२१ जानेवारी १९८२. बरोबर १०० वर्षापूर्वी याच दिवशी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी वामन मल्हार जोशी ह्यांच्या रूपाने सौजन्य मूर्त झाले. थोर तत्त्वज्ञ, युगप्रवर्तक कादंबरीकार, निस्सीम सत्योपासक, वाचकांना विचार करावयास शिकविणारे समर्थ अध्यापक, इत्यादी अनेक नात्यांनी वा. म. जोशी आपल्याला परिचित आहेत. परंतु महाराष्ट्रास सर्वाधिक प्रभावित केले ते त्यांच्या सौजन्याने. सौजन्य हा त्यांच्या आचाराचा, विचाराचा, लेखनाचा के अध्यापनाचा स्थायीभाव होता. सहिष्णुता, वात्सल्य, प्रेम, त्याग, साधुत्व हे गुण त्यांच्या अंगाखांद्यावर एखाद्या लडिवाळ बालकाप्रमाणे निर्धास्तपणे खेळत, बागडत. आपल्या साठ वर्षांच्या आयुष्यात त्यांना अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले. ऐन उमेदीत राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना अकारण भोगावी लागलेली तीन वर्षांची सक्त-मजुरीची शिक्षा, तुरुंगातून सुटून आल्यानंतर सोसावी लागलेली आर्थिक दुरवस्था, राजद्रोह्याच्या वाट्याला येणारे अस्थिर जीवन आणि हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रमसंस्थेत स्थिर जीवन लाभताच ओढवलेला पत्नीचा मृत्यू-इत्यादी प्रखर आघातांनीही त्यांची शांत व सहनशील वृत्ती कधी ढळली नाही की त्यांच्या सौजन्यावर अगदी लहानसा ओरखडाही त्यामुळे कधी उमटला नाही.
त्रिवेणी संगम
अस्थिर जीवन कंठीत असतानाच त्यांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. त्यांच्या वाङ्मयाचा आवाका लक्षणीय असा आहे. सुशिक्षित व सुसंस्कृत स्त्रीच्या आंतरिक सामर्थ्याचा व उज्ज्वल कर्तृत्वाचा मनोज्ञ आलेख काढणाच्या पाच कादंबच्या, साहित्य, समाज, राजकारण इत्यादी विषयांचा साधकबाधक विचार करणारे चार निबंधसंग्रह, त्यांचे नाव सर्वतोमुखी करणारा मराठीतील पहिलाच (आणि अजूनही अद्वितीय राहिलेला) ‘नीतिशास्त्रप्रवेश’ हा ग्रंथ, टिळकांच्या गीतारहस्याचे A Gist of Gita Rahasya हे इंग्रजीत काढलेले सार, थोर ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याच्या काही संवादांचे ‘सॉक्रेटिसाचे संवाद’ हे भाषांतर, एक लघुकथा-संग्रह, एक नाटक व एक ललित लेखसंग्रह अशी एकूण १५ पुस्तके लिहून मराठी वाङ्मयाच्या विचारवैभवात व भावसंपदेत त्यांनी बहुविध आणि बहुमोल भर टाकली आहे. परंतु वाड्मयापेक्षा जीवन उच्चतर आहे या त्यांच्या मताप्रमाणे त्यांचे जीवन खरोखरीच त्यांच्या वाड्मयापेक्षाही अधिक श्रेष्ठ होते. सत्य, सौन्दर्य व सौजन्य यांचा दुर्मिळ त्रिवेणीसंगम त्यांनी आपल्या जीवनात साधला होता. प्रो. विजापूरकरांबद्दल त्यांनी काढलेले पुढील उद्गार जोश्यांच्या जीवनालाही तंतोतंत लागू पडतात. जोशी लिहितात, “दुःखांना भिता काय? दु:खे येतील आणि जातील; प्राण देखील जावयाचे आहेत, मग