डिसेंबर १९९९ आ. सु.च्या अंकात मित्रवर्य डॉ. भाऊ लोखंडे यांचा ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. लेखावरील प्रतिक्रिया वाचनात आल्या. लेखकाच्या हेतूविषयी त्यांत चर्चा आहे. पण ऋग्वेदकाली ब्राह्मण गोमांस खात नसत असे विधान या प्रतिक्रियावाद्यांनी केलेले नाही. याचा अर्थ असा की भाऊंचा पूर्वपक्ष त्यांना मान्य असावा. उत्तरपक्ष करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन केले नसावे. डॉ. लोखंडे ह्यांनी संशोधनात्मक लेखात ऋग्वेद ते भवभूती (सातवे शतक) या कालखंडील मांसभक्षणाचा पुरस्कार करणारी वचने दिलेली आहेत. सोमेश्वराच्या मानसोल्लास (१२ वे शतक) या संस्कृत ग्रंथात महाराष्ट्रात प्रचारात असणा-या मांसभोजनात डुकराच्या मांसापासून किती प्रकारचे पदार्थ बनतात त्याची पाकक्रिया सांगितली आहे (तिसरा उल्लास) या अशा लेखामुळे कर्मठांचा दुर्वास होऊ शकतो. के. रा. जोशी ह्यांनी आपला रोष प्रगट केला आहेच. अशा त-हेचे सत्य मांडून आपण त्या पूर्वस्थितीला समाजाला नेऊ इच्छिणे योग्य होईल काय?’ (फेब्रु. २०००) अशी समज ते देतात. के. रां. च्या या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की, पांचालीचे बहुपतिव्रत, विचित्रवीर्याच्या भार्यांचे नियोग, पुत्रप्राप्तीसाठी प्रजननक्षमता नसणाच्या राजांना ऋषींपासून होणारी नियोग-संतती, स्त्रियांच्या स्वच्छंदी जीवनाचे महाभारतातील उल्लेख लक्षात घेता महाभारत केराच्या टोपलीत टाकायचे काय? तसाच जर विचार केला तर अॅमिबापासून उत्क्रांती होत हत्ती झाला. या डार्विनच्या ‘शोधाचा कोणता उपयोग आहे? कुमारसंभवातील शंकर-पार्वतीच्या रतिक्रीडेची कामुक वर्णने तरुण-तरुणींच्या वर्गात संस्कृतच्या प्राध्यापकांनी का शिकवावीत? काव्यप्रकाशात अपह्नुती अलंकार सांगण्यासाठी त्या अश्लील श्लोकाच्या (अमुष्मिन् लावण्यामृतसरसि) ऐवजी मम्मटाला तिसरे उदाहरण का सापडले नाही? इतिहास फक्त सत्यान्वेषण करतो. समाजाची नैतिक मूल्ये बदलावीत वा प्राचीन आदर्श मानवाने स्वीकारावे असे आदेश इतिहास देत नसतो. निजामाबरोबर बाजीराव मांसभक्षण करीत असे आणि त्याने मस्तानीचे प्रणयाराधन केले हे तरी सरदेसाई का सांगतात? के. रा. जोशींचा पक्ष इतिहासाची उपेक्षा करणारा आहे. ज्ञानवंत हा अप्रिय विधानाचे संदर्भात तटस्थ राहू शकत नसेल तर तो ज्ञानाच्या क्षेत्रात आतंकवादी असतो. सत्यान्वेषणाच्या बाबतीत हे आतंकवादी जल्लादाची भूमिका घेतात. के. रा. जोशींसारख्या विद्वानाला इतिहासाध्ययनाध्यापनाचे ध्येय कळले नाही असे म्हणायचे का? आणि कर्मठांचे हे सांस्कृतिक आक्रमण अन्यायी आहे, हे सर्वहारा समाजाने सांगितले तर बिघडले कोठे?
