डॉ. प्रदीप पाटील यांनी (आजचा सुधारक मे-जून ९२) उपस्थित केलेल्या तेरा मुद्द्यांसंबंधी लिहिण्याची सुरुवात शेवटल्या वाक्यातील वैज्ञानिक’ या शब्दापासून करतो.
तंत्रवैज्ञानिक मार्ग वा उपाय म्हणजे काय हे चटकन कळते. वैज्ञानिक मार्ग म्हणजे काय?
आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या मर्यादेत बोलावयाचे तर भौतिक जगाविषयीचे एका विशिष्ट प्रकारचे ज्ञान म्हणजे (आधुनिक पाश्चात्य) विज्ञान होय. हे ज्ञान पक्के असते व ते स्थलकालनिरपेक्ष (युनिव्हर्सल) असते. या ज्ञानाचा उपयोग करून एखादा प्रश्न सोडवला गेल्यास वैज्ञानिक मार्गाने प्रश्न सोडविला असे म्हणता येईल. मग वैज्ञानिक = तंत्रवैज्ञानिक असे समीकरण होईल.
मेंदूच्या अमुक एका भागाला निष्क्रिय (वा सक्रिय) बनवले तर माणसे श्रद्धा/अंधश्रद्धामुक्त, बुद्धिप्रामाण्यवादी अटळपणे बनतात असे विज्ञान, समजा, आपणास प्राप्त झाले आहे. तर मग लहान मुलाला आज जशी ट्रिपलची इंजेक्शने वा पोलिओची लस देतात तशी मेंदूत काही इंजेक्शन देण्याची कृती करून बालपणापासूनच सर्व जण आदर्श इहवादी, बुद्धिप्रामाण्यवादी बनविता येतील. हा वैज्ञानिक/तंत्रवैज्ञानिक मार्ग होईल.
‘वैज्ञानिक’ म्हणत असताना मात्र हा अर्थ अभिप्रेत नव्हता असे बहुधा डॉ. पाटील म्हणतील. ‘चर्चात्मक’शी विरोधी, वा त्याहून वेगळा मार्ग सूचित करण्यासाठी त्यांनी ‘वैज्ञानिक हा शब्द वापरला आहे. विज्ञानाशी सुसंवादी आणि ज्याविषयी चर्चा करण्याचा घोळ घालत बसायची गरज नाही असा मार्ग/उपाय त्यांना हवा आहे असे म्हणता येईल. देवबीव काही नसतो, देवदेवतांच्या ठायी शक्ती असते हे झूट आहे हे विज्ञान आहे, आणि हे श्रद्धावान (म्हणजेचअंद्धश्रद्धाळू) लोकांकडून मान्य, स्वीकृत करवून घेताना चर्चा करीत बसण्याचे कारणनाही. अमुक एक गोष्ट विज्ञानाने भ्रामक, कपोलकल्पित आहे हे सिद्धच केल्यावर चर्चा ती कशासाठी करावयाची? क्षणभर समजा आपण हा युक्तिवाद मान्य केला तरी ही गोष्ट गळी उतरविण्याचा कोणता मार्ग विज्ञानाचा म्हणता येईल हे कसे ठरवावयाचे? एकमेव सत्य विज्ञानाचा प्रसार करून हे उद्दिष्ट गाठावयाचे म्हणजे वैज्ञानिक मार्गाचा अवलंब केला असेहोईल का?विज्ञानाचा प्रसार करण्याचे, प्रयोग, प्रात्यक्षिके इत्यादि कृतीद्वारा करीत असताना संवाद चर्चा करून प्रतिपक्षातील मंडळींना निरुत्तर करणे, पटवून देणे या गोष्टी विज्ञानाच्या प्रसाराचा भाग असतात. या अर्थाने तर हा मार्ग चर्चात्मक या कोटीतच समाविष्टकरावा लागतो.
विज्ञान, वैज्ञानिक पद्धती, विज्ञाननिष्ठा या शब्दांची डॉ. पाटील यांच्यावर मोहिनी पडलेली आहे. तशी ती अनेकानेक व्यक्तींवर पडलेली आढळून येते. पण, दुदैवाने, या शब्दांनी पुरेशी स्पष्टता करून घेतली गेल्याचे आढळत नाही.
