देवाची उपासना, आध्यात्मिक साधना व ती करत असताना होणारी अनुभूती ह्यांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध
—————————————————————–
अनादि अनंत काळापासून जगातील लाखो-करोडो लोक देवाची भक्ती करतात. देवळांत, मशिदींत किंवा चर्चमध्ये किंवा निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांत नित्यनेमाने हजेरी लावतात. तासन् तास मंत्रपठण करतात, नमाज पढतात; बाबा, बुवा, महाराजांच्या प्रवचनास जातात; पंढरीच्या वारीस जातात, भागवत कथा ऐकतात. महामानव आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यास लाखोंनी येतात. त्याचबरोबर विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, राजयोग सेंटर, योगातील ध्यानधारणा; कपालभाती, भस्रिका यांच्यासारखे प्राणायाम करतात. ओशो रजनीशांच्या आश्रमात (नंगा) नाच करतात. मग हे लाखो-करोडो लोक काय मूर्ख आहेत काय ? का ते असे करतात? या सर्व ठिकाणी त्यांना नक्कीच काहीतरी लाभ होत असावा, त्यांचे दुःख दूर होत असावे, म्हणजेच त्यांना बरे वाटत असावे. त्याशिवाय का कोणी तासन् तास, वर्षानुवर्षे या अशा गोष्टींत आपला अमूल्य वेळ वाया घालवतात? आता आधुनिक विज्ञानाने या सर्व ठिकाणी आणि या सर्व क्रियांमुळे माणसांना बरे का वाटते याचे उत्तर शोधून काढले आहे आणि ते म्हणजे, माणसाच्या मेंदूत तयार होणारे एन्डॉर्फिन (Endorphin)नावाचे अफूच्या जातीचे एक रासायनिक द्रव्य!या एन्डॉर्फिनमुळेच वरील वर्णन केलेल्या सर्व क्रियांमुळे माणसांना(पशूंनासुद्धा) बरे वाटते. हे द्रव्य अफूच्या जातीचे म्हणजेच दारू, तंबाखू अशा व्यसन लावणाऱ्या जातीचे असल्यामुळे वरील सर्व क्रिया – देवपूजा, नमाज, ध्यानधारणा इत्यादी परत-परत करत राहण्याचे व्यसनच त्या करणाऱ्या व्यक्तीला लागते आणि ती व्यक्ती ते आयुष्यभर करतच राहते. त्याशिवाय त्यांना बरेच वाटत नाही. ज्याप्रमाणे अफू, दारू, गांजा, तंबाखू यांपासून मिळणारे सुख हे तात्पुरते, आभासी आणि खोटे असते, त्याचप्रमाणे वरील सर्व क्रिया करून मिळणारा आनंद हा तात्पुरता आणि आभासी तसेच सवय लावणारा असतो. खरे तर एन्डॉर्फिन माणसांच्या आणि इतर प्राण्यांच्या मेंदूत का तयार होऊ लागले याचेही (गुगल सर्चवरून मिळालेले) वैज्ञानिक स्पष्टीकरण फार रंजक आहे.
ज्या जैवरासायनिक द्रव्यामुळे हे ‘आभासी’ सुख मळते, त्या ‘एन्डॉर्फिन’बद्दल थोडी अधिक माहिती :
मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात जेव्हा मनुष्यप्राणी वन्यजीवन जगत होता आणि उपजीविकेसाठी अनेक जंगली प्राण्यांची हत्या करत होता, तेव्हा त्याला अनेकदा तो प्राणी मारण्यासाठी मैलोन् मैल पळून त्याचा पाठलाग करावा लागत होता. तसेच एखादा वाघ-सिंहासारखा हिंस्र प्राणी त्याच्या मागे लागला, तर त्याच्यापासून जीवन वाचवण्याकरताही त्याला पळावे लागत असे. हे करत असताना त्याच्या पायात अनेकदा पेटके येत असत, त्याला काटे बोचत असत. ठेचा लागत असत, बारीकसारीक जखमा होत असत, काही हाडेही मोडत असत. यावेळी अशा वेदनांमुळे त्याचा प्रवास (पळणे) खुंटून‘शिकार’ हातची जाऊ नये म्हणून किंवा त्या हिंस्र प्राण्यांकडून आपली शिकार होऊ नये म्हणून त्याच्या या वेदनेपासून तात्पुरती का होईना, सुटका होण्याकरता मेंदूतील एखाद्या जैवरासायनिक द्रव्याची जरुरी भासू लागली. जेणेकरून जरी जखमा असल्या, हाड मोडले असले, तरी त्या दुःखाचा तात्पुरता विसर पडून त्याला पळता यावे. याकरता त्याच्या मेंदूत ‘एन्डॉर्फिन’ नावाचे अफूच्या जातीतील द्रव्य तयार होण्यास सुरुवात झाली आणि तो प्रतिकूल परिस्थितीतही खाद्य मिळवू शकला आणि आपला जीव वाचवू शकला. याकरिता ‘एन्डॉर्फिन’ त्याला मदत करू लागले आणि मानवप्राणी Survival of the Fittest या न्यायाने कोणत्याही परिस्थितीवर मात करून जगू लागला. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. या पळापळीत झालेल्या जखमा, पायात मोडलेले काटे किंवा मोडलेले हाड यांवर माणसाला नंतर (शिकार मिळाल्यानंतर किंवा हिंस्र प्राण्यांपासून जीव वाचल्यानंतर) आपल्या मुक्कामी गेल्यावर उपाय करणे जरूरीचे होते.
