इच्छामरणी व्हा

पुस्तकपरामर्श

(१) सन्मानाने मरण्याचा हक्क (२) जगायचे की मरायचे?
[दोन्हीचे लेखक: विनायक राजाराम लिमये, प्रकाशक (१) स.म. ह. चे स्वतः लेखक, (२) चे उन्मेष प्रकाशन, २६ पर्वत, पुणे ४११००९]
आपले आयुर्मान वाढले आहे तसे आरोग्यमानही. परंतु मृत्यू अटळ आहे. कृतांताची ध्वजा दिसू लागल्यापासून त्याचे भेसूर दर्शन होईपर्यंत अशी स्थिती येते की, त्या स्थितीत जिवंत राहण्यापेक्षा मरणे हेच बरे असे वाटू लागते. अशांना ‘तुमचे उत्तरायण सुरू झाले आहे आणि तुम्हीही इच्छामरणी आहात’ असा संदेश देणारी दोन पुस्तके आमच्याकडे अभिप्रायार्थ आली आहेत.

सन्मानाने मरण्याचा हक्क (स.म. ह.) हे सुमारे सव्वाशे पानांचे पुस्तक, लेखक श्री. विनायक राजाराम लिमये यांनी स्वतःच प्रकाशित केले असून त्याची किंमत आहे फक्त ५ रुपये, पुस्तकाचा विषय मुलखावेगळा आहे. ह्या विषयावर मराठीत आणि कदाचित् भारतातही हे पहिलेच पुस्तक असावे. पुस्तकात प्रतिपाद्य विषयाच्या अनुरोधाने लेखकाची जी चरित्ररेखा दिसते ती पाहून मनुष्य स्तिमित होतो. लेखक औषधिशास्त्र, वैद्यक किंवा कायदा अशा मृत्यूशी संलग्न विषयांचा तज्ज्ञ नाही, किंवा लेखन हा त्यांचा व्यवसायही नाही. ते आता निवृत्तीचे शांत जीवन सांगली येथे जगताहेत. वयाच्या आठव्या वर्षी आईचे आणि बाराव्या वर्षी पित्याचे छत्र हरपल्यावर, केवळ मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन विसाव्या वर्षी ते वायद्याच्या (speculation) धंद्यात पडले. तेव्हा त्या धंद्याचे त्यांना काडीइतकेही ज्ञान नव्हते. ज्याला धोडाबहुत पद्धतशीर म्हणता येईल असा एकच विषय आपण अभ्यासला आणि तो वायदेबाजाराचा, असे ते सांगतात. पण कसे कोण जाणे, वयाच्या तिशीपासून ‘मरण’ या विषयाने त्यांच्या मनात घर केले. ते म्हणतात, ‘ मला मरण केव्हा येणार या विचाराने मी चिंताग्रस्त नाही. तर ते कशा रीतीने येणार या विचाराने माझ्या मनात घर केले आहे.’ हे पुस्तक हाती घेतले की लेखकाचे आपल्या विषयावरचे वाचन किती विस्तृत आणि चिंतन किती सखोल आहे हे सारखे जाणवत राहते. ‘जगण्यात सुख आहे तोपर्यंत मरण्यातच मौज आहे.’ हे गडकर्‍यांचे मत त्यांचे महावाक्य आहे. ते लिहितात, ‘माझ्या जगण्यात दुःखापेक्षा आनंदाचे प्रमाण खूपच अधिक आहे. परंतु हे नेहमीच असे राहणार नाही. जगण्याच्या क्रियेत आनंदापेक्षा दुःखाचे प्रमाण वाढले अथवा जगण्यात फक्त दुःखच उरले त्यावेळी काय करायचे’ या प्रश्नाने लेखकाला सतावले आहे. आणि प्रत्येकालाच केव्हाना केव्हा तरी त्याला तोंड द्यायचे आहे. या प्रश्नाचे लिमयांनी आपल्या पुस्तकात जे उत्तर दिले आहे. ते असे,’इच्छामरणी व्हा, सन्मानाने आत्मसमर्पण करा.’

