१. मी!डिजिटल! होणार! नाही!
डिजिटल, नोटबंदी, क्रेडिट-डेबिट कार्ड, एटीएम
——————————————————————————
नोटबंदीच्या अव्यवस्थेतून उद्भवलेल्या त्रासाबद्दल अतिशय समर्पक व त्रोटक भाष्य!
——————————————————————————
माझी बँक तशी चांगली आहे. वीसेक वर्षे माझे खाते तिथेच फक्त आहे, आणि माणसे ओळख ठेवून सभ्यपणे वागतात. पण हे माणसांचे झाले, ज्यांच्या वर आता एटीएम-डेबिट कार्डे आणि संगणकचलित ‘सिस्टिम्स’ येऊन डोईजड होताहेत.
पहिला त्रास मात्र बँकेच्या नव्हे तर माझ्याच यंत्रावर होऊ लागला. माझ्या खात्यात काहीही व्यवहार झाला की माझ्या मोबाईलवर त्याची सूचना येऊ लागली. माझ्या मनात आले, “चला, आता पासबुक अप्टुडेट नसले तरी खात्यात किती पैसे आहेत ते कळत राहील!’’ पण मला फक्त माझेच व्यवहार न कळवता बँकेची ‘सिस्टिम’ इतरांचेही व्यवहार सांगू लागली! मी दोनदा बँकेत जाऊन हे एसेमेस दाखवले. त्यांना यात रस नव्हता. “डिलीट करा नं, काका!’’ म्हटले, “मी करेन डिलीट, पण तुमच्या ‘त्या’ गिऱ्हाईकाला संदेश जात नसतील त्याचं काय?’’ “तो बघून घेईल! नाहीतरी तो खातं-क्रमांक आपल्या इथला नाही!’’ सोबत एक गोड स्मित. एक जुन्या लेदर-बाऊंड लेजर जमान्यातला कर्मचारी मात्र मला म्हणाला, “काका, पासबुक मात्र दर दोनतीन व्यवहारानंतर अप्डेट करत जा. यांची सिस्टिम फारदा क्रॅश होते!’’
मग आली नोटबंदी. तिच्या दोनचार दिवसच आधी एटीएममधून काढलेल्या जुन्या-मोठ्या नोटा बदलाव्या लागल्या, पण तो त्रास नगण्य होता. माझ्यासारख्या निवृत्त निरीक्षकाचे तर लाईनीतल्या इतरांच्या प्रतिक्रिया ऐकण्याने प्रबोधनच झाले!
पण 6 डिसेंबर आली, डॉ.आंबेडकरांचा स्मृतिदिनही आणि बाबरी मशिदीच्या कडू आठवणींशी जोडलेला दिवसही. आणि बँकेत जायची गरज पडली. पैसे देणाऱ्याला विचारले, “कितीपर्यंत द्याल?’’ तो उत्तरला, “नुकतंच काही काढलं नसेल तर चोवीस हजारांपर्यंत देता येईल.’’ मी तेवढ्याचा ‘सेल्फ’ धनादेश लिहिला, आणि ‘सिस्टिम’ म्हणाली, “देता येणार नाही!’’
म्हटलं, “अहो, शेवटचा व्यवहार पहा. मी सोळा नव्हेंबरनंतर पैसे काढले नाही आहेत.’’ तो ओशाळला, “हो काका! पण सिस्टिम नाही म्हणते!’’ मग त्याच्या वरिष्ठाकडे जाणे, त्याने सिस्टिमला ‘ओव्हरराईड’ करणे अशी अर्ध्या तासाची सर्कस करूनच माझे पैसे मला मिळाले.
इतरही त्रास आहेत. सर्व हॉटेले डेबिट कार्ड स्वीकारतात, तर पुस्तकांची दुकाने नाकारतात! एकदा तर परगावी हॉटेलात राहावे लागले, आणि “कार्ड घेतो’’ म्हणणाऱ्यानं प्रत्यक्ष घेण्याच्या वेळी यंत्र बिघडल्याचे सांगितले. नशीब नगद नारायण रूपातले पैसे होते. नाहीतर बेइज्जतच व्हायची!
नाही. मी डिजिटल होणार नाही. भलेही अर्थक्रांतीचे ‘विद्वान’ आणि जेटली-नमोंपर्यंतचे लोक मला फाशी देऊ जातील. माझा भारतीय बँकिंगच्या सायबर सिस्टिमवर विश्वास नाही. ती निर्दोषही नाही आणि भरवशाची सुरक्षितता तर मुळीच देऊ शकत नाही. आणि मी महाराष्ट्राच्या उपराजधानीत, मुख्यमंत्र्याच्या घरापासून एका किलोमीटरवर राहतो!
२. जुने नाटक : चौथी फेरी
डिजिटल तंत्रज्ञान, राजकारणी-राजकीय संततता
——————————————————————————
काळाच्या ओघात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी अगदी नाना फडणविसांपासून आजच्या राजनीतिज्ञांच्या विचार, आचार, आणि इम्प्लिमेंटेशनच्या प्रक्रिया त्याच असल्याचे दिसून येते.
——————————————————————————
पहिल्या फेरीत नाना फडणविसांनी काही कारणाने घाशीरामाला पुण्याचा कोतवाल केले. लवकरच त्याने प्रजेचा इतका छळ सुरू केला की अखेर नानांना त्याला हाकलावे लागले, तेही ‘खास लोकाग्रहास्तव’.
