लिंगबदल, तृतीयपंथी, लिंगसंवेदनशीलता
—————————————————————————–
आज एकविसाव्या शतकातही आपण तृतीयपंथींना व अस्पष्टलिंगींना स्वतंत्र ओळख देऊ शकत नाही?…. हा लेख वाचल्यावर तरी आपली लिंगसंवेदनशीलता वाढेल अशी आशा आहे.
—————————————————————————–
ज्याच्याशी तुम्ही मित्र म्हणून गप्पागोष्टी केलेल्या असतात, अगदी कालच त्याच्याकडून एका टेक्निकल टॉपिकवर मत मागितलेलं असतं, जो इतके दिवस अत्यंत सौम्य, सौजन्यशील संवाद साधणारा असतो, तो अचानक तुम्हाला आत्यंतिक रागाने लिहितो – “तुमने मेरा अपमान किया है… तू मला सर म्हणून संबोधलंस?” क्षणभर माझ्या मनात धस्संच. मी ते वाक्य “सर नाही संबोधलंस’‘ असंच वाचलं नि तीनतीनदा खात्री करून घेतली की मी सर असंच संबोधलं आहे. तरीही एक ‘सॉरी नोट’ लिहून टाकली नि उत्तरात मॅडम असे संबोधन अपेक्षित असल्याचे वाचून आपण चुकीच्याच कुणाला नाही ना मेल केलेली या आशंकेने आणखीच दचकले. इतक्यात याच व्यक्तीने एक लिंगबदलादि विषयेकरून ब्लॉग लिहिलाय त्यावर आमच्या प्रतिक्रिया मागवल्याचे नि हा काही इतका तातडीचा किंबहुना आपल्याला समजेलसा विषय नाही म्हणून साइडला टाकल्याचे स्मरलं. आता मात्र तातडीने मी ती लिंक उघडून वाचायला घेतली नि ओळीओळीतून पुढे जाताना आतल्याआत कोसळत गेले जणू…
वंशाचा दिवा, मेल्यानंतर पितरांना स्वर्ग देण्यासाठीतरी तो हवाच हवा, अशी मानसिकता जनमानसात रुजली आहे अशा देशात कुणा पारंपरिक, धार्मिक, जात्यंध इत्यादी इत्यादी विद्वानाघरी बाळ जन्मतो.गोरा-गोमटा, कुरळकुंतलाचा, दिसामासी वाढता भाषा-गणितादि शास्त्रेकरून तसेच खेळातही प्रतिभेची चुणूक दाखवणारा असा असला तर मायबापांना काय, अस्मानच ठेंगणे की. प्रशस्तीपत्रकांची रास, मित्रमैत्रिणींचा मेळा, ‘शिव्या, सिगारेट, सिनेमा’ अशा विकारांपासून दूर असा एकदम सुसंस्कारित मुलगा, वर्गात शिक्षकांचा लाडका, किती किती गुणांचे वर्णन करावे त्याच्या…बापाने त्याला बरोबरीने वागवायचे अशा पौगंडावस्थेत तो येतो नि एकाएकी काय काय व्हायला लागतं त्याला… या वयातले मुलगे कसकसली तेलं चोपडून छाती नि अंग केसाळ करण्यास उत्सुक असलेले विविध जाहिरातींतून दाखवतात.बापाचे रेझर ओठांच्या महिरपीवर फिरवून मिसरूड फुटवण्याचे प्रयोग होतात. मुद्द्यात काय, पुरुषत्वाच्या खुणा देहावर प्रकटण्यासाठी आसुसण्याच्या वयात आमच्या सर्वान्याला नेमकं तेच नकोसं झालं. आपण कसे एक सुंदर मुलगी असावे असं आतून आतून वाटायला लागलं. इतके दिवस दिवे लावलेत, यंदाच्या दिवाळीतही लावाल, पण’ती’ला विसरू नका अशा श्लेषातून मुलगी वाचवा, स्त्रीचा सन्मान करा असे संदेश पोहोचवावे लागतात अशा या देशात…