खरे तर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येणारे मरण हे सर्वोत्तम हे लेखकाला कबूल आहे. पण ते म्हणतात, ही गोष्ट आपल्या हातची नाही. म्हणून त्यांची मागणी आहे मरणाच्या हक्काची. सन्मानाने मरण्याचा हक्क मिळावा ही, आपल्या देशातला आत्महत्येचा कायदा १८६० सालचा. इंग्रजांनी केलेला. त्याला त्यांच्या धार्मिक कल्पनांचे अधिष्ठान होते. आत्महत्या पाप मानले गेले आहे. परंतु त्याला काही अपवाद मान्य असलेले दिसतात. उदा. ज्ञानेश्वरांची समाधी. अलीकडच्या काळातील भारतीय परंपरेतली काही उदाहरणे म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे, शिवाजीराव पटवर्धन. जैन धर्मात अशा प्रकारच्या अंताला संल्लेखना म्हणतात आणि तो प्रकार सन्माननीय गणला जातो.

श्री. लिमयांनी एखादा हुषार वकील करतो तसे दाखल्यामागून दाखले देत या विषयावरच्या इंग्रजी, फ्रेंच आदि भाषांमधील साहित्याच्या आधारे आपला युक्तिवाद सिद्ध केला आहे. ‘द सोसायटी फॉर द राइट टु डाय विथ डिग्निटी’ या संस्थेच्या कार्याचा परिचय हे त्यांच्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे. १८६० च्या आत्महत्येसंबंधीच्या भारतीय दंडविधानात इप्ट बदल घडवून आणण्यासाठी २९ मे, १९८१ रोजी आपल्या देशात या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक श्री. मिनू मसानी हे तिचे सुरुवातीपासून आतापर्यंत अध्यक्ष आहेत. १९८४ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनात आ. सदानंद वर्दे यांनी असाध्य रोगाने गांजलेल्या रोग्यांसाठी इच्छामरणाची तरतूद करणारे विधेयक मांडले, हे सोसायटीच्या प्रयत्नांना अल्पप्रमाणात का होईना आलेले यश आहे असे ते समजतात. सोसायटीच्या सदस्यत्वासाठी अर्जाचा नमुना त्यांनी पुस्तकाला जोडला आहे. पुस्तकाच्या तीन हजार प्रती छापल्या होत्या. जाहिरातीचा खर्च धरून त्यासाठी लेखकाने ४५ हजार रु. खर्च सोसला. जवळ जवळ एक हजार प्रती वाटण्यात गेल्या. किंमत ठेवली फक्त ५ रु. मान्यवर नियतकालिके आणि व्यक्तींचा प्रतिसाद निराशाजनक असला तरी सर्वसामान्य माणसांनी, विश्वास बसणार नाही इतका उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याचा अर्थ लेखक असा करतात की स्वतःच्या किंवा त्यांच्या नात्यातल्या एखाद्या माणसाच्या मरणाबद्दल त्यांना काही अडचणी आहेत, आणि त्या संदर्भात मार्गदर्शन मिळाले तर त्यांना हवे आहे. सन्मानाने मरणाचा हक्क ह्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हा विषय लेखकाच्या इतकी काही ध्यासाचा विषय झाला की, ‘औचित्य, अनौचित्य यांची फारशी पर्वा न करता लोकांबरोबरच्या संभाषणात मी हा विषय बर्‍याचवेळा काढत असतो.’ अशा रीतीने काही हजार लोकांशी त्यांनी या विषयाची चर्चा केली असे ते सांगतात.

विवेकनिष्ठ स्वहत्येच्या हक्काला कायद्याची आडकाठी राहिली नाही तर तिचा दुरुपयोग होईल हा मुख्य आक्षेप असतो. यावर लेखकाची प्रतिवाद बिनतोड आहे. ते विचारतात: कोणत्या हक्काचा दुरुपयोग होऊ शकत नाही? गर्भपाताच्या हक्काचा दुरुपयोग होऊ शकतो तरी आपण तो दिलाच की नाही? विधवांचा पुनर्विवाह आज जो आपल्याला इष्ट वाटतो त्याला असाही विरोध झाला असेल हे कोणाला खरे वाटेल काय? ‘पुनर्विवाह सशास्त्र की अशास्त्र’ या निबंधात गेल्या पिढीतील सुप्रसिद्ध विद्वान राजारामशास्त्री भागवत यांनी असा युक्तिवाद केला होता की,”… महाराष्ट्रात मुलींची संख्या पुष्कळ आहे. कित्येक जातींमधून मुलींना नवरे मिळणे कठीण झाले आहे. लोकसंख्या वाढत आहे…. तशात आणखी विधवाविवाहाचा प्रचार करून लोकसंख्यावाढीचे साधन करणारे हे लोक देशाचे अहितच करीत आहेत.”

