आजचा सुधारकचा मी नियमित वाचक आहे. निखळ विवेकवादाचा पुरस्कार करणारे हे मासिक विचारी वाचकांच्या पसंतीस उतरावे यात तिळमात्र शंका नाही.
पण मला खटकणारी एक गोष्ट म्हणजे ऊठसूठ परमेश्वराची कुरापत काढण्याची थोडीही संधी हे मासिक वाया जाऊ देत नाही.
“अध्यात्म:” एक प्रचंड गोंधळ’ हा मे, ९९ च्या अंकातील लेख हा त्याच पठडीतला म्हणावा लागेल.
माझ्याही मनात त्याने गोंधळ होतो. त्याची कारणे अशी –
१. नसलेल्या परमेश्वराची चर्चा कशाला करायची? त्याला महत्त्व देऊन ‘तो नाही’ हे सिद्ध करायला ‘आजचा सुधारक’ मधील बहुमूल्य पाने का खर्चायची? विवेकवादात तरी ते बसेल का?
२. यावर आजचा सुधारक म्हणणार की समाज परमेश्वर मानतो. त्याचेवर लोकांची श्रद्धा/अंधश्रद्धा असते. परिणामी माणसे चुकीच्या कल्पनांच्या आहारी जातात; व सामाजिक विकास खुटतो. म्हणून विवेकाच्या आधाराने त्यांना ‘तो नाही’ हे पटवून देण्याचा प्रपंच करावा लागतो. हेही एकपरीने मान्य होण्यासारखे आहे. पण यात लोक खरोखरच परमेश्वर मानतात हे गृहीत धरलेले आहे. माझ्या मते तेच मुळात चुकीचे आहे.
३. ईश्वर निर्गुण-निराकार आहे. सद्भक्तांसाठी तो सगुणसाकार आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वगुणसंपन्न व सर्वत्र असूनही पुन्हा दशांगुळे उरला आहे. तो न्यायी व दयाशीलही आहे. अशी सामान्यतः मूळ ईश्वरविषयक कल्पना आहे. बहुसंख्यच काय जवळजवळ सर्वच सगुण साकाराचीच पूजा करतात.
४. भारतात गावागणिक असंख्य देवालये आहेत. तीर्थक्षेत्रे आहेत. यात्राजत्रा भरतात. कुंभमेळे चालू असतात. कीर्तने-प्रवचने सदासर्वकाळ होतात. भक्तांची भाऊगर्दी प्रत्येक ठिकाणी हजरच, भक्तीचे उधाण इतके की अनेकदा भक्तगण चेंगरूनही मरतात. इतका हरिभक्तीचा आक्रोश भारतभर तिन्ही त्रिकाळ सुरू असतो. जागृत व नवसाला पावणाच्या देवस्थानाबाबत तर विचारायलाच नको. तिथे जायला तर स्वतंत्र बसेस व यात्रा स्पेशल असतात. समस्त भारत दोन्ही वाहू उभारून ईश्वराचा जयजयकार करीत असलेला दिसेल.
५. मला प्रश्न असा पडतो की हे सर्व होत असताना लोकांच्या दैनंदिन आचरणात इष्ट असा फरक कसा जाणवत नाही? बस, स्टॅडला लागली की प्रवाशांचे लोंढे जागा पकडण्यासाठी हाणामारी करत का धावतात? चारही धाम करणारा व्यापारी काळा पैसा का कमावितो? गळ्यांत तुळशीमाळा घालणारे, चोरटेपणाने अश्लील चित्रपट का बघू पाहतात? भारतात धार्मिकतेचा उदो उदो होत असताना, भ्रष्टाचार ईश्वराच्या वरोवरीने सर्वत्र का आढळतो? श्रेष्ठ राजकारणी मुत्सद्दी, व वैज्ञानिकही कोणातरी बाबाच्या मागे का लागतात? परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारेच असे का वागतात?