एन्डॉर्फिनने त्याच्या दुखण्याचा तात्पुरताच विसर पाडला होता. त्याच्या जखमा आणि मूळ दुखणे तसेच होते. यालाच आपण ’ एन्डॉर्फिन’ने फक्त ‘आभासी सुख’ मिळते असे म्हणतो. त्यातून मिळणारे सुख हे मूळ दुखण्यावर, आजारावर, मूळ प्रश्नावर कोणताच उपचार करू शकत नाही.
ध्यानधारणा, जलद श्वसनाचे प्रकार व एन्डॉर्फिन :
आता आपण वळू या ध्यानधारणा, योगाभ्यास (योगासने नव्हेत), आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना इत्यादी साधनांतून मिळणाऱ्या ‘सुखाबाबत’.त्यांतील प्रथम क्रिया – जलद आणि दीर्घ श्वसन. निरनिराळ्या प्रकारचे प्राणायाम यात येतात. उदाहरणार्थ, भस्रिका, कपालभाती, सुदर्शन क्रिया, ओंकार, जोरात मंत्रपठण, नामस्मरण, इत्यादी क्रिया. या क्रियांना शास्त्रीय भाषेत ‘हायपरव्हेंटिलेशन’ म्हणतात. (Hyperventilation – जोरजोरात श्वास घेणे.)
आदिमानव जेव्हा शिकारीच्या मागे किंवा हिंस्र प्राण्यांपासून जीव वाचवण्याकरिता पळत असे, तेव्हाही त्याला धाप लागून तो ‘हायपरव्हेंटिलेशन’ करत असे.
अशा प्रकारे श्वास घेण्यामुळे शरीरात काय-काय क्रिया घडतात हे पाहू या. (१) रक्तातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. (२) त्यामुळे रक्तातील अल्कलीचे प्रमाण वाढते.
या सर्वांचा परिणाम म्हणून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. त्याचप्रमाणे रक्तातील कॅल्शियमही कमी होते. रक्तातील कार्बन डायऑक्साईड कमी झाल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनमध्येच अडकून पडतो आणि तो पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मेंदूला आणि इतर अवयवांना ऑक्सिजन आणि इतर द्रव्यांचा पुरवठा कमी होतो, हातापायांना मुंग्या येतात, मेंदू हलका बधिर होऊन घेरी आल्यासारखे वाटते. चक्कर येते. डोळे दुखणे, छाती दुखणे, उगाचच हसणे अशा गोष्टी होतात आणि शेवटी मूर्च्छा यायला लागते आणि मूर्च्छा आल्यावर आपोआप श्वास ठिकाणावर येतो व माणूस पूर्वस्थितीत येतो.
अशा प्रकारच्या जलद श्वसनामुळे शरीरास व मेंदूस अधिक रक्तपुरवठा होतो आणि प्राणायामामुळे मेंदू तल्लख होतो हा गैरसमज आहे. परिस्थिती नेमकी याच्या उलट असते.
मेंदूला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे, खूप पळाल्यानंतर जशी स्थिती होते तशी बिकट परिस्थिती, संकट किंवा स्ट्रेस (Stress)शरीरात निर्माण होतो आणि त्याला प्रतिसाद म्हणून मेंदूतील पिट्युटरी (Pitutary)ग्रंथीत साठून ठेवलेले एन्डॉर्फिन मुक्त होऊन त्या व्यक्तीस बरे वाटते, आनंद मिळतो.
याचा सरळ अर्थ असा, की कपालभाती, भस्रिका, सुदर्शन क्रिया यांसारखे प्राणायाम करून आधी मेंदूतील रक्तपुरवठा कमी करून ‘कृत्रिम संकट’, स्ट्रेस निर्माण करायचे आणि या संकटामुळे मेंदूत निर्माण झालेल्या एन्डार्फिनमुळे मिळणारा तात्पुरता स्वर्गीय आनंद अनुभवायचा!आणि असा आभासी आनंद परत-परत मिळण्याकरता या क्रिया आयुष्यभर रोज करत राहायच्या. यापेक्षा त्या न केलेल्या बऱ्या!