पृथ्वीचा आकार चौकोनी आहे की गोल आहे, पृथ्वीभोवती सूर्य व ग्रहतारे फिरतात की सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत येणारे प्रश्न आहेत. या सर्व विश्वाचा कोणी निर्माता आहे का? हे विश्व एका चैतन्यतत्त्वाचा आविष्कार आहे का? विश्वातील घडामोडींना काही दिशा, लक्ष्य, हेतू आहे का? हे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत न येणारे प्रश्न आहेत. विज्ञान हे एक प्रकारचे ज्ञान आहे. ते ज्ञान संकल्पनांच्या व गृहीतकृत्यांच्या एका चौकटीत प्राप्त करून घेतलेले ज्ञान असते. या ज्ञानाला चौकटीच्याही मर्यादा पडतात आणि कोणत्याही एका क्षणी ते अपुरे असते, या अपुरेपणाच्याही मर्यादा असतात. उदाहरणार्थ, कुटुंबातील वा समाजातील इतरांशी, प्राण्यांशी, निसर्गसृष्टीशी माझे वागणे कसे असावे हा प्रश्न चौकटीच्या बाहेरचा असल्याने विज्ञान अशा प्रश्नांच्या बाबतीत स्वतः होऊन काही सांगत नाही. कसे वागावे?’ या प्रकारचे प्रश्न गैर वा अयोग्य वा अनावश्यक आहेत असेही सांगत नाही. काटेकोरपणे विचार केला तर विज्ञानाच्या मर्यादित ईश्वराचे अस्तित्व सिद्ध न करता येणारे आहे, एवढेच सांगून विज्ञान थांबते. ईश्वर नावाची शक्ती असेलही, पण ती विज्ञान ज्या भौतिक विश्वाच्या ज्या चौकटीत अभ्यास करते त्या भौतिक विश्वाच्या त्या चौकटीत निदान अद्याप तरी सापडलेली नाही, इतके नम्र विधान विज्ञान करील. ईश्वर आहे हे सत्य असलेच तर ते वेगळ्या कोटीतले सत्य आहे, आणि ते जाणण्याची रीत वेगळी असेल एवढेच विज्ञान म्हणेल.
ईश्वर नावाची काही गोष्ट नसतेच. ती एक माणसाने स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेली काल्पनिक-मानसिक संकल्पना आहे असे स्वीकारू या. तरी देखील, अशी संकल्पना निर्माण करू नये, तिचे अस्तित्व खरे मानून श्रद्धा बाळगू नये, असे विज्ञान सांगत नाही. विज्ञानाच्या चौकटीत जे ज्ञान प्राप्त होत नाही ते ज्ञानच नव्हे, आणि जे ज्ञान नाही त्यावर श्रद्धा ठेवू नये हा निर्णय विज्ञानाचा निर्णय नसतो. तो माणसाने स्वतंत्रपणे केलेला निर्णय असतो. या अर्थाने तोही तेवढाच अ-वैज्ञानिक निर्णय म्हणावा लागतो.
राहतो तो वैज्ञानिक पद्धतीचा मुद्दा. वैज्ञानिक पद्धत ही एकच एक पद्धती आहे अशी समजूत वैज्ञानिक संशोधनाशी केवळ ऐकीव संबंध असणार्यांैची असते. क्रमिकपुस्तकामधून वा लोकप्रिय लेखनामधून आपण ती ग्रहण केलेली असते. पण खुद्द वैज्ञानिक एकच एक पद्धतीला चिकटून राहतात असे आढळत नाही. भौतिकी, रसायनशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांमध्ये ‘एक्स्पेरिमेंटल सायंटिस्ट्स’ आणि ‘थिओरेटिकल सायंटिस्ट्स असा ठळक भेद केला जातो. अगदी वेगळ्या प्रकारच्या क्षमता यांना आधारभूत असतात. अनेक विषय आज असे आहेत की ज्यांच्या संशोधनासाठी, प्रख्यात भौतिकी शास्त्रज्ञ फाइनमन यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त कागद व पेन्सिल हीच साधने लागतात. अनेक वेळा पुराव्याचा आधार नसताना तार्किक संगतीच्या दृष्टीने, ‘चित्र पूर्ण करण्याच्या दृष्टीने गणित सोडविण्याच्या दृष्टीने गोष्टी कल्पिणे वैज्ञानिक पद्धतीशी सुसंगत मानले जाते. पडताळा नंतर, काही वेळा अनेक अर्थाने मिळतो. भौतिक विश्व व त्यामधील घडामोडी यांच्या मुळाशी एक गणिती नियमबद्ध व्यवस्था (‘आर्डर) आहे या गृहीतकृत्यांशी सुसंगत अशा कल्पना करण्यास वैज्ञानिक पद्धत आड येत नाही. उलट अशा कल्पनांचा ती सतत उपयोग करून घेत असते. ‘गॉड डझ नॉट प्ले डाइस’हे आइन्स्टाइनचे उद्गार प्रसिद्ध आहेत.
