साँस ही टी. व्ही. च्या स्टार प्लस चॅनेलवरील मालिका शंभरावर एपिसोड्स होऊन अजून चालू आहे. ही मालिका खरोखर सरस आहे. मालिकेचा विषय साधा जिहादाचा आणि एका गंभीर समस्येला स्पर्श करणारा आहे. एका विवाहित पुरवा या विवाहबाह्य संबंधाची ही कथा आहे. पुरुष प्रथम परिणामांची पर्वा करीत पारो, cण तोही त्यांत भरडला जातो हे दाखविताना त्यात प्रबोधनाचा अभिनिवेश नसे. तो एक प्रांजळ असा कलात्मक आविष्कार वाटतो.
ही कथा एका साध्या, सुखी, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. गौतम आणि प्रिया कपूर यांचे सधन, सुखवस्तु घर, दोन शाळेत जाणारी मुले, १५ वर्षांचा रुळलेला संसार अशी सर्वसाधारण परिस्थिती आणि त्यांच्या सरळ जीवनात मनीषा नावाचे वादळ येते. अन् सारे उद्ध्वस्त होऊन जाते. मनीषा व्यवस्थित मोहजाल पसरते, गौतम तिच्याकडे आकर्षिला जातो आणि त्यांचे, मनीषा-गौतमचे, चोरटे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रिया निर्धास्तपणे गौतमच्या प्रेमावर विश्वासून असते. पुढे आपल्या मुलीला म्हणतेही, “मैंने तुम्हारे पापा पर बहुत जादा यकीन किया। उसीकी सजा मैं भुगत रही हूं।”
वास्तविक गौतमही एक गंभीर, कर्तृत्ववान् अन् जबाबदार पुरुष आहे, प्रेमळ पिता आहे. पण तरीही मनीषाचे जबरदस्त आकर्षण त्याला खेचतेच. मग होते अपरिहार्य मोडतोड, आणि या मोडतोडीतूनच आपले स्वत्व जपत आपले नि मुलांचे आयुष्य नीट मार्गी लावायची प्रियाची धडपड.
कथाबीज असे हे एवढेच, त्याभोवती पात्रांची अन् प्रसंगांची अशी सुरेख गुंफण साधली आहे की, त्यातून एका भावविश्वाचे अनेक पदर उलगडत जातातच, मालिकेचे कथानक आणि तिचे शीर्षक साँस यांचा मेळ घालणे श्वास जसा सहजगत्या घेतो तशी सहज घडणारी गोष्ट असा काहीसा म्हणता येईल. मालिकेची निर्मातीदिग्दर्शिका नीना गुप्ता एका मुलाखतीत याबाबतीत म्हणाली होती, ‘गुलजारांशी या मालिकेबद्दल बोलता बोलता हे नाव सहज सुचले, ते आवडलं अन् तेच पक्कं केलं.’ म्हणजे ते फार विचारपूर्वक ठेवले आहे, असे नाही.
पतीच्या बाहेरख्यालीपणाने अपमानित अन् व्यथित झालेली पण शांत, समंजस, आणि स्वाभिमानी प्रिया, तिच्याबद्दल सहानुभूती बाळगणारा तिच्या नणंदेचा सहृदय नवरा, तिचा वकील सूरी, एक यशस्वी, शहाणा तरीही स्खलनशील गौतम, सुंदर, भावुक अन् हट्टी मनीषा ही आणि ह्यांच्या अनुषंगाने येणारी त्यांच्या संबंधातली इतर पात्रे आपल्याला नेहमीच्या व्यवहारात भेटणारी आहेत असे वाटते आणि त्यांच्या सुखदुःखांशी आपण समरस झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साँसची कथा कोठेही कल्पनारम्य होत नाही.