सुखदुःखाचे काय? जगात कोठे चिरंतनत्व असेल तर ते सद्भुद्धीत व सत्कार्यातच आहे.” आपल्या संपन्न जीवनातून व सकस वाड्मयातून जोश्यांनी जे विचार मांडले, त्यांचा एका लेखात साररूपानेही परामर्श घेणे अशक्य असल्यामुळे त्यांपैकी काही पैलूंचे ओझरते दर्शन घेण्यातच समाधान मानणे भाग आहे. राजद्रोहासाठी शिक्षा १९०६ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम. ए. झालेल्या जोश्यांनी पोस्टखात्यातील चालून आलेली सुपरिटेंडेंटची जागा राष्ट्रसेवेच्या ध्येयामुळे नाकारली व मानमरातबाच्या जीवनाकडे पाठ फिरवून प्रो. विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयात नोकरी करून फकिरी पत्करली. पुढे अध्यापनाबरोबरच ‘विश्ववृत्त’ या नियतकालिकाच्या संपादनाचे काम करीत असताना त्यात प्रसिद्ध झालेल्या पंडित सातवळेकरांच्या एका लेखामुळे संपादक या नात्याने त्यांच्यावरही राजद्रोहाचा आरोप येऊन त्यांना तीन वर्षे सक्तमजुरीची कैद झाली. तुरुंगात त्यांना फार हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, पण त्यामुळे ते खचले किंवा डगमगले नाहीत. उलट तुरुंगवासातील अनुभव – मंथनातून या विचारवंताने ‘माझ्या अनुभवाचे व विचारांचे सार रूपी नवनीत काढले व महाराष्ट्रास अनमोल असा पुढील संदेश दिलाः
‘‘सत्य-सौन्दर्य – सौजन्यासक्तिधर्मो हि तात्त्विकः
वेष- भाषा- जाति-वर्णा गौणाश्चैवानुषंगिकाः ”
माणुसकीचा साक्षात्कार
सत्य, सौन्दर्य व सौजन्य यांवर नितांत निष्ठा असणे हाच तत्त्वतः धर्म होय. पोषाख, भाषा, जाती, वर्ण या गोष्टी गौण आहेत व अनुषंगाने येणार्या आहेत. अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महान संदेशाचा प्रेरक होता बायकोचा खून केल्यामुळे तुरुंगवास भोगणारा गोमल नावाचा एक पठाण कैदी. सिंध हैद्राबाद येथील तुरुंगात असताना या धर्मवेड्या, अंशिक्षित व खुनी कैद्याने जोश्यांना जी माणुसकीची वागणूक दिली ती पाहून जोशी कृतज्ञतेने अंतर्बाह्य भारावून गेले. रमजानच्या उपासाने अत्यंत कृश झालेला असतानाही तुरुंगाचा नियम मोडून ‘त्याने चक्की पिसण्याच्या कामात जोश्यांना मदत केली’, आपल्या वाटणीतील पोळ्या दिल्या. याच्या उलट तेथील एका हिंदू डॉक्टरने जोश्यांना अत्यंत निर्दयतेने वागविले व आमांशाने आजारी असलेल्या त्यांना स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेली एक साधी लंगोटी देण्याचेही नाकारले. या अनुभवातून ‘सौजन्य हे वेष, भाषा, जाती किंवा धर्म यांवर अवलंबून नसून ते माणुसकीवर अवलंबून आहे आणि ही माणुसकीच मनुष्याला मनुष्यत्व देते’ या मौलिक सिद्धान्ताचा साक्षात्कार त्यांना झाला. पुढे आयुष्यभर आपल्या विचारातून व लिखाणातून त्यांनी हा सिद्धांत वाचकांच्या अंत:करणावर बिंबविला आणि त्याचबरोबर त्या उपकारकर्या पठाणालाही अमर केले.
