मे ९९ च्या अंकातील दि.य. देशपांड्यांच्या सुमारे पाच पानी लेखावर जुलै ९९ च्या अंकात अनिलकुमार भाट्यांचे नऊ पानी उत्तर आहे; संतप्त आणि विस्तृत उत्तर आहे.
१) भाट्यांना दियदेंचे आत्म्याबाबतचे विवेचन पटत नाही. पण भाटे कशाला आत्मा म्हणतात हेही समजत नाही. ते फक्त सांगतात की “माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व (कल्पनांचा) माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही”. मग आत्मा आहे कशाशी संबंधित? असे काहीतरी मानवी व्यवहाराचे अंग असणारच, की ज्याच्या वर्णनासाठी ‘आत्मा’ हा शब्द घडवावा लागला आहे. आणि त्याचा माझ्याशी संबंध हवाच-जर आत्मा माझा असेल तर.
२) विवेकवादी दृष्टिकोन (दियदे आवृत्ती) यात ‘ज्ञान’ म्हणून ज्याला मान्यता द्यायची ते फक्त ऐंद्रिय माहितीवर अनुमाने रचूनच घडलेले हवे. त्यामुळे अध्यात्म तपासताना दियदे चर्मचक्षुच मानतात, ‘ज्ञानचक्षु’ नव्हे; आणि ह्यात आश्चर्य नाही. “आत्मा हा ज्ञानचक्षुनी पाहायचा असतो असे अध्यात्मात सांगितले जाते” – वकिली रूपक मांडायचे तर अध्यात्म हे ‘अंडरट्रायल’, ज्ञानचक्षु हा आरोपीनेच उभा केलेला आणि म्हणून शंकास्पद असा साक्षीदार, आणि आत्मा ही या साक्षीदाराची ‘जवानी’, विवेकवादाच्या ‘कोर्टात’ आरोपी कसा ‘सुटावा’? तेथे “आपली आत्म्याविषयीची कल्पना शरीरी मनाची आहे”, हेच मान्य होणार. आणि अर्थातच यानंतरचे भाट्यांचे “हे देशपांड्यांचे प्रतिपादन चूक आहे हे आपण वर पाहिले” (पृ. ११९) वगैरे ‘युक्तिवाद’ आमान्यच होणार!
३) “असामान्य’ अनुभव दियदे मानतात की नाकारतात हे सध्या त्यांच्यावर सोडू. पण ज्ञानेंद्रियांचे उत्पादन आणि त्यावर अनुमाने वांधणे, हाच जर ज्ञानाचा पाया मानला तर असामान्यत्व’ तपासणे महत्त्वाचे ठरते. जर अनुभवांना असामान्यत्व देणारे घटक ज्ञानेंद्रियांना किंवा अनुमाने लढवणा-या’ बुद्धीला झाकोळणारे असतील, तर अशा अनुभवांना ‘विचित्र’ हे विशेषण लागते, ‘भरवशाचे’ हे विशेषण नव्हे. भाट्यांनी २४ वर्षे अत्यंत परिश्रमाने योगसाधना व ध्यानसाधना केली आहे (जाने. ९९). माझ्या मते या क्रियांमध्ये अशी काही अंगे आहेत की ज्यामुळे ज्ञानेंद्रिये व बुद्धी झाकोळली जाण्याची दाट शक्यता आहे – उदा. आत्म-संमोहन, auto-suggestion, शरीराला ‘असामान्य’ ताण देणे, शरीरात खेळणा-या प्राणवायूचे चलन-वलन ‘असामान्य करणे, वगैरे. एंजिनीयर भाट्यांना अशी असामान्य (abnormal) स्थितीतली ‘उपकरणे चालतात का? जर या ‘साधनांनी’ काहीच असामान्यता येत नाही असे भाट्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी शरीरशास्त्रीय – मानसशास्त्रीय पुरावा द्यावा – ऐंद्रिय माहिती, त्यावर अनुमाने रचणे यातूनच आलेला.
४) मृत्यूला व्यक्तीचे रूप का द्यायचे? त्याचा ‘अवस्था’, ‘स्थिती’ असा विचार होऊ शकतो. मग ते “एका केसाने धरून मोकळे सोडणे” वगैरे अलंकारिक रूप जाऊन उत्तर येते, की माणूस मरण पावणे फार सोपे आहे! आणि हे समजायला, पटायला अध्यात्माची गरज नाही, तर विवेकवादही पुरतो.
आता आत्मा एका नजरेतून शरीराशी जोडलेलाच (फक्त) आहे. शरीर मेले की आत्मा संपलाच. मृत्यूनंतर ‘माझे काहीही टिकत नाही, या निष्कर्षाने जर मला दुःख होत नसेल, तर मला शारीर आत्मा मानायला कष्ट पडणार नाहीत. पण जर मी स्वतःची समजूत घालायला, मृत्यूनंतरही माझे काही तरी टिकते असे मानत असेन, तर माझी आत्म्याची कल्पना शारीर असणार नाही. जर मृत्यूनंतर काय होते यावर चर्मज्ञानेंद्रियांचाच पुरावा मानायचा, तर अशरीरी आत्मा हे आत्मप्रीतीचेच लक्षण वाटणार. त्यात काही गैर, ‘भयंकर’, ‘तर्कदुष्ट’ वगैरे नाही.
५) भाटे सांगतात की “माझ्या मते कर्मसिद्धान्त हा निर्विवादपणे निसर्गाचा मूलभूत नियम आहे. माझ्या माहितीतले निसर्ग-नियम हे ज्ञानेंद्रियांना वारंवार, निरपवादपणे जाणवणाच्या निसर्ग-व्यवहारातल्या ‘नियमिततेचे वर्णन करतात. यात कोणाचे काय ‘मत’ आहे याला वजन नाही. जर भाटे अमुक कर्माचे तमुक फल, या नाही तर त्या जन्मात लाभतेच असे उदाहरणांनी स्पष्ट करतील तरच त्यांना कर्मसिद्धान्ताला निसर्ग-नियमाचे ‘पद’ वहाल करता येईल-अन्यथा नाही.
६) जाने ९९ मधील भाटे जुलै ९९ मधील भाट्यांपेक्षा वेगळे आहेत. (क) जानेवारीत ते देवावरील भक्तीला, श्रद्धेला, ‘बकवास’ म्हणतात. जुलैमध्ये ‘ईश्वर’ ही संकल्पना मानायला त्यांना अडचण वाटत नाही. (ख) जानेवारीत त्यांना दियदेंचे विवेकवादावरचे लेख “विशेषतः – – – फारच आवडले” असे म्हणावेसे वाटते. जुलैमध्ये ते दियदेंना म्हणतात, “विशेषतः विवेकवादावरचे तुमचे लेख मला अगदीच निकृष्ट दर्जाचे वाटतात”. काय, झाले काय पाचच महिन्यांत?
७) भाटे उदाहरणे कोठेच देत नाहीत. ते भारतीय मंत्रिगणाप्रमाणे विरोधी मतांचे ‘जोरदार खंडन’ करतात म्हणजे फक्त ‘नाही, नाही, त्रिवार नाही’ असे म्हणतात! वर पदोपदी त्यांच्या अफाट ज्ञानाचे, त्यांना ‘Peers’ नी काय म्हटले व विख्यात प्रकाशनांत त्यांचे लेख कसे येत असतात वगैरेचे दाखले देतात.
८) त्याऐवजी त्यांनी काँटिनेंटल युरोपीय तत्त्वज्ञान, गेस्टॉल्ट मानसशास्त्र, ती अनेकानेक लॉजिके (चूकभूल देणे-घेणे) वगैरेंवर स्पष्ट, सोदाहरण लिहावे – पण कृपया थोडक्यात लिहावे. एकतीस पाने मजकुरात एखाद्या दृष्टिकोनाला रॅशनॅलिझम म्हणावे की नॉमिनॅलिझम असल्या ‘वाल की खाल’ प्रकाराला जागा देता येत नाही.
९) वैयक्तिक अनुभव किंवा दृष्टिकोन मांडणारे लेखन म्हणजे दुस-या व्यक्तीवर ‘वरसलेली’ शिवीगाळ नव्हे (पृ. १२५) – जर तसे असले तर ते कोणत्या
लॉजिकात बसते ते सांगावे.
आणि शेवटी खास संपादकांसाठी पण ‘जाहीर’ सूचना – इतर इतके महत्त्वाचे विषय आपले लेखक-वाचक चर्चेसाठी मांडत असताना ही पोरकट, शिवराळ पत्रे का छापावी? एक कच-याची टोपली घेऊ या का?