एकूण काय तर ‘दैन्य न येता जीवन आणि अनायासेन मरण’ हे पसाय देवाकडे मागणारा श्रद्धावान असो की, ‘A Good Life, a Good Death’ चा पुरस्कार करणारा, ओपन हार्ट सर्जरीचा प्रवर्तक डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड असो, या सर्वांची साक्ष आपल्या बाजूने आहे. म्हणून कायद्याची आडकाठी जेवढी लवकर दूर होईल तेवढे बरे असा आपला युक्तिवाद चिवटपणे वाचकाच्या मनावर बिंबवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

‘जगायचे की मरायचे?’ या सुमारे साडेचारशे पानांच्या दुसर्‍या पुस्तकात पहिल्या पुस्तकावरील अभिप्राय, पत्रे, लेखकाचे मृत्युपत्र इत्यादि अनेक अंतर्मुख करणार्‍या गोष्टी आहेत. त्या मुळातूनच वाचल्या पाहिजेत. तसेच ‘महानिर्वाण गृह (म, नि.गृ.) ह्या कल्पनेची ईषत् रूपरेषाही त्यात आहे. सन्मानाने मरण्याचा हक्क खरे तर २१ वर्षे वयाच्या कोणालाही मिळायला पाहिजे. पण व्यवहार्य तडजोड म्हणून असाध्य रोगाने संत्रस्त झालेली व्यक्ती किंवा वार्धक्य असह्य झालेला ५५ वर्षे पूर्ण झालेला वृद्ध यांना म नि. गृ.ची योजना उपलब्ध असावी, अशी दुरुस्त मागणी त्यांनी केली आहे. ‘अशा वार्धक्यात जगणे जवळ जवळ थांबलेले असते आणि केवळ अस्तित्व शिल्लक राहिले असते’ या लेखकाच्या मताबद्दल दुमत होणार नाही. पण खरा प्रश्न असतो – खरे म्हणजे असे दोन प्रश्न आहेत — वेगळाच. आपले? दुखणे अखेरचेच, आता यातून सुटका नाही, असे माणसाला जे कधी वाटत नाही ते त्याला कसे पटवायचे? दुसरे, आणि हे पहिल्याशी निगडीत आहे, असे की, उच्चपदस्थांचे वागणे या बाबतीत अनुकरणीय नाही त्याला काय करायचे? म्हणजे असे की, षष्ट्यब्दिपूर्ती झाली, अमृत महोत्सव झाला, इतकेच काय सहस्रचंद्र दर्शन झाले, तरी त्यांचे आशापाश सुटत नाहीत. मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ज्यांना ज्यांना म्हणून सरकारी तिजोरीतून अमेरिकेत जायला मिळू शकते असे लोक एखाददुसर्‍या वर्षाचे आयुष्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपडतात. ती संधी नाकारून ‘मरणा न भीत तुज मी’ असे म्हणून धैर्याने मृत्यूला सामोरे जाण्याला सज्ज झाले अशी उदाहरणे सामान्य माणसाला पाहायला मिळतच नाहीत. मग सामान्य माणराचे आशापाश कसे सुटणार? ‘आता वय झाले, चला आता’ असे कोणाला कसे वाटायला लावणार?

बुद्धी शाबूत आहे आणि इंद्रिये ताब्यात आहेत, तोवर स्वतःच्या संसारातली आसक्ती आटोपती घेऊन समाजाच्या संसारात रमत, आले, तरच कबीरासारखे मृत्युंजय होऊन म्हणता येईल:
मरना भला विदेश, जहाँ न अपना कोय ।
पशु पंछी भोजन करे, तन भंडारा होय ।।

अभिप्राय 1

  • महत्वाचा विषय
    आपलं कार्य समाप्ती झाली याची निश्चित ी काहीना होते
    आता आपण मार्गस्थ व्हावं
    शरीराच्या समाजाच्या जबाबदाऱ्या जवळपास संपल्या याचे जाण होते
    तोचं क्षण खरा निघुन जाण्याचा
    पण कसे जावे हा यक्षप्रश्न
    यापुढे आपण काडीचेही कोणाच्या उपयोगी ही जाण असते परंतु
    ज्ञानेश्र्वरासारखी मोठेपण व दृढ निशचयं अंगी नसल्याने रडतखडत निर्वाण हेच हातात असते
    मग मनुष्यजन्माचे परावलंबी क्षणाचा अनुभव घेत घेत हे जिवन म्हणजे काय याची खरी व्याख्या वेगळ्या आयाम भोगत आयुष्य कंठाव लागते

    व एका क्षणाला जाणं होते

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.