हिंदु धर्मात बरीच व्यंगे आहेत म्हणून यहुदी, महंमदी, ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसर्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणार्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेच, आमचे काहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरे नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणे हे केवढे मूर्खपण आहे बरें? ज्या देशांत आपले शेकडों पूर्वज जन्मास आले, वाढले व मरण पावले; ज्या देशांतील हजारों पिढ्यांनी अनेक गोष्टींत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचें फळ आपणांस ऐतेच प्राप्त झालें – अशा देशांतील धर्माचा, रीतीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणार्या मनुष्यास खन्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही. स्वभुमीत, स्वलोकांत, स्वधर्मात आणि स्वाचारांत राहून अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छलास न भितां, त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधीं लाडीगोडी लावून, अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यांतच खरी देशप्रीति, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरें शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे. याच्या उलट जे वर्तन करतात ते सुधारणा करीत नाहीत तर फक्त शृंखलांतर करतात.