या अंगाने पाहिल्यास ईश्वर, त्याची सर्वशक्तिमानता यांची मानवाने केलेली कल्पना ही वैज्ञानिक पद्धतीशी सुसंगत अशी कल्पना आहे हे लक्षात येईल. वैयक्तिक व सामूहिक पातळीवर माणसांचे स्वतःशी व परस्परांशी जे व्यवहार होतात, जगताना व्यक्ती व समूह म्हणून माणसांना निसर्गसृष्टीचा जो अनुभव येतो तो अनुभवांच्या एका पातळीवर अव्यवस्थित, लहरी, जुगारी असतो. कशालाच काही अर्थ नाही,अव्यवस्था हीच ‘व्यवस्था आहे. आणि मृत्यूने सारे संपते अशी तार्किकदृष्ट्या सुसंगत भूमिका घेणे शक्य आहे. पण ही भूमिका व्यक्तिशः स्वीकारणान्यांनाही जगत राहणार्याप संदर्भात स्वतःची स्वतःपुरती तरी व्यवस्था निर्माण करून जीवन अर्थपूर्ण बनवावे लागते. तेव्हा, जगात एक व्यवस्था, ‘ईश्वरी व्यवस्था’ आहे, तिची उकल होऊ शकते, आणि त्या व्यवस्थेच्या नियमांनुसार जीवन जगले पाहिजे ही भूमिका भौतिक विश्वाच्या संदर्भात त्या आइनस्टाइनच्या उद्गाराशी संवादी आहे हे लक्षात येईल.
इथे अडचण आहे ती ‘मन’ नावाच्या गोष्टीची. आत्मभानसंपन्न, इच्छा-प्रेरणा असणारा, कर्तेपणाची देणगी व जबाबदारी असलेला अगदी वेगळ्याच कोटीतला मनुष्य हा प्राणी आहे. स्वयंप्रेरणेने (‘फ्री वुईल) माणूस कृती करू शकत नसता तर भौतिक विश्वाची ‘ईश्वरी व्यवस्था’ शोधून काढण्यासाठी ज्या रीती, पद्धती पुरेशा आहेत त्याच येथेही पुरेशा ठरल्या असत्या. मानवी अनुभव व व्यवहार यांच्या क्षेत्रात व्यवस्था अशी काही नाहीच असेही म्हणता येते. आणि ईश्वरी व्यवस्था आहे असे म्हटले तरी, तिची अगणित प्रकारे उकल करता येणे नेहमीच शक्य राहते.
पण समाजाची धारणा व्हावयाची असेल, व्यक्तींची समाधानकारक जडणघडण व्हावयाची असेल (म्हणजेच व्यक्तींचीही धारणा व्हायची असेल), जीवन सुरळीतपणे चालावयाचे असेल, माणसांना स्वास्थ्य, समाधान व शांती लाभावयाची असेल तर समाजाला समाईक अशी व जिचे प्रामाण्य सर्वांना स्थूलमानाने मान्य आहे अशी व्यवस्था असली पाहिजे.
भौतिक विश्वाच्या मुळाशी असलेली व्यवस्था शोधण्याची पद्धती आणि हीव्यवस्था ‘शोधण्याची रीत या एकच असू शकत नाहीत. अपौरुषेय श्रुतींचे प्रामाण्य, ईश्वरी संदेशाचे प्रामाण्य जर आपण स्वीकारले तर चर्चात्मकता आपण टाळू शकतो. वेद, कुराण, बायबल वचन असे आहे व त्याचा अधिकृत अर्थ असा असा आहे, आणि हे शास्त्रवचन आहे असे म्हणता येते. धर्मपीठे, धर्मशास्त्रे, पुरोहितवर्ग हे या अर्थाने वस्तुतः आपले म्हणणेच एकमेव शास्त्रपूत आहे असा दावा करीत असतात. ‘वैज्ञानिक’ च्या अधिक जवळची ही भूमिका म्हणता येईल. पण व्यवस्था ईश्वरी असली तरी, तिचा शोध मी माझ्या सदसद्विवेकाला स्मरून व प्रामाणिक राहून करणार व केला पाहिजे अशी जर भूमिका घेतली तर मुक्त, सखोल व निरंतर विचारविमर्श (चर्चात्मक) हीच पद्धती अनुरूप ठरते.