पुढे मुंबईतला कम्युनिस्टांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस सरकारने एका नव्याच भूमिपुत्र गटाला ‘लिफ्ट’ दिली. लवकरच त्या गटाचा पक्ष झाला आणि कॉंग्रेससाठी तो ‘गजकर्ण’ ठरला. विजय तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक लिहिले आणि काही अत्यंत सर्जनशील लोकांनी ते ‘मंचित’ केले. शिवसेनेला ती आपली टिंगल आहे असे वाटून रणधुमाळी झाली. महाराष्ट्रात याला ‘दुसरी फेरी’ मानले जाऊ लागले.
अकाली दलाला चाप लावण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जर्नेलसिंग भिंद्रावाले या तथाकथित संताला ‘बढावा’ दिला, ज्यातून तोपर्यंत दुबळ्या असलेल्या खलिस्तान चळवळीला नवजीवन मिळाले. यातून घडलेल्या आगडोंबाने भिंद्रावाले, त्याला सुरुवातीला बळ देणाऱ्या इंदिरा गांधी आणि अनेकानेक शिखांचा बळी गेला. ही ‘तिसरी फेरी’ असल्याचे तेव्हा मराठी विचारवंतांनी सांगितले.
एकविसाव्या शतकात इंटरनेट यंत्रणा जगभरातल्या लोकांना एकमेकांशी जोडू लागली. सोबतच मोबाइल फोन हे यंत्रही झपाट्याने लोकप्रिय झाले. नवी तंत्रज्ञाने दुर्बलांना बळ देतात, हे खोटे पाडून ही दोन तंत्रज्ञाने, इंटरनेट आणि मोबाईल फोन्स, जगभरात माणसांमधली विषमता वाढवू लागली. आता सत्ताधाऱ्यांना आपल्या प्रजेवर पाळत ठेवायला ‘क्लोज्ड सर्किट टेलेव्हिजन’ उर्फ CCTV हे तंत्रज्ञान मोहवू लागले. यासाठी लाखो कॅमेरे योजले जाऊन ते एकमेकांशी व नियंत्रकाशी संपर्क ठेवायला ‘मायक्रोप्रोसेसर्स’ हे लघुसंगणक वापरू लागले. हे लघुसंगणक इंटरनेटद्वारा बोलत, ज्या यंत्रणेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ उर्फ IOT हे नाव पडले. मोबाइल फोन्सची ‘स्मार्टफोन’ ही आवृत्तीही अशा ‘थिंग्स’चा भाग बनली. खुद्द इंटरनेटच्या दृष्टीने महाजालाचा एखादा धागा मानवी आहे की ‘थिंगी’ आहे यांत फरक नसतो.
आणि याचा फायदा घेऊन काही विघ्नसंतोषी व हुशार लोक या लघुसंगणकांचा ताबा घेऊ शकतात. त्यांना काहीतरी भलत्याच सूचना देऊन त्या IOT द्वारे इंटरनेटभर पसरवू शकतात. असे करून एक महत्त्वाची इंटरनेट प्रणाली कशी बिघडवली गेली यावर नुकताच हर्ष मांगलिक यांचा एक लेख प्रकाशित झाला (Battling the Bots, इंडियन एक्स्प्रेस 13.12.16). लेखक उच्च दर्जाचे संगणकतज्ञ आहेत. म्हणजे नगण्य मानले गेलेले लघुसंगणक वापरून खरे व्यवहार विकृत केले जात आहेत. बहुधा ताज्या घटनेत एक लाख ‘तळाचे’ लघुसंगणक एका हॅकरने यंत्रदानवांत बदलले! (तळाचे, bottom आणि robot यंत्रमानव; यातून घडतात ते बॉट्स!). ही ‘चौथी फेरी’ तर नव्हे? घाशीराम-नाना नमुन्याची?
गंमत म्हणजे मांगलिकांच्या लेखाशेजारी भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी असे सांगणारा सी. राजा मोहन यांचा लेख आहे (The Challenge of Automta), सायबर रोबॉट तंत्रज्ञानाबद्दल!
6, लोटस (रामनगर चौकाशेजारी, सिमेंट रोड), 187, शिवाजीनगर, नागपूर.
आपल्या शहरात आणि महानगरात मलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी प्रणाली अतिशय खर्चिक, अशास्त्रीय व अपुरी आहे. आपल्या घरातील संडासच्या टाकीत येणारे पाणी शेकडो मैलांवरून पाईप लाईनने आणलेले असते आणि त्याला निर्जंतुक करण्यासाठी बराच खर्चही केलेला असतो. संडासातून बाहेर पडणारे पाणी ९९.९% शुद्ध असते, केवळ ०.१% मल धुण्यासाठी आपण इतक्या पाण्याची नासाडी करतो. कार्ल मार्क्सने आपल्या सुप्रसिद्ध ‘भांडवल’ ह्या १८६७ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात लिहिले आहे की “मानवी विष्ठा शेतीसाठी अतिशय मौल्यवान आहे. भांडवली अर्थव्यवस्थेत त्याची प्रचंड प्रमाणावर नासाडी करण्यात येते. उदा. लंडनमध्ये राहणाऱ्या ४५ लाख नागरिकांच्या विष्ठेचा काहीच उपयोग न करता ती सरळ थेम्स नदीत सोडण्यात येते, तीही त्यावर प्रचंड खर्च करून.” अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष टेड रूझवेल्ट ह्यांनीही १९१० साली अशाच अर्थाचे विधान केले होते. ह्या दोन्ही विचारवंतांचा हा बहुमुल्य विचार आजही जगभरातल्या साम्यवादी व भांडवलशाहीवादी देशांनी गटाराच्या पाण्यात सोडून दिलेला दिसतो.
स्रोत:– जल, थल, मल , गांधी शांती प्रतिष्ठान, 2016