खटल्यात सरकारतर्फे साक्षीदार म्हणून आहिताग्नी राजवाडे उभे राहिले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘ धिमाधवविलासचंपू’ मध्ये पूर्वी अविवाहित स्त्रियांना मुले होत असे विधान केले खरे, परंतु ते त्यांचे एक तऱ्हेवाईक मत आहे अशी मखलाशी आहिताग्नींनी केली. कर्व्यांच्या बाजूने रियासतकार सरदेसायांची साक्ष झाली. आक्षिप्त लेख शास्त्रीय दृष्टीने लिहिला आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयाने मात्र तो मानला नाही. कर्व्यांना दोषी ठरवून १०० रु. दंड केला. ही घटना एप्रिल १९३२ मधली.. या निकालासंबंधी दोन शब्द या लेखात कर्वे म्हणतात, ‘आमचे चुकीमुळे शिक्षा झाली नसून मॅजिस्ट्रेटला आमची मते पसंत नसल्यामुळे झाली. कायद्यात अश्लीलतेची व्याख्या नाही.’ मतभेदाबद्दल जिथे शिक्षा देता येते असा कायदा कितपत समंजस असेल असा सवाल ते करतात.
यावेळी समाजस्वास्थ्याचे वर्गणीदार होते साडेसातशे. पण खटल्यामुळे किरकोळ अंकाचा खप वाढला म्हणून अडीच हजार प्रती काढल्या जात.
पहिल्या वर्षी वर्गणीदारांची संख्या १६० होती ती दुसऱ्या वर्षअखेर २६० झाली. तिसऱ्या वर्षात ४०० पर्यंत पोचली. तीन वर्षांत एक हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
मुखपृष्ठावर दुसऱ्या वर्षापासून अर्धनग्न स्त्रीचे चित्र देऊ लागले. तिसऱ्या वर्षी पूर्णनग्न स्त्रीचे चित्र देत.
स्वतःबद्दल आपणहून काही न लिहिणारे कर्वे वाचकांच्या जिज्ञासेला उत्तर देणे आपले कर्तव्य समजत. एकाने त्यांच्यावर द्रव्यलोभाचा आरोप केला तेव्हा त्यांनी लिहिले, ‘पैसा मिळविण्यापेक्षा इतर काही करण्यात जर एखाद्याला जास्त समाधान वाटेल, तर त्याने पैशाच्या मागे न लागण्यात काही स्वार्थत्याग होतो असे आम्हांस वाटत नाही. परंतु जो मनुष्य प्रोफेसरची सुखावह नोकरी – वर्षातून सहा महिने रजा व इतर वेळीही दररोज फक्त दोन तास काम – व सरकारी रु. १००० पगाराची आशा सोडून ऑफिसात कमी पगाराची व अत्यंत जिकिरीची नोकरीही करावयास तयार झाला त्यावर द्रव्यलोभाचा आरोप मात्र अस्थानी आहे असे समंजस लोक कबूल करतील.
स्वार्थत्यागाबद्दल मात्र त्यांचे मत चांगलेच तऱ्हेवाईक होते. ते म्हणतात. ‘मला स्वार्थत्यागाचा टेंभा मिरवायचा नाही’; कारण स्वार्थत्याग कोणीच करीत नाही असे माझे मत आहे.