एकदा आपण सदसदविवेकाचा आधार घेण्याच्या भूमिकेवर आलो की धर्मचिकित्सेचा मार्ग खुला होतो. ईश्वर, त्याची सर्वशक्तिमानता यांची अवनत रूपे व त्यांचा अवनत आशय यांची पकड ढिली पडू शकते. धार्मिक-सामाजिक सुधारणांनी प्रक्रिया गतिमान होते. चिकित्सेचे (म्हणजेच चर्चेचे) स्थान व महत्त्व मध्यवर्ती आहे. पुरोहितवर्ग व धर्मपीठे म्हणूनच सदसदविवेकाधिष्ठित चिकित्सेला एवढ्या प्राणपणाने विरोध करतात, ती दडपून टाकतात, चिकित्सा करणार्यांषचा छळ करतात.
आता मी डॉ. पाटील यांच्या प्रश्नांकडे वळतो.
१. धर्म, धर्मग्रंथ, धर्मपीठे यांचा प्रभाव शून्य करणे हे तातडीचे पूर्णतया इष्ट व आवश्यक लक्ष्य आहे असे मी मानीत नाही. ते व्यवहार्य उद्दिष्ट आहे असेही मला दिसत नाही.
धर्म काय सांगतो, धर्माचरण कशाला म्हणावयाचे, धर्मपालन करावयाचे झाल्यास कोणते विधी/संस्कार केले पाहिजेत याबद्दलच्या विभिन्न कर्माच्या अनुयायांमध्ये जी समज प्रचलित आहे व त्यांचा जो व्यवहार होतो यात हिणकस व त्याज्य भाग बराच आहे. त्याचवेळी सर्वसामान्य बहुसंख्य माणसांच्या सदसदविवेकाचे, नैतिकतेचे, माणुसकीचे अधिष्ठान धर्मश्रद्धा, धर्माची शिकवणूक हे आहे. कोणत्याच समाजात राजकीय-सामाजिक विचारप्रणाली वा राज्यघटना वा कायदे हे कार्य पार पाडू शकतील असे मला दिसत नाही.
५ व्या प्रश्नात डॉ. पाटील यांनी डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची नावे घेतली आहेत. महात्मा फुले यांनी नव्या सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी केली, तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तर बौद्ध धम्माची दीक्षा विधिपूर्वक घेतलीच, पण लाखो अनुयायांना देवविली. इतकेच नाही तर भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या धर्मग्रंथाची रचना जाणीवपूर्वक केली.
नास्तिक व अज्ञेयवादी प्रत्येक समाजातच तुरळक संख्येने निर्माण होत आले आहेत, पण त्यांचे स्थान व कार्य गौण राहिले आहे. समाजाचा मुख्य प्रवाह धार्मिक असतो. म्हणून थोडे लोक, एखादा संप्रदाय नास्तिक व अज्ञेयवादी असला तर ती गोष्ट खपून जाते; किंबहुना, समाजास यांचा उपयोगही होतो.
धर्मचिकित्सा आणि धर्माचे परिष्करण ही प्रक्रिया अखंड होत राहून कर्माचेअधिकाधिक उन्नत रूप समाजात प्रसृत व स्वीकृत होणे अगत्याचे आहे. धर्मग्रंथांना पुढे करून प्रतिपादले जाणारे शब्दप्रामाण्य आणि धर्मपीठांचे सत्ताकारण (आर्थिक, राजकीय व सामाजिक अर्थीनी) यांचा या गोष्टीला विरोध होतो ही गोष्ट खरी.
धर्मग्रंथांच्या बाबतीत बायबल वा कुराण यांच्यासारखे जेव्हा त्यांचे स्थान समाजात असते तेव्हा प्रोटेस्टंट रेफर्मेशनच्या धर्तीची चळवळ सतत होत राहणे सर्वाधिक उपकारक ठरते. ग्रंथाचे प्रामाण्य समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न धर्मसुधारणेच्या दृष्टीने घातकी ठरतो.
धर्मपीठांच्या बाबतीत एकाच केंद्रीभूत पीठाच्या हाती राजकीय, आर्थिक व सामाजिक सत्ता एकवटू नये, अनेक धर्मपीठे असावीत व त्यांच्यातील भेदाभेदांमुळे बहुमुखी, विकेंद्रित स्थिती निर्माण होऊन ती टिकावी याला जास्त महत्त्व आहे. धर्मपीठांच्या अखत्यारीत असलेले अनेक विषय, व्यवहार व कार्ये आज अन्य संस्थांच्या अधिकारात आहेत. मुस्लिम पर्सनल लॉचे उदाहरण घेतले तरी काय आढळते? कायदा, त्याचा लावला जाणारा अर्थ व विशिष्ट प्रकरणी दिले जाणारे निकाल यांच्याविषयी आपले अनेक आक्षेप असतील. पण असा व्यक्तिगत कायदा करण्याचा अधिकार राज्यसत्तेस आहे; कायद्यानुसार निवाडे करण्याचे काम न्यायसंस्थेचे आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
डॉ. पाटील यांनी आणखी एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे. धर्मपीठांचे वैध कार्यक्षेत्र/अधिकारक्षेत्र कोणते, त्यांचे काम कोणती पथ्ये सांभाळून व्हायला हवे याचे इतिहासाच्या वाटचालीत जे निर्णय आज लागले आहेत ते स्थूलमानाने पुरेसे आहेत. सेक्युलर राज्यव्यवस्थेने घालून दिलेल्या मर्यादेत धर्मपीठांना आपला प्रभाव पाडण्याची, कार्य करण्याची मोकळीक असणे नागरिकस्वातंत्र्ये व लोकशाही यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. धर्म, धर्मग्रंथ, धर्मपीठे, यांचे समूल निर्मूलन करणे, हे डॉ. पाटील यांचे लक्ष्य असू शकते. ते लक्ष्य गाठण्यासाठी लोकशाहीची पथ्ये व चौकट झुगारून न देण्याचे बंधन त्यांनी स्वीकारायला हवे. धर्मग्रंथ, धर्मपीठे, धर्म यांचा योग्य तो आदर राखून, त्यांचे हक्क व अधिकार यांचा सांभाळ करीतच निर्मूलनाचे कार्य त्यांना करायला हवे. म्हणजेच प्रबोधन, जागृती, संघटन व चळवळ हाच उपाय वा मार्ग ठरतो. एवढ्यापुरती ठोकशाहीच करायला हवी आहे असे म्हणणे गैर ठरते.
२. सतीबंदीचा कायदा, किंवा तत्सम अन्य कायदे हिंदू धर्मातील अमानुष स्वरूपाच्या विशिष्ट प्रथा थांबविण्याच्या हेतूने केले गेले. १८५७ च्या आधी धर्मदृष्ट्या नीच अवस्थेत असलेल्या हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याची स्वप्ने अनेकानेक ब्रिटिश अंमलदारांनी व धर्मप्रसारकांन जरूर पाहिली. पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा उद्देश धर्माचा प्रभाव कमी करणे व इहवादाला प्रामाण्य प्राप्त करून देणे हा नव्हता. सती प्रथा बंद करणे, संमतिवयाचा कायदा करणे आणि धर्माचा प्रभाव कमी करणे यांचे समीकरण घालणे चुकीचे आहे. दयानंद सरस्वतींच्या आर्यसमाजाने खच्या धर्माचा प्रभाव वाढविण्यासाठी अनेकानेक प्रथांचा अव्हेर केला. आर्यसमाजी हे त्यांच्या मते खच्या वैदिक धर्माचे अभिमानी असतात.
प्रत्येक धर्माच्या नावाने परंपरेने चालत आलेल्या अनेक चालीरीती, प्रथा, व्यवहार, कर्मकांड इत्यादि हीन स्वरूपाच्या असतात, वा कालबाह्य झाल्याने त्या उपकारक ठरण्याऐवजी जाचक, अन्यायकारक, शोषक बनलेल्या असतात. बोकड बळी देणे हे हीन चालीरीतीचे, तर तलाक हे कालबाह्य रूढीचे उदाहरण म्हणून देता येईल. धर्मग्रंथांमध्ये समाविष्ट अनेक भागदेखील त्याज्य असतात.यांचे उच्चाटन, निर्मूलन कसे करायचे ही भारतात विभिन्न धर्मीय समाजांमधील सुधारक बंडखोरांपुढील निकडीची समस्या आहे.
