दस्तावेज -गोहत्याबंदी आणि गांधीजी

गोहत्याबंदी, गांधीजी
———————————————————————————————-
गोहत्याबंदीच्या प्रश्नावर आपल्या देशात नुकतेच रण माजले होते. अजूनही हा वाद शमला नाही. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीच्या भल्यासाठी गोसंगोपन आणि गोसेवेचा आग्रह धरणारे गांधीजी धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावर गोहत्याबंदीच्या मागणीला ठाम विरोध करतात हे समजून घेऊ या त्यांच्याच शब्दांतून.
—————————————————————————-
राजेंद्रबाबूनी मला सांगितले की त्यांच्याकडे गोहत्याबंदीची मागणी करणारे सुमारे ५०,००० पोस्टकार्ड्स, २५,०००-३०,००० पत्रे व हजारो तारा येऊन पडल्या आहेत. मी तुमच्याशी ह्यापूर्वी ह्या विषयावर बोललो होतो. हा पत्र आणि तारांचा पूर कशासाठी? त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही.
मला एक तार मिळाली ज्यात सांगितले आहे की एका मित्राने ह्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे. भारतात गोहत्याबंदीसाठी कोणताही कायदा करता येणार नाही. हिंदूंमध्ये गोहत्या निषिद्ध मानली जाते ह्याबद्दल मला काही शंका नाही. मी फार पूर्वीच गोसेवेची प्रतिज्ञा केली आहे. परंतु माझा धर्म हा देशातील इतरांचा धर्म कसा बनू शकेल? त्याचा अर्थ हिंदू नसणाऱ्या भारतीयांवर जबरदस्ती करणे असा होईल.

धर्माच्या बाबतीत कोणावरही जुलूम-जबरदस्ती होणार नाही असे आम्ही कंठशोष करून सांगत आहोत. प्रार्थनेच्या वेळी आम्ही कुराणातील काही पंक्तींचे पठन करतो. पण कोणी जर माझ्यावर त्या म्हणण्याची जबरदस्ती केली, तर मला ते आवडणार नाही. एखाद्या व्यक्तीला जोवर तसे मनापासून वाटत नाही, तोपर्यंत मी कोणालाही गोहत्या न करण्यासाठी कसा बाध्य करू शकतो? भारतात फक्त हिंदूच तेव्हढे राहत नाहीत. इथे मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन व इतर धर्म समुदाय देखील राहतात.

भारत हा आता हिंदूंचा प्रदेश झाला आहे असे हिंदूंनी मानणे चुकीचे आहे. इथे राहणाऱ्या सर्वांचा हा देश आहे. समजा आपण इथे गोहत्येवर बंदी आणली आणि त्याच्या नेमके उलट पाकिस्तानात घडले, तर काय होईल? समजा त्यांनी असे म्हटले की शरियतनुसार मूर्तीपूजेला बंदी आहे, म्हणून कोणत्याही हिंदूला मंदिरात जाता येणार नाही? मला तर दगडातही देव दिसतो, पण माझ्या ह्या श्रद्धेमुळे इतरांची काय हानी होते? म्हणून माझ्या मंदिरात जाण्यावर जर बंदी घालण्यात आली, तर मी ती पाळणार नाही. म्हणून मी असे सुचवितो की ह्या तारा आणि पत्रे आता बंद केली पाहिजेत. त्यांच्यावर पैसे नासणे योग्य नाही.

त्याशिवाय काही संपन्न हिंदू स्वतः गोवधाला उत्तेजन देतात. हे खरे आहे की ते आपल्या हातांनी गोहत्या करीत नाहीत. पण गायींना ऑस्ट्रेलियातल्या कत्तलखान्यात पाठवून त्यांच्या चामड्यापासून पादत्राणे बनवली जातात, ते लोक कोण असतात? माझ्या ओळखीचा एक सनातनी वैष्णव हिंदू आहे जो आपल्या मुलांना बीफ सूप देत असे. मी त्याला त्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की गोमांस औषध म्हणून खायला काही हरकत नाही. आम्ही खरा धर्म काय आहें ह्याचा विचार करत नाही, फक्त गोहत्येला कायद्याने बंदी घातली पाहिजे म्हणून ओरडा तेव्हढा करतो. हिंदू लोक बैलांच्या खांद्यावर एव्हढे ओझे लादतात की त्यांचा जवळजवळ चुराडाच होतो. ही संथपणे केलेली गोहत्याच नव्हे काय? म्हणून मी असे सुचवीन की संविधान समितीत ह्या मुद्द्यावर फारसा आग्रह धरला जाऊ नये*…
मला असे विचारण्यात येते आहे की “मुसलमानांनी केलेले अत्याचार पाहता, कोणत्या मुसलमानांवर विश्वास ठेवावा हे ठरविणे कठीण होत आहे. (ह्या संदर्भात) भारतातील मुस्लिमांविषयी आपला काय दृष्टिकोन असावा? पाकिस्तानातल्या गैर-मुस्लिमांनी काय करावे?”
मी ह्या प्रश्नांचे उत्तर ह्यापूर्वीही दिले आहे. मी पुन्हा सांगतो की आज भारतातल्या सर्व धर्मांच्या कसोटीचा काळ आहे. येथील हिंदू, मुस्लीम , शीख व ख्रिश्चन ह्यांसारखे धार्मिक समुदाय कसे वागतात आणि भारताचा कारभार कसा चालवितात ह्याकडे आपल्याला लक्ष पुरवावे लागेल. पाकिस्तान केवळ मुसलमानांचा असेल, पण भारत सर्वांसाठी आहे. जर तुम्ही भेकडपणा सोडला आणि शूर बनला तर तुम्हाला मुसलमानांसोबत कसे वागावे हा प्रश्न पडणार नाही. पण आजही आपल्यात भेकडपणा भरला आहे. त्यासाठीचा माझा दोष मी आधीच स्वीकारला आहे.
माझी तीस वर्षांची शिकवण प्रभावहीन कशी ठरली ह्याचे मला अजूनही आश्चर्य वाटते. अहिंसा हे भेकडांचे शस्त्र बनू शकेल असे मी कसे गृहीत धरले? आताही जर आम्ही खरोखर शूर बनू शकलो आणि मुसलमानांवर प्रेम करू शकलो तर त्यांनाही थांबून विचार करावा लागेल की आपल्याशी दगाबाजी करून त्यांना काय मिळणार आहे? त्यांना आपल्या प्रेमाचे उत्तर प्रेमानेच द्यावे लागेल. आपण भारतातील कोट्यवधी मुस्लिमांना गुलाम बनवून ठेवू शकतो का? आपण जर तलवारीचा जवाब तलवारीने, काठीचा काठीने आणि लाथेचा लाथेने दिला तर पाकिस्तानात काही वेगळे घडण्याची अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. मग आपले स्वातंत्र्य गमवायला आपल्याला काहीच वेळ लागणार नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.