कर्व्यांच्या स्वभावात काहीसा कडवटपणा दिसतो त्याचे मूळ त्यांच्या बालपणी झालेल्या संगोपनात आहे असे मत श्रीमती शकुंतलाबाई परांजपे यांनी दिले आहे. रघुनाथरावांना ‘रम्य ते बालपण देई देवा फिरुनी’ असे कोणी म्हटले तर चीड येई. ते म्हणत, यात दोन थापा आहेत. एक देव, आणि दुसरी बालपणाची रम्यता. त्यांचे वडील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सामुदायिक कुटुंबाच्या काही चमत्कारिक कल्पना होत्या. ते मुंबईला गणिताचे प्राध्यापक असताना एकदोन मित्र आणि त्यांचे कुटुंबकबिले मिळून एकत्र राहात. रघुनाथरावांना घरी अप्पा म्हणत. त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी (जन्म १४ जाने. १८८२) त्यांची आई वारली. त्यामुळे मातृसुख त्यांच्या वाट्याला फारसे आलेच नाही. खरे तर मुळीच आले नाही असे म्हटले पाहिजे. कारण मुंबईच्या एकत्र कुटुंबाच्या प्रयोगात अण्णांचे (धोंडो केशवांचे) मित्र नरहरपंत जोशी यांच्याकडे मुलांना शिस्त लावण्याचे काम होते. छडीप्रयोग करण्यात त्यांचा हातखंडा होता. कर्मधर्मसंयोग असा की त्यांची विधवा बहीण गोदूबाई यांच्याशीच अण्णांनी पुनर्विवाह केला (१८९३). तो पुनर्विवाह जोशांना पसंत नव्हता. पुढे अण्णांचे वर्गबंधू ना. गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी त्यांच्या जागी अण्णांना फर्ग्युसनमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून बोलावले. आता कुटुंबच पुण्याला हलले म्हणून अप्पांचा संयुक्त कुटुंबातील वनवास संपला. पुण्याला अण्णांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे सुरू केले आणि अप्पा अख्ख्या मुंबई इलाख्यात मॅट्रिकला पहिले आले (सन १८९७).
फर्ग्युसनमध्ये सेनापती बापट अप्पांचे वर्गबंधू होते. स्वातंत्र्यवीर सावरकर थोडे मागे होते. पुढे रघुनाथराव स्वतः गणिताचे प्रोफेसर झाले तेव्हा ‘कर्वे गणित छान शिकवीत’ अशी आठवण ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि भारताचे अर्थमंत्रिपद भूषविलेले चिंतामणराव देशमुख सांगत. मराठीचे ख्यातनाम संशोधक अ. का. प्रियोळकरही अप्पांचे धारवाडला विद्यार्थी होते. कर्वे काय शिकवीत ते आपल्याला मुळीच समजत नसे अशी त्यांची आठवण आहे. येथूनच कर्वे दीड वर्षाची फलों रजा घेऊन फ्रान्समध्ये पॅरिसला गणिताच्या उच्च अध्ययनासाठी गेले. त्यांच्या माघारी कर्नाटक कॉलेजला गणितासाठी ऑनर्स अभ्यासक्रम शिकविण्याची मान्यता द्यावी की काय यासाठी मुंबई विद्यापीठाची एक समिती आली होती.. तेव्हा कर्व्यांच्या जागी चार्ल्स सालढाणा नावाचे गृहस्थ आले होते. ते पदार्थविज्ञानात एम्.ए. होते. समितीने सालढाणांच्या गणितातल्या अपात्रतेची नोंद अहवालात घेतली, पण कर्वे परत आल्यावर त्यांची प्रोफेसर पदावर नेमणूक होईलच या समजुतीने ऑनर्सला मान्यता दिली. कर्वे परतले तेव्हा सरकारने त्यांना डावलून सालढाणांची नेमणूक दरमहा ३५० पगारावर केली आणि कर्व्यांना २०० रु. पगारावर डेक्कन कॉलेजात नेमले. कर्व्यांनी या अन्यायाविरुद्ध कडक शब्दांत तक्रार केली. त्यावेळी त्यांच्या वडिलांचे मामेभाऊ रँग्लर परांजपे मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री होते. त्यांनी आपल्यावर पुतणेगिरीचा आरोप होऊ नये म्हणून तिची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांचावर अप्पांच्या जो राग झाला तो शेवटपर्यंत गेला नाही. सरकारने त्यांचा पगार दोनशेचा अडीचशे करून अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधे त्यांची बदली केली. कर्व्यांनी चिडून जाऊन राजिनामा दिला (मे १९२१). रँग्लर परांजपे यांनी अण्णासाहेब कर्व्यांच्या घरी राहून आपले शिक्षण केलेले होते.
इथून कर्व्यांच्या हलाखीला सुरुवात झाली. पुढे विल्सन कॉलेजमधला अल्पकाळ सोडला तर ही हलाखी त्यांनी जन्मभर भोगली. यावेळी त्यांची पत्नी लहानशा पगारावर एका निराधार महिलांच्या आधारगृहात नोकरीला होती. कर्वे गणिताच्या आणि फ्रेंचच्या शिकवण्या करून चरितार्थ चालवू लागले.