हीच गोष्ट मेंदूला थकवणाऱ्या, दमछाक करणाऱ्या विपश्यना, सिद्ध समाधी योग, राजयोग आणि इतर ध्यानधारणांचीही असते. या क्रियांमध्येसुद्धा मेंदूतील एका ठरावीक भागाचा रक्तपुरवठा कमी होतो, हे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. रक्तपुरवठा असा कमी झाल्यामुळे डोळ्यांपुढे निरनिराळी दृश्ये दिसणे, कानांत निरनिराळे आवाज ऐकू येणे, कोणीतरी ‘ईश्वर’ आपल्या पाठीशी उभा आहे व त्याचा स्पर्श आपल्याला होत आहे, आपण विश्वाशी-ईश्वराशी एकरूप झालो आहोतअसे भास होऊ लागतात आणि वर सांगितल्याप्रमाणेच मेंदूस रक्त कमी होण्याचे संकट निर्माण झाल्यामुळे, एन्डॉर्फिन मुक्त होऊन या सर्व क्रियांमुळे (ध्यानधारणेमुळे) तात्पुरत्या, आभासी स्वर्गसुखाचा आनंद मिळतो.
आज असे अनुभव ध्यान, मेडिटेशन न करता प्रयोगशाळेत निरनिराळ्या तारा (वायर्स) जोडलेल्या हेल्मेट घालून त्यातून विजेचे प्रवाह सोडूनही अनुभवता येतात.
(महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री. मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी लिहिलेले ‘मला बरे का वाटते’ हे पुस्तक वाचकांनी अवश्य वाचावे.)
खरे तर मी या सर्व गोष्टींचा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्या-त्या गोष्टी करत असताना मला ‘स्वर्गीय’ सुख मिळाले आहे. लहानपणी देवपूजेत, रामरक्षा म्हणताना आणि वसतिगृहातील गांधीप्रार्थना म्हणताना मी तल्लीन होऊन जात असे. विपश्यनेमध्ये नवव्या दिवशी समाधि-अवस्थेत जाऊन मी बुद्ध झालो होतो. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पाच दिवसांच्या शिबिरात मी माझ्या तरुण गुरुजींपुढे साष्टांग नमस्कार घातला होता. तीच माझी परिस्थिती आठ दिवसांच्या योगशिबिरात राजयोग सेंटरमध्ये आणि रेकीचे शिबिर करत असताना झाली होती. थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती मी स्वाध्यायाच्या पांडुरंग शास्त्रींच्या, पूर्णवादाच्या पारनेरकर महाराजांच्या आणि योगगुरु रामदेवबाबांच्या प्रवचनास जाऊन आल्यानंतरझाली होती. या सर्व गोष्टी, त्यात सांगितलेल्या क्रिया अशा शिबिरातून किंवा प्रवचनातून परत आल्यावर मी अनेक दिवस सुरूच ठेवत होतो. पण माझ्यातील जागृत विवेकबुद्धीमुळे अशा गोष्टींपासून मिळणारे सुख हे क्षणभंगुर, आभासी आहे हे थोड्याच दिवसांत माझ्या लक्षात येत असे आणि त्यानंतर मी अशा पंथांच्या, बाबा-महाराजांच्या आणि त्या क्रियेतून माझ्या मेंदूत तयार होणाऱ्या एन्डॉर्फिन नावाच्या अफूच्यागोळीच्या आहारी न जाता आयुष्यभर व्यसनाधीन धर्मवेडा होण्यापासून वाचलो आहे. मी कोणत्याही बाबा, बुवा किंवा पंथाचा शिष्य नाही. मात्र, योगशिबिरात शिकवलेली सर्व आसने (त्यात माझ्या पाठदुखी, गुडघेदुखी, सर्व्हायकल स्पाँडिलायसिसच्या आर्थोपेडिक सर्जन्स आणि फिजिओथेरपिस्टने सुचवलेले सर्व व्यायामप्रकार यांच्यासह) गेली पन्नास वर्षे नियमित करतो आहे. माझ्या व्यायामप्रकारांत नमाजपठणाचीही क्रिया व्यायाम म्हणून असते, पण प्राणायामातील भस्रिका, कपालभाती, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुदर्शन क्रिया असे दमणूक करून एन्डॉर्फिन निर्माण करणारे कोणतेही प्रकार मी करत नाही.
यांतील अनेक ‘साधना’ मी स्वतः अत्यंत ‘मनोभावे’ आणि प्रामाणिकपणे केल्या आहेत आणि माझ्या स्वानुभवानंतरच या सर्व साधनांतून मिळणारे ’स्वर्गीय सुख’ हे तात्कालिक आणि ’आभासी’ आहे हे मला पटले आहे.
