संपादकीया

श्री. ढाकुलकरांनी स्वामी विवेकानंदांच्या वचनांचा उल्लेख करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आणि स्टालिन ह्यांच्यातील संवादाचा आधार घेतला आहे. भाकरी ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती त्याच्या कृपेने ह्या जन्मात मिळते असे त्यांनी सूचित केले आहे. परमेश्वराच्या कृपेने मोक्ष मिळतो किंवा भाकरी त्याच्या कृपेशिवाय लाभत नाही असे स्वामी विवेकानंदांना वाटत होते. आम्हाला तसे वाटत नाही. ईश्वर नाही, मोक्ष नाही, आपले सर्व व्यवहार ह्या पृथ्वीतलावर घडतात; त्यांचा जमाखर्च परलोकात कोणीही ठेवत नाहीत असे आम्ही मानतो. मानवाच्या मनावर संस्कार करणा-या अनेक घटना त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत घडत असतात. हे संस्कार न तपासता स्वीकारले गेले की त्यांना श्रद्धांचे स्वरूप प्राप्त होते. ह्या संस्कारांमुळे म्हणजेच श्रद्धांमुळे माणूस घडतो इतकेच नाही तर आपले मनोबल तो त्यांमधून प्राप्त करतो. ज्या विषयांचा विचार करताना त्याला शीण होतो ते विषय तो ईश्वराच्या अधीन करून टाकतो. स्वतःला शिणवावयाला त्याला आवडत नाही. त्यापेक्षा ईश्वरावर भार टाकणे किती सोपे असते! ईश्वराचे अस्तित्वच मुळी मानवी कल्पनांच्या खेळातून निर्माण झालेले आहे हे आम्हाला कळलेले असल्यामुळे आम्ही -आजचे सुधारक- मानवाला देवाकडून मनोबल घ्यावे लागू नये असा प्रयत्न करतो.
श्री. ढाकुलकर पुढे लिहितात, ‘जगात दोन प्रकारचे ईश्वर अजूनही जिवंत आहेत : (१) मानवहितकेन्द्री आणि (२) पुरोहित-ब्राह्मणहितकेन्द्री.’ हे म्हणणे ढाकुलकरांचे स्वतःचे दिसते. त्याविषयी आम्हाला सांगावयाचे असे की मानवहित काय किंवा पुरोहितब्राह्मणांचे हित काय ईश्वर करीत नाही. हे दोन्ही प्रकारचे हित मानवाच्या वर्तनामुळेच घडत असते. अज्ञ माणसे पुरोहितब्राह्मणहित करतात, ती ईश्वराच्या सांगण्यावरून करीत नाहीत. ती आपल्या विचारपूर्वक न केलेल्या कृतीमुळे ते (पुरोहितब्राह्मणहित) करीत असतात. पुरोहितांच्या मध्यस्थीमुळे आपणावर परमेश्वराची कृपा होईल ह्या श्रद्धेमुळे करीत असतात. भूदेव (पुरोहित) प्रसन्न झाले की परमेश्वर प्रसन्न होईल अशा समजुतीने ते करतात.
आपल्या भारतात असे अनेक प्रदेश आहेत की जेथे जुना (पूर्वीपासून) पुरोहितब्राह्मणवर्ग नाही. ईशान्य भारतामध्ये (अरुणाचल, मिझोराम वगैरे) पुरोहित ब्राह्मण पोचलाच नसावा. अशा खूप मोठ्या प्रदेशात, (गडचिरोली, बस्तर इ.) म्हणजे आदिवासींच्या प्रदेशात ब्राह्मण आधीपासून होते असा पुरावा नाही. अशा अनेक जाती आपल्या भारतात आहेतज्या आपले पौरोहित्य आपल्याच जातीच्या लोकांकडून करून घेतात. ईश्वर असता आणि तो जर पुरोहित-हित-दक्ष असता तर ही पृथ्वी ईश्वराने निर्माण केलेली असल्यामुळे (!) जगात सर्वत्र, सगळ्या देशांमध्ये, पुरोहितब्राह्मणांचा आढळ झाला असता. तेथेही त्याने ब्राह्मण निर्माण केले असते. परंतु तसे झालेले नाही.
ह्या निमित्ताने म. फुल्यांच्या आणि आमच्या दृष्टिकोनात काय फरक आहे, हेही विशद करण्याचा यत्न करतो. कारण वर दिलेल्या पत्रात म. फुल्यांचे नाव आहे. पुरोहित-ब्राह्मणांचे वर्चस्व जसे म. फुल्यांना नको तसेच आम्हालाही नको. त्या बाबतीत त्यांचे आमचे एकमत आहे. (आम्हाला कोणाचेच वर्चस्व नको आहे. पुरुषांचे स्त्रियांवर नको, स्त्रियांचे पुरुषांवर नको —एका जातीचे दुसरीवर नको–कोणाचेच कोणावर नको.) परंतु ह्या वर्चस्वाचे कर्तृत्व ते पुरोहित-ब्राह्मणांकडे देतात. आम्ही ते मानवी मनावरच्या संस्कारांना देतो. दुसन्याने कोणतीही गोष्ट सांगितली असता ती तपासून न पाहता जशी सांगितली गेली तशीच बिनबोभाटपणे स्वीकारण्याच्या वृत्तीला देतो; श्रद्धेला देतो.
