(१) धरणीकंपासारख्या प्रसंगीही महात्मा गांधीसारखे वकील ईश्वराचा चांगुलपणा सिद्ध करू पाहतात. त्याहून ताण युक्तिवाद एका कॅथॉलिक धर्मगुरूने केला. तो असा-कॅनडामधील माँट्रील शहरी एकदा एका सिनेमागृहाला आग लागली. तो खेळ मुद्दाम शाळेतील लहान मुलांसाठी होता. त्या आगीत सुमारे शंभर मुले जळून मेली. ती रोमन कॅथॉलिक पंथाच्या फ्रेंच लोकांची होती ईश्वराच्या दयाळूपणाचा हा विचित्र प्रकार ईश्वराला कमीपणा आणणारा होता. पण धर्मगुरू वस्ताद होते. त्यांनी असे पुकारले की शहरात पाप वाढल्यामुळे ईश्वराने लोकांना शिक्षा करण्याकरिता असा सूड घेतला. एकाने याहीपेक्षा जास्त कुशलतेने ईश्वराच्या दयाळू पणाचा खुलासा केला की, स्वर्गात देवदूत कमी झाले होते आणि ईश्वराला आणखी देवदूतांची गरज होती. लहान मुले निष्पाप असल्यामुळे मेल्याबरोबर एकदम स्वर्गात देवदूत होतात. तेव्हा बरीच मुले एकदम मारणे भाग होते. काय करील विचारा? सिनेमाला आग लावून त्याने आपली गरज भागवली.
(२) कोणता देव मोठा याबद्दल ज्यू आणि ख्रिस्ती धर्मात चुरस असते. एकदा एका ज्यू ने सोडतीचे तिकीट घेतले. आपल्या देवळातील देवाला तो म्हणाला, ‘देवा’, सोडतीतले १ ले बक्षीस आहे ५ लाखांचे, मी ते काही मागत नाही, पण दुसरे १ लाखाचे तरी निदान मला मिळवून दे. मी त्यातले १०० डॉलर खर्चुन तुझे देऊळ नवे करून देईन. पण त्याच्या दुर्दैवाने तेही बक्षीस लागले नाही. पुढच्या वेळी दुसरे तिकीट घेऊन तो ख्रिस्ती देवळात गेला. तसाच नवस केला आणि काय आश्चर्य! त्याला १ लाखाचे बक्षीस लागले. तो पक्का ज्यू. देऊळ कसचा वांधतो! तो इतकेच म्हणाला की, आमचाच देव ख्रिस्ती देवापेक्षा श्रेष्ठ, तो निदान माझ्या नवसाने फसला तरी नाही!
* * * * * * * * * * * * *
संपादक, आजचा सुधारक, यांस,
संपादकीय परिवर्तन समजले.
आग्रही आंदोलने ही आपली प्रकृती नव्हे. श्री. शंकरराव देवांची निराश मुद्रा मला अजूनही आठवते. समाजप्रबोधन-पत्रिकेच्या पहिल्या आम्हां सहका-यांशी ते बोलत होते.
तरीही आजचा सुधारकचा एकसुरीपणा आग्रहाने टाळावयास हवा. सुधारकच्या आद्य ब्रीदाशी आपले निकटचे नाते सांगणारे कितीतरी प्रश्न आज महाराष्ट्रात ऐरणीवर आहेत. हे नाते आजचा सुधारकने जागते जिवंत ठेवावयास हवे.
या दृष्टीने आपण विचार करणार असाल तेव्हा त्यात सक्रिय सहभाग घ्यावयास मला आवडेल. डिसेंबरमध्ये आपण पुण्यात एक बैठक घेणार होता. तिचे आता काय ठरले? त्या बैठकीत मी काही मांडणी करू शकेन.