धर्म आणि विवेकवाद ह्यातील नाते हा बहुधा ह्या शतकातील कळीचा मुद्दा असणार आहे. भारतातच नव्हे तर जगभरात धार्मिक मूलतत्त्ववाद दहशत-वादाच्यारूपाने डोके वर काढताना दिसत आहे. झेंड्यांच्या ह्या लढाईत कोणत्याही धर्माचेप्राणतत्त्वअसणारी मूल्ये मात्र सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसतात. भारतात दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी ह्यांच्या झालेल्या हत्या, बांगलादेशमध्ये निरीश्वरवादी ब्लॉग लेखकांचे नेमाने पडणारे खून, मध्यपूर्वेत आयसीसने घातलेले थैमान व अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनीइस्लामच्यानावानेतोडलेले तारे ह्या सर्व बाबी पराकोटीच्या धार्मिक असहिष्णुतेच्या निदर्शक आहेत. दुर्दैवाने‘रंगांधळ्या’ मंडळीना फक्त अन्य धर्माच्या व्यक्तींनी घातलेला हैदोस तेव्हढा दिसतो व ‘आम्ही आहोतच सहिष्णु, ह्याहून मऊपणे वागलो तर ‘ते’ आमच्या डोक्यावर बसतील’ असे युक्तिवाद मांडताना त्यांची सदसद्विवेकबुद्धी आड येत नाही, हे चित्रही सर्वत्र दिसते आहे.
पण ह्या काळोख्या भासणाऱ्या परिस्थितीला दुर्लक्षित रुपेरी किनारही आहे. ती आहे धर्माच्या व्यापक, मुक्त व रचनात्मक पैलूची. आज जगभर सुरू असणारा संघर्ष मूठभर निरीश्वरवादी व धार्मिक रूढिवादी असा नाही. मुळात तो वेगवेगळ्या धर्मांत सुरू असणाऱ्या वैचारिक संघर्षाचा वैश्विक आविष्कार आहे. गेली काही दशके इस्लाममध्ये अरबस्थानातील मूलतत्त्ववाद व अन्य देशातील इस्लामचे खुले स्वरूप ह्यात रणकंदन सुरू आहे. सीरिया, तुर्कस्थान, अफगाणिस्थान ह्या देशांत स्त्रिया आताआतापर्यंत मोकळेपणाने वावरत असत. आता मूलतत्त्ववाद्यांच्या आक्रमकतेमुळे त्यांच्या हालचालीवर, शिक्षण घेण्यावर बंधने आली आहेत. भारतातही अनेक प्रांतांत व जाती-जमातींमध्ये हिजाबची प्रथा आतापर्यंत नव्हती, ती तब्लीगसारख्या संघटनांच्या दबावामुळे वेगाने पसरली आहे. असे असले तरी इंडोनेशिया, मलेशिया व इतर मुस्लिमबहुल देशात इस्लामचे स्थानिक व मोकळे रूप सनातन्यांशी नेटाने झुंजतेआहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. ख्रिस्ती धर्मात तरविद्यमान पोप फ्रान्सिस द्वितीय ह्यांनी रोमन कॅथॉलिक चर्चच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्या दिवसापासून ह्या लढाईचे रणशिंगच फुंकले आहे.गेल्या काही महिन्यांतील त्यांची वक्तव्ये पहिली तर हा माणूस चर्चचे पारंपरिक, कालविन्मुख स्वरूप नष्ट करून धर्माला एक नवा चेहरामोहरा देण्यासाठी कटिबद्ध झाला आहे असे लक्षात येते. त्यांनी चर्चने आतापर्यंत केलेल्या अनेकदुष्कृत्यांबद्दल संबंधितांची जाहीर माफी मागितली(उदा. आदिवासींचा संहार). काही धर्मोपदेशकानी बालकांवर केलेल्या लैंगिक अत्याचारासारखा नाजूक प्रश्न असो की युरोपातील निर्वासितांना आश्रय देण्याचा राजकीय सवाल असो, पोपनी त्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका ही मानवतेला व ख्रिस्ती धर्माला अभिप्रेत असलेली करुणा व सच्चेपणा ह्यांच्याशी सुसंगत होती.अलीकडच्या काळात त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेखोरीविरुद्ध, पहिल्या जगाने चालवलेल्या पर्यावरणनाशाविरुद्ध इतकी ठाम व सुस्पष्ट भूमिका घेतली की आपण अवाक् होतो. डोनाल्डट्रम्पसारखे राजकीय नेते इतके बहकल्यासारखे का वागू लागले आहेत, ह्या प्रश्नाचे उत्तर पोपच्या कार्यामुळे अशा मंडळीना वाटणाऱ्या असुरक्षिततेत दडले आहे.
