आधी ताज्या वैद्यकीय संशोधनाचा आढावा घेऊ –
(क) स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था (Immune System) पुरुषांच्या तशाच व्यवस्थेपेक्षा बरीच जास्त प्रमाणात नियंत्रित असते. शरीरात ‘घुसणाच्या बाहेरच्या जीवाणूंशी स्त्रियांची शरीरे जास्त जोमाने लढतात, तर पुरुषांच्या बाबतीत हा प्रतिसाद (तुलनेने) सौम्य असतो. गर्भारपणात मात्र स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था बरीच मंदावते, पण बाळंतपण होताच ती पुन्हा पूर्ववत होते. प्रतिरक्षेच्या कार्यक्षमतेतील या चढउतारांचा संबंध स्त्रियांना जास्त प्रमाणात सतावणा-या ल्यूपस (Lupus), संधिवात ‘व मल्टिपल स्क्लेरॉसिस वगैरे आजारांशी लावला गेला आहे. या सर्व आजारांमध्ये शरीरांची प्रतिरक्षा-यंत्रणा शरीराच्याच उपांगांशी झगडू लागते!
(ख) सरासरीने पाहता पुरुषांना ज्या वयात हृदयविकाराचा पहिला झटका येतो, त्यापेक्षा स्त्रियांना असे झटके दहा वर्षे उशीराने येतात – पण झटक्याच्या वेळी वयस्क असल्याने स्त्रिया अशा झटक्यांमुळे दगावण्याचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. स्त्रियांच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळणारा एस्ट्रोजेन (Estrogen) हा हॉर्मोन (Hormone) रक्तवाहिन्यांना लवचीक ठेवून स्त्रियांना हृदयविकारापासून संरक्षण देतो. मासिक पाळी बंद झाल्यावर मात्र या हॉर्मोनचे प्रमाण बरेच कमी होते. जर हा हॉर्मोन शरीराला पुरवत राहिला गेला, तर मात्र वयस्क स्त्रियांमधील हृदयविकाराचे प्रमाण घटते.
(ग) क्रीडा व इतर तत्सम शारीरिक श्रमांच्या क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भाग घेतात. पण गुडघ्यांचे सांधे दुखावण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आढळते. याचा संबंध स्त्रियांच्या जास्त रुंदावलेल्या पायांच्या अस्थिरचनेशी जोडता येतो.
(घ) मासिक पाळी बंद झाल्यावर स्त्रियांची हाडे पुरुषांपेक्षा जास्त वेगाने भुसभुशीत होतात. यातून ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) सारखे आजार उद्भवतात. एस्ट्रोजेनचा पुरवठा हा अस्थिह्रास थांबवू शकतो.
(च) सारखेच अन्न खाणा-या स्त्रीपुरुषांमध्ये स्त्रियांना अन्नपचन व्हायला बराच जास्त वेळ लागताना दिसतो. बहुधा यामुळे स्त्रियांमध्ये आतड्यांचे विकार पुरुषांच्या दुप्पट प्रमाणात आढळतात. बद्धकोष्ठाचे प्रमाण तर स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तिप्पट प्रमाणात आढळते.
(छ) स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेदना जास्त वेळा व जास्त तीव्रतेने जाणवतात. स्त्रियांना लागू पडणारी वेदनाशामके पुरुषांच्या तशाच औषधांपेक्षा वेगळी असावीत,
असेही आढळते.
(ज) स्त्रियांना पुरुषांपेक्षा मेंदूपेक्षा कमी सेरोटोनिन (Serotonin) उत्पन्न करतात. सेरोटोनिन उत्पन्न करण्याच्या प्रमाणाचा ‘वैद्यकीय खिन्नते’ शी (Clinical Depression) संबंध आहे. यामुळे स्त्रियांना हा विकार पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात भोगावा लागतो. इथेही एस्ट्रोजेन पुरवल्याने बराच फरक पडताना दिसतो.
(झ) पुरुष स्त्रियांपेक्षा सरासरीने उंचीत दहा टक्के, वजनात वीस टक्के व ‘ताकदीत’ तीस टक्के जास्त असतात. हे फरक प्रामुख्याने शरीराच्या कमरेवरच्या भागात जाणवतात. पण स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी थकतात, असे दिसते. अमेरिकन सैन्यदलातील प्रयोगांमध्ये असे दिसले आहे की सहाच महिन्यांत सामान्य ‘स्त्रियाही पुरुषांच्याइतकी तंदुरुस्ती’ (fitness) गाठू शकतात.
(ट) स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त प्रमाणात डावखोरे किंवा रंगांधळे असतात.
(ठ) शरीराच्याच प्रमाणात स्त्रियांचे मेंदूही पुरुषांपेक्षा लहान असतात, पण मेंदूच्या आकाराच्या मानाने स्त्रियांमध्ये ‘न्यूरॉन’ (Neuron) उर्फ चेतापेशी जास्त असतात – म्हणजे स्त्रियांचे मेंदू पुरुषी मेंदूपेक्षा ‘दाट’ असतात!
