हा देश तुमची मालमत्ता आहे
की आमच्यापेक्षा अधिक घाम-रक्त वाहवलंय तुम्ही
तुमच्या श्वासात आमच्यापेक्षा अधिक विरघळली आहे इथली हवा
तुमच्या मातीत इथला सुवास अधिक आहे
की नसांतून जरा जास्तच दौडतय इथलं पाणी
नाही ना, मग आम्ही का जावं पाकिस्तानात?
ज्यांना जायचं होतं, ते गेले निघून पाकिस्तानात
त्यांना तुमच्या पाकिस्तानची भीती वाटत होती
म्हणून त्यांनी बनवला त्यांचा त्यांचा पाकिस्तान
पण काय झालं ?
धोक्यात आहे त्यांचे अस्तित्त्व
आपल्याच पाकिस्तानात भयग्रस्त आहेत ते,
खरं तर सर्वांनाच माहित आहे
की प्रत्येक पाकिस्तानचा शेवट सारखाच असतो
म्हणून आम्ही पाकिस्तानात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तसे तर जे नाही गेले पाकिस्तानात
त्यांनाही तुम्ही पाकिस्तानीच मानलं
उभं केलं त्यांना संशयाच्या घेऱ्यात
विचारली ओळख, म्हटलं – सिद्ध करा निष्ठा
गा वंदे मातरम, म्हणा जय श्रीराम
आम्हाला मंजूर नाही हे सारं
म्हणून आम्ही नाही जाणार पाकिस्तानात
बरं हे तर सांगा की तो पाकिस्तान आहे कुठे?
कसला देश आहे ज्याचा नकाशा
कोरलाय तुमच्या हृदयात?
त्याच्या ज्या सीमारेषा आखल्या आहेत तुम्ही
त्या मी ओलांडू इच्छितो
पण मला नाही जायचं पाकिस्तानात
आम्ही पाकिस्तानात जावं
असं का वाटतं तुम्हाला?
ह्यासाठीच ना की तुम्हाला विद्रूप करायचा चेहरामोहरा ह्या देशाचा
नष्ट करायचा ह्याचा सामायिक वारसा
ह्याला बनवायचाय पाकिस्तान
ज्यांना हे घडायला नकोय
ते कशाला जातील पाकिस्तानात?
तुम्हाला माहितेय
जेव्हा पाकिस्तानला शिव्या देता तुम्ही
तेव्हा तुम्ही दिसता हुबेहूब त्याच्यासारखे
विचार करता त्याच्यासारखा
वागता त्याच्यासारखेच
त्यांच्या जिहादहून काय वेगळं आहे
तुमचं धर्मयुद्ध?
खरं तर तुम्ही तयारी चालवलीय
एक आणखी पाकिस्तान बनवायची
म्हणूनच आवश्यक आहे आमचं पाकिस्तानला न जाणं
आम्हाला माहित्येय तुमच्या आत
पाळंमुळं रुजवून बसलाय एक पाकिस्तान
पाकिस्तानहून मोठा पाकिस्तान
तुमच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
भारत आणि पाकिस्तान
तुमची इच्छा आहे पाकिस्तान नष्ट करण्याची
पण असं करताना वाढतच जातोय त्याचा आकार
अशा वेळी कोणाला जावंसं वाटेल पाकिस्तानात?
तसं तर मी कधीही जाऊ शकतो पाकिस्तानात
आणि का न जावं?
तुमच्यासारखीच नाहीत तर
आमच्यासारखी माणसंही राहतात पाकिस्तानात
जी व्यथित आहेत तुमच्यासारख्या माणसांमुळे
त्यांनाही सांगितलं जात असेल
भारतात चालते व्हा म्हणून
आणि तेही उलट विचारत असतील
आम्ही का जावं भारतात ?
(हिंदीतून अनुवादित)