स्त्रीशिक्षणाला महत्त्व १८१४ साली जोशी महर्षि कर्वे यांच्या संस्थेस जाऊन मिळाले व त्यानंतरची पंचवीस वर्षे त्यांनी हिंगण्यासारख्या आडगावी राहून स्त्रीशिक्षणार्थ वेचली. हे कार्य करीत असताना स्त्रियांना शिक्षण व स्वातंत्र्य दिल्यास त्या किती मोठ्या होऊ शकतील, हे दाखविणाच्या पाच कादंबच्या त्यांनी लिहिल्या व त्यांतून सुशिक्षित स्त्रीकडे पाहण्याची न्यायी व विशाल दृष्टी वाचकांना दिली. स्त्रियांनी सदैव ऋणी राहावे अशी ही मोलाची कामगिरी आहे. समस्यांची कुशल उकल आज आपल्यासमोर साहित्य, धर्म, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत त्या जोश्यांच्या काळातही होत्याच. प्रत्येक कालखंडात त्या असतातच, फक्त त्यांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. या समस्यांची जोश्यांनी केलेली कुशल उकल पाहिली की अचूक मार्गदर्शनाचे त्यांचे सामर्थ्य केवढे मोठे होते हे लक्षात यावे.
कला व शासन यांसंबंधी आज आपल्यासमोर जो प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे त्याची जोश्यांनी केलेली मीमांसा किती मौलिक आहे पाहा. ते म्हणतात,”हल्लीच्या स्वातंत्र्यवादाच्या युगात लेनिन-स्टॅलिन -गांधी-नेहरू यांच्यासारख्या लोकहितपर व्यक्र्तीनीही जरी म्हटले की अमुक कलावंताने अमुक प्रकारची कलानिर्मिती करावी, तर माझ्यासारख्यांना तरी ते तत्त्वदृष्ट्या पटणार नाही. एक तर असल्या व्यक्ती अलौकिक असल्या तरी त्या स्खलनशील असतात. दुसरे असे की, या व्यक्ती कितीही चांगल्या असल्या तरी सर्वाधिकार चालविण्याची संधी दिली गेल्यास त्यांना ती सवय किंवा चटकच लागते…तिसरे असे की, अमुक एक प्रकारची व ध्येयाची कलानिर्मिती पाहिजे अशा नियंत्रणाचा कलावंताच्या स्वैर विकासाला व विहाराला बाधच होतो… चवथे कारण म्हणजे पर-प्रेरित व परनियंत्रित नीतिमत्ता जशी खरी नीतिमत्ता नव्हे, त्याचप्रमाणे पप्रेरित व परनियंत्रित कला बाहयत: कितीही चांगली दिसली तरी ती खरी कला नव्हेच. कला काय, नीती काय किंवा सत्यप्रीती काय पूर्ण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेतच फोफावते, फुलते आणि सुफलदायी होते.”
वाङ्मयातील अश्लीलता व वास्तवता यावर वेळोवेळी जे आक्षेप घेतले जातात त्यांना जोशी एकाच वाक्यात उत्तर देतात की, “जीवनात कला नसेल तर ते बेचव, नीरस, कळाहीन होईल हे खरे, पण सत्य नसेल तर ते लुळे, आंधळे, पांगळे होईल आणि नीति नसेल तर ते रोगट, कुजके, नासके होईल.” असत्य, दुर्जनता व हरत-हेची कुरूपता यांचा विनाश करणे, व सत्य, सौजन्य आणि सौन्दर्य यांचे संस्थापन करणे हेच वाड्मयसेवकाचे ध्येय ते मानतात. अन्याय, परतंत्रता, दौर्जन्य ही कोठेही व कोणत्याही क्षेत्रात असोत त्याला ती असह्य व अवंद्य वाटली पाहिजेत. हे व्रत त्याने स्वीकारले तर तुष्टी, पुष्टी व शांती यांचा लाभ सर्वांना मिळून दैवी संपत्तीचे जगात साम्राज्य होईल. कर्तव्याचा सात्त्विक आनंद साध्या साध्या प्रश्नांतून वाचकांना महान दृष्टी देण्याचे जोश्यांचे सामर्थ्य विलक्षण आहे. नाटकात