संपादकीय

सारेच श्रद्धालु!
गेल्या महिन्याचे संपादकीय आणि स्फुट लेख वाचून दोन चांगली पत्रे आली. त्यांपैकी ज्या एका पत्रलेखकाला आपले नाव प्रकट करावयाचे नाही त्यांचे पत्र अन्यत्र प्रकाशित करीत आहोत. दुसरे पत्र ह्याच संपादकीयामध्ये पुढे येणार आहे. ह्या दुस-या पत्राच्या निमित्ताने आम्ही आमचे विचार मांडणार आहोत.
आम्ही वेळोवेळी जी संपादकीये आणि स्फुटलेख लिहितो त्यांतून आम्ही आम्हाला कळलेल्या विवेकवादाच्या दृष्टिकोनातून काही घटनांचा परामर्श घेत असतो. अशा आमच्या लेखनावर आमच्या वाचकांपैकी सगळ्यांनी आपली काही ना काही प्रतिक्रिया द्यावी अशी आमची इच्छा असते पण ती नेहमीच पूर्ण होत नाही. पाळणाघरांची वाढ–एक अपप्रवृत्ती ह्या स्फुटाचा मात्र त्याला अपवाद घडला. त्याने पुष्कळ लोकांना लिहिते केले ह्यात संशय नाही.
आमचे मित्र श्री. नाना ढाकुलकर ह्यांचे आम्हाला आलेले पत्र खाली देत आहोत. त्यांच्या मतांशी आम्ही काही बाबतींत स्थूलपणे सहमत असलो तरी सगळ्या बाबतींत नाही. हा जो आमचा मतभेद आहे तो आमच्या दृष्टिकोनांतला फरक आहे.
श्री. ढाकुलकरांचे पत्र पुढीलप्रमाणे –
दोन ईश्वरांतील विद्रोह
भारताचे रशियातील राजदूत म्हणून मॉस्कोला डॉ. राधाकृष्णन् यांचे स्वागत करताना कॉ. स्टॅलिन यांनी मनमोकळेपणे विचारले होते– “आपण थोर तत्त्वज्ञ आहात. मी नास्तिक आहे. हिंदू धर्मग्रंथांचे मी मुळीच वाचन केलेले नाही. पण आपल्या हिंदुधर्मातील एका वास्तववादी महामानवाबद्दल मला विलक्षण आदर आहे. त्याचे नाव मला आठवत नाही. पण त्याचे एक वाक्य मी कदापि विसरू शकत नाही. तो म्हणाला होता, ‘भाकर हीच खरी परमेश्वराची शक्ति! या जन्मात भाकर मिळवून देण्याऐवजी माणसाला त्याच्या मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देण्याचे आमिष दाखविणारा ईश्वर मला मान्य नाही.’ या महामानवाचे नाव आपण मला सांगू शकाल?”
डॉ. राधाकृष्णन् यांचे डोळे डबडबले. गहिया आवाजात ते म्हणाले, “त्या महामानवाचे नाव आहे स्वामी विवेकानंद!” (श्री. वसंत पोतदार लिखित योद्धा संन्यासी मधून)
मार्च १९९९ च्या आजचा सुधारक मधील मुखपृष्ठावरील ‘पुरोहितब्राह्मणांना अनुकूल अशी समाजव्यवस्था’ (डॉ. सुमंत मुरंजन) वाचल्यावर स्वामी विवेकानंदांची काही वाक्ये आठवतात : ‘व्यासांनी वेदांचे चुकीचे अर्थ सांगितले ‘ब्राह्मण जेव्हा लिहावयास बसले तेव्हा त्यांनी अतिसामान्यांचे अधिकार नाकारले… त्यांनी इतरेजनांना अधःपतनाचेच शिक्षण दिले. …ढगांवर बसून पृथ्वीवरील मानवी व्यवहारांत लुडबूड करणारा ईश्वर? ईश्वराची ही केवढी क्रूर थट्टा आहे!’ वगैरे.
जगात दोन प्रकारचे ईश्वर अजून जिवंत आहेत: (१) मानवहित केंद्री (२) पुरोहित ब्राह्मणहित केंद्री. दुसन्या ईश्वराचे डिंडिम ढोल ताशे पुराणकाळापासून आजवर इतके अहर्निश वाजत आहेत की पहिल्या ईश्वराचे तुणतुणे लुप्त होऊन जाते. पुराणकाळापासून पहिल्या ईश्वरवाद्यांनी विद्रोह केले पण दुस-या ईश्वरवाद्यांनी त्यांना दडपून टाकले. गो. ग. आगरकर, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर, वगैरे आजच्या सुधारकांनी पुरोहितशाहीविरुद्ध जिहाद मांडला होता. त्यांच्याही पूर्वी म. जोतीराव फुल्यांनी पुरोहितशाही विरोधात आपल्या गावरान भाषेत विद्रोह आणि कृतिसत्रांनी मैलाचे दगड रोवले. आज आपण ते अंगीकारले परंतु फुले तत्त्वज्ञ नव्हते. त्यामुळे आजच्या सुधारकांना ते आजही ‘शूद्र’ अस्पृश्य वाटतात. ते असो. परंतु दुसन्या ईश्वरवाद्यांच्या विरोधात पहिल्या ईश्वरवाद्यांचा आवाज क्षीण का?
कारण आजही आपल्या पुरोगामी मनावर व देशावर नंबर दोनच्या ईश्वराचे व ईश्वरवाद्यांचे अधिराज्य आहे. म्हणूनच कविवर्य वसंत बापटांना व समस्त परिवर्तनवादी साहित्यिकांना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे खुलेआम ‘बैल’ म्हणू शकतात. कारण ९०% पुरोगामी बैल बाळासाहेबांच्या तोरणाखाली मखर लावून बसले आहेत. काही वर्णी लावून प्रतीक्षायादीत बसले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना अभिव्यक्ति(मत)स्वातंत्र्य एकट्याने विकत घ्यायला सोपे झाले आहे.
तत्त्वज्ञान हवे. विद्रोह सुद्धा हवा. कृतिसत्र तर हवेच हवे. फुले आंबेडकरी तत्त्वज्ञान,
विद्रोह अस्पृश्य वाटत असल्यास बाजूला ठेवावा. पण एवढे लक्षात असू द्यावे की फुले
आंबेडकरांच्या लेखणीकरणीवाणीविद्रोहामुळे आज वेगाने परिवर्तन घडून आले आहे. हे सत्य नाकारणे म्हणजे पहिल्या ईश्वराला नाकारणे ठरेल. फुले आंबेडकरांची विद्रोही भाषा नको असेल तर टाळावी. पण कालपरवाच तात्त्विक विद्रोही भाषेतून न्या. चंद्रशेखर माडखोलकर म्हणाले, “हिंदूंनी अस्पृश्यांना मंदिरे खुली केली पण स्वयंपाकगृहे खुली केली नाहीत.” यातील व्यापक अर्थ शोधावा. वाच्यार्थही खरा आहे. आजच्या सुधारकांनी (आगरकरवादी, फुलेवादी सुद्धा) अस्पृश्यांना बैठकीत घेतले; पण आमच्या स्वयंपाकगृहातील स्वयंपाकीण किंवों भांडेवाली बाई अस्पृश्यजातीची चालत नाही. (काहींची क्षमा मागून)
वेदवेदांगे कोळून प्यालेल्या स्वामी विवेकानंदांचे विद्रोही भाष्य बघावे, “आज कोणीही ब्राह्मण जिवंत नाही. जो स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेत असेल त्याने स्वतःला जाळून घ्यावे… पुरोहितांनी जातपात हिंदुधर्माच्या मानगुटीस बसविली… हे कधीच सुधारणार नाहीत त्यांना हाकलून लावा…” वगैरे निदान आ.सु. ने असा विद्रोह तरी दडपून ठेवू नये.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.