गायीचे पावित्र्य
भाजीपाला, अन्यधान्ये पोट भरण्यासाठी उपलब्ध असतील तर गायच काय पण कोणत्याच पशुपक्ष्याची हत्या करू नये असे आमचे मत आहे. गाय ही पवित्र आणि गाढव अपवित्र का? बंगालात लक्ष्मीचे वाहन गर्दभ आहे. गाय आणि कुत्रा ह्यांच्या आहारात फरक नाही. कुत्रा अपवित्र का? गाय हा उपयुक्त पशू आहे. पण तिला पवित्र का मानायचे? याचे उत्तर नाही. विशेषतः ऋग्वेदात गाय पवित्र आहे या अर्थाचे एकही सूक्त नाही. कृष्णमृग हा पवित्र असू शकतो. कारण तो यज्ञाचे दृश्य स्वरूप होता (शतपथ, ६-४-१-६). कृष्णमृगाजिनामुळे ब्राह्मत्वाची ओळख होत असे (तैत्तिरीय संहिता, ५,४,४,४). ऋग्वेदातील सूक्तातून काळविटाच्या मांसाचा हवि यज्ञात दिल्याचा उल्लेख नाही. ऋग्वेदात अज (बोकड) वी (मेंढी) गाई, बैल, घोडे, यांच्या मांसांच्या आहुती दिल्याचे अनेक संदर्भ आहेत. अज हा पर पूषा नावाच्या देवतेचे वाहन होता.
ऋग्वेदातील ब्राह्मण
ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या मथळ्याने कर्मठ उद्विग्न होऊ शकतात. गोरक्षणसंस्थांच्या सदस्यांना हा ऐतिहासिक शोध अप्रिय असाच आहे. आंग्लाळलेल्या ब्राह्मणपरिवारात जिव्हालौल्यासाठी मांसाहार प्रिय असतो. गोमांसभक्षण उघडपणे होत नाही. पण मांसाहार करणारे गोमांसभक्षणाच्या या शोधाने अस्वस्थ होत नसतात. प्रश्न आहे तो कर्मठांचा आणि संस्कृतीच्या ठेकेदारांचा. वर्तमानात असणा-या ब्राह्मण जातीचा ऋग्वेदातील ब्राह्मणांशी गोत्रापलिकडे संबंध नाही. ब्राह्मणगोत्रे ही वेदातील ऋषींची नावे आहेत. या ऋषींना ब्राह्मण का म्हणायचे? ते ब्रह्मपुत्र नाहीत. ब्रह्म या शब्दाचे ऋग्वेदात अनेक अर्थ आहेत. ब्रह्म म्हणजे गाणे, अन्न, भौगोलिक प्रदेश असे अनेक अर्थ आहेत. ऋग्वेदात ब्राह्मण हे विराट पुरुषाचे मुख आहे अशा अर्थाचे पुरुषसूक्त आहे (ऋ. १०-९०;१२). त्यावरून ब्राह्मण हा स्तोत्रे रचणारा, अन्न शिजविणारा, किंवा आर्यावर्ताच्या मुखाशी असणा-या ब्रह्मावर्त (कुश गवताचा प्रदेश) प्रदेशातील समाज होता असे म्हणता येते. ऋग्वेदात ‘वर्ण’ या शब्दाचा निर्देश कोठेच नाही. ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील मंडूकसूक्तात ब्राह्मणांच्या पाठशाळांचा उल्लेख आहे. हे ब्राह्मण, वर्तमानकाळच्या जातींच्या संदर्भात कोणत्याही जातीचे असू शकतात. अथर्ववेदात अंगिरस आणि अथर्व हे मुखाच्या ठिकाणी दर्शविलेले आहेत. अध्रव हे इराणी ब्राह्मण होते. अंगिरस ब्रह्मपुत्र नसून सूर्यपुत्र होते (ऋ. १०.५६.