पार्ट करणे चांगले की नाटक पाहणे चांगले या प्रश्नावर त्यांनी केलेले भाष्य महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ न शकलेल्या असंख्य लोकांना दिलासा देणारे व पराभवाने खचून न जाता ताठपणे उभे राहण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण करणारे आहे. जोशी म्हणतात की, या प्रश्नाचे उत्तर ‘नाटक पाहणे चांगले’ असे अनेक स्त्री-पुरुषांकडून आलेले मी ऐकले आहे. मग जगाच्या नाटकात कोणाला प्रमुख पार्ट मिळाला नाही तर त्याने जगाचे नाटक प्रेक्षकाप्रमाणे पाहात का राहू नये? पण तसे न होता माणूस दुःखीकष्टी होतो. जग हा एक क्रिकेटसारखा खेळ असे कल्पिले तर हजारो लोकांसमोर क्रिकेट खेळण्याचा मान मिळविण्याची महत्त्वाकांक्षा असणे अभिनंदनीय आहे. पण ही मान मिळाला नाही म्हणून क्रिकेटचा सामना पाहण्याची मौज का गमवावी? नाटकात काय, क्रिकेटच्या सामन्यात काय किंवा जगाच्या व्यवहारक्षेत्रात काय, पुढे येण्याचा मान थोड्यांनाच मिळू शकणार. बाकीच्यांना पडद्यात किंवा बाहेर राहून प्रेक्षकांचेच काम करावे लागणार. पण हे काम काय वाईट? उलट काही बाबतींत हे काम अधिक आनंददायी आहे. यशस्वी लोकांना यशामुळेच कशा अडचणी येतात, त्यांच्यावर अधिक जबाबदार्या व अधिक काळजांचा भार कसा पडतो, अधिक मोहप्रसंग कसे येतात, व त्यांच्यात अधिक दुरभिमान, अधिक ढोंग, अधिक उर्मटपणा इत्यादि दोष उत्पन्न होण्याचा कसा संभव असतो हे सूक्ष्मपणे पाहिले तर त्यांची स्थिती म्हणजे अति सौख्याची खाण असते अशातला काही प्रकार नाही हे मनात ओळखून आपले जे कर्तव्य आहे ते करीत राहण्यातच आपण आपल्या व इतरांच्या सात्त्विक आनंदात भर घालू शकतो हे आपल्या लक्षात येईल.
अनाग्रही व सत्यनिष्ठ
जोश्यांचा सर्वांत महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांच्या ठायी असलेला ज्ञानोपासनेने येणारा अनाग्रह व अपरिहार्य गोष्टींचा स्वीकार करण्याचे सामर्थ्य, प्रत्येक प्रश्नाच्या सर्व बाजू पाहण्याच्या त्यांच्या सत्यनिष्ठ वृत्तीमुळे लोक त्यांना ‘संशयात्मा’ म्हणत. त्याबद्दल ते म्हणतात,“कोणत्याही विषयाच्या सर्व बाजूंचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची वे असा विचार करावयास लावण्याची माझी जी वृत्ती आहे, तिचे महत्त्व अद्यापि पुष्कळ लोकांना कळलेले नाही… या कर्मभूमीत ‘संशयात्मा विनश्यति’ म्हणतात हे मला माहीत आहे. कार्यकत्र्यांना जन्मभर बुद्धीच्या हिंदोळ्यांवर बसून अनुकूल-प्रतिकूल विचारांच्या आंदोलनात काळ घालविणे शक्य नाही, त्यांना पुष्कळ वेळा निश्चयात्मक वृत्ती स्वीकारावी लागते व त्याप्रमाणे वागावे लागते, हे मला समजते… पण असे काही प्रसंग नसता अनिर्णीत स्थिती वाईटच. सर्वांगीण विचार म्हणजे विकार, अनिश्चय म्हणजे अर्धवटपणा, अशा प्रकारची विचारसरणी स्वीकारून घाईने निश्चय करणे हे में ईट समजतो… काही लोकांचे कर्तव्यकर्म विचार करण्यास शिकवायचे हे असते, वे काही लोकांचे कर्तव्यकर्म त्यांना संमत अशा सन्मार्गाचे अवलंबन करण्यास लोकांना लावावयाचे