नऊ-दहा वर्षांच्या आमच्या चिरंजीवांनी स्त्रियांची मासिके नि विज्ञानाच्या पुस्तकातील पुनरुत्पादनक्रियेची माहिती वाचून आपल्या सुंदर शिक्षिकेशी मनातल्या मनात प्रणयाराधन करणे किंवा एखादी सुंदर सहाध्यायी गरोदर राहिल्याची कल्पना करणे एकवेळ सहन होण्यासारखे. पण हे? शांतं पापम्। पितृप्रधानव्यवस्थेचे पाईक असलेल्या मातापितरांनी अक्षरश: साकडेच घातले, “देवा रे, वाचीव रे याला, सोडीव रे आम्हाला या पापातून…’‘
शेजारच्या थोड्या मोठ्या मुलांचा तो क्रिकेटसाथी असला तरी त्यांच्या अड्ड्यावरच्या कामुक गप्पांत त्याचे मन रमेना. आपल्याला काहीतरी होतंय तेव्हा ते सहानुभूतिपूर्वक समजावून घेणारं कुणीतरी हवंसं या काय, कुठल्याही वयात वाटणं स्वाभाविक. कुणी साथी मिळणं इतकं अवघडही नसतं. इथे तोच गफला होता. प्रस्थापित कल्पनांत त्याला तसे होऊ देण्यास स्थानच नाही. भावनिक कोंडमारा होतोय, अभ्यासात अतिउत्तमपासून उत्तमपर्यंतची घसरण इतरांना विशेष वाटली नाही तरी त्याला ती जाणवतेय…
त्याने अस्वस्थता संपवण्यासाठी मग पालथी घातली वर्तनशास्त्राची नि मानसशास्त्राची पुस्तके. सततच्या निराशेने ग्रासलेले आणखी कुणी असतात का, त्यांना उजळून टाकणारे काही आहे काय? अपुर्या उपलब्ध माहितीच्या आधारे तो शोध घेत राहिला. धाग्यादोर्यांवरून पूर्ण केस उभी करण्याचे करण्याचे कौशल्य जे पुढे गणिती सिद्धतांच्या ‘तिच्या ‘संशोधनातून व्यक्त होतांना दिसते ते यातून निर्माण झाले असेल म्हणे. हो, ह्यापुढे जगायचे तर ‘ती’ म्हणूनच हे सर्वान्याचे एव्हाना पक्के ठरले होते…
जोगवामधल्या यमन्या-तायप्पांना कळतं की लोकांनी सुरुवातीला गैरसमजुतीतून त्यांच्यावर लिंगदोष लादलाय आणि ह्या चुकीला पुढे रेटण्यात आता समाजाचा स्वार्थ आहे. जनतेला हे मान्य असतं म्हणून यमन्या-तायप्पांचा आक्रोश चौकाततरी उभा राहू शकतो, कुणी त्यांच्यासाठी उघड अश्रु ढाळतात. सर्वान्याचा लिंगदोष नियतीने लादलेला, तो स्वीकारून ताठमानेने जगण्याचा मार्गही तिने शोधलेला. पण हे समाजाला मान्य नाही. पुढारलेपणाचे स्तोत्र गाणार्यांना हे उघडपणे अमान्यही करता येत नाही. इथून सुरू होतो एक छुपा नि म्हणूनच अवघड संघर्ष. यातून जन्म घेते एक कमालीची असुरक्षितता…
लहानपणी मला फ्रिलचे फ्रॉक, परकर-पोलके असे कपडे आवडायचे. आईने कौतुकाने एकदा बेलबॉटम पॅंट आणली तर तेव्हा नि पुढेही ‘कधी ती घालूनतरी पहा’ असा आग्रह झाला त्या प्रत्येकदा ‘नको’ म्हणून माझा केवढा आकांत होत असे! प्रत्येकाच्या आत्मसन्मानाच्या काही कल्पना असतात, त्यांना कुणीच धूप घालत नसेल अशा समाजात किती काळ कोणाला तग धरता येईल?…
मुलीसारखे वागावे, वागवून घ्यावेसे वाटते या आपल्या कल्पनेला दुजोरा सोडाच, नेहमी वेड्यात काढणेच जर होत असेल तर काय करायचे ? अभ्यासात गुंतल्याने बाहेर पहायला वेळच नको म्हणून की काय सर्वान्या पदवीसाठी गणितासारखा क्लिष्ट विषय निवडते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित याविषयांच्या उत्तमोत्तम ग्रंथांची ती अभ्यासक असतेच, संग्राहकही बनते. अशातच तिच्या हाती एक अहवाल लागतो – इंग्लिश देशात लिंगबदलून स्त्री बनलेल्यांबद्दलचा. एकोणीसशेनव्वदच्या सुरवातीला लिंगबदल वा समलिंगीसंबंध हे माध्यमांसाठी चघळण्याचे विषय होते, शास्त्रीय माहिती तेव्हा अभावानेच उपलब्ध असे. अशा काळात हा अहवाल घेऊन सर्वान्या एका मानसोपचार तज्ज्ञाला गाठते नि स्वत:ला तसे करायचे आहे असे सांगते. डॉक्टरलाही नाही झेपत हा विचार. अनुभवाला येतो पालकांसारखाच विरोध. नांव असतं वैद्यकीय समुपदेशन…
गणिती संशोधनात रमलेल्या सर्वान्याला ख्यातनाम संस्थांमधून पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश मिळणे कठीण नव्हतेच. ‘कधी काय होईल सांगता येत नाही, कदाचित दहापेक्षाही कमीच वर्षे असतील आपल्या हातात’ या काहूरातही अतिशय दर्जेदार काम होत राहतं तिच्या हातून. संशोधनछात्र बनण्याआधीच तिचे कित्येक शोधनिबंध जागतिकस्तरावर प्रसिद्ध होतात. पण लिंग नाकारल्याची व्यथा संपवण्याचे सामर्थ्य कला किंवा विज्ञानाच्या साधनेने मिळते का? आयुष्यच संपवावे की त्या वेदनेपायी असे तिला वाटत राहते …
फिनॉल पोटात गेल्याने मूत्राशयांचे काम बंद पडून होणारा मृत्यू त्यातल्यात्यात कमी वेदनादायी असतो असे एकदा तिच्या वाचनात येते. आपल्याला आहे तसे न स्वीकारणार्या जगाला टाटा करायचा म्हणून उपलब्ध फिनॉलचा प्रयोग होतो. काळ्या फिनॉलमध्ये हा गुणधर्म दाखवणार्या पदार्थाचे प्रमाण कमी असते ही माहिती नसल्याने तो फसतो. चुकून झाले अशा बतावणीला डॉक्टर पटतात, उपचार नि चौवीस तासांच्या देखरेखीनंतर घरी पाठवणी होते. पुढे लैंगिक संबंधातील अडसर नि लिंगभिन्नतेचा ताण असह्य होऊन दुसर्यांदा आत्महत्येचा प्रयत्न होतो तोही असफल. दिवा जळतही नाही न् विझतही नाही. वय वाढत चाललेले, वैद्यकीय उपचारांनी शक्य तितक्या लौकर स्त्री व्हायचेय तिला. पण…
सर्वान्याची कहाणी वाचताना ‘देवा, तू माझ्यावर अन्याय केलायस, बघ या इमले-माड्यांतून राहणार्यांवर पैशांचा किती वर्षाव केलास तू!’ असे गात भीक मागणार्यास हवेलीतला अंध सावकार मैफलीत बोलावून किती हजारांसाठी की लाखांसाठी तू तुझ्या एका डोळ्याची बोली लावायला तयार आहेस? असे विचारतो तेव्हा त्या भिकार्याला त्याच्या शरीरसंपदेचे मोल कळते तसे माझे झाले. स्पष्ट लिंगओळख हे फारच गृहीत धरलेले आपण, जगण्याचा तो आधार आहे हे कधी पोहोचलेच नव्हते माझ्या मनाच्या आतपर्यंत. ‘मुलगा की मुलगी’ यावर आखडलेल्यांच्या डोळ्यात अंजन पडावे यातून…
अंध सावकाराची काठी बनण्याचे भिकार्याने ठरवले तशी मी आज सर्वान्याची प्रवक्ता बनले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वान्याने स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या नि खडतर परिश्रमांच्या जोरावर संशोधकवर्तुळात स्थान कमावलेय. अभ्यासाशी संबंधित आमच्या कोणत्याही शंकेचे निराकरण करण्यासाठी मी तिला रात्री, पहाटे कधीही साद घालते नि पुढच्या बारा-पंधरा तासांत ती उत्तरासह हजर!