अशा वृत्तीला, अशा श्रद्धेला आमचा विरोध आहे, व्यक्तीला नाही. आमचा झगडा कोणत्याही एका मानवाशी किंवा मानवसमूहाशी नाही; तो श्रद्धेशी आहे. ईश्वर आहे ही जशी श्रद्धा आहे, तशीच आमची सगळी नुकसानी कोणीतरी दुसन्याने केली हीसुद्धा श्रद्धा आहे. मग तो दुसरा कधी मुसलमान राज्यकर्ता असतो, कधी ब्राह्मण पुरोहित असतो, तर कधी तो आणखी कोणीतरी असतो. पण ते खरे नाही. वास्तविक आमचे अहित आम्ही स्वतःच करीत असतो. सांगितलेले न तपासता स्वीकारण्याची, स्वतः विचार न करण्याची सवय आमचे नुकसान करीत असते.
सार्वजनिक हित म्हणजे काय हे आम्हा मंडळींना अजून समजलेलेच नाही. सर्वांचे हित हे ईश्वराने करावयाचे नसते. ते आपले आपण करावयाचे असते. सार्वजनिक हित कशात
आहे, मानवी हित कशात आहे ह्याचा विचार करता येऊ लागल्यानंतर त्याविषयी दुमत होण्याचे कारणच नाही. आपण येथे एक उदाहरण घेऊ या. लाच घेणारा जितका दोषी असतो तितकाच ती लाच देणाराही दोषी असतो. दोन्ही पक्षांकडे समान असतो. निदान असे आम्ही मानतो. पुरोहितवर्गवर्चस्व जर काही काळात वाढले असेल तर ते वाढण्यामध्ये जितके पुरोहित स्वतः दोषी आहेत तितकेच स्वतः विचार न करणारे, त्यांच्या कपटनीतीला बळी पडणारे इतरेजन आहेत. ह्या इतरेजनांच्या ठिकाणी बुद्धिमत्ता कमी होती आणि ब्राह्मणांनीच फक्त बुद्धिमत्तेचा ठेका घेतला होता, आणि परमेश्वर पिढ्यानुपिढ्या ब्राह्मणांचाच पक्षपाती होता असे आम्ही मुळीच मानत नाही. मग असे का घडले? पुरोहितवर्गवर्चस्व कशामुळे निर्माण झाले? ते विचार न केल्यामुळे निर्माण झाले. म्हणजेच श्रद्धेमुळे निर्माण झाले. सारेच श्रद्धालु. स्वतःला उच्च मानणारे ब्राह्मण श्रद्धालु आणि स्वतःला नीच मानणारे इतरेजन श्रद्धालु! श्रद्धालु म्हणजे विचारहीन! वाईट ह्याचे वाटते की आम्हा बहुतेक सान्यांना श्रद्धालु असण्याचे भूषण वाटते. तापीनर्मदेच्या उत्तरेला गेल्या शतकामध्ये तरी ब्राह्मणांचे वर्चस्व फार कमी दिसते. बंगालमध्ये वर्णभेद नसून वर्गभेद आहे. वर्णभेदाचा शाप दक्षिण भारतास आहे आणि तो आम्ही आमच्या विचार न करण्याच्या स्वभावामुळे भोगत आहोत.
श्री. ढाकुलकरांच्या सगळ्याच विधानांची दखल येथे घेत नाही.
आता दुस-या ‘एक वाचक’ ह्यांच्या पत्राविषयी –
आमच्या मागच्या अंकामधील स्फुट भारतीयांच्या परदेशी जाण्यास विरोध करण्यासाठी लिहिलेले नाही. धर्मान्तर न करताही हिंदूंच्या निष्ठा परदेशांशी जोडल्या जातात एवढा एकच मुद्दा मांडण्यासाठी ते लिहिले होते. धर्माचा उदोउदो आणि धर्मान्तराचा बाऊ मुख्यतः ज्यांच्याकडून केला जातो त्यांच्या कृतीचे वैयर्थ्य त्यांच्या ध्यानात आणून देण्यासाठी
आणि धर्माचा आणि राष्ट्रान्तराचा संबंध नाही ह्याकडे लक्ष वेधण्यासाठी ते स्फुट लिहिलेले होते, हे पुन्हा येथे सांगतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.