपल्या प्राथमिक जबाबदाऱ्या पुन्हा अंगावर घ्याव्या लागतील..’ असं निदान करीत आहेत. पर्यावरणशास्त्रज्ञ ‘कर्ब-अर्थव्यवस्थेला हरिततेकडे न्यावं लागेल. यातून नवे उद्योग, सेवा व रोजगार तयार होतील,’ असं सांगत आहेत. प्रो. सँडल हे हार्वर्ड विद्यापीठात ‘न्याय’ शिकवतात, तेव्हा त्यांच्या वर्गात १२०० विद्यार्थ्यांची दाटी होते. न्यूयॉर्कमधील खुल्या मैदानातील नीतिविषयक व्याख्यान ४००० श्रोते कानांत प्राण ओतून ऐकतात. त्यांनी ‘समुदायवाद’ (कम्युनिटिरॅनिझम) हा यावरचा मार्ग सुचवला आहे. १९८०च्या दशकातच समुदायवादाची चर्चा सुरू झाली आहे. व्यक्तिवादामध्ये सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या व्यक्ती हीच केंद्रस्थानी असते. ‘समुदायाची सांस्कृतिक व आर्थिक प्रगती झाल्यास व्यक्तींची आपसूकच होते व व्यक्तींचे आपसातील संबंधही सुधारतात’ अशी समुदायवादाची मांडणी आहे.
जगभरातील सर्व माणसं स्वगृही अडकवून ठेवल्यावर नदी, समुद्र, हिमशिखरं, पक्षी, प्राणी व आकाश सगळेच मोकळे झाले. (२०१९साली तब्बल १४० कोटी लोकांनी केलेल्या पर्यटनातून जागतिक अर्थव्यवस्थेत ९.२५ लाख कोटी डॉलर्सची भर पडली होती.) चालू वर्षात लक्षावधी टन कोळसा, अब्जावधी लिटर तेल व वायू वाचल्यामुळे कर्ब-उत्सर्जनात २.५ अब्ज टनांनी घट होईल असा अंदाज आहे. मागील वर्षी गाठलेला प्रदूषणकळस व अरण्यकांडांच्या पार्श्वभूमीवर एकदा तरी असं ‘शुभ्र काही जीवघेणं’ अनुभवणं आवश्यक होतं. करोनानं अजस्र किंमत घेऊन असं काही शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षी ‘आपलं घर जळत आहे!’ असं ठणकावून सांगत जगातील लाखो मुलं ‘कर्बरहित जगाकडे’ नेण्याची मागणी करीत होती. तेव्हा त्यांची नालस्ती व उपेक्षा करणारेही अनेक होते. आता ‘सुंदर ही दुसरी दुनिया’ किंचित का होईना, प्रत्यक्ष त्यांनी पाहिली आहे. आता सभोवतालचं पर्यावरण तसंच ठेवून चालणार नाही याची जाणीव सर्वांना झाली आहे. परंतु हे नवीन जग आपोआप अस्तित्वात येणार नाही. ते घडवून आणण्यासाठी सर्वांनाच नवा विचार व नवी कृती करणं भाग आहे. करोनानं लादलेल्या एकांतवासानंतरही आपण आधीसारखेच राहिलो तर ते काही काळानुरूप असणार नाही. स्व व इतर या दोन्हींचा नव्यानं विचार केला तरच जगण्यातील ‘अर्थ’ गवसू शकेल. आरंभी उल्लेख केलेल्या अभंगात नामदेवांनी ‘संतापाचे सदन व शोकाचे पुतळे होऊन दुर्लभ आयुष्य वाया घालविणाऱ्यांना पाहताना गहिवरून येतं,’ असं म्हटलं आहे. नामदेवांचा सवाल आपण चारशे वर्षे जिवंत ठेवला आहे. आता ‘आपल्या जगण्याला काही मोल आहे काय?’ हा प्रश्न आपण आपल्यालाही मनातल्या मनात विचारावा.
पूर्वप्रकाशित – लोकसत्ता, २६ एप्रिल २०२०