असे असते. युद्धात गुंतलेले सेनानायक, राजकीय कार्यकर्ते, पुढारी, संस्थेचे चालक व पुरस्कर्ते, चळवळे, खटपटे अशा लहानमोठ्या लोकांचे कर्तव्यकर्म दुसर्या प्रकारचे असते; कलावंत तत्त्वजिज्ञासू, शास्त्रसंशोधक, शिक्षक वगैरे लोकांपैकी काहींचे तरी कर्तव्यकर्म पहिल्या प्रकारचे असते; त्यांनी निर्णयाबद्दल घाई करण्याचे कारण नसते. .. मी विद्यार्थिनींमध्ये आणि वाचकांमध्ये यांत्रिक रीतीने लाखो आयते गोळीबंद सद्विचार व सद्भावना उत्पन्न करू शकलो आणि सद्विचार व सद्भावना कशा ओळखाव्यात हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलेले नसेल, तर माझे समाधान होणार नाही… पण त्यांच्यामध्ये मी जर सद्विचार करण्याची व ओळखण्याची, तसेच सद्भावनांनी प्रेरित होण्याची व त्यांची मूल्यमीमांसा करण्याची शक्ती निर्माण केलेली असली तर मला धन्यता वाटेल!”… ही त्यांची शिकवण जर शिक्षकांनी स्वीकारली तर आज सर्वत्र जी असहिष्णुता, एकांगी व हटवादी वृत्ती दिसत आहे व त्यातून जी कटुता निर्माण होत आई तिला केवढा तरी आळा बसेल. विरोधई सौजन्ययुक्त हवा विविध पक्षांत, गटांत, धर्मांत, जातींत जी विलक्षण बेदिली आज माजली आहे व त्यामुळे त्यांच्यात जो कड़वा द्वेष निर्माण झाला आहे, त्यातून समाजाला वाचवारचे असेल तर जोश्यांच्या विचारसरणीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही. जोश्यांच्या काळी पंथापंथामध्ये असलेला द्वेष पाहून ते इतके व्यथित होत की ‘अशा भांडणत आनंद मानणाच्या समाजात राहणे नको असे कित्येक वेळा वाटू लागते असे दु:खोद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडत. रानडे, आगरकर, गोखले, गांधीजी यासारया व्यक्तींचा प्रतिपक्ष जो अवमान करी, तो पाहून जोश्यांना वाटे, महाराष्ट्राला अद्यापि सौजन्याचा अंतरात्माच कळला नाही. या जगात पूर्ण सत्य कोणाच्याच हाती न लागल्याने मतभेद होणे, पक्षापक्षामध्ये विरोध असणे अपरिहार्य ठरते. पण जोशी म्हणतात, हा विरोध सौजन्ययुक्त असला तरच फलदायी होऊ शकतो. या दृष्टीने विचारविहार या त्यांच्या निबंधसंग्रहातील ‘पक्षभेद आणि पक्षद्वेष’ आणि ‘पुढारी क्लबात वामनराव’ हे दोन लेख अत्यंत वाचनीय आहेत. त्या काळात जहाल व मवाळ पक्ष आणि केसरीव ज्ञानप्रकाशही वृत्तपत्रे यांच्यात माजलेला उभा दावा पाहून अतिशय अस्वस्थ झालेल्या जोश्यांनी लो. टिळकांना विचारले की, “दोन्ही पक्षांची मंडळी इतकी चांगली, स्वार्थत्यागी असून त्यांच्यांत भांडण का असावे?” यावर टिळकांनी त्यांना सांगितले की, “वामनराव, तुम्ही बाहेर बाहेर राहता, तत्त्वज्ञाची भूमिका घेऊन, तटस्थ राहून निरीक्षक म्हणून पाहता. त्यामुळे तुम्हाला वाटते की हे लोक उगीच भांडतात. पण उत्साहाने ‘आपण एक काम करणार’ असा निर्धार करून तुम्ही काम करू लागा आणि विरोधी पक्षाकडून तुम्हाला अडथळे येऊ द्या, मग तुमची शांत वृत्ती राहते का पाहू.” टिळकांचे हे मत जोश्यांना पूर्णपणे पटले नाही. कारण ते म्हणतात की सत्य महान आहे. प्रत्येकाला त्याचा काही विशिष्ट भाग