६). वशिष्ठ हा उर्वशीचा पुत्र होता. तो वशीचा पुत्र असल्यामुळे वैश्य होता. पाराशराची माता चांडाली होती. व्यास ढिवरिणीचे पुत्र होते आणि त्यांचे जन्मदाते ब्राह्मणेतर होते. मनूच्या जातिव्यवस्थेत ते सारे शूद्र ठरतात. गाईंच्या कळपाच्या आश्रयाने राहणा-या निरनिराळ्या पशुपाल ऋषींच्या यज्ञात ब्रह्मा प्रमुख असे. या ब्रह्माचा परिवार ब्राह्मण असेल तर ऋषींच्या हिंसाप्रधान यज्ञात ब्राह्मण हाच प्रमुख होता. आजच्या यज्ञातही पिठाचे पशू तयार करून त्यांच्या आहुती दिल्या जातात. ते प्राचीन हिंसाप्रधान यज्ञाचे अवशिष्ट विशेष आहेत. ऋग्वेदात वर्णपरिवर्तनावर कोणतेच बंधन नसल्यामुळे वर्तमानातील ब्राह्मणांचे पितर ऋग्वेदकाळात क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कोणत्याही वर्णाचे असू शकतात. ते कोणत्या वर्णाचे होते हे ठरविता येणे अशक्य आहे. गोमांसभक्षणाच्या आरोपातून आपल्या पितरांना मुक्त करावयाचे असेल तर वर्तमानातील ब्राह्मणांना ऋग्वेदातील ऋषींच्या गोत्रांशी आपला संबंधविच्छेद करावा लागेल. ते शक्य नसल्यामुळे संशोधनातून जे सत्य प्रगट होते ते अप्रिय इतिहास म्हणून तटस्थपणे मान्य करावे लागेल. इतिहासाला कवटाळून माणसे जगत नसतात. मनूने काही प्राण्यांचा मांसाहार श्राद्धात सांगितला आहे. मनुस्मृतीवर नितान्त श्रद्धा असणान्यांनी मनूचे आप्तवचन नाकारले आहेच.
मांसभक्षणाची अपरिहार्यता
माणूस मुळातच कुत्रीमांजरांप्रमाणे भिन्न आहार घेणारा प्राणी आहे. अन्नधान्ये कंदफळेमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात त्यावेळी जगण्यासाठी मांसाहार अपरिहार्य ठरतो. दुष्काळ, नैसर्गिक कोप आणि ऋतूपरत्वे शाकाहार उपलब्ध झाला नाही तर माणसे मांसाहाराकडे वळतात. मानवांची अपत्ये वाढीस लागल्यानंतर केवळ दूध, दही, तूप यावर पोषण होत नाही. पशुपालन-संस्कृतीत जनावरे मारून खाणे अपरिहार्य असते. गाई आणि बैल, अजावया, (शेळ्यामेंढ्या) ऋग्वेदकाळात सहज प्राप्त होत्या. अंगिरस हे ऋग्वेदातील पहिले गोपालक होते (ऋ. ५.४५.८), अंगिरसांना दूधदुभते कसे करावे याचे ज्ञान नव्हते (ऋ. १/१३९/७). अंगिरसांना गायींचा गोमांसभक्षणाव्यतिरिक्त दुसरा कोणता उपयोग असू शकतो? ऋग्वेदात कृषीपेक्षा पशुपालनाचे उल्लेख अधिक आहेत. यवाशिवाय दुसरे धान्यही उपलब्ध नव्हते. दुष्काळात आणि दारिद्र्यामुळे वामदेव-गौतमाने कुत्र्याची आतडी शिजवून खाल्ली (ऋ. ४-१८-१३). मनूचा दहावा पुत्र प्रशघ्र ह्याने गुरूची गाय मारून फस्त केली. च्यवनाने त्याला शूद्र ठरविले. इक्ष्वाकूने विकुक्षी नावाच्या पुत्राला गोमांस आणावयास सांगितले ते दूषित होते म्हणून वशिष्ठाच्या आदेशावरून इक्ष्वाकूने विकुक्षीचा त्याग केला. दुष्काळात सत्यव्रताने डुकरे आणि