धर्माच्या नावाने रुजलेल्या अनेक समजुती व श्रद्धा या भौतिक विश्वातील घडामोडींच्या सदंर्भातल्या आहेत, व त्या विज्ञानाच्या प्रकाशात अंधश्रद्धा ठरतात. अशा श्रद्धा/समजुतींच्या जोरावर पैसा वा प्रतिष्ठा वा प्रभाव वा अन्य लाभ पदरात पाडून घेण्याचा धंदा करणारी मंडळीही समाजात आहेत. श्रद्धाळू लोकांपर्यंत विज्ञानाचा प्रसार करणे हा एक मार्ग झाला. दुसरा वरील प्रकारच्या फसवणुकीचा धंदा करणार्याक व्यक्तींना उघडे पाडणे हा. हा दृश्य स्वरूपात लढाऊ रूप धारण करू शकतो. यामुळे याचे आकर्षण अधिक वाटते. खोट्या, बनेल व दांडगट व्यक्तींना उघडे पाडण्यात यश आले तर श्रद्धाळू लोकांचाही पाठिंबा मिळतो. मात्र, श्रद्धा, समजुती गळून पडतीलच असे नाही. भौतिक व्यवहार बदलत गेल्याने आणि त्यामुळे विज्ञान हे त्या त्या क्षेत्रात प्रतिष्ठित व स्वीकृत होत गेल्याने दृष्टी बदलते. अनेक श्रद्धा, समजुती यांची पकड ढिली होत होत त्या विरून जातात. हा, म्हटले तर, तिसरा उपाय. यापैकी कोणताही मार्ग/उपाय याला ‘वैज्ञानिक उपाय/मार्ग असे म्हणने योग्य ठरणार नाही. विज्ञानाचे उपयोजन असलेले वैचारिक-सामाजिक प्रबोधनाचेच हे उपाय आहेत.
पण काही प्रकारच्या गोष्टी आर्थिक गुंतागुंतीच्या असतात. तलाक, हुंडा, पशुबळी, देवदासी, यासारख्या प्रथा किंवा जातपात, अस्पृश्यता यासारख्या सामाजिक संस्था, वा ग्रंथप्रामाण्य, धर्मपीठाचे अधिकार यांसारख्या अस्मितेशी खोलवर निगडित झालेल्या गोष्टी. अधिक लोकांपर्यंत विज्ञान पोचले, दैनंदिन लौकिक व्यवहार आधुनिक बनले, प्रागतिक कायदे केले, तरी या गोष्टींचे उच्चाटन सहजी होत नाही. कारण अडाणीपणा, निरक्षरता ही काही या गोष्टींच्या अस्तित्वामागची मुख्य कारणे नसतात. इतिहास, परंपरा, संस्कृती यांच्यात त्यांची खोलवर मुळे असतात. धारणा, मानस, अस्मिता, व्यक्तित्व यांची घडण त्यांच्या आधारे झालेली असते.
विज्ञानाचा प्रसार, जीवनाचे बदलते व्यवहार, आधुनिकता, अन्य समाज व संस्कृती यांचा आघात,प्रभाव,परिचय, वसाहतवादी प्रभुत्व वा पारतंत्र्य या सगळ्यांचा बदलत्या प्रकियेसाठी उपयोग होतो. आपणा भारतीयांना याचा अनुभव आहे. मुख्य उपयोग पुढील प्रकारे होतो : त्या त्या धर्मीय समाजात, जातीजमातीत बंडखोर व्यक्ती व प्रवाह उत्पन्न होतात. नवा दृष्टिकोन अंगीकारून, वेगळी मूल्ये, श्रेयःकल्पना स्वीकारून ‘सुधारकी जीवन जगणाच्या व्यक्ती व कुटुंबे ही संघर्ष व संवाद यांची केंद्रे बनतात. अशा व्यक्ती अनेकविध उपक्रम व्यक्तिशः या सामूहिक पातळीवर हाती घेतात. यापैकी काहींचे स्वरूप एकमेकांची पुष्टी करणे, हिंमत वाढविणे, संरक्षण देणे असे असते. (यांची नेहमीच गरज असते.) काहींचे स्वरूप विचार पसरविण्याचे असते. (वर्तमानपत्रे, व्याख्याने, परिसंवाद, वादसभा, मोचें,पदयात्रा, इत्यादि.) निषेध, विरोध नोंदविणे, समाजाला, प्रतिपक्षीयांना धक्का देऊन जागे करणे, गैर कृत्य करण्यास प्रतिबंध करणे असे काहींचे स्वरूप असते. या प्रकारचे संघर्षात्मक लढाऊ कार्यक्रमही प्रबोधन व संवाद यांचेच अप्रत्यक्ष मार्ग असतात.
परिवर्तनवादी जहाल बंडखोर गटांमध्ये सत्तेचा वापर करून आदर्श समाज निर्माण करण्याविषयी अलीकडच्या काळात बरेच आकर्षण आढळते. विज्ञानाने सिद्ध केलेल्या किंवा अडाणी पूर्वग्रह ठरविलेल्या किंवा बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीनुसार सत्य असलेल्या भूमिका गळी उतरविण्यासाठी कायदे करून सत्तेच्या जोरावर समाजाला बदलावयाला भाग पाडणे योग्यच आहे, अशी या मागची धारणा आहे. हा मार्ग यशस्वी ठरला तरी तो राजकीय दडपशाहीचा, ठोकशाहीचा उपाय असतो. आपण जे करू मागतो त्याला ‘बुद्धिप्रामाण्याचा व विज्ञानाचा आधार असला तरी उपाय त्यामुळे ‘वैज्ञानिक वा प्रबुद्ध (एनलायटन्ड) ठरत नाहीहे ओळखले पाहिजे.
नागा लोकांमध्ये (व कदाचित काही अन्य आदिवासी जमातींमध्येही) प्रचलित असलेली अन्य टोळ्यांमधील व्यक्तींची मुंडकी गोळा करून स्वतःचे वीरत्व प्रस्थापित करण्याची गौरवशाली मानली गेलेली प्रथा (‘हेड हंटिंग), एकेकाळी भारतात बरीच सार्वत्रिक असलेली नरबळीची प्रथा, किंवा यासारख्या अन्य काही प्रथा क्रौर्य व अमानुषता यांच्या कारणाने सत्तेच्या वापराद्वारे दडपल्या गेल्या. ही गोष्ट करायलाच हवी होती; असे करण्यावाचून गत्यंतरही नव्हते असे मीदेखील म्हणेन. पण दडपणुकीचा तो उपाय होता हे शिल्लक राहतेच. अत्यल्प लोकसंख्येचे जनसमूह, तळागाळाशी असलेल्या जातीजमाती यांच्यात प्रचलित असलेल्या अशा रूढी वा प्रथा व्यवहारात या उपायाने यशस्वीपणे दडपल्या जाऊ शकतात. आधी कठोर दडपणूक आणि नंतर प्रबोधन असा क्रम शक्य होतो. पण जातपात, आर्थिक-राजकीय सत्ता या दृष्टीने वरिष्ठ व वरचढ असणाच्या थरांमध्ये ज्या प्रथांना मान्यता व प्रतिष्ठा असते तेथे हा उपाय पूर्ण यशस्वी होतोच असे नाही. प्रबोधन जर उणे पडले तर परिस्थिती पालटली असता जुन्या ग्रथांचे चोरूनमारून वा उघडपणे पुनरुज्जीवन होते. सती प्रथेचे उदाहरण ताजे आहे. नरबळीची प्रकरणे आजही अधून मधून घडतात.
धर्माशी निगडित अमुक एक भाग हीन, त्याज्य आहे व त्याचे समूळ उच्चाटन करायला हवे असे ज्या भागासंबंधी डॉ. पाटील व माझे एकमत होईल अशा भागांच्या संदर्भातही धर्म, धर्मग्रंथ व धर्मपीठ यांचा प्रभाव निपटून काढण्याचे उषाय एका व्यापक दीर्घकालीन व व्यामिश्र प्रक्रियेच्या चौकटीत योग्यायोग्य, व्यवहार्य-अव्यवहार्य, आवश्यक-अनावश्यक अशा कसोट्यांवर पारखून घेण्याची अनिवार्यता मात्र दिसते.
३व४. कायदा मूर्ख ही माझी भूमिका नाही. स्पृश्यास्पृश्यता ही हिंदू (व भारतातील अन्यधर्मीय) समाजात लोकमानसात व व्यवहारात इतकी खोलवर रुजलेली गोष्ट आहे की कायदा करून व त्याची जबरीने अंमलबजावणी करून अस्श्य तेचे उच्चाटन करता येणार नाही. म्हणजे कुचकामी नसली तरी कायद्याची भूमिका अद्याप तरी फार गौण ठरली आहे. नागरी व शिक्षित समाजात काही प्रमाणात स्पृश्यास्पृश्यता क्षीण झाली आहे ही गोष्ट खरी. पण याचे मुख्य श्रेय खरोखरच कायद्याला किती आहे? माझा मते ते गेल्या पावणेदोनशेवर्षामधील प्रबोधन व चळवळी यांना आणि बदललेल्या आर्थिक-राजकीय व्यवस्थेला आहे. गांधींच्या हरिजन सेवेच्या व लोकशिक्षणाच्या कार्याला एकमेव श्रेय मी देत नाही. सवर्ण हिंदू समाजाचे मानस व व्यवहार बदलण्याचे फार मोठे श्रेय सापेक्षतः गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याला द्यावे लागेल. पण गांधींचे यशही मर्यादित आहे व तसे बरेच वरवरचे आहे. दोष गांधींचा व त्यांनी अवलंबविलेल्या मार्गाचा नाही. या कार्याचा व्यापक आरंभ करणे, उच्चवर्णीयांच्या मनात अपराधी भावना, शरम (मानवतेवरील, हिंदू धर्मावरील ‘कलंक’ असे ठरवून) उत्पन्न करणे, धक्का देऊन जागे करणे, कर्तव्याचे भान आणून देणे हा पहिला टप्पाच तेवढा त्या काळात पार पाडणे शक्य होते.
