२०१९च्या डिसेंबरच्या शेवटी पहिल्यांदा सापडलेल्या इवल्याशा एका विषाणूने मानवजातीच्या नाकी नऊ आणले आहेत. तो चीन देशातील वुहान प्रांतातील wet market मध्ये कसा सापडला येथपासून ते सोशल डिस्टंसिंग का आणि कसे करायचे ते आता सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे कोणाचे कोणते निर्णय चुकले आणि कोणाचे कोणते आडाखे आणि कोणती भाकीते चुकू शकतात याचीपण आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये मी खगोलशास्त्राच्या डेटाव्यतिरीक्त कॅन्सर आणि इतर वैद्यकीय डेटा याचे ज्ञानात रूपांतर करण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. साहजिकच या नव्या संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलायचा माझाही प्रयत्न सुरु झाला. या निमित्ताने विषाणूंबद्दल बरेच वाचन झाले. त्यातील काही सहजी वाचनात न येणाऱ्या बाबी येथे नमूद करतो आहे.
यजमानपेशीबाहेर असेपर्यंत सजीवतेचे प्रमुख चिह्न अर्थात प्रत्युत्पादनाची प्रणाली विषाणूंना उपलब्ध नसते, आणि पेशी नसल्यामुळे पेशीविभाजन शक्य नसते. ते केवळ एक रासायनिक पोतडी असतात. फरक एवढाच की रासायनिक अस्ताव्यस्ततेऐवजी आतमध्ये पद्धतशीर डावपेचांनी भरपूर अशी गूणसुत्रांची एक साखळी असते. एखाद्या स्फटिकाप्रमाणे हळूहळू न वाढता त्यांच्या साखळीचे भाग पेशीच्या आत जादूची कांडी फिरल्याप्रमाणे एकत्र येतात – अर्थात एका साचेबद्ध रासायनिक रूपरेषेनुसार.. बाहेर मात्र ते विषाचे अणूच असतात. विषाणू हा शब्द थेट विषापासून आला आहे. पण व्हायरस या शब्दाची व्युत्पत्ती त्यांच्या कार्यभागाशी जास्त संलग्न आहे. लॅटिन/संस्कृतमधील ‘वीर्’ या धातूपासून ती व्युत्पत्ति आहे. ‘वीरयति’ म्हणजे विभाजन करणे, मात करणे. नेमके हेच करायचे सामर्थ्य या रासायनिक पोतडीत दडले असते. हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाऱ्या नृसिंहाप्रमाणे हा ना सपेशीय ना अपेशीय, ना सजीव ना निर्जीव अशा अनेक ना या ना त्या प्रकारांमध्ये मोडणारा वीर आहे. खेदाची गोष्ट ही आहे की हिरण्यकश्यपूच्या जागी आपण आहोत.
कोणता विषाणू कोणत्या प्राण्यांना ग्रासू शकणार हे त्यांच्यातील प्रथिनांवरून ठरते. झाडांना ग्रासणाऱ्या विषाणूंचीपण तीच तऱ्हा. हो, झाडांचेही विषाणू असतात. एवढेच काय जीवाणूंचे पण विषाणू असतात. कोणत्याही विशिष्ट विषाणूचे बाह्य प्रथीन यजमानपेशीच्या आवरणाशी जुळवून घेऊ शकणार असल्यास काम फत्ते, नाहीतर ती रासायनिक पोतडी सभोवतालात विलीन होणार. कदाचित दुसरीकडे पोचलेल्या एखाद्या समपंथीय विषाणूच्या ‘अलख निरंजन’ला प्रतिसाद मिळाला असणार. कोणत्याही सजीव प्रकारांपेक्षा विषाणू जास्त आहेत, अनेक पटींनी आहेत. समुद्राच्या एका चमचाभर पाण्यातसुद्धा कोट्यवधी विषाणू असतात. त्यामुळे चुकीच्या यजमानांच्या दारी पोचलेल्या कुड्या कडमडल्या तरी बेहत्तर.