रेडे मारून विश्वामित्राच्या कुटुंबाचे पोषण केले. याच दुष्काळात त्याने वशिष्ठाची गाय कापून विश्वामित्राच्या पुत्रांचे पोपण केले. या कथा पुराणात आहेत तशा सांगितल्या. वशिष्ठ वैश्य होता. विश्वामित्र क्षत्रिय होता त्याने दुष्काळात कुत्र्याची तंगडी भक्षण केली होतीच. या मांसाहारामुळे ब्राह्मणांनी विचलित का व्हावे? रावण ब्राह्मण होता पण मांसाहारी होता. वृत्र हा ऋग्वेदकाळातील ब्राह्मणच होता. पण दानव होता (भाग, ६-१६). ऋग्वेदात वशिष्ठाला यातुधान म्हणजे क्रव्याद वा मांसाहारी म्हटले आहे (ऋ. ७-१०४-१५). ब्राह्मणांनी स्वतःला पवित्र, श्रेष्ठ समजण्याचे कारण काय? ब्राह्मणांची घरे बांधून देणारा गवंडी, सुतार, हे ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ आहेत. मराठे, प्रभू हे ब्राह्मणांना कनिष्ठ समजतात. वर्णाहंकाराच्या अकारण अभिमानापोटी, आणि पोट भरण्यासाठी श्रम न करावे लागल्यामुळे ब्राह्मण कर्मठ झाला. तो स्वतः धर्माचे आदेश देणाराही नव्हता. उपलब्ध असणा-या स्मृतीत ब्राह्मणाने दिलेली स्मृती नाही. बुद्धकाळात अनेक ब्राह्मण शेतकरी म्हणजेच कुणबी होते. सारस्वत मत्स्याहारी आहेत. रत्नागिरीच्या परिसरातील जवळ वा खोत ब्राह्मण मांसाहारी होते. मांसाहार ही ब्राह्मणांसहित सर्व मानवांची कालमानाप्रमाणे जगण्यासाठी अपरिहार्यता होती. माणसांनी दुष्काळात मरावे हे कर्मठांना अभिप्रेत आहे काय?
गोमांसभक्षण
डॉ. लोखंडे ह्यांनी ऋग्वेदात आणि वेदोत्तर कालखंडातील गोमांसभक्षणाच्या पुष्टीसाठी प्रमाणे दिलेली आहेत. आमचा लेख ऋग्वेदकाळापुरताच मर्यादित ठेवला आहे. ज्या ऋचांतून गोहत्या स्पष्ट दिसते त्याच ऋचांचे भाषांतर सिद्धेवरशास्त्री चित्राव यांनी ऋग्वेदाचे जे भाषांतर केले त्यातून उद्धृत केले आहे. या भाषांतरावर कर्मठांनी बंदी घातलेली नाही हे लक्षात घ्यावे लागते. म्हणजे सिद्धेश्वरशास्त्री शास्त्री असल्यामुळे कर्मठ संस्कृतपंडितांना त्यांचे भाषांतर आक्षेपार्ह वाटू नये आणि डॉ. भाऊ लोखंडे मात्र आक्षेपार्ह ठरतो. सैंधवी संस्कृतीतील भग्न घरांच्या अवशेषातून स्वयंपाकघरात गायीची हाडे आढळतील. “उक्षाणं पृश्निमपचन्त वीरास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्’ (१.१६४.४३). वीर पुरुष बैलाला तुकडे करून शिजवीत तो मानवाचा प्रथम धर्म होता. यज्ञाची उत्क्रांती देताना यज्ञ प्रथम नरबलीत, त्यानंतर तो पशुत प्रविष्ट होतो. प्रथम तो अश्वात नंतर तो गाईत प्रविष्ट होतो. त्यानंतर यज्ञात शेळ्या मेंढ्या अर्पण केल्या जातात, नंतर तो यवाने आणि व्रीहीने (तांदूळ) आरंभ होतो (शतपथ, १,२, १,८,) ‘गामवाजति मांसमेकः पिंशति’ (ऋ. १-१६१-१०) या संपूर्ण ऋचेचा अर्थ सिद्धेश्वरशास्त्रींनी असा दिलेला आहे. एकजण गाईला ढकलतो, दुसरा सुरीने मांस कापतो. तिसरा आतड्यातील शेण बाहेर काढतो.’ ‘निश्चर्मणो गामरिणीत धीतिभिः ऋभवः’ (क्र. ४.३६.४). ऋभुंनी कुशलतेने गाईला चामडे चिरून बाहेर काढले. याच अर्थाची ऋचा अन्यत्र आहे (ऋ. ३.६०-२). एक वर्षपर्यंत गायीचे मांस ऋभुंनी टिकवून ठेवले (४.३३.४). (हे मांस बहुधा बफत टिकवून ठेवले असावे). अग्नीला घोडे, वृषभ, मेंढे, वांझगाईच्या आहुती दिल्याचा उल्लेख आहे (ऋ. १०.९१.१४). भाऊंच्या लेखात नसलेले हे गोमांसभक्षणाचे उल्लेख ऋचांतून स्पष्ट दिसतात. ऋग्वेदाच्या सूक्तांत अश्व कापून त्याच्या मांसाची आहुती देण्याचा सविस्तर प्रसंग वर्णन केलेला आहे (ऋ. १-१६२), अश्वाच्या मांसाची आहुती दिली याविषयी ब्राह्मण अस्वस्थ होणार नाहीत पण गोमांसाची आहुती दिल्याचे स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात असताना ते वगळून कसे चालणार? मानव हा ऋषी आणि ब्राह्मणही आपत्काळात नैसर्गिक प्रवृत्तीनेच वागणार हे सत्य का नाकारायचे? संपूर्ण लेखात भाऊने मांसभक्षणाचा कोठेही पुरस्कार केला नाही. ज्या पुरोहितवर्गाने शूद्रांना जीवन नकोसे केले तो पुरोहितवर्ग एके काळी मांसभक्षी आणि आजच्या समजुतीप्रमाणे अपवित्र होता, त्याने पावित्र्याचा दंभ पांघरून स्पृश्यास्पृश्यता निर्माण केली हाच संताप भाऊच्या लेखातून प्रगट होतो. तो स्वाभाविक आहे. ‘अंगी विटाळाचा गोळा/देह होईल कैचा सोवळा’. चोखोबांचे हे वचन सत्य नाही असे कसे म्हणावयाचे? कर्मठांविषयी चोखोबा जे म्हणतात तेच ब्राह्मणांच्या पावित्र्यासंबंधात म्हणता येते.
अर्थाची हेराफेरी
ऋग्वेदातील गोमांसभक्षणाचे हे उल्लेख लक्षात घेऊन संस्कृतीच्या दिव्यत्वाची गाणी गाणा-यांनी उक्ष (सांड) म्हणजे सोम, गो (गाय) म्हणजे कंद, ऋषभ (बैल) म्हणजे एक औषधी वनस्पती, अज (बोकड) म्हणजे अंकुरित न होऊ शकणारी धान्यबीजे असे अर्थ लक्षात घेऊन ऋचांचे आणि संस्कृत प्रमाणांचे अर्थ दिलेले आहेत. ते त्या अर्थी आक्षेपार्ह नाहीत. मास म्हणजे उडीद असाही अर्थ दिलेला आहे. ऋग्वेदात कोणत्याच दाळीचे वरण, पुरण, वडे प्रचारात नव्हते. उडिदाचा उल्लेखही नाही. एका ऋचेत उक्ष आणि सोम वेगवेगळ्या अर्थाने दिलेले असून उक्षाचा अर्थ सांड असाच दिलेला आहे. अर्थाची हेराफेरी सायणाचार्यांनी सर्वप्रथम केली. ऋग्वेदातील ९ वे मंडल ‘सोम’ नावाच्या मद आणणा-या वनस्पतीलाच अर्पण केलेले आहे. त्यात सोम उकडला जात नसे. तो कच्चा, पाणी घालून, वाटून, दूध दही मिसळून प्राशन केला जात असे.