त्यांनी फ्रेंचचे ज्ञान का मिळवले आणि ती भाषा त्यांनी आत्मसात् कशी केली हे सांगण्यासारखे आहे.
बी.ए. झाल्यावर (सन् १९०३) विलायतेला जाण्याची त्यांची फार इच्छा होती. पण ते जमले नाही. १९०६ साली मुंबईला सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज निघाले तेव्हा पहिल्याच वर्षी ते त्यात दाखल झाले. एक वर्ष एल्फिन्स्टन मिडलस्कूलमध्ये काम केल्यावर १९०८ मध्ये त्यांना गणिताचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून जागा मिळाली. नंतर नऊ वर्षे ते तिथे होते. कर्व्यांच्या वाचनात त्यांना असे आढळले की, लैंगिक विषयावर फ्रेंच भाषेत धीट व मोकळे शास्त्रीय लिखाण मुबलक होते. इंग्रज लेखकांचे विचार अजूनही बुरसटलेले होते. म्हणून इंग्लिश व अमेरिकन लोकही या विषयांचा अधिक अभ्यास करायचा तर फ्रान्सला जात. एल्फिन्स्टनमध्ये श्री. पोल्तिए नावाचे फ्रेंचचे प्राध्यापक होते. कर्व्यांनी खास त्यांच्या वर्गात बसून ती भाषा आत्मसात केली आणि संभाषणाचा सराव वाढवला. पुढे पुन्हा विल्सन् कॉलेजातली नोकरी सोडली तेव्हा याच पोल्तिएच्या मुलामुळे त्यांना रोझेंथॉल या फ्रेंच कंपनीत कारकुनाची नोकरी मिळाली.
रघुनाथरावांच्या पत्नी मालतीबाई यांचे त्यांच्या कार्यात पूर्ण साहाय्य असे. राजिनामा दिला तेव्हाच्या काळात त्यांनी संततिनियमनाची साधने विकावयास आरंभ केला. ती कशी वापरावीत याचा सल्लाही ते देत. मालतीबाई, स्त्रियांना, संततिप्रतिबंधक साधने कशी बसवावीत हे शिकवीत. हा सर्व खटाटोप स्वतः का करता या एका वाचकाच्या प्रश्नाला उत्तर देताना कर्वे म्हणतात, ‘या देशात…एकाच मनुष्याला बरीच कामे करावी लागतात…उपदेश देणारे डॉक्टर आणि साधने विकणारे केमिस्ट पुरेसे नाहीत. गुप्तरोगांसंबंधी तर प्रतिबंधाची साधने विकावयास केमिस्ट लाजतात, व आमची इंग्रजी पुस्तके फुकट दिली तरी ती घेण्यास लोक घाबरतात. कित्येक डॉक्टर तर प्रतिबंधाचे नावही घेण्यास तयार नाहीत. अशा स्थितीत ही साधने आम्ही स्वतः विकणे आमचे मते अपरिहार्य होते. एरवी सर्व प्रचार शब्दांतच राहिला असता.
अपत्यहीन मालतीबाईंनी स्वतः संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यांना पुत्रप्राप्तीची आतुरता नव्हती यांचे एक कारण त्या सुधारकी मताच्या होत्या हे आहे. त्यामुळेच अप्पांनी त्यांना मागणी घातली होती. अप्पांची दुसरी आई श्रीमती बाया कर्वे यांनीआपल्या आत्मवृत्तात (माझे पुराण) या लग्नाची हकीकत सांगितली आहे. मालतीबाईंचे लग्नाआधीचे नाव (लग्न १९११) गंगू. गंगू गोडे. ती हिंगण्याच्या आश्रमाचीच विद्यार्थिनी होती. तिचे शिक्षण इंटरपर्यंत झाले होते. लग्नानंतर अप्पांच्या स्वीकृत कार्यात त्यांनी मनापासून मदत केली. मालतीबाईंना १९२८ साली रक्तक्षय झाला. नोकरीसाठी घराबाहेर पडणे अशक्य झाले. आधीच उत्पन्न अल्प, त्यात आजारपणाचा खर्च झाला. सोळा वर्षे दुखण्याशी झगडून त्या १९४४ साली मृत्युमुखी पडल्या.