कायदा व त्याची अंमलबजावणी, आधुनिकीकरण, औद्योगीकरण व शहरीकरण, आर्थिक विकास यांच्यामुळे अस्पृश्यतेचे निर्मूलन होईल असे मधल्या काळात मानल्यामुळे प्रक्रिया ठप्प झाल्यासारखी आहे. ‘एक गाव, एक पाणवठा सारख्या चळवळींची मोठी गरजआहे’.
५. मुस्लिम समाजाची मानसिकता धर्मांध आहे असे श्री गाडगीळ यांना अनुसरून गृहीत धरून मी काही एक युक्तिवाद केला आहे. व्यक्तिशः मी मुस्लिम समाजाच्या मानसिकतेचे तसे वर्णन करणार नाही, ही पहिली गोष्ट. अ. भि. शहा व हमीद दलवाई यांनी जी टीकाटिप्पणी केली तिचे स्वरूप इस्लामधर्मावरच इहवादी, अश्रद्ध भूमिकेतून हल्ला चढविल्यासारखे होते. ती भूमिका घेऊन समाजात काम करण्याचा आग्रह राखल्यास आपण समाजापासून तुटतो, निष्प्रभ ठरतो असा अनुभव दिसतो. विशिष्ट प्रश्न (उदा. तलाकपीडित स्त्रियांच्या समस्या) हाती घेऊन उपयोगी पडत राहणे या मर्यादेत काम संकोच पावलेले दिसते.
महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल काय आढळते? त्यांनी जो हिंदूधर्मावर, ब्राम्हणावर चौफेर त्वेषपूर्ण हल्ला चढविला त्यामधून ब्राम्हणेतर शूद्रातिशूद्र समाजातही हिंदुधर्मसुधारणा व्यापक प्रमाणावर घडून आली का? तशी गोष्ट असती तर डॉ. आंबेडकर अभिमानाने हिंदू राहिले असते व मोठे धर्म व समाजसुधारक बनू शकले असते. खरे तर हिंदुधर्म व समाजसुधारणा हे त्यांचे स्वप्न होते. बाबासाहेबांनीही ज्या पद्धतीने हिंदुधर्म व समाज यांच्यावर हल्ला चढविला (उदा. ‘अनायहिलेशन ऑफ कास्ट’) त्याला तीव्र प्रतिक्रियाचआली. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे धर्म व समाजसुधारणेच्या बाबतीत गप्प व निष्क्रिय आहेत. किंबहुना, आज ते ‘हिंदुत्ववादी भूमिकेच्या अधिक जवळ आहेत. आणि बाबासाहेबांचे अनुयायी बुद्धाच्या धम्माच्या जिवंत उदाहरणाने हिंदू समाजाची धार्मिकसुधारणा करण्याने युगकार्यं न करता राजकारणी हत्यार म्हणून केवळ वापर करीत आहेत. या वास्तवाचा आणि त्यांनी ज्या भूमिकेचा अंगीकार करून टोकाच्या आक्रमक हल्ल्याचा पवित्रा घेतला, जी भाषा वापरली याचा संबंध नाही का, हा प्रश्न विचारायला हवाच आहे. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या वारशाच्या बाबतीतही नीरक्षीरविवेक करण्याची निकड आहे.
नास्तिक व अज्ञेयवादी व्यक्तींची संस्था आणि त्यांचे वर्तुळ, ह्यांची जनसामान्यांमध्ये पोच या गोष्टी लक्षात घेतल्या तर तौलनिक अंगाने केलेले माझे विधान आश्चर्याचे वाटण्याचे कारण नाही. उदाहरणच द्यावयाचे तर, पर्यायी विकासनीतीचा मी पुरस्कर्ता आहे. पण विकासनीतीच्या संदर्भात या विचाराच्या व्यक्तींची संस्था, त्यांचे वर्तुळ, त्यांची पोच आजपर्यंत तरी फार सीमित राहिली आहे. आमचा प्रभाव नगण्य आहे. उद्या तो नगण्य राहू नये अशी माझी इच्छा आहे. पण आजची वस्तुस्थिती काही त्यामुळे बदलत नाही.डॉ. पाटील माझे विधान साधार ऐतिहासिक विवेचन करून खोडून काढू शकतात.