खरी गंमत सुरू होते विषाणूच्या प्रथीनाने यजमानपेशीच्या आवरणाशी सलगी केल्यानंतर! अनेक विषाणू यजमानपेशीचे आवरण फाडतात आणि त्यात स्वतःला पांघरून घेऊन पेशीत शिरकाव करतात. आत शिरलेले विषाणू त्या पेशीची आवृत्ती बनवणारी यंत्रणा लंपास करून स्वत:च्याच जैविक गुणसुत्रांच्या आवृत्त्या बनवतात. या आवृत्त्या बनवतानादेखील थोडीफार फसवणुकीची वृत्ती काही विषाणूंमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ सध्याचा नवा कोरोना विषाणू. नेहमी जेव्हा आवृत्ती बनवली जाते तेव्हा संकेतत्रिकुटे (गुणसुत्रांमधील 3-3 बेसेस) वापरून त्याचे रूपांतर अमायनो आम्लांमध्ये (ॲसिड्स) होते आणि या अमायनो आम्लांची प्रथिने बनतात. पण येथे मात्र ठरावीक ठिकाणी काही अमायनो आम्ले बनली की मध्येच एका रासायनिक साखळीद्वारे रूपांतरण करणाऱ्या रायबोसोमला घसरवल्यागत एक स्थान मागे यायला या विषाणूची गुणसूत्रे भाग पाडतात आणि नवे रूपांतर एक स्थान आधी सुरू होऊन वेगळेच प्रथीन तयार होते. असे ते नेमके का करतात हे आपल्याला अजूनही कळलेले नाही.
अमायनो आम्लांच्या छोट्या साखळ्या म्हणजे पेपटाईड्स. काही विषाणू पेपटाईड्स दळणवळणसाठी वापरतात. उदाहरणार्थ आपल्यासारखे इतर किती विषाणू आहेत हे शोधण्याकरता ते पेपटाईड्स सोडतात आणि त्यांना मिळालेल्या संकेतांवरून ते एक महत्त्वाचा निर्णय घेतात: जास्त विषाणू नसतील तर स्वत:च्या अनेक आवृत्त्या बनवून यजमानपेशीचे पोट फाडून ते बाहेर पडतात. मात्र, विषाणूंची खूप गर्दी असल्यास आपल्या गुणसुत्रांचा एक भाग पेशीच्या गुणसुत्रांमध्ये लपवतात. योग्य वेळ येईल तेंव्हा ते पुन्हा अवतीर्ण होऊन आपली कुकर्मे करायला तयार. अनेक सजीवांच्या गुणसूत्रांमध्ये अशाप्रमाणे बेमालूमपणे मिसळल्या गेलेल्या विषाणूंच्या गुणसूत्रांमुळे उत्क्रांतीच्या वैविध्याला हातभार लागला आहे.
मनुष्याच्या गुणसूत्रांमध्ये अब्जावधी बेस असतात. कोरोनाची लांबी केवळ 29 हजार बेस एवढी आहे. पोर्सीन सिर्कोव्हायरसमध्ये तर केवळ १७६८ बेसेस असतात. कोरोनाव्हायरसमध्ये जरी स्वतःची आवृत्ती बनवणारी प्रणाली नसली तरी पण कवच कसे बनवायचे, नेहमी लागणारी प्रथिने कशी बनवायची याबद्दलची माहिती अंतर्भूत असते. पण काही प्रकारचे विषाणू मात्र त्याहीपेक्षा कंजूष असतात. ते मोजकीच गुणसूत्रे बाळगतात. कवच कसे बनवायचे आणि प्रमुख प्रथिने कशी बनवायची याची गुणसूत्रे ते इतर विषाणूंपासून उसनी घेतात. म्हणजे असा एखादा विषाणू जेव्हा एखाद्या पेशीत शिरतो तेव्हा दुसरा एखादा विषाणू तिथे आहे का याचा शोध घेतो आणि असल्यास त्याच्यापासून तो ती सामग्री मिळवतो. दोन्ही प्रकारचे विषाणू सामग्रीविरहित असले तर दोघांचेही नुकसान. दोन्ही विषाणू सामग्रीसहित असले तर ठीकच आहे. पण जेव्हा एक विषाणू सामग्रीविरहीत असतो आणि दुसरा विषाणू सामग्रीसहित असतो तेंव्हा सामग्रीविरहीत असणाऱ्या विषाणूचे फावते. हे थोडेफार दुसऱ्या कैद्याच्या गुन्ह्याबद्दल माहिती द्यायची की नाही अश्या कोंडीत सापडलेल्या कैद्यांसारखे आहे.