विल्सन कॉलेजमध्ये गणिताचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कर्व्यांना १९२२मध्ये नोकरी मिळाली. पगार २०० रु. होता. म्हणून त्यांनी शिकवण्या सोडून दिल्या. नोकरीनंतर मोकळ्या वेळात ‘राईट एजन्सी’ या नावाखाली सल्ला देणे व साधने विकणे हे काम सुरू केले. विक्रीतून जाहिरातीचा खर्चही निघत नसे. १९२४ साली त्यांची पूर्णवेळ आणि २५०-३०० श्रेणीत नोकरी कायम झाली. याच सुमारास ‘किर्लोस्कर खबर’ मध्ये संततिनियमनावरील लेख प्रसिद्ध झाला आणि परिणामी त्यांना विल्सनमधील नोकरी कशी सोडावी लागली याची हकीकत मागे आली आहे.
आता पोटासाठी काय करावे या विवंचनेत असता एक मोटार घेऊन टॅक्सीड्रायव्हरचा धंदा करण्याचे प्रो. कर्वे यांनी ठरविले होते. असे त्यांचे घनिष्ठ मित्र मामा वरेरकर यांनी लिहिले आहे. त्यावेळी त्यांचे धाकटे बंधू डॉ. शंकरराव कर्वे यांना नैरोबीला ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी अप्पांना आफ्रिकेत बोलावून घेतले. तिथे नोकरीचा शोध घेत असता आपल्या बंधूची मोटार चालवायलाही ते शिकत. तेथेच त्यांनी स्वतःवर संततिविरोधक शस्त्रक्रियाही करवून घेतली. कारण मुंबईचा कोणी डॉक्टर ती करायला तयार नव्हता. नोकरी मिळाली नाही म्हणून ते भारतात परतले. रोझेंथॉल या फ्रेंच कंपनीत त्यांना नोकरी मिळाली ती यानंतर. ती ही त्यांनी १ मे १९३३ रोजी सोडली तेव्हा या प्रसंगाचे वर्णन त्यांनी स्वतःची किंमत राखण्याकरिता नोकरीचा राजीनामा देण्याचा आमचे आयुष्यातील तिसरा प्रसंग असे केले आहे.
समाजस्वास्थ्य हा कर्व्यांचा जीवनध्यास होता. मासिक सुरू करण्यापूर्वी जवळजवळ १५ वर्षे ते त्या विषयाचा अभ्यास करीत होते. पहिल्या अंकात ते लिहितात, ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भितात असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळविण्यास सामान्य वाचकास अतिशय अडचण पडते व ती अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. पहिला अंक २४ पानांचा होता. लोकसंख्यावाढ, ब्रह्मचर्य, मांसाहार, गर्भपात, इत्यादि विषयांवर त्यात माहिती दिली आहे. नंतरही मासिक एकसुरी होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले दिसतात. प्रसिद्ध झालेल्या बातम्या निवडून त्यावर चुरचुरीत भाष्य ते देत. वेश्यांचा प्रश्न, गरमी, परमा यांसारखे गुप्तरोग हे लेखविषय असतच, पण पाणी किती प्यावे, सर्दी कशाने होते, कॉलरा कसा टाळावा, जीवनसत्त्व, तोतरेपणा, मलेरियाचा प्रतिबंध, हातांची निगा अशा अनेक विषयांवर माहितीपर लेख येत.
कर्वे पक्के नास्तिक. त्यांना धर्म थोतांड वाटे. धर्मभास्कर जगातील सुखांवर पाणी सोडण्याच्या नुसत्या गप्पा मारतात. कर्वे लिहितात, “…धर्माच्या स्वर्गसुखाच्या कल्पनेत अप्सरांनी बराच भाग व्यापलेला आहे. जगात एकपत्नीव्रत पाळायचे कशाकरिता, तर स्वर्गात अप्सरांचा मनसोक्त उपभोग घेता यावा म्हणून! ब्रह्मचर्याचेही पर्यवसान तेच! ही सर्व उपभोगाची व्यवस्था पुरुषांकरिताच केलेली आहे, यावरून पुरुषांनी स्वतःच्या फायद्याकरिता धर्म केले आहेत हे उघड आहे. धर्मप्रणेत्यांना निष्पक्षपात बुद्धि असती तर त्यांनी स्त्रियांकरिताही तशीच सोय केली असती.”
