मंटो नावाचे बंड

येत्या १८ जानेवारीला मंटो मरून ४५ वर्षे होतील. वयाच्या ४३ व्या वर्षी तो वारला. काही समीक्षकांच्या मते तो उर्दूतला सर्वश्रेष्ठ कथाकार होता. नोकरीच्या शोधात अमृतसरहून मुंबईला आला अन् चित्रपट-व्यवसायात शूटींगच्या वेळी संवाद दुरुस्त करून देणारा मुन्शी म्हणून नोकरीला लागला. लवकरच ‘मुसव्विर’ (चित्रकार) या उर्दू सिनेसाप्ताहिकाचा संपादक म्हणून त्याला जरा प्रतिष्ठेची नोकरी मिळाली. ‘बद सही लेकिन नाम तो हुवा’ अशा बेहोशीत लिहायचा. स्वतःबद्दल फार थोडे सांगणारा
मंटो म्हणतो, “माझ्या आयुष्यात सांगण्यासारख्या तीनच गोष्टी. एक माझा जन्म, दुसरे, माझे लग्न आणि तिसरे माझे लिहिणे. पहिल्याबद्दल मला काहीच माहिती नाही. तिसरे अजून सुरू आहे त्यामुळे त्याबद्दल लिहिणे बरे नाही’, असे म्हणून त्याने आपल्या लग्नाची हकीकत मोठ्या खुमासदार शैलीत लिहिली आहे. सात-आठ वर्षे मुंबईत त्याने फिल्मी पत्रकार आणि पटकथाकार म्हणून चांगलेच नाव कमावले. पुढे फाळणी झाली तेव्हा तो पाकिस्तानात गेला. तिथे आणखी सात वर्षे कथाकार म्हणून तो चांगलाच गाजला. त्याच्या हयातीतच तो आख्यायिका बनला होता. शेवटच्या दिवसांत तर तो दिवसाला एक या वेगाने कथा लिहीत असे. आपण डोक्यातून कथा काढत नाही, खिशातून काढतो असे तो म्हणे. सात वेळा त्याच्या कथांवर अश्लीलतेच्या आरोपाखाली सरकारी कारवाई झाली. स्वतःला तो ‘अफसानानिगार’ (गोष्टी सांगणारा) म्हणवीत असे. वास्तव कल्पित आणि कल्पित वास्तव वाटावे अशा शैलीत तो लिहितो. स्वातंत्र्य : व्यक्तीचे, विचाराचे, अभिव्यक्तीचे यांचा तो बेडर पुरस्कर्ता होता. जवळपास बेबंद म्हणता येईल असे जीवन तो जगला. समाजातल्या शोषित, पीडित वर्गाशी तो चटकन समरस होतो. मुंबईतल्या बदनाम वस्त्यांत तो राहिला. स्त्रियांची पिळवणूक किती परोपरीने होते ते त्याने रोज पाहिले. तो पाकिस्तानात गेला खरा पण धर्माचे बंधन त्याला बांधू शकले नाही. पिळवणूक, दंभ, अन्याय यांच्यावर तुटून पडताना त्याने ना भूगोलाच्या सीमा मानल्या ना देवाधर्माच्या. फाळणीनंतरची लूटमार, जाळपोळ, स्त्रीत्वाची विटंबना पाहून तो हैराण झाला. त्याच्या स्वभावातला फटकळपणा, वृत्तीतली बेदरकारी, ढोंगाची चीड सगळी त्याच्या शैलीत उतरली. उपहास-उपरोध ही त्याची अवजारे. तिखट-बोचया, मोजक्या आणि अचूक शब्दांनी तो तुम्हाला घायाळ करतो. “वो सुबह कभी तो आयेगी” अशा वेड्या आशावादाचा प्रतिनिधी असलेल्या मंटोला एकविसाव्या शतकाच्या उषःकाली सलाम.
त्याच्या ‘इसलाह’ (दुरुस्ती) आणि ‘मजदूरी’ या दोन लघुतम कथा सारे काही सांगून जातात.
१. इसलाह*
सआदत हसन मंटो
कोणायेस तू?”.
तुम्ही कोण?” हर-हर महादेव … हर-हर महादेव!” हर-हर महादेव!”
सुबूत काय?”
सुबूत 😕 माझं नाव धरमचंद.”
हा काही पुरावा नाही होत.”
“चार वेदांतले काहीही विचारून पाहा मला”.
“आम्ही वेद जाणत नाही :: : पुरावा दाखव.”
काय?”
पायजामा सोड.”
पायजामा सोडला तो एकच हलकल्लोळ उडाला : “मारून टाका … मारून टाका.”
नका … नका … मी तुमचा भाईबंद आहे … देवाशपथ, तुमचा भाऊ आहे.”
तर मग ही काय भानगड आहे?”.
मी जिथला आहे, तो आपल्या दुष्मनांचा मुलूख आहे … म्हणून नाइलाजाने मला तसे करून घ्यावे लागले, नुसते आपला जीव वाचवण्यासाठी …
एवढी एकच चूक झाली आहे, मी बाकी बिलकुल सच्चा आहे…”
“छाटून टाका ही चूक …
चूक उडवली गेली … धरमचंदही सोबत उडाला.
*इसलाह – चुकीची दुरुस्ती, सुधारणा.
२. मज़दूरी
लुटालुटीला उधाण आले होते, चोहोबाजूंनी भडकलेली आग त्या गर्मीत आणखी भर घालत होती.
मग खूप वेळाने थाड-थाड असे आवाज झाले-गोळ्या सुटू लागल्या. बाजार रिकामा झालेला पोलिसांना दिसला – पण दूर धुरात वळणापाशी एक पडसावली-सारखे काही होते.
शिट्या फुकत शिपाई तिकडे धावले.
पडछाया गडबडीने धुरात घुसली.
शिपायानेसुद्धा निःश्वास टाकला.
धुराचा वेढा संपला तेव्हा शिपायांना दिसले की एक काश्मिरी मजूर पाठीवर भरलेले पोते घेऊन पळत सुटला आहे.
शिट्यांचे घसे कोरडे पडले पण तो काश्मिरी मजूर थांबेना….त्याच्या पाठीवर बोझा होता; मामुली वजन नाही; एक भरलेली गोणी होती, पण तो दौडत असा होता की जणू त्याच्या पाठीवर काहीच नाही.
शिपाई धापा टाकू लागले.-एकाने चिडून पिस्तुल काढले नि गोळी झाडली.
गोळी काश्मिरी मजुराच्या पोटरीला लागली. गोणी त्याच्या पाठीवरून खाली पडली. पाठलाग करत हळू हळू पुढे सरकणा-या शिपायाकडे त्याने घाबरून पाहिले; पोटरीतून वाहणा-या रक्ताचाही त्याने अंदाज घेतला. मग एकाच झटक्यात गोणी उचलली, पाठीवर लादली अन् लंगडत-लंगडत धावत सुटला.
दमलेल्या शिपायाला वाटले : “जाई ना का मसणात…”
त्याच क्षणी काश्मिरी मजुराला ठोकर लागली अन् तो पडला. गोणी त्याच्या अंगावर.
आता थकल्या-भागल्या शिपायाने त्याला पकडले; गोणी त्याच्या बोकांडी लादली अन् पोलिसठाण्याकडे कूच केले.
रस्त्यात काश्मिरी मजुराने गयावया केली :
“हजरत आप मुझे क्यों पकडती … मैं तो ग़रीब आदमी होती…. चावल की एक बोरी लेती … घर में खाती, आप नाहक मुझे गोली मारती.”
पण त्याच्या विनवण्या वाया गेल्या. ठाण्यात काश्मिरी मजूर आपल्या बचावासाठी म्हणाला : “हजरत, दुसरा लोग बडा-बडा माल उठाती … मैं तो फ़क़त चावल की एक बोरी लेती … हजरत, मैं बहुत ग़रीब होती … हर रोज भात खाती …”
जेव्हा तो थकून जेरीस आला तेव्हा त्याने आपल्या डोईवरच्या मळक्या टोपीने माथ्यावरचा घाम पुसला आणि तांदुळाच्या पोत्याकडे आशाळभूतपणाने पाहात ठाणेदारापुढे हात फैलावत तो म्हणाला : “अच्छा, हज़रत, तुम बोरी अपने पास रखती … मैं अपनी मजदूरी माँगती … चार … आने!”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.