आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि जगाकडे ताठ मानेने पाहिले पाहिजे. जगातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, त्यातील सौंदर्य आणि कुरूपता- या सर्व जशा आहेत तशा निर्भयपणे आपण स्वीकारल्या पाहिजेत. जग बुद्धीने जिंकायचे आहे, त्यातील भयप्रद गोष्टींनी गुलामांप्रमाणे पराभूत होऊन नव्हे. परमेश्वराची सबंध कल्पना पूर्वेकडील सर्वशक्तिमान हुकूमशहांच्या अनुभवातून निर्माण झालेली असून ती स्वतंत्र मनुष्याला मुळीच शोभणारी नाही. जेव्हा माणसे चर्चमध्ये स्वतःला दीन पापी म्हणून लोळण घेतात, तेव्हा ते तिरस्करणीय, स्वाभिमानी मनुष्याला न शोभणारे असते. आपण ताठ उभे राहून जगाकडे निर्भयपणे पाहू या, जगाचा पुरेपूर उपयोग करू या; आणि ते जर आपल्याला कुठे उणे वाटले तर ती उणीव दूर करू या. जग चांगले होण्याकरिता ज्ञान, करुणा आणि धैर्य यांची गरज आहे; भूतकाळाकडे खेदपूर्ण उत्कंठेने पाहण्याची नाही. त्याकरिता निर्भय दृष्टीआणि स्वतंत्र प्रज्ञा यांची आवश्यकता आहे. त्याकरिता मृत भूतकाळाकडे पाहात न बसता, भविष्याकडे आशेने पाहण्याची, आणि कोणत्याही भूतकाळाहून सरस असा भविष्यकाळ आपण निर्माण करू शकू या आत्मविश्वासाची आवश्यकता आहे.