ईश्वराच्या अगाध करणीची त्यांनी कशी वाट लावली ती पाहा. ‘ईश्वर‘ सर्वव्यापी असल्यामुळे त्याला कोणतीही हालचाल करता येत नाही, कारण हालण्यास जागा लागते. तो सर्वज्ञ असल्यामुळे त्याला कसलाही विचार करता येत नाही, किंवा करण्याची जरूर नसते. आणि त्याला कालाची उपाधी नसल्यामुळे त्याला कोणतीही क्रिया करता येत नाही, कारण क्रियेला काल लागतो. मग ईश्वराची करणी म्हणजे काय?
पुनर्जन्माबद्दल ते लिहितात, ‘सृष्टीतील नियम अबाधित असतात. सत्कृत्यांचे बक्षीस व दुष्कृत्यांची शिक्षा ही सृष्टीत दिसत नाहीत, व ही मनुष्याला हवीशी वाटतात म्हणूनच त्याने ईश्वर कल्पिला आहे.’
पुनर्जन्माच्याही कल्पनेचा तोच उपयोग. अशा कल्पनांनी विचारी माणसाचे समाधान होत नाही. जगातील विषमतेमुळेच ईश्वरांची कल्पना विशेष हास्यास्पद वाटते. जडवस्तूतूनच चेतनायुक्त प्राणी निर्माण झाले आहेत. हे आश्चर्य वाटेल खरे, परंतु विजेचे बटन दबले असता दिवा लागणे हे काय कमी आश्चर्य आहे?. महार व ब्राम्हण… हा भेद मनुष्याच्या मूर्खपणामुळे झालेला आहे.
मुंबईच्या रॅशनॅलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘रीझन’ या इंग्रजी मासिकातील (मार्च १९३२) ‘सेंट्स अँड फकीर्स’ या लेखात ते म्हणतात, ‘खऱ्या अर्थाने साधुपुरुष म्हणता येतील असे फारच थोडे लोक असतात; मूर्ख किंवा धूर्त साधूच जास्त. भटजी हा उपद्रव देणारा, तर साधू हा बांडगुळासारखा असतो.’ श्रद्धेमुळे तारतम्य नाहीसे होऊन साक्षात्काराने आभास कसे होतात याची उदाहरणे देऊन त्यांनी रोझन मध्ये आणखी लेख लिहिले.
लैंगिक स्वातंत्र्याच्या पुरस्काराने विवाहसंस्था मोडली तरी कुटुंबसंस्था नैसर्गिक स्वरूपाची राहीलच, ती मोडणे शक्य नाही असा त्यांचा विश्वास होता.
समाजस्वास्थ्य मासिकावर तीन खटले झाले. त्यांपैकी पहिल्या दोनमध्ये त्यांना दंड झाला. तिसऱ्यात वकील न देता त्यांनी स्वतःच बचाव दिला आणि ते निर्दोष सुटले. दुसऱ्या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे वकील होते. त्याची हकीकत अशी.
समाजस्वास्थ्याची विक्रीव्यवस्था पाहणारे श्री काशीनाथ नारायण निमकर हे एक निष्णात वार्ताहर होते. त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. भागीदारी व पुढाकार घेतला म्हणून समाजस्वास्थ्याची गुजराती आवृत्ती कर्व्यांनी काढली. तिच्या चार हजार प्रती काढत. एका गुजराती वाचकाला दिलेल्या उत्तरातून हा खटला उभा राहिला (फेब्रु १९३४).
‘मासिक लोकशिक्षणाच्या उद्देशाने चालवले जाते, आक्षिप्त मजकुरातून कुमार्गाला उत्तेजन मिळत नाही. अश्लीलता अर्थापेक्षा भाषेवर अवलंबून असते. पण खटल्यात भाषेबद्दल आक्षेप घेतलेला नाही’, इ. इ. परोपरींनी बाबासाहेबांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश पूर्वी होते तेच होते. त्यांनी गुन्हा दुसरा म्हणून कर्वेंना २०० रु. दंड केला. त्यावर कर्वेंनी लिहिले, ‘हायकोर्टाकडे अपील करता यावयास २०० चे वर दंड असावा लागतो. म्हणून २०० ऐवजी २०१रु. दंड करावा अशी विनंती केली असता त्यांनी तसे करण्याचे नाकारले. यावरून मॅजिस्ट्रेटांचे उदार मन आणि न्याय देण्याची तीव्र इच्छा कोणासही सहज दिसून येण्यासारखीआहे. अश्लीलतेच्या आरोपाखाली १९३९ मध्ये भरण्यात आलेल्या तिसऱ्या खटल्याला निमित्त झाले एका जाहिरातीचे. सप्टेंबर १९३८ च्या अंकात ‘कामकला या पुस्तकाची जाहिरात होती. तिच्यात प्रस्तुत हिंदी पुस्तक ‘अप्राकृतिक संभोग व रतिविलासाच्या गुप्त प्रेमलीलां’चे खासगी पुस्तक असल्याचा दावा होता. यातील ‘अप्राकृतिक संभोग’ हा शब्दप्रयोग अश्लील आहे असा सरकारचा आक्षेप होता. कर्वेंना ५ एप्रिल ३९ ला अटक करून जामिनावर सोडले. तेव्हापासून म्हणजे मे १९३९ पासून समाजस्वास्थ्याच्या पहिल्या लेखाच्या आरंभी ते जाड ठशात पुढील वाक्य छापू लागले ‘अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणाऱ्यांच्या मनाचा गुण आहे.’
खटल्याच्या मागचे खरे कारण दुसरेच होते. त्यावेळी काँग्रेसचे मंत्रिमंडळ अधिकारावर होते. कर्वे काँग्रेसच्या नि त्याहूनही गांधीजींच्या अनेक धोरणांचे कठोर टीकाकार होते. दारूबंदी, खादीचा उदो-उदो, लोकसंख्या-नियंत्रणासाठी कृत्रिम उपायांपेक्षा आत्मसंयमाचा आग्रह, आतल्या आवाजाची गूढवादी भाषा, उपोषणे, राजकारणात धार्मिक परिभाषेचा वापर यांनी हिंदुस्थानाचे हित होण्यापेक्षा अहितच अधिक झाले अशी मते ते मांडत.
कोणत्याही सुधारणा कायद्याच्या जबदस्तीपेक्षा लोकशिक्षणाने प्रशस्त होतात असे त्यांचे म्हणणे. ‘वेश्या बंद करा, दारू बंद करा, जुगार बंद करा… पण त्यापैकी एकही गोष्ट जबरदस्तीने बंद होत नाही… या गोष्टी बंद व्हायला लोकशिक्षण हाच श्रेयस्कर मार्ग ठरेल. हे मत ते वारंवार मांडत, काँग्रेस सरकारने सूडबुद्धीने आपल्यावर खटला रचला असा बचाव त्यांनी मांडला. हेही दाखवून दिले की, काँग्रेसच्या ‘लोकशक्ती’ या पत्रात त्यांच्या मासिकातल्या जाहिरातीपेक्षा जास्त अश्लील जाहिराती होत्या. तशा त्या ‘ज्ञानप्रकाश’मध्येही येत होत्या. मॅजिस्ट्रेटने २४ जून १९४० ला त्यांना निर्दोष सोडले.
कर्वे आणि त्यांचे समाजस्वास्थ्य चवथ्यांदा अश्लीलतेच्या शुक्लकाष्ठातून सुटले ते केवळ त्यांच्या मृत्यूने. १९५३ मध्ये तीन-चार अंकांत एक लेखमाला प्रसिद्ध झाली होती, ‘अनैसर्गिक नव्हे, निसर्गपूरक, समलिंगी संभोगाला समाजाने अनैसर्गिक, असभ्य वा बेकायदेशीर न मानता मान्यता द्यावी’ असा विचार एक डॉक्टर या टोपणनावाने लेखकाने मांडला होता. ह्यावेळी मोरारजीभाई देसाई मुख्यमंत्री होते. सरकारने खटल्याची तयारी केली होती. तेवढ्यात १४ ऑक्टोबर १९५३ ला कर्वेंचा अंत झाला. दुसऱ्या दिवशी १५ तारखेला समाजस्वास्थ्याचा अंक आणि त्यांच्या मृत्यूचे वर्तमान बरोबरच वाचकांना मिळाले. ते नेहमी आगामी दोन-तीन अंकांचा मजकूर (मुद्रणप्रत) यंत्रावर लिहून (टाईप) तयार ठेवीत. त्यांच्या मृत्यूने तर शेवटचा अंक आणि मासिक बंद केल्याची घोषणा १५ नोव्हेंबर १९५३ ला झाली आणि एक करुण सुधारणापर्व संपले.
जांभेकरांपासून आगरकरांपर्यंत सुधारकांवर एक आरोप होत असतो. तो असमंजस असला तरी वरवर पाहता त्यात तथ्यांश दिसतो. हे सगळे सुधारक ब्राह्मण होते आणि त्यांना ब्राह्मणांचेच दुःख दिसले. बालविवाह, केशवपन, विधवांना पुनर्विवाहाची बंदी, आर्थिक परावंलबन, इ. स्त्रीदुःखे मुख्यतः ब्राह्मण समाज भोगत होता. म्हणून हे ब्राह्मणी सुधारक अशी रोषमुद्रा त्यांच्यावर उठविली जाते. पण रघुनाथ धोंडोंना तुम्ही काय म्हणणार? त्यांना अभिप्रेत सुधारणा कोणत्या जातीसाठी होत्या?
आणखी एक – रघुनाथरावांनी सुखवादाचा पुरस्कार केला. पण तो निखळ स्वैराचार म्हणता येईल? संयमित सुखास्वादाचे ते प्रवक्ते होते आणि भोक्तेही. ते सवयीने मासांहारी नव्हते की मद्यपीही नव्हते. पॅरिसमध्ये तेथील पद्धतीप्रमाणे ते सौम्य मद्य घेत. मांसाहारही घेत. भारतात आल्यावर प्रसंगोप्रात्त ‘मी मांसाहार घेत होतो व पत्नीही घेत होती’ असे त्यांनी एका वाचकाला उत्तर देताना म्हटले आहे. अण्णा (धोंडो केशव) मुंबईला आले की त्यांच्याकडेच उतरत. दोघांनाही लावण्या आवडत असल्याने कधी तमाशा पाहायलाही जात.
मामा वरेरकरांच्या एका नाटकात गोपाळ कृष्ण गोखल्यांना दोन बायका होत्या असा उल्लेख आला म्हणून काहूर उठले. कोर्टकचेऱ्या झाल्या. पण ती वस्तुस्थिती होती. गोखले कर्वेंना वंद्य होते. त्यांचे गुरु होते. तरी त्यांनी मामांची सत्याची बाजू घेतली. मग त्यांनी समाजस्वास्थ्याचा ‘दोन बायका अंक’ काढला. फडके, शंकरराव किर्लोस्कर, कविवर्य यशवंत हे त्यातले होते. विशेषांकात मामा वरेरकर व शंकरराव किर्लोस्करांनी स्वानुभवावर आधारलेले लेख लिहिले. त्यांच्या भावजय प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इरावतीबाईंनी शास्त्रीय दृष्टिकोनातून लेख लिहिला. या एकाच लेखात शास्त्रीय दृष्टी दिसते म्हणून कर्वेंनी त्यांचे कौतुक केले. पहिली पत्नी हयात असता दुसरे लग्न करणाऱ्यांची कड घेऊन त्यांनी अनेकदा लिहिले आहे. तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य दिल्यास त्याही पुरुषाप्रमाणे वैचित्र्यप्रिय असल्याचे सिद्ध होईल याची खात्री दिली आहे. सध्या गाजत असलेल्या ‘चारचौघी’ हेच सांगत आहेत काय?