(ड) एस्ट्रोजेन हा ‘बायकी’ हॉर्मोन आईअसे समजले जात असे, तर टेस्टोस्टेरोन (Testosterone) हा ‘पुरुषी’ हॉर्मोन आहे -हे खरे दिसत नाही. दोन्ही लिंगांच्या व्यक्तींमध्ये दोन्ही हॉर्मोन्ज आढळतात. तसेच जास्त टेस्टोस्टेरोन म्हणजे जास्त ‘मर्दानगी’, हे समीकरण चुकीचे ठरत आहे. मोठ्या हल्ल्यांआधी किंवा छत्रीधारी सैनिकांनी ‘उडी मारण्याआधी ‘टेस्टो’चे प्रमाण कमी होते, असे दिसून आले आहे.
आता उत्क्रांतीमुळे स्त्रीपुरुषांमध्ये जे फरक घडले असे मानतात, त्याबद्दलची ताजी मते पाहू –
(क) पुरुष शिकार करून अन्न कमावत असत, तर स्त्रिया मुले ‘जनत’ व वाढवत असत, हे जुने मत खोटे पडत आहे. शिकारीवर व अन्न गोळा करत जगणा-या टोळ्यांमध्ये आज तरी सत्तर टक्के कॅलरीज स्त्रिया कमावतात, व उरलेले तीस टक्के पुरुष कमावतात. आदिम मानवी हत्यारांपैकी दगडाच्या कुहाडी व बाणांची टोके जास्त प्रमाणात सापडतही असतील, पण कोठेकोठे पंचवीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये विणलेली कापडेही मातीच्या भांड्यावर खुणा उमटवून गेलेली दिसतात. अशी कापडे, मासे पकडायची जाळी वगैरे ‘हत्यारे’ स्त्रियांचा अन्न कमावणे-अन्न राखणे-अन्न साठवणे यात जास्त सहभाग असल्याची निदर्शक आहेत.
(ख) शिकारीच्या वेळी रडती मुले, कमकुवत स्त्रिया वगैरेंची अडचण होत असे, व म्हणून शिकार हे पुरुषांचे क्षेत्र होते, हे मतही फारसे खरे दिसत नाही! आदिम शिकार आजसारखी एकदोन ‘भालेराव’ किंवा बंदूकधान्यांकरवी केली जात नसे. जनावरांच्या झुंडींना हाकाटी करून कोंडीत पकडणे, किंवा कड्यांवरून उड्या मारून जायबंदी व्हायला लावणे, हे आदिम तंत्र होते. आज काँगोतीरावरचे म्बुटी (Mbuti) आदिवासी व गेल्या शतकातले रेड इंडियन्स अशी हाकाव्याची शिकार करतात व करीत. हाका-यानेच शिकार करायची तर कलकलाट करणारी पिलावळही उपयुक्तच! याला पूरक असे एक निरीक्षण हे, की बहुतांश मांसाहारी–शिकारी जीव हाका-याचीच शिकार करतात-वनराज सिंहही याला अपवाद नाही!
(ग) ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये शिकार हे बायकी काम समजले जाते. अनेक प्राचीन धर्मामध्ये शिकारीशी निगडित ‘देवी’ आहेत, ‘देव’ नव्हे. कझाकस्तानातील अडीच हजार वर्षांपूर्वीची ‘समाधिस्थाने स्त्रियांसोबत बाण, कट्यारी वगैरे पुरली जात असत, असे दाखवतात. एका बाईच्या प्रेतावशेषात तर हाडावर आदळून वाकलेले बाणाचे टोकही आहे!
एकूणच पुरुषांचा युसुत्सुपणा व बायकांची ‘नरमदिली’, या आज वादातीत बाबी उरलेल्या नाहीत.
पुरुष अनेक स्त्रियांकडे आकर्षित होऊन अनेक क्षेत्रां’ मध्ये ‘बीजे’ पसरवतात –याउलट स्त्रिया एकनिष्ठ असतात, हेही अर्धसत्य असू शकते. पुरुषां-बाबतचे अर्धे विधान सत्य असावे, पण बायकांच्या एकनिष्ठतेची खात्री देणे आज अवघड आहे. अरबस्तानात व लॅटिन’ देशांमध्ये ‘वाकडे’ पाऊल पडलेल्या स्त्रियांना बापांनी वा भावांनी मारणे नित्याचे आहे. काही आफ्रिकन जमातींमध्ये तरुण मुलींचे ‘क्लायटोरिस’ (clitoris) कापून त्यांच्या लैंगिक इच्छा कमी करायचा प्रयत्न केला जातो. अरबी भाषेतील ‘सुरस व चमत्कारिक’ कथांचा तर गाभाच स्वैराचारी स्त्रिया हा आहे!