६. उत्तर एकच निघते. ते परमेश्वर मनापासून मानतच नाहीत. ते स्वार्थी व ढोंगी आहेत. “आम्ही मोठे भक्त आहोत’ हाच डांगोरा पिटण्यात त्यांना फक्त स्वार्थी समाधान हवे असते व ते ते मिळवितात; व स्वतःला प्रतिष्ठावान समजून चालतात. ‘असला तर पावेल, नसला तर गेला उडत’ अशा हिशेबाने वागणारेही काही कमी नाहीत. मुळात म्हणजे ते ईश्वर मानतच नाहीत. ‘देह जावो, अथवा राहो’ ह्या कुळीची त्यांची श्रद्धा नसतेच. मुळात तो (ईश्वर) नाहीच ही त्यांची पक्की समजूत असते. तसे नसते तर त्यांच्या दैनंदिन आचरणात फरक जाणवला असता. ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादावर सुरेख प्रवचन करणारा, त्याच्या ठरलेल्या बिदागीत रुपया कमी पडला तर एकदम संतापतो यावरून काय समजायचे?
७. वरील दृष्टिकोन लक्षात घेता सर्वसामान्यपणे बाह्यतः ईश्वरपरायणतेची कितीही अवडंबरे व सोंगे दिसत असली तरी त्यांच्या वागणुकीवरून ते ईश्वर मानतात असा भरवसा देता येत नाही व तसा निष्कर्षही निघत नाही. खरे म्हणजे ‘तो नाही’ हे ज्यांना मनातून वाटते त्यांना ‘तो नाहीच’ हे पटवून देण्याचा आटापिटा विवेकवादी का करतात व स्वतःची शक्ती वाया का घालवितात हेच समजत नाही.
८. तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा।।
पूजा केली होय अपारा । तोषालागी।।
स्वतःच्या सत्कर्मकुसुमांनी परमेश्वराची पूजा भक्तांनी केली तर ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. असे जर आहे तर लोक देवळांत, देवघरांत बसून पूजा करण्याऐवजी सत्कर्मांतच का रमत नाहीत?
जयाच्या ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा।
सुखासि चढावा । जयाचे असणे।।
अर्जुना, त्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही (ज्याला कशाचीही जरूरी नाही) आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो – असे जर आहे तर निरपेक्ष सत्कर्माचा आश्रय हे तथाकथित आस्तिक व ढोंगी का घेत नाहीत? कारण एकच आहे. त्यांचा परमेश्वर स्वार्थापोटी व अहं गोंजारण्या-पुरताच असतो. मुळात त्यांचा परमेश्वरच नसतो. असतो तो तोंडी लावण्याकरता- नावापुरताच. अशांना परमेश्वराचे नास्तित्व पटवून देण्याच्या फंदात विवेकवाद्यांनी पडू नये. कारण त्यांची संख्या प्रचंड आहे. देवांचे देव्हारे माजविण्यात ते माहिर आहेत. परमेश्वर त्यांचे भांडवल आहे व त्यांचे कातडे गेंड्याचे आहे.
९. परमेश्वरावर श्रद्धा असणारे (वा विवेकवाद्यांच्या मते अंधश्रद्धा ठेवणारे) खरेखुरे भक्त जगात, असतीलही व आहेतही. पण त्यांची संख्या जगाच्या लोकसंख्येच्या एक शतांश टक्काही भरणार नाही. ते परमेश्वराची पूजा सत्कर्माच्या माध्यमातून व निरपेक्षपणे करीत राहणार. एक शतांश टक्क्याहून कमी भरणारी ही ईश्वरभक्तांची मांदियाळी एकाकीपणे निष्काम कर्मयोगात गुंतलेली आहे. त्यांचेपासून समाजाला तोटा नाहीच. उलट समाजाचे हितच ते करीत असतात. त्यांच्या निरपेक्ष व निरलस सेवेने समाजच त्यांचा ऋणाईत होतो अशी वस्तुस्थिती असते. त्यांच्यापासून विवेकवाद्यांनाही धोका नाही. त्यांना परमेश्वर नाही हे समजावून सांगण्यात मतलब नाही. कारण त्यांचा परमेश्वर निरपेक्ष सत्कर्मातच त्यांना सापडतो. हे सत्य विवेकवाद्यांच्या शब्दांच्या जादूत अडकतच नाही. –
हे शब्देविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे।
बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी।।