भूतभूतकाळी आमचे धर्मविचार व आमची समाजव्यवस्था ही कितीही स्पृह्य असली व भविष्यकाली आम्ही सार्या जगाचे मार्गदर्शक होणार असलो, तथापि वर्तमानकाळ तरी प्रत्येक दृष्टीने आमची स्थिती अगदी खालावलेली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे; आणि भोवताली चाललेल्या जीवनार्थ कलहात आम्हांस सरशी मिळवावयाची असो किंवा मिसेस बेझंट सांगतात त्याप्रमाणे साच्या जगास आध्यात्मिक विचाराचा धडा घालून देणे असो. आम्हांस प्रथम आपल्या सुधारणेस लागले पाहिजे यात मुळीच मतभेद नाही. नुसते आमच बाबा असे होते आणि तसे होते म्हणून फुशारकी मारीत बसण्याने आमची सुधारणा होणे नाही. ती होण्यास आम्ही आपला आयुष्यक्रम बदलण्यास तयार असले पाहिजे….. एका काळी पूर्वदिशा ज्ञानसूर्याने तज:पुंज झाली होती व पश्चिमदिशा अज्ञानतिमिरान व्याप्त झाली होती. पण आज त्या स्थितीचा व्युत्क्रम होऊन पूर्वदिशा अंधकारान चा राऊ लागली असता त्या ज्ञानसूर्यप्रभेच्या नुसत्या स्मरणाने आमचा व्यवहार सुरळीत चालावा कसा?…… सर्व जगाचे नेतृत्व मिळविण्याची हाव काही वाईट नाही; पण ती सिद्धीस जाण्यास प्रयत्नही त्याच तोडीचे असले पाहिजेत. पूर्वजांच्या थोरवीचे गोडवे गायिल्याने किंवा दुसर्याने ते गायिलेले ऐकून ‘शाबास’ – ‘शाबास’ म्हणून नुसते आकाश दणाणून सोडल्याने ते नेतृत्व मिळणे नाही. तात्पर्य, जोपर्यंत पूर्वजांच्या पोकळ स्तुतीपलीकडे आमची मजल जाणार नाही तोपर्यंत ‘सांगे वडिलांची कीर्ति तो एक मूर्ख या समर्थोक्तीचेच आम्हांस वाटेकरी व्हावे लागेल हे आमच्या लोकांनी ध्यानात ठेवावे.