माणूस हा प्राणी वीसेक लाख वर्षे या पृथ्वीवर आहे. यापैकी एक टक्का काळच तो (म्हणे) ‘सुसंस्कृत’ आहे. या काळातील सर्व ‘संस्कार’ (जे मुळात काही मूलप्रवृत्ती झाकण्यासाठी असतात!) टाळून जर ‘मानवी’ गुणधर्म शोधायचे असतील, तर अशी आपली अनेक मते पुनःपुन्हा तपासावी व गरज पडल्यास बदलावी लागतील.
(८ मार्च १९९९ च्या टाईम नियतकालिकातील ‘द टुथ अबाऊट विमेन्स बॉडीज’ या लेखातील काही मुद्द्यांचा हा सारांश आहे.)
गर्वाच्या खुट्यांच्या निमित्ताने
आशा ब्रह्म
जून १९९९ च्या आजचा सुधारक अंकात श्री. नंदा खरे यांचा ‘विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या’ हा लेख वाचण्यात आला. ‘भारतीयांनी परम-१००० घडवला, क्रायोजेनिक इंजिन घडवले व स्वस्तात उपग्रह अवकाशात सोडला, देवीचा रोग उपटून फेकून दिला त्याचा आणि आपले प्रधानमंत्री पाकिस्तानात गेले त्यांच्या bus diplomacy चा गर्व आपल्याला का वाटत नाही?’ हा प्रश्न चांगला आहे. त्यावर सुचलेले विचार :
अमेरिकेने महासंगणक द्यायचे नाकारल्यावर, भारताने त्याच्या खूप कमी खर्चात परम-१००० घडवला ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हा अभिमान निर्भेळ नाही. आपल्या शास्त्रज्ञात सामर्थ्य आहे हे जरी सिद्ध झाले असले तरी आपण आपल्या तज्ज्ञांना वाव का देत नाही? अमेरिकेने महासंगणक द्यायचे नाकारल्यावरच आपल्या तज्ज्ञांना आपली कुशलता सिद्ध करायची संधी मिळाली ही केवढी नामुष्कीची गोष्ट आहे. ह्या उलट जपान, दुस-या देशांनी बनवलेली यंत्रसामग्री हुबेहूब त्यांच्या सारखी बनवतो इतकेच नाही तर त्यामध्ये सुधारणा करतो व मग त्याच देशाला स्वस्तात निर्यात करतो. त्यामुळे जपानची आयात कमी होते आणि त्यायोगे परकीय चलन वाचते. तसेच तिथल्या लोकांना रोजगार मिळतो व त्यासंबंधी शिक्षण इ. ला ही प्रोत्साहन मिळते. पर्यायाने देशाची समृद्धी व राहणीमान आपोआपच वाढते. म्हणून भारताने जपानचे अनुकरण केल्यास आपले सध्याचे दारिद्र्य कमी होण्यास मदत होईल. ह्यात अडथळा आला तर आपल्या भ्रष्ट राजकारणी लोकांना आणि नोकरशाहीला आयात कमी केली तर आर्थिक लाभ कसा होणार? दूरदृष्टीचा किती अभाव! किती आप्पलपोटेपणा! किती स्वार्थ!
आपल्या प्रधानमंत्र्यांची बस राजनीती (bus diplomacy) वाखाणण्यासारखीच आहे. पण त्याबरोबर केवळ भावनांच्या आहारी जाऊन आपल्या सरहद्दवर शत्रु लढाईची तयारी करीत आहे ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष करायला नको होते. चिनी आक्रमणाच्या वेळेस असेच झाले. आपण ‘हिंदी चिनी भाई भाई’ चे नारे लावत होतो, तिकडे चीनचे सरकार आपल्याविरुद्ध लढाईची जय्यत तयारी करीत होते! परिणामी आपली युद्धाची पूर्वतयारी नसल्यामुळे भारतीय सेनेला बरीच प्राणहानी सोसावी लागली.
जगभरातून देवीच्या रोगाचे निर्मुलन झाले ही बाबही अभिमानास्पद आहे. पण ह्यात सिंहाचा वाटा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांचा व WHO (World Health Organization) च्या कर्मचा-यांचा आहे हे तसेच देवीचे जिवाणू रशिया व अमेरिका ह्यांच्या प्रयोगशाळेत (labs) अजून जिवंत आहेत हेही विसरून चालणार नाही.
इतिहासात थोडे मागे वळून पाहिले तर लक्षात येईल की झाशीची राणी लक्ष्मीबाई व अहिल्याबाई होळकर ह्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला तो त्या विधवा झाल्यावरच!
जेव्हा संसाधने (resources) मोजकी असतात, तेव्हा स्पर्धा ही आलीच. डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे सगळ्यांत लायक तो टिकणार! हे विधान सर्वमान्य आहे, त्यामुळे स्पर्धा जरी पूर्णपणे टाळता आल्या नाहीत तरी आपण आपल्या मानवसंसाधन-विकासाकडे (Human Resource Development) दुर्लक्ष करीत आहोत हे कटु सत्य आहे.