हे इवलेसे वीर अनेक रासायनिक कसरतीदेखील करतात/करवतात. आधी म्हटल्याप्रमाणे संकेतत्रिकुटांचे रूपांतरण होऊन त्यांची अमायनो आम्ले बनतात. हे साधारणतः एका दिशेने होते पण काही विषाणू ऍंबिसेन्स असतात – ते एका दिशेने एक प्रथीन बनवतात तर दुसर्या दिशेने दुसरे. रूपांतरण थांबवणारी जी संकेतत्रिकुटे असतात ती शोधून अनेकदा विषाणूरोधक औषधे वेगवेगळ्या विषाणूंचे कार्य बंद पाडतात. तसे होऊ नये म्हणून हे ऍंबिसेन्स विषाणू एक वेगळीच क्लृप्ती लढवतात. रसायनांद्वारे एक आकड्यासारखे वळण वापरून ते आपल्या प्रथिनाचे रूपांतरण बंद करतात आणि शोधले जाण्यापासून स्वतःला वाचवतात.
या विषाणूरोधक औषधांव्यतिरिक्त विषाणूंवरचे उपाय म्हणून पेप्टाइड्स आणि लशी (व्हॅक्सिन्स) वापरल्या जाऊ शकतात. लशी उपयोगी तर नसतातच पण हानिकारक असतात असे म्हणणाऱ्यांचे कोरोना विषाणूमुळे कदाचित मतपरिवर्तन होऊ शकेल. तसे झाले तर उत्तमच. इतर अनेक व्याधी पसरणे त्यामुळे थांबू शकेल. देवस्थानांना देणग्या देण्यापेक्षा वैज्ञानिक, निदान वैद्यकीय प्रगतीला हातभार लावणे जास्त लोकांनी सुरू केले तर तेही नसे थोडके.
विषाणूंच्या लाखो प्रकारांपैकी सध्या आपल्याजवळ केवळ 75000 विषाणूंचे पूर्ण जिनॉम्स उपलब्ध आहेत. त्यांचे संख्याशास्त्रात्मक विश्लेषण करून सर्वांना लागू होतील अश्या थोड्याफार गोष्टी कदाचित करता येतील. तसे प्रयत्नही सुरू आहेत. पण अनेक विषाणूंच्या स्वतःच्या खुबी असल्यामुळे सर्वांनाच लागू पडणारे एखादे रामबाण औषध काढणे कठीण आहे. मात्र पुरेशा संशोधनातून अशी औषधे लवकर कशी बनवायची हे शोधून काढणे शक्य आहे.
अशा या विषाणूंच्या खुबी! इतरही अनेक आहेत. या कोरोनामुळे एक निर्णय आपल्या हातात मुळीच नाही – सध्या घरी बसायचे की नाही हा! पण यातून जेंव्हा केंव्हा बाहेर येऊ तेंव्हा जग कसे असेल, आपल्या जीवनशैलीत काय काय फरक करावे लागतील हे निर्णय खूप गहन आणि दूरगामी असणार आहेत. सध्या मात्र निर्णायक लढा देण्यासाठी याच्या मागे सर्वांनी हात धुऊन लागणे आवश्यक आहे.
Refrences:
- https://en.wikipedia.org/wiki/Virus
- https://en.wikipedia.org/wiki/Coronavirus
- https://en.wikipedia.org/wiki/Porcine_circovirus
- https://en.wikipedia.org/wiki/Pseudomonas_phage_phi6
- https://en.wikipedia.org/wiki/Sense_(molecular_biology)
- Mutational Analysis of the “Slippery-sequence” Component of a Coronavirus Ribosomal Frameshifting Signal, I Brierley, A Jenner and C Inglis, J. Mol. Biol., 1992, 227, 463
- Phages make a group decision, A Davidson, Nature, 2017, 541, 466
- Communication between viruses guides lysis-lysogeny decisions, Z Erez et al., Nature, 2017, 541, 488
- Prisoner’s dilemma in an RNA virus, P Turner and L Chao, Nature, 1999, 398, 441
- Expression strategies of ambisense viruses, M Nyugen, A Haenni, Virus research, 2003, 93, 141
- Full genome characterization of porcine circovirus type 3 isolates reveals the existence of two distinct groups of virus strains, R Fux et al., Virology Journal, 2018, 15, 25
- Ten Strategies of Interferon Evasion by Viruses, A Garcia-Sastre, Cell Host Microbe. 2017, 22, 176