साँसच्या कथेवर तरीही एक आक्षेप येतोच-विषय. तिचा विवाहबाह्यसंबंध. त्याच्यात ठराविकपणा दिसला तरी अशा संबंधाचे परिणामकारक चित्रण करण्यावर भर असल्याने ते संबंध पार्श्वभूमीसारखे मात्र उरतात. विवाहबाह्य-संबंधांच्या समस्येला धरून भारतीय समाजातील एका सनातन समस्येचा अंतःप्रवाह या कथेतून सतत वाहत आहे. ही समस्या आहे भारतीय समाजातील पुरुषी वर्चस्वाची. भारतीय समाजमनाने स्त्रीला दीनदुबळी अन् दुय्यमच मानली आहे आणि ही मानसिकता आजतागायत फारशी बदललेली नाही.
खर्या अर्थाने स्त्रीपुरुषसमानता ही या समाजात एक मिथकच आहे. स्त्री फक्त उपभोग्य वस्तू किंवा सेविका आणि पुरुष तिचा मालक असे विभाजन झाल्यावर स्त्रीने त्यागी, सोशीक, सेवातत्पर आणि पुरुषपरायण असावे अन् पुरुषाने स्वच्छंदी वागावे अन् तरीही त्याला सर्व गुन्हे माफ असावेत यात कोणालाच काही गैर वाटत नाही. मग स्त्रीला एक मन असते, तिलाही मानापमान असतो, तिलाही आपले आयुष्य सुखाने जगण्याचा हक्क असतो ही जाणीव बोथट होते. प्रिया जेव्हा घटस्फोट घ्यायला निघते किंवा दुसरे लग्न करायचे ठरवते तेव्हा त्यावर इतरांच्या होणार्या प्रतिक्रिया या दृष्टीने पाहण्यासारख्या आहेत. पण प्रियाची ही जाणीव जागृत आहे. आपले स्वत्व जपण्याचा ती आलेल्या परिस्थितीत आटोकाट प्रयत्न करते. गौतमचा व मनीषाचा प्रेमसंबंध कळतो तेव्हा ती गौतमच्या घराबाहेर पडते. आधी साधी गृहिणी असते, ती काँप्युटर शिकून नोकरी करू लागते. मुलांचा सारा भार आपल्या शिरावर घेते. त्यातूनही गौतम मनीषाला सोडून परत आला, तर मुलांसाठी, घरासाठी तडजोड स्वीकारायचीही तिची तयारी असते. परंतु मनीषाला गौतमपासून दिवस जातात अन् ती दोघे चोरून लग्न करतात तेव्हा प्रिया गौतमला घटस्फोट मागते. त्या परिस्थितीत सन्मानाचा असा तोच एक मार्ग असतो, पण गौतम ते नाकारतो. त्याला मनीषाही हवी असते आणि आपले पहिले घरही तसेच हवे असते. वास्तविक गौतम एक सभ्य सुसंस्कृत माणूस आहे. परंतु प्रियावर अन्याय करताना तो इतका निढविल्यासारखा वागतो की त्यातून एक परंपरागत भारतीय पुरुषच प्रकर्षाने जाणवतो.
तो प्रियाला विचारतो, “क्यों चाहिए तुम्हें डिवोर्स?” प्रिया म्हणते, “तुम आझाद घूम रहे हो। मुझे भी आझादी दे दो।” त्यावर तो छद्मीपणे म्हणतो, “क्या दुसरी शादी करोगी?” मग ती उसळते, “हाँ, करूंगी। क्यों न करूं?” तसा तो तिला बजावतो, “बच्चों का तो कुछ खयाल करो।” मग मात्र तिला राहवत नाही, “मनीषा के साथ तुमने घर बसाया, तब तुम्हें बच्चों का खयाल आया?”