गाय अवध्य झाली
नैसर्गिक प्रकोपामुळे ऋषींची जी भटकंती होत होती तीत अन्नधान्याचे विस्तीर्ण प्रदेश उपलब्ध होऊ लागले किंवा धान्य पिकविणा-या आदिम टोळ्यांचा संपर्क येत गेला त्यावेळी गाईबैलांच्या उपयुक्ततेमुळे ते अवध्य ठरले. यवानंतर मानवांना गव्हाचा परिचय झाला. अधिक दक्षिणेला सरकल्यानंतर त्याला भाताचे पीक परिचित झाले. ऋषी ज्यावेळी ते मानुष प्रदेशात (कुरुक्षेत्र) मार्ग काढीत आले त्यावेळी त्यांना गव्हाचा परिचय झाला (शतपथ ब्रा. ५.२.१.६). मांसाहारासाठी गोहत्या थांबली. नांगरटीसाठी बैलाचा उपयोग होऊ लागला (शतपथ. ५.२.४.१३). गायीची हिंसा थांबली याचा शोध घेण्यासाठी कलियुगातील स्मृती धुंडाळण्याची आवश्यकता नाही. ऋग्वेदातच गाय अवध्य ठरली. के. रा. जोशींनी ऋग्वेद शोधला असता तर त्यांना समाधान देणा-या अनेक ऋचा ऋग्वेदातच आढळल्या असत्या. गाय अहिंस्य आहे. गायीची हिंसा करू नका, यज्ञकर्त्यांच्या गायी निर्भय असोत (६-२८-४), गायीवर बलिदानाचे संस्कार करू नका, यज्ञ अहिंस्य असावा (ऋ. ८-१८-४) अशा अर्थाची अनेक सूक्ते संख्येने वाटेल तितकी विखुरलेली आहेत. गोमांसभक्षण पितरांचा अपमान करण्यासारखे आहे (अथर्व. ५-१९-५). गायीचे मांस खाणा-याचे पुत्र मरतात (अथर्व. १२-४-३८) । (यो वेहतं . . . पचते वशाम् … पौत्रांश्च याचयते बृहस्पतिः ।) ब्राह्मणांनी गोमांसभक्षण करू नये असे शतपथात सांगितले आहे (१२,१,२,३९).त्यावरून गोहत्येच्या विरोधात ऋग्वेदकाळातच मतप्रवाह प्रकट झालेला दिसतो. ऋग्वेदकाळातील गोमांसभक्षणही त्या त्या काळची अपरिहार्यता होती. वशिष्ठ हा यातुधान होता, ही त्याची प्रसिद्धी असल्यामुळेच भवभूतीच्या नाटकात त्याची टवाळी केली आहे. दुष्ट प्रवृत्तीला दाबूनः सुष्ट प्रवृत्तीचा परिपोष मानवाने अंतःप्रेरणेने केला त्या संदर्भातच इतिहास-पुराणे, महाकाव्ये यांतील घटनांतून सांस्कृतिक विकासाचे मार्ग सांगावे लागतात. हे सांगण्यासाठी मानवांच्या दुष्ट प्रवृत्तीचे अवशेष दडवून ठेवले तर गुन्हेगारीचे पुरावे नष्ट करण्यासारखे दंडनीय आहे. इतिहासकार सत्य तेवढे उकरून काढतो. ते ज्याला अप्रिय आहे त्याने आपला विद्रुप चेहेरा दर्पणात बघू नये एवढेच.
टिप्पणीः- प्रस्तुत लेख ऋग्वेदापुरताच मर्यादित ठेवला आहे. ऋग्वेदकाळात गोहत्येच्या विरोधात विचार प्रगट झाला तरी गोहत्या थांबली असे म्हणता येत नाही. वेदानंतरच्या काळातही तो चालूच होता. गोमांसभक्षण वेदोत्तर काळात ब्राह्मणांनी वर्ज केले. माणसाने मात्र ते वर्ज केले नाही. थोडे सुधारून लिहावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की माणसांना गोमांसभक्षण वर्ण्य नाही.