खरे तर सहकार्यांचा अभिमानविषय ठरावी अशी ती मैत्रीण. कदाचित ती म्हणते त्याप्रमाणे उपेक्षेच्या, मानभंगाच्या वेदना स्त्री म्हणून आम्हीही जात्याच भोगलेल्या असल्याने असेल, तिच्याशी जोडून घेणं मला नि माझ्या सख्यांना जड नाही गेलं; किंबहुना ते आमच्या आतून आलं. पुरुष सहकार्यांबद्दलचा तिचा अनुभव मात्र वेगळा आहे. सर्वान्याला स्त्रीत्वाचे आकर्षण आहे, फारतर मला पुरुषी बांध्याची स्त्री म्हणा, ते चालेल; पण मी पुरुष नाही, असे ती सांगते. तिचे असे स्त्री बनणे हे काहींना थेर वाटतात, काहींना ‘सर्वान्याला आपण आधी ‘तो’ म्हटलं, आता ‘ती’ कसं म्हणायचं?’ हा प्रश्न पडतो. स्त्रीवादाच्या आणि मानसशास्त्राच्या अभ्यासातून तिने स्वत:ला धीट बनवलेय. स्त्रीला पुरेशा सन्मानाने वागवले जावे, मुलाबाळांचे जोखड तिच्यावर तिच्या इच्छेविरूद्ध लादले जाऊ नये, तिच्या शरीरावर तिचा अधिकार, त्याचे भांडवल न होऊ देणार, या आणि अशा प्रबोधनात्मक भूमिकांवर ती ठाम आहे. असे सारे असतानाही तीच सांगते की तिच्या देहबोलीतून आत्मविश्वास अभावानेच प्रकटतो आणि त्याची कारणं तशी सहजच उमजावीतशी…
संप्रेरके बदलण्याच्या उपचाराने सर्वान्या समाजात सहजतेने वावरू शकेलशी स्त्री बनली आहे. छाती भरदार होतेय नि नितंब घाटदार, स्नायूंचा पीळ कमी होतोय, डोक्यावरचे केस वाढलेत, शरीरावरचे गेलेत, त्वचा आणि हो, मनही कोमल होतंय तिचं. “मी अधिकाधिक सुंदर बनतेय, थोडासा मेकप, भुवयांना आकार देणं, आता जीन्सवर मुलींना शोभतील अशा कुडत्यांची आणि लागणार्या इतर वस्त्रप्रावरणांची निवड असा सगळा जामानिमा जमलाय”, असे ती खुलून सांगते तेव्हा तिच्या स्वमुग्धतेचे मला अप्रूप वाटतं. महत्त्वाचं म्हणजे या उपचारांनी तिच्यातील भावनिक आंदोलने संपली, आत्महत्येचे विचार पळाले. परवा मी एका अवॉर्डविनर मुव्हीबद्दल तिच्याशी बोलत होते. तर ती म्हणे की मी केवळ लेस्बियन मुव्हीच पाहते. ‘दुसरेही सामाजिक प्रश्न आहेत, त्यांची जाणीव नको का आपल्याला?’ या माझ्या प्रश्नावर कधी नव्हे ते मौन धारण करून ‘लेस्बियनांचे जग वेगळे आहे’ हेच का सुचवले तिने? अलिकडच्या काळात तिच्या एका गर्लफ्रेंडच्या आग्रहास्तव तिने स्वत:ची कहाणी सांगणारा ब्लॉग सुरू केला. तिच्या शास्त्रज्ञवृत्तीनुसार यासंदर्भात अनेकांना अनेकप्रकारे उपयोगी पडेल अशा माहितीचे शास्त्रीय विश्लेषण ती तिथे लिहीत असते. मी अस्पष्टलिंगींना उपयोगी पडेल असे हेतुपुरस्सर नाही म्हटले. कारण सर्वान्याचा ब्लॉग आणि तिच्याशी संवाद यातून अन्यत्र कधी मला माहीत झालेच नसते असे एक जीवनाचे दर्शन मलाही घडले आहे. माझी जीवन-जाणीव वाढवल्याबद्दल मला तिचे आभार मानायचेत…
बृहन्नडा-शिखंडींना वेगळे नव्हते केले आपण. समाजात, अवती-भवती, आपल्या सर्वाना सर्वान्या भेटतील तेव्हा त्यांच्यासाठी स्वागताचे स्मित आपल्या ओठांवर उमलेल अशी आशा करते…