आपण प्रियाशी प्रतारणा केली आहे, मुलांना दुःख दिले आहे, घराची वाताहत केली आहे यात आपले काही चुकले आहे असे गौतमला चुकूनही वाटत नाही. उलट ‘मैं दिल के हाथों मजबूर हूँ’ असे तो त्याचे गोंडस समर्थन करतो. मात्र मनीषा जेव्हा त्याला सोडून निघून जाते, तेव्हा तो आपला तोल सावरू शकत नाही. तो खूप दारू झोकतो, कॉल गर्लला बोलावतो आणि अशा अवस्थेत पोलिसांकडून पकडलाही जातो. हीच वेळ प्रियावरही आली असते. पण तिने ती शांतपणे अन् समजूतदारपणे पेलली असते. ही सहनशीलता गौतम का दाखवू शकत नाही, याचे कारण त्याचा पुरुषी अहंकार होय. एका स्त्रीशी कसेही वागण्याची आपल्याला मुभा आहे, पण स्त्रीने मात्र आपले मन मोडता कामा नये ही त्याच्या नसानसात भिनलेली पुरुषी वर्चस्वाची कल्पनाच ह्यामधून दिसते.
पुरुषी वर्चस्वाच्या कल्पनेला अजाणता म्हणा, स्वार्थापोटी म्हणा किंवा नाइलाजाने म्हणा, स्त्रियांनी खतपाणी घातले आहे हे विसरता येणार नाही. मग स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू होतात. प्रियाचा संसार उधळून लावण्याकरिता मनीषाच जबाबदार असते ना? प्रिया दुसर्या लग्नाला तयार होते, तेव्हा तिच्यावर ताशेरे झाडणार्या स्त्रियाच असतात. आपण निर्दोष असलेल्या एका स्त्रीवरच अन्याय करतो आहोत अन् करून सवरून असणारा पुरुष मात्र सहीसलामत सुटतो आहे याचे त्यांना भान नाही. एरवी प्रियाच्या दुःखाबद्दल हळहळ वाटणार्या तिच्या नणंदेलाही तिचे दुसरे लग्न पसंत नसते. गौतमलाही ते अर्थातच पसंत नसते. एव्हाना आपल्या दुसर्या लग्नातून तो पोळून निघाला आहे. तो आता नरमाईच्या भाषेत प्रियाला समजावतो की, मी जी चूक केली ती तु करू नकोस. त्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो.
प्रिया समंजस आहे. करारी आहे, पण कोमलही आहे. विशेषतः मुलांच्या बाबतीत ती हळुवार आहे. आपल्या मुलाला आपले दुसरे लग्न मान्य नाही हे तिने ओळखले आहे अन् ती आता विचारात पडली आहे की, मुलाला नाराज करून आपण आपले सुख बघायचे का?
साँसची कथा या वळणापर्यंत आली आहे. पण इथे पुन्हा तीच पुरुपी वृत्ती अकुलच्या रूपाने अंकुरित होताना दिसते. आपल्या आईचे दुसरे लग्न प्रियाच्या मुलीला मिठीला मान्य आहे. पण अकुल मात्र चांगलाच नाराज आहे. तो आईवर रागावला आहे. मिठी त्याला समजावते तरी तो ऐकत नाही. वडील दुसरे घर करतात, लग्न करतात याचे त्याला वाईट वाटते, पण तो असा वडलांवर रागावत नाही. वडिलांची प्रतारणा तो पत्करतो. आई तर तशी नाही. चांगले राजरोस ठरवून, सर्वांना सांगून लग्न करते आहे. तरी अकुल ते सहन करू शकत नाही.
आई आणि वडील यांच्यामध्ये अकुल हा फरक का करतो? स्त्री व पुरुषाला असे वेगळे मापदंड लावायला त्याला कोणी शिकवले? पुरुषाला हवे तसे वागायला ज्या समाजाने मुभा दिली, आणि स्त्रीवर मात्र बंधने टाकली त्या समाजाची पुरुषप्रधान मानसिकता अकुलमध्ये आपोआप उतरली आहे का?
या अनुषंगाने इथे नव्याने निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक प्रश्नाचा निर्देश करावासा वाटतो. त्याचे मूळही या पुरुषी वर्चस्वाच्या वृत्तीतच आहे म्हणून. ही वृत्ती फोफावली की कशी आसुरी आणि हिंसक वळण होते हे अलीकडे एकतर्फी प्रेमातून एकामागोमाग घडलेल्या कोवळ्या युवतींच्या हत्येतून विदारकपणे दिसून आले आहे.