दिसत असतो. तसेच राष्ट्राच्या प्रगतीचा प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे की तो एकट्या दुकट्याला सोडविणे अशक्य आहे. देशाच्या उन्नतीच्या दृष्टीने आज नानात हेचे प्रश्न आपल्यापुढे आहेत. त्यासाठी अनेकांच्या अनेक प्रयत्नांची जरुरी आहे. ज्याने त्याने आपापल्या बुद्धीप्रमाणे व सामथ्र्याप्रमाणे त्यातील भाग उचलावा. त्यासाठी दुसर्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. जगाचा इतिहास पाहिला तर अकलेचा मक्ता कोणा एकाला दिलेला नाही असे आढळून येईल, म्हणून आपल्या मताबद्दलचा दुराग्रह धरणे गैर आहे. पूर्ण सत्य कोणत्याही एका कवीच्या, इतिहासकाराच्या, दर्शनकाराच्या किंवा धर्मसंस्थापकाच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे ज्याला जो सत्याचा अंश कळेल व पटेल त्याची कास त्याने धरावी. विविध प्रश्नांसंबंधी मतभेद होणे स्वाभाविक आहे. परंतु हे मतभेद प्रामाणिक असले पाहिजेत व त्यांचे विशेष स्तोम माजविण्याचे कारण नाही. तीच गोष्ट पक्षभेदांची. पक्षभेद अपरिहार्य आहेत, पण पक्षद्वेष अपरिहार्य नाहीत. धर्मयुद्धे व्हावीत.
‘माझ्या अनुभवाचे व विचाराचे सार’ या लेखामध्ये जोश्यांनी हलकटपणाचा विरोध आणि सौजन्ययुक्त विरोध यांतील फरक दाखविताना आयर्लंडमधील एका आदरयुक्त युद्धाचे दिलेले उदाहरण प्रत्येकाने मनावर कोरून ठेवण्यासारखे आहे. इंग्लंडचा आयर्लंडशी तह झाला, तो डी व्हॅलेरा यांच्या काही अनुयायांना मान्य नव्हता; आणि निर्भेळ स्वातंत्र्याकरिता पूर्वी इग्लिशांशी लढले त्यांना आता तह मान्य करणाच्या स्वकीयांशी लढणे प्राप्त झाले. अशा प्रसंगी काही उज्ज्वल देखावे दिसून आले. डी.व्हॅलेरांच्या एका अनुयायाला त्याच्या मित्रानेच पकडून तुरुंगात टाकल्यावर त्याची रीतसर चौकशी होऊन गोळी घालून त्याला दुसरे दिवशी बारा वाजता ठार करण्याचे ठरले. आपणाला अत्यंत प्रिय असणाच्या मित्राला ‘तुरुंगात ठार करविण्याचे कटू कर्तव्य त्याच्या नशिबी आले व त्याने ते बजावलेही. परंतु बाराच्या ठोक्याला आपल्या मित्रावर गोळी झाडली जाऊन तो मृत झाला हे ऐकेपर्यंतच कर्तव्यनिष्ठुरता त्याला स्वीकारता आली. कारण तो लगेच रडू लागला व थोड्याच अवधीत निश्चेष्ट पडला. कालांतराने सावध झाल्यावर मृत मित्राच्या मृत्युपत्राचा कागद त्याने पाहिला. त्यात लिहिले होते की, ‘कर्तव्यनिष्ठेमुळे माझ्यासारख्या मित्राला मारण्यास देखील तू कमी केले नाहीस हे पाहून तुझ्याबद्दल माझा आदर पूर्वपेिक्षाही अधिक झाला आहे, आणि म्हणून माझी सारी इस्टेट मी तुझ्या स्वाधीन करतो. तिचा विनियोग तू पाहिजे तसा कर.’ जोशी म्हणतात,‘अशा प्रकारची धर्मयुद्धे मला पाहिजे आहेत.’
सत्य, सौजन्य व सौन्दर्य यांचे महत्त्व महाराष्ट्राला पटविणाऱ्या, जीवनातील विविध संकटांना, अडीअडचणींना बिनतक्रार सामोरे जाण्याचे बळ त्याच्यात निर्माण करणाच्या व त्याला विचार करावयास शिकवून स्वावलंबी करणार्या या थोर तत्त्वज्ञास त्याच्या जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन!