चातुर्वण्याविरुद्ध आजवर अनेक बंडे झाली. त्यांत महाराष्ट्रातील भागवतधर्मी साधुसंतांचे बंड़ प्रमुख होय. पण या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शुद्र मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधुसंत पडले नाहीत. या बंडात साधुसंतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरीसुद्धा या बंडाचा चातुर्वण्र्यविध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. असे म्हणता येईल की तुमचे चातुर्वण्र्य तुम्ही ठेवा, आम्ही भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू, अशी अहंमान्यता धरून संतांनी चातुर्वण्र्याला मुळीच धक्का लावला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. तिची किंमत स्वयंसिद्ध आहे हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वण्र्याचे दडपण कायम राहिले.