सांगलीची अमृता देशपांडे असो, ठाण्याची रिंकू पाटील असो, की मलकापूरची वैशाली काळे असो, या नवयुवतीचे दुर्दैव असे की, त्या कुठल्यातरी उडाणटप्पू, रगेल आणि रंगेल तरुणाला आवडल्या. बस्, आपल्याला ती आवडली म्हणजे ती हवीच हा त्याचा चढेलपणा! तिने त्याच्या इच्छेपुढे मान तुकवलीच पाहिजे. तिला तिची स्वतंत्र इच्छा आहे, याची त्याला चाड नाही. मग तिच्या इच्छेचा आदर तर दूरच राहिला. त्याचे एकतर्फी प्रेम तिच्यावर हक्क प्रस्थापित करायला त्याला पुरेसे आहे. तिचेही आपल्यावर प्रेम असले पाहिजे. पण आपण तिच्या प्रेमाला पात्र असले पाहिजे याची त्याला खिजगणती नाही. कारण तो पुरुष आहे, स्त्रीवर मालकी हक्क गाजविणारा पुरुष. तो कितीही नालायक असला तरी स्त्रीने त्याच्या अधीनच राहिले पाहिजे ही त्याची धारणा. तो जन्माने पुरुष आहे एवढेच त्याला वरचढ ठरवायला पुरेसे आहे असा त्याचा गैरसमज! त्याच्या इच्छेला मुलगी विरोध करते म्हणजे काय? केवढी ही धिटाई! आणि त्या मुलांनी सरळ त्या मुलींना जीवनातूनच उठवले! या कोवळ्या कलिकांचा केवढा हा भयानक अंत! नुसती वातमी वाचूनच मन सुन्न होऊन जाते. स्त्रीला आता बरेच स्वातंत्र्य मिळाले आहे. निदान व्यवहारात तरी मिळाले आहे. पण स्त्री ही माणूस आहे, उपभोग्य वस्तु नव्हे ही त्यामागची कल्पना समाजाने खरेच स्वीकारली आहे काय अशी शंका दाटून येते.
प्रेमाच्या उदात्ततेची पुसटशीही जाणीव नसलेल्या या प्रेमवीरांच्या अंगी लहान वयातच कुठून एवढे क्रौर्य आले? हिंसाचाराने बरबटलेल्या सिनेमांचा हा परिणाम नीला चटावलेल्या या युगातील वातवरणाचा हा परिपाक म्हणावा? आमच्या घरांतील शिकवण कमी पडते आहे की आमच्या संस्कृतीत युगानुयुगे रुजलेली स्त्रीपुरुषविषमता नडते आहे? ज्या भारतीय संस्कृतीचे आपण गोडवे गातो, त्याच संस्कृतीने ज्यावेळी पुरुषाला अनेक लग्ने करण्याची मोकळीक दिली होती, त्यावेळी स्त्रीवर सतीहोण्याची अपेक्षा ठेवली होती हे आपल्याला विसरता येणार नाही. ही विषमतेची पाळेमुळे इतकी खोलवर गेलेली आहेत की, आजही, २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर, सतीचे उदात्तीकरण होत आहे. मुलींचे गर्भ पाडले जाताहेत, सुना जाळल्या जाताहेत आणि आता हे खुनाचे सत्र सुरू झाले आहे. अंतर्मुख व्हायला हवे. विचारमंथन व्हायला हवे. शाळाकॉलेजातून लैंगिक शिक्षण आणि नीतिशिक्षण द्यायला हवे असा एक विचार पुढे येत आहे. या मार्गांनी हे प्रकार थांबतील? वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.
साँससारख्या मालिका प्रचारात्मक भूमिका न घेता, अनिष्टतेवर बोट ठेवून कलेच्या माध्यमातून एक संदेश घरोघरी पोचविण्याचे कार्य परिणामकारक रीतीने करू शकतात. या काळाची ती गरज नाही का?