मी मुंबई येथील योगविद्याधाम येथील सात दिवसांचे शिबिर, इगतपुरी येथील दहा दिवसांचे विपश्यना शिबिर, जैनांचे प्रेक्षाध्यान शिबिर, दोंडाईचा आणि अबू येथील ब्रह्माकुमारी यांचे राजयोग शिबिर, आर्ट ऑफ लिव्हिंग, रेकीचे प्राथमिक शिबिर अशी अनेक छोटी-मोठी शिबिरे केली आहेत. त्याचबरोबर वैकल्पिक वैद्यकीय विज्ञानशास्त्राच्या (World Congress of Alternative Medicine) दोन जागतिक परिषदांत सहभाग घेतला होता. त्यात रेकी, अॅक्युपंक्चर, सायको थेरपी (सायको सर्जरी), अॅरोमा थेरपी वगैरे अनेक गोष्टीत भाग घेतला होता.
विपश्यनेच्या दहा दिवसांच्या शिबिरात सहाव्या दिवशी मी रात्री हवेत चालत होतो. नवव्या दिवशी तर पहाटे साडेचार वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत तीन तास ’समाधी’त गेलो होतो आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर ’मी बुद्ध झालो’, मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे असे वाटले. यापुढे टोणगावकर हॉस्पिटल व त्यात होणाऱ्या शस्त्रक्रिया बंद करून ’धम्मचिकित्सालय’ काढावे, श्री. गोएंका गुरुजींच्या हस्ते त्याचे उद्घाटन करावे आणि यापुढे सर्व रोगांवर ’विपश्यनेचाच’ उपचार करावा असे ठरवून त्याच तंद्रीत इगतपुरीहून बाहेर पडलो होतो. पण येता-येता नाशिकला डॉ.सुळे या मानसोपचारतज्ज्ञाचा (सायकिअॅट्रिस्ट) सल्ला घेतला असता त्यांनी सांगितले, ‘’यापुढे घरी जाऊन ’विपश्यना’ करण्याचा धोका पत्करू नका. ते तुमच्या दृष्टीने आगीशी खेळण्यासारखे होईल. धम्मचिकित्सालय काढून टोणगावकर हॉस्पिटल बंद करणे म्हणजे शुद्ध वेडेपणाच होईल. तुम्ही स्वतःचे, तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या पंचक्रोशीतल्या जनतेचे अपरिमित नुकसान कराल.’’ त्यांनी विपश्यनेनंतर ठार वेडे झालेल्यांची अनेक उदाहरणे मला दिली.
अशा प्रकारे अशा सर्व प्रकारांतून मिळणाऱ्या ’आभासी’ सुखांचा मी स्वानुभव घेऊनच माझी आजची मते तयार केली आहेत. आज जरी या सर्वांनी शिकवलेली सर्व योगासने मी रोज करत असलो, तरी कोणत्याही प्रकारचा अतिरेकी प्राणायाम, कपालभाती, भस्रिका, सुदर्शन क्रिया किंवा अन्य कोणत्याही प्रकारची ’ध्यानधारणा’, प्रेक्षाध्यान, विपश्यना, राजयोग, रेकी यांपैकी मीकाहीही करत नाही.
ईमेल: rrtongaonkar@gmail.com
***
“मी मुस्लिम आहे आणि पॅरिस, सॅन बर्नार्दिनो किंवा जगात कोठेही, निरपराध माणसांना मारणे ह्यात काहीही इस्लामी नाही. खरे मुसलमान जाणतात की तथाकथित इस्लामी जिहादी करीत असलेली निर्घृण हिंसा मुस्लिम धर्माच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.
इस्लामचे नाव घेऊन आपला व्यक्तिगत अजेंडा राबवू पाहणाऱ्यांच्या विरोधात आम्ही मुसलमानांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी अनेक लोकांना इस्लामची तत्त्वे जाणून घेण्यापासून परावृत्त केले आहे. कोणावरही जबरदस्तीने इस्लाम लादणे वा तसा प्रयत्न करणे आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे हे खऱ्या मुसलमानांना माहीत आहे व असायला हवे.
राजकीयदृष्ट्या योग्य तेच बोलण्याचा ज्याच्यावर कधीही आरोप झाला नाही अशा व्यक्तीप्रमाणे बोलायचे झाले तर मी म्हणेन की आपल्या राजकीय नेत्यांनी, त्यांच्या स्थानाचा उपयोग करून इस्लाम धर्माच्या तत्त्वांबाबत सर्वाना जाणीव करून द्यावी आणि हे स्पष्ट करावे की ह्या वाट चुकलेल्या खुन्यांनी इस्लाम खरोखर काय आहे याबाबत लोकांचा दृष्टिकोन कलुषित केला आहे.”
-मुष्टीयोद्धा मोहम्मद अली