दारू, बालके
सध्याच्या जिव्हाळ्याच्या व वादग्रस्त प्रश्नाची एक दुर्लक्षित बाजू …
—————————————————————————
चंदगडला आता प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या वर्गमित्राकडे गेलो होतो. तो जिथे राहतो, त्याच्यासमोरच मांगवाड्याची वस्ती सुरू होते. छान जेवून मित्राच्या दिवाणखान्यात गप्पा ठोकत बसलो होतो. तेवढ्यात समोरच्या झोपडीवजा घरातून कलकलाट ऐकू आला. शिवीगाळ, काहीतरी फेकून मारल्याचे, ठो-ठो बोंबलण्याचे, रडण्याचे आवाज. कुतूहलाने काय होते आहे हे बघण्याच्या उद्देशाने मी खुर्चीतून उठताना बघून हातानेच मला बसण्याचा त्याने इशारा केला. मग अत्यंत निर्लेप आवाजात तो मला सांगू लागला, “समोर एक मांगाचं कुटुंब आहे. सत्तर-ऐंशी वर्षांची म्हातारी, तिचा नवरा, मुलगा, सून आणि दोन सात-आठ वर्षांची नातवंडं, सगळं कुटुंब सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत दारूत तर्र असतं. मग अशी भांडणं, शिवीगाळ, मारामारी चालूच असते. अनेक वेळा आम्ही पोलिसात तक्रार केलीय; पण यांच्यात काही फरक पडत नाही. आम्ही कंटोळलोय, पण आता सवय झालीय.”
“ती दोन नांतवंडंसुद्धा पितात?” माझा व्यथित प्रश्न.
“दाबून! बऱ्याच वेळा ही मुलंच दारू आणायला जातात.” मित्राचं सहज कोरडं उत्तर.
“त्यांच्या शिक्षणाचं – “ माझा आणखी एक बाळबोध समजेचा प्रश्न.
मित्र माझ्याकडे टक लावून पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटतात. म्हणतो, “बरं झालं ना! तेवढ्याच दोन राखीव जागा कमी झाल्या.” मला त्याचा हा विनोद फारच क्रूर वाटतो.
काही वेळा माझ्याकडं लेखक, कवी, पत्रकार वगैरे मित्र येतात. त्यांच्या ‘सोशल ड्रिंक’साठी कधीमधी गावातल्या बारमध्ये जावे लागते. तिथे गणेश नावाचा एक 10 वर्षांचा मुलगा वेटर म्हणून काम करायचा.
माझ्या गप्पीष्टपणामुळे चांगलाच मित्र झालेला. एकदा माझ्या चार वर्षांच्या कन्येला सोबत घेऊन गेलो. तर गणेश तिच्यावर एवढा खुश. बारमधले खाण्याचे पदार्थ त्याने तिच्यासमोर ठेवलेच, पण बाहेर जाऊन किराणा दुकानातून खास ‘कॅडबरी’ही तिच्यासाठी आणली. निघताना त्याने हळूच माझा शर्ट ओढला. मला बाजूला बोलवू लागला. मला, मी ज्या संस्कृतीत वाढलोय, त्यानुसार वाटलं की याला काहीतरी पैशाची गरज असावी.
“सर, एक सांगू का?” तो दबकतच.
“बोल ना, काय हवंय?” माझा आश्वासक स्वर.
“नाही. परत दीदीला असल्या ठिकाणी आणत जाऊ नका.” त्याचं खालमानेनं उत्तर.
मूल्यशिक्षणाला जागेची आणि वयाची अट नसावीच.
एका पत्रकार मित्राच्या घरी गेलो होतो. दिवाणखान्यातच त्याची पावणेदोन वर्षांची बछडी खेळत होती. समोरच्या बशीत काकडीच्या फोडी, बिसलेरी पाण्यानं भरलेली बाटली आणि एक स्टीलचा पेला. ती थोडंसं पाणी त्या पेल्यात ओतायची. तोंडाला लावायची. मग बशीतली एक फोड तोंडात टाकायची. मी विचारलं, “”काय करतेयस बेटा?”
“”पेग खेळतेय.” तिचं बोबडं पण माझी बोबडी वळवणारं उत्तर.
सरकारनं धान्यापासून दारू काढायला परवानगी द्यायचं ठरवलंय. दारू ही भूक आहे, की संस्कृती, असा प्रश्न मला आता वाळवीसारखा पोखरू लागलाय.