ह्या अंकात आम्ही ह्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डाव्या चळवळीत सुरू असणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयावरील वादविवादाकडे आमच्या वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डाव्या चळवळीत धर्माला स्थान असावे का? ख्रिश्चनधर्मातीलपोप फ्रान्सिससारख्या नेत्यांमुळे अवरुद्ध अवस्थेतील भांडवलशाहीविरोधी लढ्याला ऊर्जा व अवकाश प्राप्त होऊ शकेल का?’ ह्या प्रश्नांवरील वाद-प्रतिवाद आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत. वैश्विक राजकारणातील अमेरिकेचे आजचे स्थान व सर्वच धर्मांत सुरू असलेली घुसळण लक्षात घेता ह्या चर्चेचे महत्त्व व प्रासंगिकता आपल्या ध्यानात येईल. त्याचबरोबर श्रीमंती नेमकी कशाने येते व भारतीय लोक तंत्रज्ञानात मागे का आहेत, अशा मूलभूत प्रश्नांचा वेध घेणाऱ्या दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखाचा पूर्वार्ध या अंकात प्रकाशित करत आहोत. नंदा खरे ‘मराठ्यांचा अस्मितादर्शी इतिहास’ ह्या त्यांच्या आवडीच्या विषयावरील एका महत्त्वाच्या पुस्तकाचा परिचय त्यांच्या खास शैलीत करूनदेत आहेत. ह्या दोन्ही लेखांवर ‘आ.सु.’च्या परंपरेला साजेशी चर्चा अपेक्षित आहे. त्याशिवाय मागच्या अंकापासून सुरू केलेली सदरे- चित्रपट परीक्षण, अनुभव, कविता आहेतच. त्याशिवाय‘दस्तावेज’ नावाचे एक नवे सदरही सुरू करीत आहोत.
डिसेंबर २०१५च्या अंकाविषयीमिळालेल्या प्रतिक्रियांनी आमचा उत्साह खचितच वाढला आहे. ‘आजचा सुधारक’चे विवेकवादी विचारपीठहे’स्व’रूप अबाधित ठेवून तो तरुण व अर्ध-नागरी वाचकसमुदायापर्यंत नेण्याची आमची आकांक्षा आहे, हे आम्हीमागच्या अंकात नमूद केले आहे. त्याशिवायअनेक महत्त्वाच्या व माध्यमांकडून दुर्लक्षित (राहिलेल्या/केल्या गेलेल्या) विषयांवर व्यापक व सखोल चर्चा घडवून आणण्याचाही आमचा प्रयत्न राहील. त्यासाठीवाचक व संपादकह्यांच्यातउत्तमसंवाद होणे आवश्यक आहे.
कृपया editor.sudharak@gmail.com वर मेल पाठवून कळवा किंवा अंकात दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवा.
‘आ. सु.’ला आपल्या भक्कम पाठबळाची गरज आहे. वर्गणीविषयक सविस्तर निवेदन अंकात देत आहोत. कृपया आपली वार्षिक वर्गणी लौकर भरावी.
२०१५ साल बरेच अंधारलेले होते. नव्या वर्षी फटफटायला लागेल, अशी आशा आपण करू या.